Next
ताऱ्यांच्या दुनियेतली एक रात्र
मानसी मगरे
Wednesday, April 25, 2018 | 04:25 PM
15 0 0
Share this article:


पुण्यातील अंतराळ अभ्यासक आणि विज्ञान पत्रकार मयुरेश प्रभुणे यांच्या ‘संशोधन’ या संस्थेतर्फे दर वर्षीप्रमाणे यंदाही आकाशनिरीक्षण आणि उल्कापात दर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमादरम्यान आलेल्या अनुभवांचं वर्णन करणारा हा लेख....
..................
अचानकपणे मिळणाऱ्या गोष्टीचा आनंद निराळाच असतो. अशीच अगदी अचानकपणे ठरलेली एक छोटीशी ट्रिप. निमित्त होतं पुण्यातील अंतराळ अभ्यासक आणि विज्ञान पत्रकार मयुरेश प्रभुणे यांच्या ‘संशोधन’तर्फे आयोजित केलेल्या आकाशनिरीक्षण आणि उल्कापात दर्शनाच्या कार्यक्रमाचं. पुण्यापासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘तिकोना’ किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जवान नावाच्या गावात हा कार्यक्रम होता. रात्री आठ ते सकाळी सहा असा रात्रभर चाललेला हा कार्यक्रम म्हणजे खऱ्या अर्थानं अंतराळाबद्दल आणि विज्ञानाबद्दल गोडी निर्माण करणारा, कुतूहल निर्माण करणारा एक सोहळाच होता...    

पहिल्यांदाच जात असल्याने अर्थातच अतिशय उत्सुकता होती. सोबत मुलं जास्त आहेत, असं समजलं. मोठ्यांपेक्षाही लहानांचा, शाळकरी मुलांचा उत्साह प्रचंड होता. अंतराळ, ग्रह, तारे या सगळ्या मुळातच लहान मुलांच्या स्वप्नातल्या जगातल्या गोष्टी. थोडं मोठं झालं, की याच गोष्टी त्यांच्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासाचा भाग होऊन जातात. मग एका वेगळ्या दृष्टीने त्यांच्याबद्दलचं आकर्षण वाटू लागतं. सूर्य, पृथ्वी, चंद्र, वेगवेगळे ग्रह यांची माहिती पुस्तकात तर अभ्यासलेली असतेच, त्यांची चित्रंही पाहिलेली असतात. आजकाल इंटरनेटच्या जगात त्यांचे व्हिडिओजही पाहिले जातात. परंतु तो चंद्र, तो गुरू, तो मंगळ प्रत्यक्षात पाहायला मिळणार, ही कल्पनाच त्यांच्या दृष्टीने उत्साह निर्माण करणारी होती. 

मयुरेश प्रभुणेतिथे पोहोचेपर्यंत दरम्यानच्या प्रवासातच मुलांची अंतराळयात्रा सुरू झाली होती. हा ग्रह दिसेल का..? त्याचा रंग ओळखू येईल का..? हा केवढा मोठा असेल..? हे आणि असं बरंच काही सुरू होतं. सोबतच्या मोठ्यांमध्येही मग त्यांच्या पातळीवरच्या याबाबतच्या चर्चा झाल्या. तिथे पोहोचल्यावर सर्वांत आधी नजर गेली ती कार्यक्रमाच्या जागी मोकळ्या मैदानावर आधीच सेट करून ठेवलेल्या मोठ्या टेलिस्कोपवर आणि अन्य काही दुर्बिणींवर. छोटे-मोठे टेलिस्कोप पाहून लहानांनाच काय, मोठ्यांनाही त्यातून एकदा पाहण्याचा मोह आवरला नाही. 

निरभ्र आकाश, स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण, डोक्यावर लांबच लांब पसरलेला निळसर काळोख आणि त्यात लुकलुकणाऱ्या, चमकणाऱ्या असंख्य शुभ्र चांदण्या. आमच्या लहानपणी मामाच्या गावी असं आकाश पाहिल्याचं आम्हाला किमान आठवतं तरी, पण आत्ताच्या या मुलांना हे नवीनच, जादुई होतं. ‘अरे यार.. इतक्या भरगच्च चांदण्या...! एखाद्या स्टुडिओत आल्यासारखं वाटतंय ना..!!.’, अशा मुलांच्या प्रतिक्रिया ऐकून त्यांना होणाऱ्या आनंदाचा अंदाज येत होता. दररोज टीव्हीसमोर बसून केवळ हाता-तोंडाची गाठ घालत जेवणारी ही मुलं त्या दिवशी मोकळ्या आभाळाखाली एकमेकांशी गप्पा मारत जेवली. जेवणानंतर सुरू होणाऱ्या कार्यक्रमाची सगळ्यांनाच प्रतीक्षा होती आणि उत्सुकताही. 

कार्यक्रमाच्या पहिल्या भागात सूर्यमाला, ग्रह, तारे यांची प्रोजेक्टरवर स्लाइड शोच्या माध्यमातून सविस्तर माहिती देणारं एक सेशन होतं. समोर येणाऱ्या एक एक गोष्टी आपण कधीतरी शिकलोय याची आठवण देत होत्या. खरं तर आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित आणि आयुष्यभर अभ्यासावा असा हा विषय आपल्यातले बहुतांश जण शाळेनंतर विसरून जातात. शिक्षण संपल्यानंतर विषय बदलतात, क्षेत्रं बदलतात आणि मग या सगळ्या गोष्टींशी संपर्क तुटतो, अगदी कायमचा. शाळेत कुठेतरी, कधीतरी शिकलेल्या या सगळ्या गोष्टी समोर आल्या आणि एकाएकी ते तेव्हाचं सगळं आठवलं. अंतराळ, सूर्यमाला या सगळ्यांची अगदी प्राथमिक माहिती सगळ्यांना असतेच. परंतु आपली सूर्यमाला, सगळे ग्रह, उपग्रह त्यांचं स्वरूप, आकार, रंग, यांशिवाय काळानुसार त्यात होत जाणारे बदल, नवनवीन संशोधन, लागलेले शोध, त्यांचा आपल्या जगण्यावर होणारा परिणाम या आणि यांसारख्या असंख्य गोष्टी या सेशनच्या माध्यमातून उलगडल्या. माणसाने आयुष्यभर विज्ञानाचा विद्यार्थी असलं पाहिजे, किमान हा विषय तरी शिकत राहिला पाहिजे, याची प्रकर्षाने जाणीव झाली, तशी गरज वाटली.  

या अंतराळाची निर्मिती, पहिला हायड्रोजन पार्टिकल, बिग बँग थिअरी. या थिअरीच्या पहिल्या तीन मिनिटांत काय काय घडले या संदर्भात काहीशे पानांचं पुस्तक आहे. हायड्रोजनच्या अशा काही पार्टिकल्सपासून क्लाउड्सची निर्मिती आणि अशा असंख्य क्लाउड्सपासून तयार झालेला एक एक तारा. हायड्रोजनपासून हेलियम, हेलियमपासून कार्बन, कार्बनपासून ऑक्सिजन अशी ही प्रक्रिया होत जाते. तारे, किंवा न्यूट्रॉन्स यांचे सातत्याने होणारे स्फोट, या स्फोटांचे परिणाम, त्या स्फोटांमुळे तयार होणारे नवीन घटक, सूर्य, त्याचे स्वरूप, त्याचे तापमान, पृथ्वीवरील वाढत्या तापमानाची त्याच्याशी निगडित असलेली कारणे, एखाद्या विशिष्ट भागाचे सातत्याने वाढणारे तापमान, ग्लोबल वॉर्मिंग, ग्लोबल कूलिंग अशा दोन्हींचे स्वरूप, दोन्हींपैकी काय नेमकं जास्त हानिकारक अशी एकामागे एक येणारी माहिती ऐकताना, पाहताना सगळेच एकचित्त झाले होते.  

याशिवाय बुध, गुरू, शुक्र, मंगळ, शनी, प्लूटो, नेपच्यून हे सर्व ग्रह, त्यांचं स्वरूप, त्यांची वैशिष्ट्ये ज्योतिषशास्त्रानुसार सर्वांत चांगला मानला जाणारा ‘शुक्र’ कसा सर्वांत जास्त हानिकारक आणि सर्वांत वाईट, विनाशकारी मानला जाणारा ‘मंगळ’ आपल्या पृथ्वीला तारणारा ग्रह कसा आहे, यामागचे स्पष्टीकरण चकित करणारे होते. ग्लोबल वॉर्मिंग चांगलं की ग्लोबल कुलिंग हा प्रश्न विचारला गेला असताना, त्यावर ‘ग्लोबल कुलिंग चांगलं’, असं उत्तर अगदी बिनदिक्कतपणे दिलं गेलं. त्यानंतर समोर आलेलं स्पष्टीकरण असं होतं -  जागतिक तापमानवाढ किंवा ‘ग्लोबल वॉर्मिंग’ म्हणजे नक्की काय, याचा अनुभव आपण आत्ता घेत आहोतच. दर वर्षी उन्हाळ्यात तापमान वाढतं आणि हिवाळ्यात ते कमी होतं. पृथ्वीचा आस २३.५ अंश कललेला असल्यामुळं ऋतू कसे होतात, हे ज्ञान सर्वांनाच आहे. या प्रकारे दर वर्षीच उन्हाळा आणि हिवाळा हे ऋतू होतात. आपल्याकडे आणि बऱ्याच पूर्व आशियाई देशांमध्ये पावसाचा वेगळा ऋतू असतो. प्रत्यक्षात तो उन्हाळ्याचा आणि पानगळीच्या ऋतूचा भाग असतो. जेव्हा पृथ्वीचं सरासरी तापमान वाढतंय असं म्हटलं जातं, तेव्हा भूपृष्ठावरील वातावरणीय तापमानाबद्दल आपण बोलत असतो. सामान्यपणे पृथ्वीवरील उन्हाळी सरासरी तापमानाचा आकडा पूर्वीच्या वर्षीच्या सरासरी तापमानापेक्षा जास्त असतो आणि हिवाळ्यातील सरासरी तापमानामध्ये वाढ होऊन तोही आकडा वाढलेला असतो. तेव्हाच पृथ्वीचं त्या वर्षीचं सरासरी तापमान पूवीर्पेक्षा जास्त होतं असं म्हटलं जातं. 

आता ग्लोबल कूलिंग म्हणजे काय..? १९व्या शतकापर्यंत सूर्यावर असणारे डाग (सनस्पॉट्स) खूप कमी होते. या स्पॉट्सना पृथ्वीवर ‘लिटल आईसेज’ म्हटलं गेलं. हे लिटल आईसेज असतील किंवा ग्लोबल कूलिंग झालं, तर या दरम्यान बहुतांश भागावर बर्फ पसरलेला दिसेल. यामुळे संपूर्ण पृथ्वीवर दुष्काळ असल्याचं चित्र दिसेल. सगळे लोक आपापसांत भौतिक गरजांसाठी भांडताना दिसतील. असं जर असेल, तर अर्थात ग्लोबल वॉर्मिंगपेक्षा ग्लोबल कूलिंग हे नक्कीच हानिकारक आहे, असं म्हणता येईल.    

याव्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा उलगडा झाला तो मंगळ आणि शुक्र या दोन ग्रहांबद्दल. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला सांगितलं जातं, की शुक्र हा पत्रिकेत चांगला मानला जातो, त्याला शृंगाराचं प्रतीक मानलं जातं. परंतु वैज्ञानिकदृष्ट्या पाहता, नरक कुठे असेल, तर तो शुक्रावर. पृथ्वीवरून आपल्याला दिसणारा शुक्र हा शुक्र नसतोच मुळी, ते त्याच्या बाजूचे ढग असतात. आजवर जी जी अंतराळयाने या ठिकाणी उतरली आहेत, ती २० मिनिटांपेक्षा जास्त काळ तिथे राहू शकली नाहीत. या ठिकाणी पाऊस पडतो तो आम्लाचा. म्हणजेच आम्लवर्षा आणि त्याचा प्रभाव केवळ तेवढ्यापुरताच मर्यादित नसून त्याचा परिणाम पृथ्वीवरही होत असतो.  

याच्या बरोबर उलट मंगळ ग्रहाच्या बाबतीत आहे. ज्योतिषशास्त्राच्या मते पत्रिकेत मंगळ असणं अत्यंत वाईट मानलं जातं; मात्र विज्ञानाच्या दृष्टीने पृथ्वीला तारणारा कोणता ग्रह असेल, तर तो आहे मंगळ. संशोधनात मंगळावर पाणी मिळाल्याचं सांगितलं गेलं आहेच. शिवाय मंगळावर ऑक्सिजनही आहे. मंगळाचा परिवलन काळ आणि ऋतुचक्र या गोष्टी पृथ्वीसारख्याच आहेत. मंगळावरील माती अल्कधर्मी असून त्यामध्ये मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम आणि क्लोराईड आहेत. ही मातीतील पोषकतत्त्वे जीवसंवर्धन करू शकतात. त्यामुळे इतर ग्रहांच्या तुलनेत पृथ्वीसारखा कोणता ग्रह असेल तो मंगळ हा एकमेव ग्रह आहे. अशा गमतीशीर आणि अनेकांना माहिती नसलेल्या असंख्य गोष्टींचा उलगडा करत पहिलं सेशन रंगलं. 

टेलिस्कोपमधून दिसलेला चंद्रयानंतर सुरू झाला ताऱ्यांच्या दुनियेतला खरा प्रवास. मोकळ्या मैदानावरील आकाश निरीक्षणाचा तास. किट्ट अंधारात मोकळ्या मैदानावर वेगवेगळे गट करून आम्ही सगळे बसलो होतो आणि डोक्यावर दिसणाऱ्या प्रचंड आकाशात एक एक गोष्ट लेझरच्या साहाय्याने दर्शवण्याचा प्रयोग. ध्रुव तारा, सप्तर्षी, अभिजित हे तारे, स्वाती, चित्रा ही नक्षत्रे, सिंह, तूळ, वृश्चिक, कन्या या राशी अशा कितीतरी गोष्टी, असे अवकाशाचे कितीतरी घटक ज्यांच्याबद्दल आपण केवळ ऐकून असतो, वाचून असतो, त्यांचे या अंतराळातले स्थान काय...? त्यांच्या तिथे असण्या-नसण्याने काय फरक पडेल..? त्यांच्या प्रवासाचा मार्ग कोणता..? त्यांचा आपल्यावर काय प्रभाव असतो..? या पृथ्वीशी त्यांचं नातं काय..? यांचा जन्म कसा.. ? कधीचा..? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं मिळाली. 

यानंतर पुन्हा एक माहितीवजा सेशन रंगलं, त्यानंतर प्रश्नोत्तरांचा तास रंगला. मुलांची संख्या जास्त होती. म्हणूनच मग ओघाने त्यांना पडणाऱ्या प्रश्नांचीही संख्या तेवढीच. या प्रश्नोत्तरांमधूनही भरपूर नवीन गोष्टी समोर आल्या, त्यांच्यावर सविस्तर चर्चा झाली. 

उल्कापातकार्यक्रमाचा पुढचा टप्पा होता उल्कापात पाहण्याचा. ईशान्य दिशेला असलेला ‘अभिजित’ हा तारा या वेळच्या उल्कापाताचा केंद्रबिंदू होता. ‘अभिजित’ किंवा ‘वेगा’ याचं शास्त्रीय नाव ‘अल्फा लायरे’. ‘लायरा’ तारामंडळातील हा सर्वांत चमकदार तारा, तसंच पृथ्वीवरून दिसणाऱ्या ताऱ्यांपैकी पाचव्या क्रमांकाचा चमकदार तारा आहे. म्हणून यंदाच्या उल्कापाताला ‘लेयरीड मेटर शॉवर’ असंही म्हटलं गेलं.  

कोणतंही उद्दिष्ट सफल करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी एकत्रितपणे जुळून येणं म्हणजे काय, हे या ठिकाणी पाहायला मिळालं. वेगवेगळ्या क्षेत्रातली काही लोकं केवळ एखादी सारखी आवड घेऊन एकत्र येतात आणि त्यासाठी काहीतरी काम करतात. एखादा विषय, त्याबद्दलचा जिव्हाळा आणि तो लोकांपर्यंत पोहोचवण्याची तळमळ या गोष्टी अर्थातच अशा कार्यक्रमांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक ठरतात. हा अनुभव नक्कीच घेण्यासारखा आहे.

(आकाशनिरीक्षणाच्या या कार्यक्रमाची झलक दाखवणारा ‘संशोधन’चा एक व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search