पुणे : ‘केंद्र सरकार आपली उद्योगविषयक धोरणे ठरवताना देशातील वाहन उद्योगाच्या हिताला बाधा येणार नाही याची खबरदारी घेईल,’ असे आश्वासन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी दिले. ‘सिम्पोझिअम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजी २०१९’ या वाहन तंत्रज्ञान विषयक जागतिक परिषदेच्या समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. तीन दिवसाच्या या परिषदेचे आयोजन येथील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI ) ने केले होते.
संस्थेच्या संचालक डॉ. रश्मी ऊर्ध्वरेषे, अखिल भारतीय तंत्र शिक्षण मंडळाचे (AICTE ) अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे, टाटा मोटर्सचे वरिष्ठ महाव्यवस्थापक एस. आर. जे. कुट्टी, तसेच परिषदेचे निमंत्रक अकबर बादुशा या वेळी उपस्थित होते.
‘भारतीय वाहन उद्योगाने जागतिक वाहन उद्योगाच्या बरोबरीने वाटचाल केली पाहिजे आणि या उद्योगात होत असलेले बदल अंगिकारले पाहिजेत अशी सरकारची भूमिका आहे; परंतु तिच्या अंमलबजावणीत सरकार वाहन उद्योगाला विश्वासात घेऊनच धोरणे ठरवेल. सरकारच्या धोरणात ग्राहकांच्या आणि वाहन उद्योगाच्या हिताचा समतोल साधला जाईल आणि देशातील वाहन क्षेत्राच्या विकासात या उद्योगाला बरोबर घेऊन वाटचाल केली जाईल,’ असे गीते यांनी स्पष्ट केले.
‘मेक इन इंडिया’सारख्या उपक्रमाच्या अंमलबजावणीत वाहन उद्योगाची कामगिरी आणि या उद्योगात मोठया प्रमाणावर निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी याबद्दल गीते यांनी समाधान व्यक्त केले. ‘‘एआरएआय’मध्ये होणाऱ्या उच्च गुणवत्तेच्या संशोधनावरून भारतीय अभियंते आणि तंत्रज्ञ यांची क्षमता जागतिक स्तरावरची आहे हे सिद्ध होते,’ असेही त्यांनी नमूद केले.
जागतिक वाहन सुरक्षितता नियमावलीच्या २०१९ च्या आवृत्तीचे अनावरण गीते यांच्या हस्ते झाले. सुरक्षित, स्मार्ट आणि टिकाऊ तंत्रज्ञानाविषयीच्या शोधनिबंधांच्या विजेत्या लेखकांना त्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली; तसेच विद्यार्थ्यांसाठीच्या पोस्टर स्पर्धेच्या विजेत्यांना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली.
‘इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना वाहन उद्योगाच्या अपेक्षेप्रमाणे काम करता यावे, यासाठी अभ्यासक्रमात योग्य ते बदल केले जात आहेत आणि या उद्योगातील ताज्या तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच मिळावी असे प्रयत्न आहेत,’ अशी माहिती सहस्रबुद्धे यांनी दिली. ‘आज अभियांत्रिकी पदवी घेऊन बाहेर पडलेल्या फक्त २५ टक्के तरुणांना थेट (प्रशिक्षणाशिवाय) कामावर नेमता येते. अभ्यासक्रमातील बदलांच्या आधारावर हे प्रमाण ५० ते ५५ टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे,’ असेही त्यांनी सांगितले. ‘विद्यार्थ्यांना फ्युएल सेल तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती मिळावी यासाठी ‘एआरएआय अकॅडमी’ने तयार केलेल्या ‘इ-लर्निंग मोड्यूल’चे अनावरण त्यांनी केले.

या वेळी ‘एआरएआय’च्या नियोजित नॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजी म्युझिअम या वाहन तंत्रज्ञानविषयक संग्रहालयाची रूपरेखा रश्मी ऊर्ध्वरेषे यांनी ध्वनिफितीच्या आधारे स्पष्ट केली. संस्थेच्या पुण्याजवळ टाकवे येथील ११० एकर परिसरात उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक मोबिलिटी रिसर्च सेंटरबाबतही त्यांनी माहिती दिली. ‘या संशोधन केंद्रामध्ये स्वयंचलित वाहनांसाठीचे टेस्ट ट्रॅक, टायर आणि व्हील यासाठीचा संशोधन विभाग, टायर टेक्नॉलॉजीसाठीची संशोधन प्रयोगशाळा, हायड्रोजन डिस्पेन्सिंग स्टेशन, सायलेंसरच्या चाचणीसाठीच्या सुविधा यांचा समावेश असणार आहे. याशिवाय प्रामुख्याने या क्षेत्रातील संशोधकांना मदत देण्याबरोबरच स्वच्छ आणि हरित उर्जेसाठी आवश्यक सुविधा पुरवित ‘कनेक्ट भारत’ ला मदत करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याचा मानस आहे,’ असे त्यांनी सांगितले.
‘यापुढची ‘सिम्पोझिअम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजी’ २०२१ च्या जानेवारी महिन्यात होईल,’ असे ऊर्ध्वरेषे यांनी जाहीर केले.
परिषदेचे समन्वयक अकबर बादुशा यांनी उपस्थितांचे आभार मानले.