Next
‘धम्मपहाट’मध्ये गौतम बुद्धांना स्वरवंदना
राहुल देशपांडे यांचे गायन, रोणू मुजुमदार यांचे बासरीवादन
BOI
Saturday, May 18, 2019 | 03:22 PM
15 0 0
Share this article:

‘धम्मपहाट’कार्यक्रमात राहुल देशपांडे यांनी गायन,तर रोणू मुजुमदार यांनी बासरीवादन केले.

पुणे : धीरगंभीर स्वरातील ‘बुद्धम् शरणम् गच्छामि’चा घोष, त्यानंतर पंडित राहुल देशपांडे यांच्या सुरेल गायनाचे स्वर आणि त्यासोबत पंडित रोणू मुजुमदार यांच्या बासरीचे सुमधुर सूर... अशा चैतन्यमयी वातावरणात बौद्ध पौर्णिमेनिमित्त गौतम बुद्धांना स्वरवंदना देण्यात आली.  

या धम्मपहाट कार्यक्रमाला संयोजक परशुराम वाडेकर यांच्यासह मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे, उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, पंडित वसंतराव गाडगीळ, टेक्सास विद्यापीठाचे प्रा. स्कॉट, प्रा. विजय खरे, नगरसेविका सुनीता वाडेकर व राजकीय, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. 

बुद्ध जयंतीच्या (बौद्ध पौर्णिमा) निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे धम्मपहाट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. धम्मपहाट महोत्सवाचे हे अठरावे वर्ष असले, तरी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने पुण्यात पहिल्यांदाच शास्त्रीय संगीताची मैफल झाली. 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात रंगलेल्या या मैफिलीत राहुल देशपांडे यांनी गायनातून, तर रोणू मुजुमदार यांनी बासरीतून सादर केलेल्या रागदारीने रसिकांना भुरळ घातली. त्यात भर घालण्याचे काम गौरव महाराष्ट्राचा फेम गायक सिद्धेश जाधवने केले.


देशपांडे व मुजुमदार यांनी स्वरमालेतून भूप रागाने गायनाला सुरुवात करत ‘बुद्धम् शरणम् गच्छामि’ हे वंदन गायले. त्यानंतर तीन ताल बंदिश सादर केली. अहिर भैरव रागातील रोणूजी आणि राहुल यांच्या मिश्र सादरीकरणाने रसिकांना मोहिनी घातली. ‘घेई छंद मकरंद’, ‘अलबेला सजन आयो रे’ या बंदिशीने आणि ‘सुनता है गुरु ग्यानी’ या संत कबीरांच्या दोह्याने रसिकांनाही ठेका धरायला लावला. ‘नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा’, ‘चांदण्यांची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया’ ही दोन गीते सिद्धेश जाधव याने सादर केली. तबल्यावर निखील फाटक यांची, तर पखवाजावर ओंकार दळवी, कीबोर्डवर विशाल धुमाळ यांची साथसंगत झाली. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. कबीराचे निर्गुण भजन गात भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 118 Days ago
Can somebody read the Buddhist literature in the otigional the Brahmi script .
0
0

Select Language
Share Link
 
Search