Next
‘ज्ञान-कौशल्येच रक्षण करतील’
मनोज जोशी यांचे मत
BOI
Thursday, October 25, 2018 | 11:26 AM
15 0 0
Share this story

याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियानाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘युवा पुरस्कार’ प्रदान सोहळ्यावेळी (डावीकडून) चारुहास पंडित, प्रा. मेधा कुलकर्णी, मनोज जोशी, शेखर चरेगावकर, रविंद्र प्रभुदेसाई, वसंत नगरकर, उमाकांत जोशी व अशोक जोशी.

पुणे : ‘विपुल ज्ञान आणि श्रेष्ठ विचारांच्या जोरावरच आपल्या पूर्वजांनी समाजाचा उद्धार केला आहे. आपल्या ‘डीएनए’मध्ये सृजनशीलता असून, तिचा योग्य उपयोग करण्यासाठी आपण उद्योगाकडे वळले पाहिजे. आरक्षणापेक्षा ज्ञान आणि कौशल्येच आपले रक्षण करणार आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवे’, असे मत अभिनेते मनोज जोशी यांनी व्यक्त केले.

शुक्ल यजुर्वेदिय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियानाच्या (युवा) दहाव्या वर्धापन दिनानिमित्त चंद्रकांत जोशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘युवा उद्योजक पुरस्कार’ श्रीपाद शंकर नगरकर सराफ पेढीचे वसंत नगरकर आणि सृजन आर्ट गॅलरी पुरस्कृत ‘सृजन युवा पुरस्कार’अभिनेते पद्मश्री मनोज जोशी यांना, तर ‘कै. दिगंबर सर्वोत्तम कर्जतकर पुरस्कार’ ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल पाठक आणि ज्ञानेश्वर त्रैमासिकाचे माजी संपादक रामचंद्र कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. त्या वेळी मनोज जोशी बोलत होते.

शुभारंभ लॉन्स येथे झालेल्या सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेखर चरेगावकर, पितांबरी प्रॉडक्ट्सचे रवींद्र प्रभुदेसाई, आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, मंडळाचे उमाकांत जोशी, अशोक जोशी, अभि ग्रुप ऑफ कंपनीजचे डॉ. जितेंद्र जोशी, ‘चिंटू’कार चारुहास पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.

मनोज जोशी म्हणाले, ‘आपली वर्णव्यवस्था कधीच ‘व्हर्टिकल’ नव्हती. जातीवादाची सुरुवात परकीय आक्रमणांतून झाली आहे. इंग्रज आणि मेकॉले याने आपल्या संस्कृतीचे विभाजन केल्याने आपण जातीवादातच अडकलो. ही जातीव्यवस्था ‘व्होटबॅंक’ होतेय, हे दुर्दैव आहे. ब्राह्मण समाज धनाने गरीब असला, तरी मनाने श्रीमंत आहे. आजच्या काळात टिकायचे असेल, तर आपण नवनवीन कौशल्ये आत्मसात करून छोटे-छोटे उद्योग उभारावेत आणि इतरांना आपल्याशी जोडून घ्यावे. चाणक्यनीती अभ्यासावी कारण सर्व क्षेत्रात आणि गोष्टीत ती लागू होते.’

‘युवा पुरस्कार’ प्रदान सोहळ्यावेळी प्रा. मेधा कुलकर्णी, चारुहास पंडित, मनोज जोशी, शेखर चरेगावकर, रविंद्र प्रभुदेसाई, वसंत नगरकर, अशोक जोशी व उमाकांत जोशी.

शेखर चरेगावकर म्हणाले, ‘सर्वच समाजातील तरुणाची श्रम करण्याची तयारी आहे. बँकाही कर्ज द्यायला तयार आहेत. मात्र, तरुणांना दिशा मिळत नसल्याने उद्योगाकडे ते वळत नाहीत. अशावेळी ब्राह्मण समाजाने मार्गदर्शकाच्या भूमिकेत जाऊन सर्वच समाजातील तरुणांना उद्योगासाठी प्रोत्साहित करावे. त्यातून आपला आणि इतर समाजाचाही उत्कर्ष साधावा.’

रवींद्र प्रभुदेसाई, वसंत नगरकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक श्रीकांत जोशी यांनी केले. सूत्रसंचालन आदिती कुलकर्णी यांनी केले. मंजुषा वैद्य यांनी आभार मानले. अजय कुलकर्णी, जयंत कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link