Next
‘डीकेटीई’चा सौर ऊर्जेवर नावीन्यपूर्ण प्रकल्प
प्रेस रिलीज
Thursday, May 31 | 01:38 PM
15 0 0
Share this story

‘डीकेटीई’तील इटीसी विभागामधील विद्यार्थ्यांनी बनविलेले सौर उर्जेवरचा नाविन्यपूर्ण प्रकल्पासोबत विद्यार्थी व प्राध्यापक.

इचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’तील अंतिम वर्ष ईटीसी विभागामधील विद्यार्थ्यांनी अपारंपारिक ऊर्जास्रोतांवर म्हणजेच सौर, पवन ऊर्जा, तसेच जैविक ऊर्जांवर आधारित ‘सोलर पॉवर्ड इंटेलिजंट पॅरॅबोलिक ट्रफ कलेक्टर’ हा नावीन्यपूर्ण प्रकल्प बनविण्यात यश आले आहे.

‘डीकेटीई’चे विद्यार्थी दर वर्षी नवनवीन प्रकल्प सादर करीत असतात. या वर्षी ईटीसी विभागातील विद्यार्थी तुषार माळवे, लक्ष्मण सरगर व वतन जुगनाके या विद्यार्थ्यांनी हा नावीन्यपूर्ण प्रकल्प बनविला आहे. सध्या पर्यावरणामध्ये सततच्या वृक्ष तोडीमुळे गेल्या काही वर्षांत पडत असलेला भीषण दुष्काळ आणि त्यामुळे सर्वांना भासत असलेली विजेची, तसेच पाण्याची टंचाई डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थ्यांनी नैसर्गिक ऊर्जास्रोतांचा उपयोग होण्यासाठी सदरचा प्रकल्प निवडला. या प्रकल्पामध्ये यांत्रिकी, अणुशास्त्र व सौर ऊर्जा या तिन्हीची सांगड घालण्यात आली आहे.

या प्रकल्पामध्ये अर्ध वर्तुळाकार दोन कलेक्टर्स तयार केलेली असून, त्यांना रोबोटिक ऑटोमेशनची जोड देण्यात आली आहे. या ऑटोमेशनमुळे हे दोन्ही कलेक्टर्स सूर्याच्या अचूक स्थानानुसार त्यांची दिशा बदलतात. जशी सूर्यफुले सूर्याच्या ठिकाणानुसार पहाटेपासून संध्याकाळपर्यंत त्यांची दिशा बदलतात, त्याच प्रकारे हे कलेक्टर्स दिवसाच्या सुरुवातीपासून संध्याकाळपर्यंत दिशा बदलतात. म्हणजेच ते पूर्वेकडून पश्‍चिमेकडे वळतात आणि रात्र होताच हे कलेक्टर्स पुन्हा पूर्वेकडे येऊन थांबतात.

या पॅरॅबोलिक कलेक्टरच्या मध्यभागी अॅल्युमिनियम धातूचे पाइप्स बसवलेले आहेत. हे पाइप्स सूर्यकिरणांमुळे सतत गरम राहतात. अर्धवर्तुळाकार पॅरॅबोलिक कलेक्टर सिस्टीममुळे, येणारी सूर्यकिरणे या पाइपवर एकत्रित केली जातात. त्यामुळे पाइपमध्ये असलेले पाणी तापते. वैशिष्ट्यपूर्ण इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमेशन व अद्ययावत मायक्रोकंट्रोलर सिस्टीममुळे आपल्याला हवे तेवढे पाणी किंवा पाण्याचे तापमान निवडता येते. हा संपूर्ण प्रकल्प सोलर पॅनल व बॅटरी बॅकअपवर कार्यान्वित असून, विजेची गरज भासत नाही.

असा हा नैसर्गिक अपारंपारिक सौर ऊर्जेवर कार्यान्वित असलेला बहुउददेशीय प्रकल्प बऱ्याच ठिकाणी उपयुक्त आहे.  बॉयलर सिस्टिम पाणी गरम करण्यासाठी, एअर कन्डिशनिंगसाठी, दूध पाश्चरायझेशन, टेक्स्टाइल प्रोसेसिंग, तसेच केमिकल एव्हेपोरीझशन प्रकल्पामध्ये आणि महत्त्वाचे म्हणजे वीज निर्मितीसाठीसुद्धा या प्रकल्पाचा उपयोग होऊ शकतो.

हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर झालेल्या विविध प्रकल्प सादरीकरण स्पर्धेमध्ये सादर करण्यात आला असून, या प्रकल्पास प्रथम, तसेच द्वितीय क्रमांकाची विविध पारितोषिके मिळालेली आहेत. हा प्रकल्प प्रा. व्ही. बी. सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली झाला असून, प्रा. एस. एस. मगदूम यांचे मोलाचे अनुदेश लाभले. संस्थेचे डायरेक्टर प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, डेप्युटी डायरेक्टर प्रशासकीय डॉ. यू. जे. पाटील, डेप्युटी डायरेक्टर (अ‍ॅकॅडमिक्स) प्रा. डॉ एल. एस. आडमुठे व विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. ए. पाटील यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link