Next
छोड दे सारी दुनिया...
BOI
Sunday, June 03, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

चित्रपटप्रेमींच्या आजही स्मरणात असलेल्या अभिनेत्री नूतन यांचा उद्या (चार जून) जन्मदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आस्वाद घेऊ या नूतन यांच्यावर चित्रित झालेल्या ‘छोड दे सारी दुनिया’ या गीताचा...
...........  
चार जून १९३६ ही अभिनेत्री नूतनची जन्मतारीख! आज नूतन हयात नसली, तरी तिच्या भूमिका असलेल्या अनेक चित्रपटांनी तिच्या स्मृती सांभाळून ठेवल्या असल्याने ती चित्रपटप्रेमींच्या आठवणींत आहे. नूतनच्या जन्मदिनानिमित्ताने तिच्या कारकिर्दीवर एक दृष्टिक्षेप टाकू या! शोभना समर्थ या एकेकाळच्या सुंदर, देखण्या व आकर्षक अभिनेत्रीची मुलगी म्हणजे नूतन! नूतन आईच्या तुलनेत सुंदर नव्हती; पण तरीही ती अभिनेत्री म्हणून पडद्यावर शोभली आणि पसंत केली गेली. कारण तिचा सोज्ज्वळ चेहरा, खट्याळ, तरीही लाजरंबुजरं हास्य, गालावरची मिस्किल, पण मोहक खळी आणि तिचा अभिजात, देखणा अभिनय! हीच तिची वैशिष्ट्ये होती. 

मुंबईतील पेडर रोडवरील आयडियल स्कूलमध्ये ती शिकली. तिने पं. जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे, तर मोहनलाल पांडे यांच्याकडे कथ्थकचे धडे गिरवले. शालेय वयातच हे सर्व करत असल्यामुळे ती शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घेत असे. तिची आई अभिनेत्री होती व वडील कुमार सेन समर्थ हे दिग्दर्शक होते. नूतन आठ-नऊ वर्षांची असताना तिचे वडील ‘नल-दमयंती’ नावाचा चित्रपट दिग्दर्शित करत होते. त्या चित्रपटात तिने एक छोटीशी भूमिका केली. १९४९च्या सुमारास म्हणजे नूतन १२-१३ वर्षांची असताना रणजित स्टुडिओचे चंदूलाल शहा यांनी ‘हम लोग’ नावाचा चित्रपट तयार करण्याचे ठरविले. त्यांनी दिलीपकुमार, राज कपूर यांना घेतले आणि नायिका म्हणून नूतनची निवड केली; पण पुढे त्यांचा हा बेत बारगळला! नंतर १९५०मध्ये शोभना समर्थ यांनी स्वतःच नूतनला नायिकेच्या रूपात पुढे आणण्यासाठी ‘हमारी बेटी’ हा चित्रपट निर्माण केला. 

‘हमारी बेटी’ हा चित्रपट तसा ठीक होता; पण तो फारसा चालला नाही. तरीही नूतनने त्या चित्रपटामुळे अनेक निर्मात्यांचे लक्ष वेधून घेतले. चंदूलाल शहांनी पुन्हा ‘हम लोग’ची तयारी केली. राज कपूर, दिलीपकुमारच्या जागी बलराज सहानी व सज्जन आले. नूतनही आली. ती बलराज सहानींची बहीण बनली. त्याच वेळी ती ‘नगीना’ चित्रपटातही काम करत होती. दोन्ही चित्रपट हिट ठरले आणि नूतनकडे निर्मात्यांची रांग लागली. ‘हंगाम’, ‘आगोश’, ‘शिशम’, ‘निर्मोही’, ‘परबत’, ‘मालकीन’, ‘लैला मजनू’, ‘शबाब’ अशा चित्रपटांत तिने काम केले; पण हे सारे चित्रपट यथातथा चालले . त्यामुळेच ती ‘अनलकी गर्ल’ म्हणून ओळखली जाऊ लागली.

त्यामुळेच ‘शबाब’नंतर ती चित्रपटसृष्टीपासून दूर गेली. स्वित्झर्लंडमध्ये जाऊन राहिली. तेथील हवा तिला मानवली व तिची तब्येत सुधारली. सात-आठ महिन्यांत बदललेल्या नूतनचा फोटो भारतात निर्माते एस. मुखर्जींच्या हातात पडला व त्यांनी तिला ‘हीर’ चित्रपटाची नायिका म्हणून काम करण्याकरिता भारतात आणले; पण तोही चित्रपट फ्लॉप ठरला! पण हा चित्रपट निर्मिती अवस्थेत असताना अमिया चक्रवर्तींनी नूतनला ‘सीमा’ चित्रपटासाठी निवडले होते. ‘सीमा’ चित्रपट पूर्ण झाला आणि तो सुपरहिट ठरला. त्यामधील भूमिकेबद्दल तिला उत्कृष्ट अभिनेत्रीचे फिल्मफेअर अॅवॉर्ड मिळाले. ‘सीमा’पासून तिची कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरू झाली.
अशोक कुमार, दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर, रेहमान, बलराज सहानी अशा नामवंतांबरोबर आणि सुनील दत्त, प्रदीपकुमार, किशोरकुमार, मनोजकुमार अशा नवोदितांबरोबर ती नायिका म्हणून अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांपुढे आली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तिच्या अभिनयसामर्थ्याचा कस पारखणाऱ्या दर्जेदार भूमिका तिला न मागता मिळाल्या. त्यामध्ये ‘सुजाता’, ‘सोने की चिडिया,’ ‘बंदिनी’, ‘सूरत और सिरत’, ‘अनाडी’ अशा चित्रपटांचा समावेश होतो. नूतनच्या आईने ‘छबिली’ हा चित्रपट निर्माण केला. त्यामध्ये नूतनने गाणी गायली होती. ‘छबिली’चे चित्रीकरण चालू असतानाच नेव्हीतील ऑफिसर रजनीश बहल यांच्याबरोबर नूतनचा विवाह झाला. त्यानंतरही तिने चित्रपटात काम करणे चालू ठेवले. म्हणून तर आपल्याला दिल्ली का ठग, दिल ही तो है, दिल ने फिर याद किया, कन्हैया, बारीश, मंझील, पेइंग गेस्ट, सरस्वतीचंद्र अशा अनेक चित्रपटांतील तिच्या छान छान भूमिका बघायला मिळाल्या! 

या अभिनयसंपन्न तारकेला १९७४मध्ये पद्मश्री किताब देऊन शासनाने तिचा गौरव केला होता. तिचा स्वतःचा ऑर्केस्ट्राचा ग्रुपही होता. ‘नूतन म्युझिकल नाइट’ हा नव्या-जुन्या गाण्यांचा कार्यक्रम ती सादर करत असे. तिचा मुलगा मोहनीश बहल हा हिंदी चित्रपटसृष्टीत सहनायक म्हणून स्थिरावला आहे. मधुबालाने साकार केलेली अनारकलीची भूमिका प्रथम नूतनकडे आली होती; पण नूतनने स्वतःच त्या भूमिकेसाठी मधुबालाची शिफारस केली होती. असा मनाचा मोठेपणा नूतनकडे होता. नूतनच्या भूमिका, प्रौढावस्थेतील भूमिका (मेरी जंग, मैं तुलसी तेरे आंगन की, कर्मा इत्यादी) आणि तिच्या जीवनातील घटना ही सारी (छोटीसी गुडिया की) ‘लंबी कहानी’ आहे.

पडद्यावर अनेक मधुर गीते तिच्यावर चित्रित झाली आहेत. त्यामुळे त्यातून एकच गीत ‘सुनहरे’ म्हणून निवडणे कठीण आहे. तरीही त्यापैकीच एक गीत इथे पाहू या. चित्रपट सरस्वतीचंद्र (१९६८), गीतकार इंदिवर, संगीतकार कल्याणजी-आनंदजी आणि स्वर लता मंगेशकर यांचा! गीताची सुरुवात अशी होते -

कहाँ चला ए मेरे जोगी जीवन से तू भाग के 
किसी एक दिल के कारण यूँ सारी दुनिया त्याग के

असे चित्रपटाची नायिका नूतन नायकाला (त्याचे नाव मनीष) विचारते व पुढे त्याला जीवनाची रीत काय, कसे जगायचे हे गाण्यातून सांगते. ते सांगण्याआधी ती विचारते, ‘जीवनापासून पळून तू कोठे चाललास रे माझ्या (प्रेम) जोगी? एका मनाच्या/हृदयाच्या (नाराजीमुळे) हे सारे जग सोडून तू का चालला आहेस?’

त्याच्या प्रश्नाच्या उत्तराची वाट न बघता ती आशयसंपन्न काव्यात सांगते - 

छोड दे सारी दुनिया किसी के लिए 
ये मुनासिब नहीं आदमी के लिए 
प्यार से भी जरूरी कई काम है 
प्यार सब कुछ नहीं जिंदगी के लिए

एखाद्या व्यक्तीसाठी सारे जग सोडून देणे (एखाद्या प्रिय व्यक्तीची प्राप्ती झाली नाही, म्हणून दुनियेकडे पाठ फिरवणे) हे (कोणाही) मनुष्याला उचित नाही (शोभा देत नाही.) (आयुष्यात प्रेम महत्त्वाचे नाही असे नाही; पण) प्रेमापेक्षा कितीतरी अत्यावश्यक कर्तव्ये आहेत. (केवळ) प्रेम हेच जीवनाचे सर्वस्व नाही.
हेही तू लक्षात घे की -

तन से तन का मीलन हो न पाया तो क्या?
मन से मन का मीलन कोई कम तो नही 
खुशबू आती रहे दूर से ही सही 
सामने हो चमन कोई कम तो नही 
चाँद मिलता नही सब को संसार में 
है दिया ही बहुत रोशनी के लिये

(प्रेम म्हणजे शरीराशी शरीराचे मिलन असे नाही. म्हणून आपले ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्या) शरीराशी आपल्या शरीराचे मिलन झाले नाही, म्हणून काय बिघडले? त्याच्या मनाशी आपल्या मनाचे मीलन होणे हे काय कमी आहे? हेच म्हणणे पटवून देण्यासाठी कवी पुढे उपमा अलंकार वापरतो व सांगतो, की - दृष्टीसमोर उद्यान आहे. (त्यामध्ये जाऊ शकत नाही; पण तेथील फुलांचा) दुरून का होईना, पण सुगंध आपल्यापर्यंत येतो आहे, हे काय कमी आहे. (अरे बाबा) या जगात चंद्र सर्वांनाच मिळतो असे नाही, (पण) प्रकाशासाठी एखादा दिवासुद्धा खूप काही असतो. 

जीवनाचे हे तत्त्वज्ञान कळण्यासाठी पुढील कडव्यात आशावादी विचारांची पेरणी करून कवी लिहितो - 

कितनी हसरत से तकती है कलियाँ तुम्हे, 
क्यूँ बहारों को फिरसे बुलाते नही
एक दुनिया उजड ही गयी है तो क्या,
दुसरा तुम जहाँ बसाते क्यूं नही
दिल न चाहे भी तो साथ संसार के
चलना पडता है सब की खुशी के लिए

(निराशा सोडून तू हे का पाहत नाहीस, की) या कळ्या (जीवनातले काही चांगले, नवे विचार) केवढ्या अभिलाषेने तुझ्याकडे टक लावून पाहत आहेत. (आणि म्हणूनच तू) पुन्हा वसंत ऋतूला का बोलावत नाहीस? (नव्या उमेदीने जीवन जगायला सुरुवात का करत नाहीस? तुझे एक जीवन, आयुष्यातील एक कालावधी उजाड झाला खरा (पण तेच तू उगाळत बसणार आहेस का?) जीवनाचा दुसरा टप्पा, त्यात नवे जग का बसवू शकत नाहीस? (अरे वेड्या, या जीवनात हे असेच असते, की) मनात असो अगर नसो (मनाची इच्छा नसली तरी) सर्वांच्या सुखासाठी, आनंदासाठी आपणाला (जीवनाच्या पथावरून) मार्गक्रमण करावेच लागते. (जगावेच लागते.)

निराश मनाला आधार देणारे हे काव्य, साजेसे संगीत, स्वरांतील आर्तता व पडद्यावर समजावून सांगणारी नूतन! सारे सारेच सुनहरे! पुन्हा पुन्हा अनुभवावे असे!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search