Next
‘अलेक्झांड्रिया ग्रंथालय एशियाटिक सोसायटीशी सहकार्य करण्यास उत्सुक’
प्रेस रिलीज
Thursday, April 25, 2019 | 12:31 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘इजिप्तमधील दुसरे मोठे शहर असलेल्या अलेक्झांड्रिया येथील जगप्रसिद्ध अलेक्झांड्रिया ग्रंथालय मुंबईच्या एशियाटिक सोसायटीशी सहकार्य करण्यास उत्सुक आहे. या संदर्भात आपण लवकरच एशियाटिक सोसायटीच्या विश्वस्तांशी संपर्क करणार आहे,’ अशी माहिती भारतातील नवनियुक्त इजिप्तच्या राजदूत डॉ. हिबा सलाहेल्दिन अल्मारास्सी यांनी येथे दिली.

राजदूतपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच मुंबई भेटीवर आलेल्या डॉ. अल्मारास्सी यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

‘सम्राट अशोकाच्या काळापासून भारताचे इजिप्तशी राजकीय संबंध आहेत. आज या संबंधांना नव्याने चालना देण्यासाठी आपण कार्य करणार आहोत. अलेक्झांड्रिया हे मुंबईशी साधर्म्य असलेले शहर व बंदर असून, उभय शहरांमध्ये सामंजस्य करार व्हावा, तसेच मुंबई व कैरो येथील स्टॉक एक्स्चेंज यांच्या दरम्यान सहकार्य वाढावे, अशी अपेक्षा आहे. या संदर्भात मुंबईतील विविध उद्योग- वाणिज्य संस्थांच्या प्रतिनिधींशी भेट झाली आहे,’ असे त्यांनी सांगितले. 

‘इजिप्त देशाला पुरातन वारसा जतन क्षेत्रात व्यापक अनुभव असून, या संदर्भात भारताशी सहकार्य करण्यास अधिक वाव आहे. इजिप्तमधील लोक भारतीय चित्रपटांचे मोठे चाहते आहेत. भारतीय चित्रपट निर्मात्यांनी इजिप्त येथे चित्रपटांचे छायाचित्रण केल्यास त्यातून उभय देशातील पर्यटनाला चालना मिळेल,’ असा विश्वासही डॉ. अल्मारास्सी यांनी व्यक्त केला. 

इजिप्शियन इंटरनेशनल सेंटर फॉर अॅग्रीकल्चर या संस्थेमध्ये प्रगत कृषी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी शिष्यवृत्ती उपलब्ध असून, भारतीयांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. 

पश्चिम आशियामध्ये शांती आणि स्थिरता कायम ठेवण्याच्या कामी इजिप्तची भूमिका सर्वांत महत्त्वाची असल्याचे राज्यपालांनी नमूद केले. इजिप्तने महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांशी सहकार्य केल्यास आपण कुलपती या नात्याने निश्चितपणे मदत करू, असे आश्वासन राज्यपालांनी या प्रसंगी दिले.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search