Next
वक्त ने किया क्या हसीं सितम
BOI
Sunday, October 08 | 06:45 AM
15 0 0
Share this story

गुरुदत्त - गीता दत्त१० ऑक्टोबर हा अभिनेते, दिग्दर्शक गुरुदत्त, म्हणजेच वसंतकुमार शिवशंकर पदुकोन यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज पाहू या त्यांचे दिग्दर्शन आणि अभिनय असलेल्या ‘कागज़ के फूल’ चित्रपटामधील ‘वक्त ने किया क्या हसीं सितम’ या गाण्याबद्दल...
.................
एखादी सुंदर कलाकृती आपण निर्माण करावी, ती नावारूपाला यावी आणि पुढे तीच आपल्या जीवनाचे प्रतीक बनून जावी, असे कधीकधी काही कलावंतांच्या बाबतीत घडून जाते. त्या कथेचा, कवितेचा सुखान्त असेल तर व त्याप्रमाणे त्या कथालेखकाच्या अगर कवीच्या जीवनात घडले त्या कथेचे अगर काव्याचे कौतुक होऊन रसिक, ‘बघा कसा योगायोग’ असे म्हणून आश्चर्यचकित होतात. परंतु त्या कथेचा अगर काव्याचा सुखान्त नसेल तर...? त्या कलाकृतीचे कौतुक होते. कथानक अगर काव्यातील आशय व कलाकृतीच्या निर्मात्याच्या जीवनातील साधर्म्याबद्दल आश्चर्यही व्यक्त केले जाते; पण त्या साऱ्याला कारुण्याची एक झालर असते.

या विचारांचे पटकन आकलन होण्यासाठी ही दोन उदाहरणे बघा. ‘मैं जिंदगी का साथ निभाता चला गया...’ या गीतकार साहिरने लिहिलेल्या काव्यपंक्ती देव आनंदने ‘हम दोनों’ चित्रपटात पडद्यावर साकार केल्या आणि त्या काव्यातील आशय जणू त्याने स्वतःच्या जीवनात उतरवला! अनेक चित्रपटांना अपयश येत असताना तो नवीन चित्रपटांच्या निर्मितीत व्यग्र राहिला. सदा हसतमुख राहून कामात राहिला. दु:ख करत बसला नाही. 

आणि या गीताच्या पंक्ती लिहिणाऱ्या साहिरनेच ‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है...’ असे काव्य लिहिले आणि निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता गुरुदत्तने ते पडद्यावर साकार केले. ‘प्यासा’ हा तो चित्रपट लोकप्रिय ठरला! मैलाचा दगड बनून गेला; पण गुरुदत्तवर ‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है’ असे म्हणण्याचीच वेळ आली. का? कसे घडले हे? 

वास्तविक देव आनंद आणि गुरुदत्त हे दोघे मित्र! दोघांनीही प्रभात चित्रसंस्थेत एकाच वेळी प्रवेश केला; पण दोघांच्या आयुष्याच्या दोन तऱ्हा झाल्या. उमेदवारीच्या काळात देव आनंदसारख्या नेक मित्राने दिलेल्या संधीने गुरुदत्त दिग्दर्शन क्षेत्रात उतरला! ‘आरपार’, ‘जाल’, ‘सीआयडी’, ‘'प्यासा’, ‘कागज़ के फूल’ यांसारख्या अप्रतिम चित्रपटांद्वारे उत्कृष्ट दिग्दर्शकीय कसब त्याने दाखवले.

‘जाल,’ ‘बाजी,’ ‘सीआयडी’ हे गुन्हेगारी वळणाचे चित्रपट होते. ‘आरपार’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस ५५’ हेही तसेच, पण थोडासा बदल असलेले! त्यांचे यश बघूनच गुरुदत्तने ‘प्यासा’ हे भावानोत्कट काव्य पडद्यावर आणले. त्याला फारसे यश मिळणार नाही अशी अपेक्षा असलेल्या गुरुदत्तला तेव्हा धक्का बसला. ‘प्यासा’ लोकांनी डोक्यावर उचलून घेतला. प्रक्षकांची अभिरुची बदलली या विचाराने ‘त्या’ बिचाऱ्याने नंतर ‘कागज़ के फूल’ काढला; पण...? 

‘कागज़ के फूल’चे अपयश निर्माता-दिग्दर्शक गुरुदत्तला पेलले नाही. तो भावनाप्रधान कलावंत खचून गेला. मित्रांच्या आग्रहाखातर नंतर त्याने, ‘साहिब बीवी और गुलाम’ आणि ‘चौदहवी का चाँद’ हे दोन चित्रपट काढले; पण त्यांचे दिग्दर्शक अनुक्रमे अब्रार अल्वी आणि एम. सादिक होते. नंतर सुरू केलेल्या ‘बहारे फिर भी आयेगी’ या चित्रपटाला अर्धवट सोडून गुरुदत्त या चित्रपटसृष्टीतूनच नव्हे तर या दुनियेतूनच निघून गेला. ती तारीख होती १० ऑक्टोबर १९६४! 

गुरुदत्तचे कर्तृत्व दीर्घ काळाचे नव्हते; पण जो अल्पकाळ त्याने या चित्रपटसृष्टीत काढला, त्यामध्ये त्याने उत्तुंग कलाकृती निर्माण करून ठेवल्या आहेत. तो जाऊन दीर्घकाळ लोटला आहे; पण त्याचे दिग्दर्शन, निर्मिती, त्याच्या चित्रपटांची गाणी यांची आजही चर्चा होते. आदर्श दिग्दर्शन म्हणून त्याचे चित्रपट दाखवले जातात. 
गायिका गीता रॉय त्याच्या जीवनात पत्नी बनून आली. गीता दत्त म्हणून प्रख्यात झाली. दोन कलावंतांचा संसार तसे पाहता सुखाचा होणे गृहीत आहे; पण सगळीच गृहीतके वास्तवात उतरत नाहीत. जीवनाची एकत्र वाटचाल करताना ते काही पावले चालले आणि नंतर दुरावले.

त्या आधीच ‘कागज़ के फूल’ चित्रपटातील गीत गीता दत्तने गायले होते! ‘वक्त ने किया क्या हसीं सितम’ असे त्याचे शब्द होते. कैफी आझमी या गीतकाराने ते लिहिले होते. एस. डी. बर्मन यांनी ते गीत एका वेगळ्या, पण साजेशा सुरावटीत संगीतात गुंफले होते. गाणारी स्वतः गीता दत्तच! नेमके तसे नसले, तरी हे गीत खास गुरुदत्त व गीता दत्त यांच्यासाठीच लिहिले आहे, असे मला वाटते. जसे ‘हम दोनों’चे गीत देव आनंदसाठी होते, तसेच हे! 

वक्त ने किया क्या हसीं सितम 
तुम रहे ना तुम, हम रहे ना हम

काळाने (केवढा) सुंदर अन्याय/ जुलूम (सितम) केला आहे. (तुमचे आणि माझे विचार वेगळे आणि अशा भिन्न विचारांच्या व्यक्तींना एकत्र आणणे म्हणजे जुलूम नाही का?) (यामुळे) तुम्ही तुम्ही राहिला नाहीत आणि मी ‘मी’ राहिले नाही. (प्रेमाच्या वाटचालीत आपण स्वत्व विसरून गेलो होतो. पण आज...?)

बेकरार दिल इस तरह मिले
जिस तरह कभी हम जुदा न थे
तुम भी खो गये, हम भी खो गये 
एक राह पर चलके दो कदम 

(मला आठवतात ते दिवस जेव्हा) आपली बेचैन मने/हृदये अशा प्रकारे एकत्र आली, की जणू काही आपण कधीच वेगळे नव्हतो. (कसे घडले होते ते?) (प्रेमाच्या मार्गावर) दोन पावले चालून गेल्यावर आपण दोघेही स्वतःला विसरून गेलो. (केवढा सुखद काळ होता तो!, पण आज पुढे मात्र...)

जायेंगे कहाँ सूझता नहीं 
चल पड़े मगर रास्ता नहीं
क्या तलाश है कुछ पता नहीं 
बून रहे हैं दिल ख्वाब दम-ब-दम 

(प्रेमाच्या मार्गावार आपण काही पावले चाललो आणि आता) कुठे जावे ते सुचत नाही. वाटचाल तर सुरू केली; पण आता पुढचा रस्ता दिसत नाही. (जीवनात) आपण नेमके काय शोधत आहोत. काहीच कळेनासे झाले आहे. (आणि असे असूनही) (माझे हे मन) क्षणोक्षणी - श्वासा श्वासागणिक (सुंदर) स्वप्ने गुंफत आहे, पाहत आहे.

गीता दत्त व गुरुदत्त यांच्या मनात त्या दिवसांत असेच विचार असतील का? हे गाणे ज्या पद्धतीने चित्रीत केले आहे, तो प्रकाश-सावल्यांचा खेळ आवर्जून पाहण्यासारखा आहे. संगीतही तेवढेच समर्पक! आणि गीता दत्तच्या काळजातले दु:ख ओठातून बाहेर पडले, त्यामुळे हे गीत प्रभावी बनले? 

दहा ऑक्टोबरच्या गुरुदत्तच्या स्मृतिदिनामुळे हे सारे आठवले, आठवली गुरुदत्तची वैशिष्ट्ये! अगदी ‘प्यासा’मध्ये दिलीपकुमार वेळेत आला नाही म्हणून स्वतः काम करणे. ‘ओपीं’ची ‘लेके पहला पहला प्यार’ची चाल सगळ्यांनी नाकारली, पण गुरुदत्तने ती स्वीकारली, ती घटना. त्याचे अन्य चित्रपट - सुहागन, भरोसा, बारा बजे! त्याच्या भूमिका - तो ‘साहिब बीबी’मधील भूतनाथ, ‘जाने वो कैसे’चा विषाद मांडणारा विजय! एक ना दोन - अनेक आठवणी! गुरुदत्तला फिल्मी दुनियेत देऊन अल्प कालावधीत घेऊन जाणे हासुद्धा ‘वक्त ने किया क्या हसीं सितम’ नाही का? 

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.)

(‘सुनहरे गीत’ हे सदर दर रविवारी प्रसिद्ध होते.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link