Next
पुण्यात लवकरच धावणार २५ एसी इलेक्ट्रिक बस
इलेक्ट्रिक बसच्या निविदेस पालिकेत मंजूरी
BOI
Friday, December 07, 2018 | 01:11 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘पुणेकरांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा सर्वांत महत्त्वाचा भाग असलेल्या ‘पीएमपीएमएल’च्या ताफ्यात २६ जानेवारी रोजी २५ एसी इलेक्ट्रिक बस समाविष्ट होणार आहेत. महापालिकेत २५ वातानुकूलित इलेक्ट्रिक बसच्या निविदेस मंजूरी देण्यात आली आहे’,अशी माहिती पीएमपीएमएलचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी गुरुवारी (दि.६) पत्रकार परिषदेत दिली. महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक या वेळी उपस्थित होते.

सिद्धार्थ शिरोळे
‘पुण्याच्या पेठांमध्येही सहज प्रवास करू शकतील अशा नऊ मीटरच्या २५ बस भाडेतत्त्वावर घेण्याचे कंत्राट देण्यात आले असून, या ३१ व्यक्तींची आसनक्षमता असलेल्या या बसेस येत्या २६ जानेवारीला पीएमपीएमएलच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहेत. १२ मीटर लांबीच्या बसची निविदा प्रक्रियाही काहीच दिवसांत पूर्ण होईल’, असेही त्यांनी सांगितले. 

‘एसी इलेक्ट्रिक बसची सुविधा नागरिकांना नॉन एसी बसच्या दरातच उपलब्ध होणार आहे. या बससाठी भाडेतत्वावर प्रति किलोमीटर ४० रुपये ३२ पैसे असा दर देण्यात आला असून, दररोज या बसने २२५ किमीचा प्रवास करणे अपेक्षित आहे. या सर्व बस ‘बीआरटी कंप्लायंट' आहेत. ‘ओलेक्ट्रा ग्रीनटेक’ या कंपनीला हे कंत्राट मिळाले आहे. या बसचे चार्जिंग, तसेच देखभालीची जबाबदारी कंपनीची असेल. पालिका चार्जिंगसाठी वीज पुरवणार आहे. सुरुवातीला या लहान बस बीआरटी मार्गावरच धावणार असून, निगडी ते भेकराईनगर या मार्गावर ही बस धावेल. या बससाठी ४.५ रुपये प्रति किलोमीटर असा नाईट चार्जिंगचा खर्च येणार आहे, तर डे चार्जिंगचा खर्च ६ रुपये प्रति किमी आहे. हे विजेचे शुल्क पालिका भरणार आहे. सध्या सीएनजी नॉन एसी बससाठी प्रत्येक बसला ५४ रुपये ७ पैसे प्रति किमी खर्च येतो. त्यामुळे या बस तुलनेने स्वस्त व पर्यावरणपूरक आहेत. एप्रिलपर्यंत १२ मीटर लांबीच्या १२५ बस देखील पीएमपीएमएलच्या ताफ्यात येणार असून, त्या नंतरच्या ३५० बससाठी वेगळी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे’, असे शिरोळे यांनी सांगितले. 

‘सार्वजनिक वाहतूक सुविधा पर्यावरणपूरक आणि सामान्यांच्या सोयीची व्हावी, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दृष्टीकोन आहे. त्याच्याशी सुसंगत असाच हा निर्णय आहे’, असेही शिरोळे यांनी नमूद केले.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link