Next
कृष्णधवल निसर्गचित्रांचा किमयागार
BOI
Thursday, April 12, 2018 | 03:16 PM
15 0 0
Share this story


‘क्रुकवेल’ हे आगळेवेगळे तंत्र वापरून काळ्या, पांढऱ्या रंगात निसर्गचित्रे साकारणारे पुण्यातील चित्रकार उमाकांत कानडे यांच्या चित्रांची रशियात सध्या सुरू असलेल्या दहाव्या आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शनासाठी निवड झाली आहे. ११ एप्रिलला सुरू झालेले हे प्रदर्शन १५ एप्रिलपर्यंत सुरू राहणार असून, पुण्यातून निवड झालेले ते एकमेव कलाकार आहेत. या निमित्ताने उमाकांत कानडे यांची प्राची गावस्कर यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत... 
...........
- ‘क्रुकवेल’ हे तंत्र तुम्ही कसे अवगत केलेत? कधीपासून तुम्ही ते वापरत आहात? 
- साधारण १९८४-८५च्या सुमारास मी पुण्यात चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी आलो. अभिनव कला महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. तिथे माझे गुरू दिलीप कदम यांच्याकडे मी अर्धवेळ काम करत असे. ‘अमर चित्रकथे’चे महाभारत, राज कॉमिक्स, मनोज कॉमिक्स यांची कामे ते करत होते. या कॉमिक्समध्ये इंकिंगच्या साह्याने चित्रे साकारली जात. वेग दाखवायचा असेल, तर त्यासाठी ‘क्रुकवेल’ तंत्राचा वापर केला जात असे. हे तंत्र मी पहिल्यांदा तिथे बघितले. हळूहळू ते शिकून घेतले. त्यावर चांगला हात बसला. कॉमिक्ससाठी काम करत असल्याने ते तंत्र मला अवगत झाले होतेच; पण त्या वेळी त्याचा वापर तेवढ्यापुरताच मर्यादित होता. नंतर ९४-९५च्या दशकात कॉमिक्सचा खप कमी झाला आणि आता काय करायचे असा प्रश्न उभा राहिला. त्या वेळी मी ठरवले, की नवीन काही शोधण्यापेक्षा ज्यावर मला प्रभुत्व मिळाले आहे, त्या ‘क्रुकवेल’चाच वापर करून यातून स्वतःचे काही वेगळेपण निर्माण करायचे. एका जागी बसून हे तंत्र वापरून चित्रे निर्माण करणे खूप कठीण आहे. २००५पर्यंत मी या तंत्राच्या साह्याने कॉमिक्सच्या पलीकडे जाऊन नवीन काही चित्रशैली साकारता येते का याचा अभ्यास केला. त्यानंतर या क्षेत्रातील माझी स्वतंत्र वाटचाल सुरू झाली. 

- या तंत्राचे शिक्षण कुठे मिळू शकते का? 
- खरे तर, हे माध्यम खास कोणी शिकवत नाही. ब्रश, रंग घेऊन शिकवण्यासारखे ते माध्यम नाही. मी दिलीप कदम यांच्याकडे अभ्यास करत असताना ते शिकलो. नंतर अनेक वर्षे त्यावर मेहनत घेऊन त्याआधारे माझी एक वेगळी चित्रशैली तयार केली. आता गेल्या काही वर्षांपासून मला त्याचे फळ मिळत आहे. 

- हे तंत्र नेमके कसे आहे, याबद्दल थोडे सांगा. 
- ‘क्रुकवेल’ म्हणजे पेनाच्या निबसारखी, सुईसारखी एक निब असते. त्याच्या साह्याने काळ्या शाईचा वापर करून बारीक रेषांच्या आधारे चित्रे साकारली जातात. त्याचा टोन बदलता येणे आवश्यक असते. चित्राची खोली दाखवण्यासाठी रंगांचे टोन जमणे महत्त्वाचे ठरते. त्याकरिता चित्रकाराला अभ्यास करणे आवश्यक असते. सुरुवातीला मी काळ्या शाईचा वापर करून निसर्गचित्रे तयार केली; पण कालांतराने शाई फिकट होत असे आणि चित्र खराब दिसत असे. मी प्रयोग करून अॅक्रेलिक रंग पातळ करून त्याचा वापर करण्यास सुरुवात केली. फक्त काळ्या रंगाचा वापर करून मी निसर्गचित्रे साकारतो. त्यात वेगळेपण आणण्यासाठी पक्षी, फुले, फळे असे काही घटक रंगीबेरंगी असतात. संपूर्ण चित्राच्या मानाने त्यांचे प्रमाण खूप कमी असते; पण ते चित्रामध्ये उठाव आणण्यासाठी खूपच उपयुक्त ठरते. केवळ रेषांच्या साह्याने ही चित्रे साकारली जातात. 

- रशियातील प्रदर्शनासाठी पुण्यातून तुमची निवड झाली आहे, ही खूप अभिमानाची बाब आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते?
- पुण्यातून माझी निवड झाली याचा मला आनंद आहे. मी भारती विद्यापीठात  चित्रकला शिकवतो. तिथून मला ऊर्जा मिळते. त्या मुलांना काहीतरी वेगळे देता यावे यासाठी मी प्रयत्नशील असतो. या सगळ्या धडपडीचा हा परिपाक आहे, असे मला वाटते. माझ्या संस्थेकडूनही मला नेहमीच पाठबळ मिळाले आहे. माझ्याबरोबर देशातील १५ कलाकार आहेत. 

- तुमच्या बहुतांश चित्रांमध्ये मध्यभागी सर्कल दिसते आणि काही छोटी चित्रे वेगवेगळ्या रंगात रंगवलेली दिसतात? याचा नेमका उद्देश किंवा अर्थ काय?
- काळ्या रंगातील वेगवेगळ्या शेड्समध्ये साकारलेल्या या चित्रांत मी मध्यभागी वर्तुळ काढायला सुरुवात केली. प्रत्येक गोष्टीचा एक केंद्रबिंदू असतो. आयुष्यातही कोणत्या तरी गोष्टीवर फोकस करावे लागते. असा संदेश यातून मला द्यायचा आहे. एक वेगळा प्रयोग म्हणून मी हे करून पाहिले आणि ते यशस्वीही ठरले. तीच बाब रंगीबेरंगी छोट्या चित्रांची. माझी चित्रे ही निसर्गचित्रे आहेत. सगळ्यांना रंग आवडतात. माणसाचे लक्ष वेधले जाते ते रंगाकडे. त्यामुळे मोठमोठ्या काळ्या रंगातील चित्रांमध्ये आकर्षक रंगातील पक्षी, फळे, फुले रंगवण्याचे तंत्र मी वापरले आहे. त्यामुळे चित्राला अधिक उठावही येतो. त्याचे सौंदर्य आणखी वाढते. 

- तुमची चित्रे बघितली तर लक्षात येते, की यात खूप बारकाईने काम करावे लागते. एक चित्र साकारायला किती दिवस लागतात? 
- ‘क्रुकवेल’ तंत्रज्ञानाचा वापर करून चित्र तयार करताना चित्र किती मोठे आहे, त्यात पांढरा भाग किती सोडायचा आहे, किती बारीक काम करायचे आहे, या सर्व बाबींचा विचार करावा लागतो. सरावाने काही गोष्टी झपाट्याने होतात, तरीही साधारण दोन बाय तीन फूट आकाराचे एक चित्र तयार करायचे असल्यास किमान २० ते २५ दिवस लागतात. 

या कलाप्रवासाचा तुमच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला?
- या चित्रतंत्राचा अभ्यास करून त्यात काम करण्यासाठी मी अनेक वर्षे घालवली. आता त्याचे फळ मिळू लागले आहे. या सगळ्या प्रवासाने मला निस्सीम आनंद दिला आहे. कुठलीही आवडीची गोष्ट करताना आनंदच मिळतो. रोजच्या एकसुरी आयुष्यात आपल्याला येत असलेली कोणतीही कला आपल्याला आनंद देऊ शकते. त्यामुळे मी सगळ्यांना असे सांगेन, की तुम्हाला कोणतीही कला येत असेल तर तिचा थोडासा अभ्यास करा, ती तुम्हाला सगळे त्रास विसरून जाण्यास नक्कीच मदत करेल. 

- पुढच्या योजना काय आहेत? 
- या चित्रतंत्रात मी आणखी काही प्रयोग करू शकेन असे मला वाटत नाही; पण याच्या साह्याने ज्या प्रकारची चित्रे मी काढत आहे, त्यात काही नवीन प्रयोग, बदल करून बघणार आहे. ग्रे रंगाचा वापर करण्याचा माझा मानस आहे. 

(उमाकांत कानडे यांच्या चित्रतंत्राचे प्रात्यक्षिक दाखविणारा आणि त्यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link