Next
एक तृतीयांश भारतीयांना चरबीयुक्त यकृताचा आजार
‘ग्लोबल हॉस्पिटल’तर्फे ‘फॅटी लिव्हर प्रोग्रॅम’ सुरू
प्रेस रिलीज
Wednesday, July 31, 2019 | 11:58 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : यकृताचा आजाराचा (फॅटी लिव्हर) भारतातील एक तृतीयांश लोकसंख्येवर परिणाम झाला असल्याचा निष्कर्ष ग्लोबल हॉस्पिटलतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून काढण्यात आला. यकृताच्या गंभीर आजारांसाठी हा आजार कारणीभूत आहे. यकृतातील पेशींमध्ये अतिरिक्त चरबी जमा झाल्यामुळे हा आजार होतो. या आजाराचे निदान वेळेवर झाले, तर आहार व व्यायामाने हा आजार पूर्णपणे बरा करता येऊ शकतो. या आजाराचे व्यवस्थापन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. चरबीयुक्त यकृताचा आजार हाताळण्यासाठी परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलमधील यकृतविकारतज्ज्ञ, एंडोक्रिनोलॉजिस्ट, आहारतज्ज्ञ आणि व्यायामतज्ज्ञ एकत्र आले आहेत.

ग्लोबल हॉस्पिटलने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात गेल्या वर्षी (२०१८) हॉस्पिटलमधील लिव्हर क्लिनिकला भेट दिलेल्या चार हजार ८६२ रुग्णांपैकी १७.२ टक्के रुग्णांना चरबीयुक्त यकृताचा आजार असल्याचे आढळून आले. त्यात ७६ टक्के पुरुष, २४ टक्के महिला होत्या. चरबीयुक्त यकृत आणि संबंधित आजारांबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलतर्फे केंद्रीभूत प्रयत्न आणि विविधांगी दृष्टीकोन असलेला फॅटी लिव्हर कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

चरबीयुक्त यकृताच्या आजारामध्ये यकृतात अतिरिक्त चरबी साचण्यापासून (स्टिटॉसिस) ते यकृत सुजणे (स्टिटोहेपटायटिस) या आजारापर्यंत विविध आजारांचा समावेश होतो. ‘स्टिटोहेपटायटिस’ पूर्णपणे बरा होऊ शकतो; पण वेळेवर उपचार केले नाहीत, तर यकृताला सूज येऊन त्याला भेगा पडू शकतात किंवा ते यकृतातील ऊती कडक होऊ शकतात. त्याची परिणती सिऱ्हॉसिसमध्ये होते. काही रुग्णांना यामुळे यकृताचा कर्करोगही होऊ शकतो. त्याचप्रमाणे चरबीयुक्त यकृत असलेल्या व्यक्तींच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे.

नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) हे यकृताच्या आजारासाठी कारणीभूत ठरणारे प्रमुख कारण आहे. ‘एनएएफएलडी’ने गंभीर स्वरूप प्राप्त केले की ‘स्टिटोहेपटायटिस’ होतो. यात यकृताला सूज येते आणि पेशींना इजा पोहोचते. ‘एनएएसएच’मुळे फायब्रॉसिस आणि नंतर ‘सिऱ्हॉसिस’ होऊ शकतो. यात यकृतातील ऊतींना भेगा पडतात आणि ते कठीण होतात. ‘सिऱ्हॉसिस’मुळे यकृत निकामी होते आणि यकृताचा कर्करोग होऊ शकतो. तसे झाल्यास यकृताचा कर्करोग होऊ शकतो. किंबहुना, अनेकांना ‘एनएएफएलडी’ असल्याची जाणीवही नसते. 

चरबीयुक्त यकृत असलेल्यांवर उपचार करण्यासाठी सुयोग्य आहार, व्यायाम व औषधे यांचा समावेश असलेला ‘फॅटी लिव्हर प्रोग्रॅम’ परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलने सुरू केला आहे. यात आहारतज्ज्ञ आणि व्यायामतज्ज्ञ वजन कमी करण्यासाठी वेळापत्रक ठरवून देतील आणि हेपटोलॉजिस्ट पचनसंस्थेशी निगडीत असलेल्या घटकांवर नियंत्रण आणण्यासाठी सल्ला देतील. समुपदेशन करण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची टीमही असेल.

या विषयी बोलताना ग्लोबल हॉस्पिटलमधील यकृत आजार, एचपीबी शस्त्रक्रिया आणि यकृत प्रत्यारोपण संस्थेतील हेपटोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. समीर शहा म्हणाले, ‘चरबीयुक्त यकृत असलेल्या रुग्णांना मदत करण्यासाठी या क्लिनिकमार्फत सर्वांगीण मदत करण्यात येणार आहे. ज्यांना चरबीयुक्त यकृताचा आजार आहे आणि वजन कमी करणे शक्य होत नाहीये, अशा रुग्णांना पुढे जाऊन यकृताचे गंभीर आजार होऊ शकतात. ग्लोबल हॉस्पिटलमध्ये यकृताच्या प्रत्योरोपणाची आवश्यकता असलेल्या सुमारे ३५० रुग्णांमध्ये नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज हे प्रमुख कारण होते. त्यामुळे या व्यक्तींना मदत करण्यासाठी संपूर्ण टीमने एकत्रितत प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.’

फॅटी लिव्हर क्लिनिक सुरू करून भारतात न सुटलेल्या चरबीयुक्त यकृताची समस्या सोडविण्यासाठी आम्ही एक नवीन मार्ग सुचवत असल्याचे डॉ. शहा यांनी सांगितले.

‘ग्लोबल हॉस्पिटल हे वैद्यकीय आधुनिकतेच्या बाबतीत आघाडीवर राहिले आहे आणि सर्वोत्तम व अथ्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान देशात प्रथमच सुरू करणारी वैद्यकीय संस्था ही ग्लोबल हॉस्पिटलची ओळख आहे. विविध आरोग्य उपक्रम सुरू करून या महत्त्वाच्या वैद्यकीय समस्येबाबत जागरुकता निर्माण करणे हे या हॉस्पिटलचे उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे फॅटी लिव्हर कार्यक्रमातील तज्ज्ञांचा सल्ल्याचा रुग्णांना लाभ होईल, कारण आहार आणि जीवनशैलीतील बदलांमुळे ही सर्रास आढळणारी आरोग्य समस्या झाली आहे,’ असे ग्लोबल हॉस्पिटलचे सीईओ डॉ. विवेक तळवलीकर म्हणाले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search