Next
ठोसेघरचं रौद्र सौंदर्य
BOI
Wednesday, July 12, 2017 | 06:45 AM
15 0 0
Share this story

पावसाळ्यात सगळी मरगळ झटकून ताज्या टवटवीत झालेल्या डोंगरदऱ्या आणि त्यातून वाहणारे असंख्य धबधबे, हे पर्यटकांचं विशेष आकर्षण असतं. साताऱ्याजवळचा ठोसेघर धबधबाही त्यापैकीच एक. ‘चला, भटकू या’ सदरात या वेळी ठोसेघर आणि सज्जनगडाची सफर...
........
पावसाळ्यात ज्यांचा पाय घरी ठरत नाही, त्यांना हिरवा निसर्गच खुणावत असतो. सगळी मरगळ झटकून ताज्या टवटवीत झालेल्या डोंगरदऱ्या आणि त्यातून वाहणारे असंख्य धबधबे, हे पर्यटकांचं विशेष आकर्षण असतं. धबधबे दोन प्रकारचे असतात. एक, जिथल्या प्रवाहाखाली यथेच्छ भिजता येतं, डुंबता येतं, खेळ करता येतो. जे फार उंचावर नसतात आणि धोकादायकही नसतात. दुसरे असे धबधबे, जे प्रचंड उंचीवरून खोल दरीत कोसळतात आणि त्यांच्या जवळ जाणं शक्य नसतं; मात्र त्यांचा तो प्रवाह, तो जोर, वेग आणि रौद्र सौंदर्य पाहताना डोळ्यांचं पारणं फिटतं. आपण प्रत्यक्ष त्या पाण्यात आनंद घेऊ शकत नसलो, तरी ते पाहताना एवढे तल्लीन होतो, की तिथून पायच निघत नाही. निसर्गाच्या या वरदानाचं आपण मनापासून कौतुक करतो आणि त्यात स्वतःला हरवून जातो. साताऱ्याजवळचा ठोसेघर धबधबा अशाच रौद्र सौंदर्याची साक्ष पटवतो.

ठोसेघर धबधब्याच्या निरीक्षण मनोऱ्याकडे जायची वाट.सह्याद्रीचे डोंगर प्रत्येक ठिकाणी आपल्याला या ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ची साक्ष पटवत असतात. त्याचबरोबर त्यांच्या मोहक सौंदर्याने आपल्याला आकर्षितही करत असतात. निसर्गाशी मस्ती न करता त्याचा आस्वाद घेणं कधीही आनंददायी. ठोसेघरच्या धबधब्याचा आनंदही असाच काही फुटांवरून; पण अगदी सुरक्षितपणे घेता येतो. ठोसेघरला जाण्यासाठी सातारा शहरातून जावं लागतं. साताऱ्याहून १८ किलोमीटरवर चाळकेवाडी गाव लागतं. तिथूनच पुढे डोंगरउतारावर जाण्यासाठी पायवाट आहे. धबधबा पाहायला जाण्यासाठीची ही वाट कठडे आणि दिशादर्शक फलक लावून सुरक्षित करण्यात आली आहे. पावसाळ्यात इथून जाताना निसरड्या जमिनीमुळे तोल सांभाळावा लागतो; पण वाट मजेशीर असते. मध्येच धुक्याचा फटकारा बसतो आणि सगळी वाट हरवून जाते. मग वारा धुक्याचा पाठलाग करत येतो आणि सगळं धुकं उडवून लावतो. पुन्हा रस्ता मोकळा होतो आणि वाट स्वच्छ दिसू लागते. अध्येमध्ये हा लपंडाव सुरू राहतो. मध्येच पावसाला हुक्की येते आणि तो बरसायला सुरुवात करतो. वाटसरूंची पळापळ होते आणि ते झाडांचा आधार शोधतात. खरे पर्यटनप्रेमी मात्र चालत राहतात आणि भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतात. ही वाट एका कड्यावर थांबते. तिथे सुरक्षित कठड्यांपाशी आपण पोहोचतो. समोर प्रचंड खोल दरी दिसते. दोन बाजूंना डोंगर आणि मस्त हिरवा शालू नटलेले डोंगरकडे दिसतात. उजव्या बाजूला पाहिल्यावर ज्यासाठी एवढा अट्टाहास केला, तो ठोसेघरचा प्रचंड धबधबा डोंगरकड्यावरून दरीत स्वतःला मुक्तपणे झोकून देताना दिसतो. तो पाहताक्षणी डोळ्यांचं पारणं फिटतं. धबधब्याचं सौंदर्य काय असतं, याचा प्रत्यय येतो. वाऱ्याचा वेग एवढा असतो, की धबधब्याचे तुषार उडून पर्यटकांपर्यंत पोहोचत असतात. सगळी दरी धुक्यानं भरून गेलेली असते. मध्येच पुन्हा वारा धुमाकूळ घालतो आणि काही सेकंदात सगळी दरी धुकेमुक्त करून टाकतो. मग ठोसेघर धबधब्याचा लांबपर्यंत वाहणारा प्रवाहसुद्धा दिसू शकतो. या धबधब्याचे एकूण तीन प्रवाह असून ते पाहण्यासाठी वन खात्याकडून दोन निरीक्षण मनोरे बांधण्यात आले आहेत. पूर्वी पर्यटकांसाठी येथे पुरेशी सुरक्षाव्यवस्था नव्हती. आता मात्र वन विभागाने निरीक्षण मनोरा उभारल्याने हे ठिकाण सुरक्षित झालं आहे. एका वेगळ्या रस्त्यानं धबधब्याच्या पायथ्याशीही जाता येतं; मात्र पावसाळ्यात तिथून जाणं धोकादायक असल्यामुळे तिथून जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. दुर्घटना रोखण्यासाठी स्थानिक वन समितीने धबधब्याजवळ स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. अर्थातच, सगळे नियम पाळून आणि सुरक्षेची काळजी घेऊन या धबधब्याचं सौंदर्य पाहण्यासाठी गेलं, तर आपल्या सहलीचा आनंद शतगुणित होईल, हे निश्चित.

कसं जायचं?
साताऱ्याहून अंतर १८ किलोमीटर. बसने, खासगी जीपने किंवा स्वतःच्या गाडीनेही जाता येतं. पुण्याहून अंतर सुमारे १४० किलोमीटर.

सज्जनगडसज्जनगडाची सफर
ठोसेघर आणि सज्जनगड ही एकाच रस्त्यावरची दोन छान ठिकाणं आहेत. सज्जनगड हा समर्थ रामदासस्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेला किल्ला. ठोसेघरहून आपण साताऱ्याकडे परत यायला निघालो, की काही अंतरावर डावीकडे सज्जनगडाकडे जाणारा घाट सुरू होतो. या घाटाने गेल्यास सुमारे पंधरा ते वीस मिनिटांत आपण सज्जनगडाच्या पायथ्याशी पोहोचतो. तिथून शंभर पायऱ्या चढून गेल्यानंतर गडाचे मुख्य द्वार दिसते. त्याला ‘छत्रपती शिवाजी महाराजद्वार’ म्हणतात. दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याला ‘समर्थद्वार’ असेही म्हणतात. आजही हे दरवाजे रात्री दहानंतर बंद होतात. ज्या पायऱ्यांनी आपण गडावर प्रवेश करतो त्या पायऱ्या संपायच्या आधी एक झाड लागते. या झाडापासून एक वाट उजवीकडे जाते. या वाटेने पाच मिनिटे पुढे गेल्यावर एक रामघळ लागते. ही समर्थांची एकांतात बसण्याची जागा होती. 

गडावर प्रवेश केल्यावर डावीकडे समोरच घोड्यांना पाणी पाजण्यासाठीचे घोडाळे तळे दिसते. घोडाळे तळ्याच्या मागील बाजूला आंग्लाई देवीचे मंदिर आहे. ही देवी समर्थांना चाफळच्या राममूर्तीबरोबरच अंगापूरच्या डोहात सापडली. मंदिरासमोरच ध्वजस्तंभ आहे. तिथून पुन्हा मागे आल्यानंतर धर्मशाळा लागते. तिथे समोरच सोनाळे तळे आहे. त्यातल्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला जातो. सोनाळे तळ्याच्या समोरून जाणाऱ्या वाटेने आपण मंदिराच्या आवारात येऊन पोहोचतो. समोरच पेठेतल्या मारुतीचे मंदिर आहे, तर बाजूला श्रीधर कुटी नावाचा आश्रम आहे. उजवीकडे श्रीरामाचे मंदिर, समर्थांचा मठ आणि शेजघर आहे. या ठिकाणी समर्थांच्या वापरातील सर्व वस्तू ठेवल्या आहेत. या ठिकाणी जवळच ‘ब्रह्मपिसा’ मंदिर आणि पुढे गेल्यावर धाब्याच्या मारुतीचे मंदिर आहे. समोरच किल्ल्याचा तट आहे. येथून समोरच्या बाजूचे नयनरम्य दृश्य दिसते.

धाब्याच्या मारुतीचं मंदिरप्राचीन काळी या डोंगरावर आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते. त्यामुळे या किल्ल्याला ‘आश्वलायनगड’ असे नाव होते. त्याचा अस्वलगड असा अपभ्रंशही झाला होता. शिलाहार राजा भोज याने अकराव्या शतकात या किल्ल्याची उभारणी केली. या गडाच्या पायथ्याशी परळी नावाचे गाव होते. म्हणून त्याला परळीचा किल्लाही म्हटले जायचे. पुढे हा किल्ला आदिलशहाकडे गेला. दोन एप्रिल १६७३ रोजी शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. शिवरायांच्या विनंतीवरून समर्थ रामदास गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले आणि तेव्हाच किल्ल्याचे सज्जनगड असे नामकरण करण्यात आले, असे मानले जाते.

- अभिजित पेंढारकर
ई-मेल : abhi.pendharkar@gmail.com

(लेखक चित्रपट, दूरचित्रवाणी, कला आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.)


सज्जनगडावरून दिसणारं उरमोडी धरणाचं आणि आजूबाजूच्या परिसराचं विहंगम दृश्य.
सज्जनगडावरून दिसणारं घाटाचं मनोरम दृश्य. (सर्व फोटो : अनिकेत कोनकर)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link