Next
बॅटल ऑफ दी बल्ज
प्रसन्न पेठे
Tuesday, October 03, 2017 | 01:45 PM
15 0 0
Share this article:

१९४४च्या डिसेंबर महिन्यात हिटलरसाठी आशेचा शेवटचा किरण असणारी ‘ऑपरेशन ऑटम मिस्ट’ या सांकेतिक नावानं नाझी सैन्यानं मोहीम आखली होती! फ्रान्स, बेल्जियमकडची अमेरिकन आणि ब्रिटिश सैन्याची फळी भेदून पुढे ब्रिटिश खाडीपर्यंत मुसंडी मारण्याची नाझींची ही चाल चिवट अमेरिकन सैनिकांनी यशस्वी होऊ दिली नाही आणि जर्मनीच्या आधुनिक टायगर रणगाड्यांना अमेरिकन जनरल पॅटनच्या झुंजार सेनेनं धूळ चारली त्याची कहाणी म्हणजे ‘बॅटल ऑफ द बल्ज!’... ‘सिनेसफर’मध्ये आज पाहू या त्या सिनेमाबद्दल... 
..........................
दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या काळात १६ डिसेंबर १९४४ ते १६ जानेवारी १९४५ अशी महिनाभर चाललेली आर्डेन्सची लढाई म्हणजेच ‘बॅटल ऑफ दी बल्ज’! हिटलरच्या फौजांनी जर्मनीच्या भूमीकडे येणाऱ्या मित्र राष्ट्रांच्या सैन्यावर, जर्मनीच्या पश्चिमेकडच्या फ्रान्सच्या आर्डेन्स भागात चढवलेला हा निकराचा आणि जबरदस्त हल्ला!! मित्र राष्ट्रांच्या सैन्यफळीत नाझी सैन्यानं मारलेली मुसंडी म्हणजे पाचर ठोकून एखादा भाग दुभंगवल्यासारखी होती आणि त्यालाच ‘बल्ज’ म्हटलं गेलं.

नाझी सैन्यानं आर्डेन्सच्या उंचसखल आणि डोंगराळ रानाचा चांगलाच फायदा घेतला आणि आपल्या सैन्याची, विशेषतः रणगाडादळाची पूर्ण ताकद लावली. धुक्यानं भरलेल्या बर्फाळ वातावरणानं आणि खराब हवामानानंसुद्धा त्यांना साथ दिली आणि मित्र राष्ट्रांच्या सैन्याला हवी तशी हवाई कुमक आणि हवाई सामर्थ्याचं पाठबळ न लाभल्यानं त्यांची सुरुवातीला दारुण हार झाली. एक हजार रणगाडे आणि दोन हजार लढाऊ विमानं उतरवून ‘ऑपरेशन ऑटम मिस्ट’ या सांकेतिक नावानं नाझी सैन्यानं ही मोहीम आखली होती. सुरुवातीला दोस्त राष्ट्रांच्या ८० हजार सैनिकांसमोर जवळपास दोन लाख नाझी सैन्य उभं ठाकलं होतं; पण युद्ध पुढे सरकत गेलं आणि शेवटी शेवटी मात्र नाझींनी जमवलेल्या पाच लाख सैनिकांसमोर मित्र राष्ट्रांचे सहा लाख सैनिक उभे ठाकले होते. घनघोर रणसंग्राम होऊन मित्र राष्ट्रांचे सुमारे ७५ हजार, तर जर्मनीचे सव्वा लाख सैनिक धारातीर्थी पडले आणि शेवटी जर्मनीचा पराभव झाला. अमेरिकेतर्फे लढली गेलेली ही सर्वांत मोठी लढाई होती आणि हे युद्ध जिंकण्यात जनरल पॅटनच्या अमेरिकन सैन्यानं निर्विवादपणे महत्त्वाचा वाटा उचलला होता. 

दिग्दर्शक केन अनॅकीन यानं १९६५ साली हेन्री फोंडा, रॉबर्ट शॉ, टेली सव्हालास, चार्ल्स ब्रॉन्सन, रॉबर्ट रायन अशी तगडी स्टारकास्ट घेऊन याच घटनेवर आधारित ‘बॅटल ऑफ दी बल्ज’ हा सिनेमा बनवला. या सिनेमात खऱ्या घडलेल्या घटनांपेक्षा काही काल्पनिक घटनाही भरल्या आहेत. जरूरीपेक्षा जास्त संवादाची दृश्यं आहेत. त्यामुळे काही जणांना सिनेमा संथ वाटू शकतो. प्रत्यक्ष युद्ध अनुभवलेल्यांनी त्या काळी या सिनेमावर काहीशी नाराजी व्यक्त केली होती आणि बऱ्याच दृश्यांवर आक्षेप घेतला होता. अमेरिकेत काहीसं थंड स्वागत झालेल्या या सिनेमाचं ब्रिटनमध्ये मात्र चांगलं स्वागत झालं होतं. युद्धपट आवडणाऱ्या रसिकांचं हा सिनेमा निश्चितच रंजन करतो. 

सिनेमाच्या सुरुवातीला पडद्यावर घिरट्या घालणारं एक टेहळणी विमान. पार्श्वभूमीवर निवेदकाचा आवाज - ‘डिसेंबर १९४४. ब्रिटिश आणि अमेरिकन सैन्यानं नाझींचा पराभव करत आणलाय. आता जर्मनीवर निर्णायक घाव घालणं बाकी आहे. मित्रांच्या सैन्यानं पश्चिमेकडून जर्मनीवर फास आवळत आणलाय... युद्ध तसं जिंकल्यातच जमा आहे... त्याचीच ही कथा....’

टेहळणी विमानात कर्नल कायली, पायलट ज्योसह आर्डेन्सच्या डोंगराळ भागातल्या वृक्षराजीमध्ये कुठे काही संशयास्पद हालचाल दिसते आहे का, ते पाहतोय. दररोज टेहळणीसाठी चकरा मारून पायलट ज्यो खरं तर वैतागलाय. तो उद्गारतो, ‘चला आता, बस्स झालं. युद्ध संपलंय आता.’

तेवढ्यात त्यांची नजर एका जीपवर जाते. एका जर्मन अधिकाऱ्याला घेऊन जाणारी जीप. ते त्याचा अगदी जवळून फोटो काढतात. चक्कर मारत असताना कर्नल कायलीला जमिनीवर काही तरी आहे असा भास होतो... ते विमान त्या झाडांच्या रांगांवरून नेतात; पण काही आढळत नाही.... विमान परत वळवून ते पुन्हा कॅम्पकडे परत फिरतात... विमान दूर जात असतानाच कॅमेरा सावकाश त्या वृक्षराजीतून खाली येत जमिनीच्या पातळीला येतो आणि स्थिरावतो... तिथं मोठ्या संख्येनं झाडांच्या फांद्यांनी, पानांनी लपवलेल्या शेकडो जर्मन रणगाड्यांवर.....!!! नंतरच्या दृश्यात पुन्हा एकदा संशयी आणि चौकस वृत्तीचा कर्नल कायली, आपल्या बरोबर पायलट ज्योला घेऊन अत्यंत प्रतिकूल हवामानात टेहळणीसाठी जातो आणि विमानांचं इंजिन बंद करून, कमी उंचीवरून विमान नेताना, त्यांना कसला तरी वाहनांचा आवाज आणि काही हालचाल दिसते. तो परतून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर सर्व हकीकत घालतो; पण ते त्याचा संशय उडवून लावतात. जर्मनीकडे आता मनुष्यबाळ नसल्याचं सांगत त्याच्या संशयाला गांभीर्यानं घेत नाहीत. 

इकडे नाझी अधिकाऱ्यांचं जोरदार प्लॅनिंग. अवघ्या ५० तासांत मोठी चढाई करण्याची त्यांची योजना. त्याचबरोबर त्यांनी बेमालूमपणे कित्येक जर्मन सैनिकांना अमेरिकन सैनिकांचे गणवेश घालून अमेरिकन मिलिटरी पोलीस (MP) बनवून मित्र राष्ट्रांच्या सैन्यात घुसखोरी केली आहे.... ठरल्याबरहुकूम नाझींचा अजस्र रणगाड्यांसह दुसऱ्या दिवशी हल्ला होतो. सुरुवातीला जवळपास दोन तास अथक बॉम्बवर्षाव करून पाठोपाठ चिलखती वाहनं आणि रणगाड्यांसह जर्मन सैनिक तुफानी आक्रमण करतात. गाफील अमेरिकन तुकडीला माघार घ्यावी लागते. त्यांच्या रणगाडा विभागालाही नाझींच्या नव्या भव्य आणि संहारक किंग टायगर रणगाड्यांसमोर टिकाव धरता येत नाही. त्यातच बेमालूमपणे त्यांच्या सैन्यात मिलिटरी पोलीस म्हणून मिसळलेले जर्मन सैनिक टेलिफोन लाइन्स कापून, चुकीची माहिती पसरवून आणि रस्त्यांवरचे दिशादर्शक फलक बदलवून घातपाताला सुरुवात करतात. नाझींचा डाव यशस्वी झालेला असतो. अमेरिकन सैन्याची पीछेहाट होते. 

जर्मन सैन्याला आता मित्र राष्ट्रांच्या सैन्यात पाचर मारल्यागत घुसून आपली चढाई यशस्वी करून पुढे इंग्लिश खाडीपर्यंत जायचंय. त्यांच्या या चढाईचा प्रमुख कर्नल हेस्स्लर त्याला मिळालेल्या ताज्या दमाच्या, पण कोवळ्या सैनिकांबद्दल साशंक असतो; पण मातृभूमीसाठी प्राण देण्याची त्यांची तयारी त्याला जिंकण्याचं बळ देते. जर्मनीची प्रमुख भिस्त आहे ती त्यांच्या आग ओकणाऱ्या नवीन रणगाड्यांवर. लवकरच ते अमेरिकन सैन्याची कोंडी करतात आणि त्यांना शरण येण्यावाचून पर्याय उरत नाही. 

शरण आलेल्या सैनिकांमध्ये ‘आता कुठल्या कॅम्पवर आपल्याला बंदी बनवून नेणार’ याबद्दल शंका असतानाच अचानक त्यांना न्यायला आलेल्या ट्रकमधूनच त्यांच्यावर मशीनगनधारी सैनिक गोळ्यांच्या फैरी झाडायला सुरुवात करतात. गुडघ्याएवढ्या उंचीच्या बर्फातून ते बचावासाठी पळायचा क्षीण प्रयत्न करतात; पण तो यशस्वी होत नाही. युद्धबंद्यांना नाझी सैन्याकडून अत्यंत निर्दयीपणे ठार मारलं जातं... 

... पण लवकरच त्या बर्फाळ प्रांतात मुसंडी मारणाऱ्या नाझी फौजांना एक समस्या भेडसावू लागते ती म्हणजे रणगाड्यांसाठी आवश्यक असणाऱ्या इंधनाची. आणि ती ओळखून कसाबसा प्रतिकार करणारे मित्र राष्ट्रांचे सैनिक जवळपासच्या हदीत असणारे पेट्रोलचे डेपो पेटवून देतात आणि जर्मन रणगाडे कुचकामी ठरायला सुरुवात होते. 

बॅस्टॉन्येला पडलेल्या वेढ्याच्या वेळी जर्मन तुकडीचा प्रमुख अमेरिकन तुकडीपुढे शरण येण्याचा प्रस्ताव ठेवतात. त्याला धुडकावून लावत अमेरिकन तुकडीकडून ‘Nuts!’ एवढंच प्रत्युत्तर मिळतं. अमेरिकेचे सैनिक शेवटपर्यंत जर्मनीला बॅस्टॉन्येवर कब्जा करू देत नाहीत आणि नाझी सैन्याला बॅस्टॉन्येला वळसा घालून पुढे जावं लागतं. अमेरिकन सैन्याला वाचवायला त्यांचा धडाडीचा जनरल पॅटन ताज्या दमाची कुमक पाठवतो आणि पॅटनचे शूर जवान जर्मनीवर बाजी उलटवतात. 

अमेरिकन सैन्यानं दिलेला हा लढा आणि जर्मनीवर उलटवलेली बाजी निर्णायक ठरली आणि हिटलरला पुन्हा उभारी घेण्याची संधीच मिळाली नाही. चर्चिलनंही अमेरिकन सैन्याचं त्या वेळी कौतुक केलं होतं.
 
बहुतेक वॉरफिल्म्समध्ये असतात तसे यातही काही चुरचुरीत डायलॉग्ज आहेत आणि ते मजा आणतात. उदाहरणार्थ -
मेजर वोलेन्स्की (आचाऱ्याला) : Where do you think you’re going?
आचारी : To the shelter! 
मेजर वोलेन्स्की : No you’re not. Grab your rifles and come with me.
आचारी : But we’re cooks!
मेजर वोलेन्स्की (थांबून) : Lunch is over! Grab your rifles!

कर्नल कायलीनं पुन्हा जबरदस्तीनं टेहळणीसाठी अत्यंत खराब हवामानात विमान उडवून न्यायला लावल्यामुळे आधीच वैतागलेला पायलट ज्यो, कर्नलनं इंजिन बंद करून विमान आणखी खाली न्यायला सांगितल्यावर त्याला म्हणतो - If we were a hundred feet higher, I’d jump and leave you here.

तर असा हा १९६५ सालचा ‘बॅटल ऑफ दी बल्ज’! ... प्रत्यक्षातल्या इतिहासाशी तंतोतंत जुळणारा नसला, तरी एकुणात उत्कंठावर्धक आणि हेन्री फोंडाचा संयत कर्नल कायली, रॉबर्ट शॉचा जर्मन कर्नल हेस्स्लर, टेली सव्हालासचा रगेल सार्जंट गफी आणि चार्ल्स ब्रॉन्सनचा दिलेर मेजर वॉलेन्स्की यांच्यासाठी एकदा नक्की बघा!

ई-मेल : Prasanna.Pethe@myvishwa.com

(‘सिनेसफर’ हे सदर दर मंगळवारी प्रसिद्ध होते.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search