Next
‘समाजस्वास्थ्य’ची कालसुसंगत समर्पकता
BOI
Friday, August 11, 2017 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


र. धों. कर्वे यांच्यावरील ‘समाजस्वास्थ्य’ या अजित दळवी लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित नाटकाचा प्रीमियर अलीकडे पुण्याच्या विनोद दोशी थिएटर फेस्टिव्हलमध्ये झाला. ज्येष्ठ नाट्यसमीक्षक आणि लेखिका शांता गोखले यांनी त्या नाटकाबद्दल लिहिलेला लेख ‘रंगवाचा’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. प्रा. अनिल फराकटे यांनी त्याचा अनुवाद केला आहे. तो येथे प्रसिद्ध करत आहोत. 
...... 
जेव्हा संतती नियमन व कुटुंबकल्याणाचे महाराष्ट्रातील आद्य प्रवर्तक र. धों. कर्वे यांच्या भूमिकेतील गिरीश पांडुरंग कुलकर्णी म्हणाले, ‘जर आपल्या कडव्या सनातन्यांना शक्य झाले असते, तर लोकांना त्यांनी आपल्या मनावर मठ्ठपणाचे जाड पांघरूण सक्तीने घालायला लावले असते.’ तेव्हा प्रेक्षागृहात हास्यकल्लोळ झाला नसता तर नवल! कठीण भिंतीवर हातोडे हाणल्याचा ध्वनी-अर्थ-संयोग ‘मठ्ठ’ या शब्दाने साधला आहे छानच! 

‘समाजस्वास्थ्य’ या अजित दळवी लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित नाटकाचा प्रीमियर अलीकडे पुण्याच्या विनोद दोशी थिएटर फेस्टिव्हलमध्ये झाला. त्यानंतर २५ जणांच्या चमूचा ‘समाजस्वास्थ्य’चा प्रयोग मुंबईत प्रेक्षकांनी भरगच्च भरलेल्या सभागृहात झाला. उल्हसित करणारी गोष्ट म्हणजे प्रेक्षागृहातील पांढऱ्या केसांच्या मोठ्या ब्रिगेडशी समतोल साधत मोठ्या प्रमाणावर उत्साही तरुणांचाही भरणा होता. 

हे नाटक आणि परिणामत: दिग्दर्शन, रूपबंध आणि लेखनशैली इत्यादी गोष्टी जुन्या पठडीतल्या आहेत. प्रेक्षकांना विशिष्ट काळाशी माहितीद्वारे अवगत करू पाहणाऱ्या नाटकाबाबत ही समस्या उभी राहणे साहजिक आहे. नाटककाराने माहितीमध्ये कितीही नाट्यमयता आणण्याचा प्रयत्न केला तरी अखेर ही माहितीच राहते. संवादातील विश्वासाहर्तेवर याचा परिणाम होतो. नाटकाची मांडणी वास्तववादी असल्याने पात्रांमधील संभाषणेदेखील नैसर्गिक वाटावी लागतात. परंतु पात्रं ही माहितीच्या उद्दिष्टाशी बांधील असल्याने आणि सर्वच पात्रं या माहितीच्या कार्यक्रमपत्रिकेला पूरक असल्यानं ही पात्रं औपचारिक आणि कृत्रिम वाटतात. त्यामुळे सुप्रसिद्ध नाटककार, कादंबरीकार आणि भाषांतरकार मामा वरेरकर (अभय जबडे) कर्वेंचे मित्र म्हणून वावरताना अतिउत्साही, अति आनंदी वाटतात, तर जेव्हा त्यांच्या गांधीप्रणित संवेदनशीलतेला धक्का बसतो तेव्हा अतिसंतापी वाटतात. एका सार्वत्रिक सभेत कर्वे सांगतात, ‘कामभावना ही नैसर्गिक मानवी प्रवृत्ती आहे आणि जर गांधींनी ब्रह्मचार्य पाळले असेलच तर ते त्यांच्या पस्तीशीनंतरच.’ 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (अनिल साबळे) यांचे पात्र बऱ्यापैकी हाताळलेले आहे. जरी पहिल्या दृश्यात या पात्राचा वावर केवळ एखाद्या प्याद्याप्रमाणे असला तरी कर्वेंवरील अश्लीलतेच्या दुसऱ्या आरोपामध्ये आंबेडकर कर्वेंचा बचाव करतात, त्या कोर्टसीनमध्ये मात्र हे पात्र स्वतेजाने तळपते. या वेळी एक बॅरिस्टर म्हणून आंबेडकर स्वत:ला सिद्ध करतात. कर्वेंची पत्नी मालती (राजश्री सावंत-वाड) समंजस आणि सरळमार्गी स्त्री स्थापित झाली आहे. संहितेच्या अपेक्षेप्रमाणे तेवढंच करणे शक्य आहे. 

सर्वांत वाईट ‘जमलेले’ पात्र आहे सनातनी ब्राह्मणांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अहिताग्नी राजवाडे (रणजित मोहिते) यांचे. कर्वे पॅरिसमधून निरोध खरेदी करतात आणि इथे वाटतात अशी राजवाडे यांची कर्वेंविरोधात तक्रार आहे. कर्वे म्हणतात, अहिताग्नींनी इथे निरोध निर्मितीचा जर कधी विचार केला, तर निश्चितपणे ते त्यांच्याकडून निरोध खरेदी करतील. या पार्श्वभूमीवर राजवाडे शस्त्र परजूनच कोर्टात येतात, हे समजण्यासारखे आहे. परंतु त्यांचे आक्रस्ताळे हावभाव आणि शिरजोर संवादफेक, या पात्राला वास्तववादी नाटकातील खंबीर विरोधकांपेक्षा एखाद्या प्रक्षोभक नाटकातील खलनायक करून टाकतात. 

मग प्रेक्षकांचे अवधान पकडून ते धरून ठेवायची जिम्मेदारी राहते ती गिरीश पांडुरंग कुलकर्णी यांची आणि ते त्यांची सहज, स-अर्थ संवादफेक (बऱ्याचदा डॉ. श्रीराम लागू यांच्या आवाजातील आरोह-अवरोहाची आठवण करून देणारी), तसेच अंगात भिनवलेला काळाच्या कित्येक योजने पुढे असणाऱ्या माणसाचा खंबीर, स्वनियंत्रित आणि संयत असा रंगमंचावरील वावर याद्वारे पार पाडतात. कर्वे खरोखरच त्यांच्या काळाच्या इतके पुढे होते, की आजच्या काळातले नैतिक नेतृत्व करणारेही अजून त्यांना समजू शकले नाहीत. 

...तर कर्व्यांना त्यांनी त्यांच्या ‘समाजस्वास्थ्य’ नावाच्या मासिकामध्ये लिहिलेल्या ‘व्यभिचाराचा प्रश्न’ या लेखाबद्दल सनातन्यांनी कोर्टात खेचले होते. कारण काय, तर या लेखात त्यांनी विशिष्ट परिस्थितीत घडून येणाऱ्या अनैतिक संबंधांचे समर्थन केले होते. याच कारणाने जिथं ते गणिताचे अध्यापन करीत होते, त्या विल्सन कॉलेजमध्येही त्यांच्यावर अश्लीलतेचा ठपका ठेवण्यात आला होता व त्यांना तिथल्या नोकरीचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांचा युक्तिवाद होता, की अश्लीलता हा कोणत्याही लेखाचा, चित्राचा किंवा वस्तूचा गुण नसून, तो फक्त तसा आरोप करणारांच्या मेंदूचा गुण होय. 

माझ्या दृष्टीने ‘समाजस्वास्थ’ची समर्पकता ज्या काळात (म्हणजे आजच्या काळात) त्याचे लेखन आणि रंगाविष्कारण झाले आहे, त्यामध्ये आहे. सद्यस्थितीत ताकदवान बनलेला धार्मिक आणि राजकीय सनातनवाद ज्यांना मान्य नाही अशा विचारांना, व्यक्तींना देशद्रोही असे लेबल लावून त्यांची जिथं पद्धतशीर मुस्कटदाबी होत आहे, अशा काळात आपण जगत आहोत. सध्या आपण ज्या संघर्षातून जात आहोत तो १०० वर्षांपूर्वीच सुरू झाला होता किंवा कदाचित त्याही आधी ज्ञानेश्वर, तुकाराम आणि भक्ती चळवळ ज्या काळात देशभर पसरली होती - त्या काळात सुरू झाला होता, हे ‘समाजस्वास्थ्य’ पाहिल्यावर पुन्हा एकदा प्रकर्षानं जाणवू लागतं. गेल्या दशकभरात पेठेंनी ज्या प्रकारच्या नाट्यकृतींचं दिग्दर्शन केलं आहे, त्या पेठेंच्या पुरोगामी विचार आणि कृतीचीच प्रतिबिंबं आहेत. त्याच विचाराला या ताज्या नाट्यकृतीतून पेठे पुढे नेत आहेत, हीसुद्धा ‘समाजस्वास्थ्य’ची कालसुसंगत समर्पकता आहे. 

जो माणूस १९३०च्या दशकात माझ्या आईवडिलांना आणि त्यांच्यासारख्या अनेकांना, त्यांचे कुटुंब दोन मुलांपर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी साह्यभूत ठरला होता, त्याच्याबद्दल व्यक्तिश: कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मला ‘समाजस्वास्थ्य’च्या निमित्ताने मिळाली. 
.......
रंगवाचा त्रैमासिक
हा समीक्षापर लेख ‘रंगवाचा’ या केवळ रंगभूमीला वाहिलेल्या त्रैमासिकाच्या मे २०१७च्या पहिल्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. कणकवलीतील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ‘रंगवाचा’ हे त्रैमासिक प्रसिद्ध केले जाते. रंगभूमीशी संबंधित वैविध्यपूर्ण विषय या अंकात समाविष्ट असतात. एक हजार रुपये भरून या अंकाचे आजीव पालक होता येते. या अंकातील निवडक लेख दर पंधरा दिवसांनी, शुक्रवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर वाचता येतील. 

वर्गणीसाठी संपर्क : वामन पंडित, संपादक (रंगवाचा) - ९४२२० ५४७४४. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dr Rajendra Atmaram Mumbarkar About
सुंदर मांडणी. परखड विचाराबद्दल अभिनंदन.
0
0

Select Language
Share Link
 
Search