Next
‘हरिभाऊंनी मराठी वाङ्मयात आपटे पर्व निर्माण केले’
प्रेस रिलीज
Wednesday, June 27, 2018 | 01:57 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘हरिभाऊ मराठी सामाजिक कादंबरीचे जनक आहेत. रंजन प्रधान साहित्यात रमलेल्या मराठी साहित्य विश्वाला हरिभाऊंनी बाहेर काढले. मराठी कादंबरीला त्यांनी सामाजिक आशय दिला. हरिभाऊंनी मराठी वाङ्मयात आपटे पर्व निर्माण केले,’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

ह. ना. आपटे स्मृतिशताब्दीनिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद आणि आनंदाश्रम संस्था यांच्यातर्फे ‘स्मरण युगप्रवर्तक कादंबरीकाराचे’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. ‘हरिभाऊंच्या कादंबऱ्या’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. या वेळी व्यासपीठावर ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, आनंदाश्रम संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त वसंत आपटे, विश्वस्त दिलीप आपटे, डॉ. सरोजा भाटे, अपर्णा आपटे आणि माधवी कोल्हटकर उपस्थित होते. महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या सौदामिनी साने यांनी ‘पण लक्षात कोण घेतो’ या कादंबरीतील निवडक अंशांचे अभिवाचन केले.

देशमुख म्हणाले, ‘आपल्या ऐतिहासिक कादंबऱ्यातून त्यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाची मांडणी केली. इतिहासाचे गोडवे न गाता त्यांनी वस्तुनिष्ठ मांडणी केली. इतिहासाचे वेगळे आकलन वाचकांसमोर ठेवले. देशीवादाचा पहिला हुंकार त्यांच्या कादंबरीतून उमटला वास्तववादी कादंबरीचा पाया हरिभाऊंनी घातला. समाजाचे सूक्ष्मअवलोकन करून त्यांनी प्रखर समाज वास्तव कादंबऱ्यातून मांडले.’

जोशी म्हणाले, ‘हरिभाऊंचा पिंड आदर्शवादी सुधारकाचा होता आपल्या कादंबऱ्यातून त्यांनी ‘सत’चे चित्रण केले. त्यांनी आपल्या कादंबऱ्यातून केवळ वास्तवाचे चित्रण केले नाही, तर भोवतीच्या समाजस्थितीचे चित्र समाजापुढे मांडून त्यातील गुणदोषांकडे वाचकांचे लक्ष वेधले. इतिहास अभ्यासाची फारशी साधने नसतानाही हरिभाऊंनी दर्जेदार ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या.’

आनंदाश्रम संस्थेचे वसंत आपटे यांनी प्रास्ताविक केले. अपर्णा आपटे यांनी आभार मानले. दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Balkrishna Gramopadhye About 211 Days ago
Is there a biography. I wonder .
0
0

Select Language
Share Link
 
Search