Next
पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ युवक महोत्सवाला सुरुवात
‘युवास्पंदन’चे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
प्रेस रिलीज
Wednesday, December 19, 2018 | 04:17 PM
15 0 0
Share this story

गिरीश कुलकर्णीराजदत्तपुणे : ‘ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक राजदत्त आणि अभिनेता-दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ‘युवास्पंदन’ या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ युवक महोत्सवाचे १९ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी उद्घाटन होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आयोजित हा महोत्सव चार राज्यांमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा एक महायज्ञ ठरेल,’ असा विश्वास भारतीय विद्यापीठ महासंघ (एआययू) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे व्यक्त करण्यात आला.

महोत्सवाच्या आयोजनाची माहिती देण्यासाठी महासंघ आणि विद्यापीठातर्फे विद्यापीठामध्ये १८ डिसेंबरला एकत्रित पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, महासंघाचे प्रतिनिधी आणि ‘युवास्पंदन’चे निरीक्षक प्रोफेसर सुरिंदर मोहन कांत, महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष आणि विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, अधिसभा सदस्य बागेश्री मंठाळकर, विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई उपस्थित होते. पुणे विद्यापीठामध्ये पहिल्यांदाच होणाऱ्या या पश्चिम विभागीय युवक महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख इतर राज्यांसमोर मांडण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळ दुपारी तीन वाजल्यापासून उद्घाटन समारंभाला सुरुवात होणार आहे. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. महोत्सव आयोजन समितीचे सर्व प्रतिनिधीही या वेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती पांडे यांनी दिली. विद्यापीठाला या स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाल्याविषयी डॉ. उमराणी यांनी या वेळी महासंघाचे आभार मानले. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी विद्यापीठाचे सर्व घटक सक्रीय सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. हा महोत्सव विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या बहुआयामी विकासासाठीही उपयुक्त ठरण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विद्यापीठाने महोत्सवासाठी निर्माण केलेल्या व्यवस्था अत्यंत उत्तम असून, त्या आधारे हा पाच दिवसांचा उपक्रम यशस्वी होईल, असा विश्वास प्रा. कांत यांनी व्यक्त केला. विद्यापीठामध्ये सध्या सुरू असलेली कामे विचारात घेत, त्यांनी स्पर्धेच्या आयोजनालाही शुभेच्छा दिल्या.

महोत्सवादरम्यान विद्यापीठातर्फे ‘कलाकार कट्टा’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या अंगण मंचावर आयोजित या उपक्रमाद्वारे उपस्थित विद्यार्थ्यांना दिग्गज कलाकारांसोबत थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. या माध्यमातून २० डिसेंबरला सायंकाळी ५.३० वाजता सतीश पाकणीकर व संदेश भंडारे यांच्याशी गप्पा रंगतील. २२ डिसेंबरला सकाळी नऊ वाजल्यापासून मुक्ता बर्वे, योगेश सोमण, मकरंद साठे यांच्याशी, तर त्याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून पुढे सुचेता चापेकर, मनिषा साठे आणि श्रीनिवास जोशी या कलाकारांसोबत कट्ट्यावरील गप्पांचा आनंद विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. महोत्सवातील सहभागी स्पर्धकांसोबत स्थानिक विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन पांडे यांनी या वेळी केले.

या महोत्सवासाठी उभारलेल्या कलामंचांना संबंधित क्षेत्रातील दिग्गजांची नावे देण्यात आली आहेत. त्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना दिग्गज कलावंतांच्या कार्याची ओळख करून दिली जाणार आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांची जन्मशताब्दी असल्यामुळे महोत्सवातील मुख्य मंडपाला ‘पु. ल. देशपांडे मुख्य सभामंच’ असे नाव देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री लालन सारंग यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संत नामदेव सभागृहाला ‘लालन सारंग नाट्यमंच’, तर वाणिज्य विभागातील सभागृहाला ‘प्रल्हाद केशव अत्रे विचारमंच’ असे नाव दिले आहे. तेथे प्रश्नमंजुषा, वादविवाद आणि वक्तृत्व या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.

पंडित भीमसेन यांच्या स्मरणार्थ पुम्बा सभागृहाला ‘पंडित भीमसेन जोशी स्वरमंच’ असे नाव देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम शिल्पकार बी. आर. खेडकर यांच्या नावे विविध ललित कलांसाठी सज्ज असलेला सेवक विहार येथील कलामंच ओळखला जाणार आहे, तर पाश्चिमात्य संगीताच्या स्पर्धांचे आयोजन असलेले संत ज्ञानेश्वर सभागृह या दरम्यानच्या काळात ‘आर. डी. बर्मन संगीतमंच’ म्हणून ओळखला जाणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link