Next
‘आषाढी वारीसाठी सर्व यंत्रणेने समन्वयाने काम करावे’
पालकमंत्री गिरीश बापट यांचे आवाहन
प्रेस रिलीज
Monday, June 03, 2019 | 05:00 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘पंढरपूरची आषाढी वारी महाराष्ट्रातील वारकऱ्यांचा श्रद्धेचा विषय आहे. हा आनंदी सोहळा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणेने समन्वय ठेवून काम करावे,’ असे आवाहन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयातील कौन्सिल हॉलमध्ये आषाढी वारी पूर्व तयारीची बैठक बापट यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी सोलापूरचे पालकमंत्री विजकुमार देशमुख, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, खासदार अमर साबळे, आमदार दत्तात्रय भरणे, प्रशांत परिचारक, राहुल कुल, आमदार मेधा कुलकर्णी, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पुण्याचे अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक व विविध विभागाचे अधिकारी, आळंदी संस्थान प्रमुख ॲड. विकास ढगे, संत तुकाराम महाराज संस्थानाचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे व विविध पालखी सोहळ्याचे प्रमुख उपस्थित होते.

प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सर्वांचे स्वागत करून आषाढी वारीबाबत केलेल्या तयारीची माहिती दिली. त्यानंतर तिन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिकारी, यांनी केलेल्या पूर्वतयारीची  माहिती सादर केली. या वेळी प्रधान सचिव विकास खारगे यांनी यावर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून, तीन वर्षांत ५० कोटी वृक्ष लावायचे असल्याचे सांगितले. या आषाढी वारीत वृक्ष लागवडीबाबत सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.


पालकमंत्री म्हणून ही अखेरची बैठक आहे असल्याचे नमूद करत खासदार म्हणून निवडून दिल्याबद्दल बापट यांनी आभार व्यक्त केले. या वेळी प्रातिनिधीक स्वरूपात उल्हास पवार यांचे त्यांनी स्वागत केले; तसेच सर्वांना पेढे वाटून कृतज्ञता व्यक्त केली. ‘दर वर्षीप्रमाणे हा सोहळा या वर्षीही उत्साहात साजरा व्हावा. संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराज पालखीप्रमाणेच अन्य पालख्यांची सोय चांगल्याप्रमाणे करावी. कुठल्याही प्रकारची गैरसोय होता कामा नये,’ असे बापट यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याची सोय आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्था, चोख ठेवावी. मोबाइल टॉयलेट, पाण्याचे टँकर आवश्यक त्या ठिकाणी पुरविण्यात यावे. पोलिसांनी चांगला बंदोबस्त ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

‘आळंदी देहू मार्गावरील दुरुस्तीचे काम, तसेच पालखी महामार्गावरील रस्त्याच्या दुरुस्तीची कामे पावसाळयापूर्वी पूर्ण करून घ्यावीत. पालखी तळांच्या ठिकाणी सपाटीकरण करून तात्पुरत्या स्वरूपात पुरेशा प्रमाणात शौचालये बांधण्यात यावीत. पालखी तळाच्या ठिकाणी पुरेशा पाण्याची व विजेची सोय करण्यात यावी. पर्यावरणाच्या रक्षणासाठी वरीच्या मार्गावर प्लॅस्टिक पत्रावळ्या, प्लॅस्टिक ग्लास, प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर निर्बंध आणावेत, यासाठी लोकांच्यात जनजागृती करावी,’ असे बापट म्हणाले.

वारीच्या कालावधीत वारकरी व भाविकांना आरोग्याच्या समस्या उद्भवू नयेत, यासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने सर्व पाण्याचे उद्भव तपासण्यात यावेत; तसेच आरोग्य विभागाने सर्व ठिकाणी सज्ज राहण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या. या कालावधीत कोणताही अनुचित प्राकर घडू नये. अपघात, दुर्घटना टाळण्यासाठी पोलीस विभागाने सतर्क राहण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या. या आषाढी वारीत विद्यापीठांचा सक्रीय सभाग असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search