Next
सत्या : मुंबईच्या अस्वस्थ, काळ्या इतिहासाची दृकश्राव्य डायरी
BOI
Tuesday, July 23, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


अप्रतिम अभिनय, कमालीचं बांधीव आणि नेटकं दिग्दर्शन, सशक्त कथा, पटकथा, संवाद, देखणं छायाचित्रण, जबरदस्त पार्श्वसंगीत, याला तोडीस तोड असणारं संकलन आणि प्रॉडक्शन डिझाइन, अश्या सगळ्याच बाबतीत उच्च पातळी गाठणारी ‘सत्या’ ही राम गोपाल वर्मांची एक अप्रतिम कलाकृती आहे. मुंबईचा काळा इतिहास, अंडरवर्ल्ड आणि त्याच्याशी निगडित असलेल्या अस्वस्थ माणसांची ही दृकश्राव्य स्वरूपातली डायरी, अनेकदा आवर्जून आवर्तने करावी अशीच आहे... ‘रसास्वाद’ या सदरात या वेळी पाहू या ‘सत्या’ या हिंदी चित्रपटाबद्दल....
..........................................
पावसाची संततधार सुरू झाली, सतत बरसणाऱ्या आभाळाने खिडकीवरच्या पत्र्यावर ताल धरायला सुरुवात केली, की न चुकता आठवण येते, ती सत्याची. सत्या. रामगोपाल वर्मा दिग्दर्शित कल्ट हिंदी चित्रपट. मुंबापुरीच्या अंडरबेलीची कथा. तीन जुलै २०१९ला, हा चित्रपट प्रदर्शित होऊन २१ वर्षे उलटली, तरी त्याची स्मृतीपटलावरची आठवण फिकट होऊ शकत नाही.
‘अच्छी है आपकी खोली तो!
आपकी खोलीसे, आसमान दिखता तो है..
हमारी खोलीसे जो आसमान दिखता है, वो है सामनेवाली बिल्डिंग!’
शेजारी म्हणून नव्यानेच राहायला आलेल्या सत्याला, विद्या सांगते. निरागस, उत्सुक, भाबडी विद्या. पाऊस आला, की भान हरपून पदरात त्याचे थेंब वेचू पाहणारी. इमारतीतल्या एका मधल्या व्हरांड्यातून दिसणाऱ्या, ओल्या होणाऱ्या सृष्टीसोबत स्वतः भान हरपून ओली होणारी. अर्धांगवायूने व्हीलचेअरला खिळलेले बाबा आणि वयोवृद्ध आईची काळजी घेणारी. शास्त्रीय संगीत हाच श्वास आणि ध्यास असलेली विद्या. तिच्या मोठ्या, पाणीदार डोळ्यांत हुशारीची चमक दिसते. नव्या शेजाऱ्यांबद्दल एखाद्या लहान मुलाच्या मनी असावं तसं कुतुहल असतं. प्रचंड विपरित घडूनही, आयुष्यात अनेक दु:खे झेलूनही, गरिबीची झळ सोसत असूनही तिच्या चेहऱ्यावर शक्यतो आनंदच निथळत असतो. 

नवीन आलेल्या शेजाऱ्याची, तो काय काम करतो याची, तिला काहीही माहिती नसते. हा नवा शेजारी मुंबईच्या गुन्हेगारी क्षेत्रात नुकताच पाय ठेवलेला तरुण असतो. हा तरुण कुठून आला, कसा आला, याची कोणतीही माहिती दिग्दर्शक आपल्याला देत नाही. ‘तू कहां का रहनेवाला है, माँ-बाप, घरवाले किधर है तेरे?’ असं भिकू म्हात्रेने उघडपणे विचारूनही, ‘क्या फरक पडता है’, असं उत्तर सत्याकडून येतं. सत्याचं गाव कोणतं, त्याची पार्श्वभूमी काय? त्याच्या मनात इतका आत्मविश्वास कसा? गुन्हे करत असताना, अमानुष कृत्ये करत असताना, तो शांत, निर्विकार भावाने कृती आणि विचार कसा करू शकतो, याबाबत प्रेक्षकाला अपार कुतुहल वाटतं. पेपरमध्ये छापून येणाऱ्या एखाद्या बातमीच्या रिपोर्ताजसारखीच ही कहाणी आहे. एकमेकांशी जोडलेल्या विविध घटनांच्या आत-आत शिरून सर्व तपशील उलगडू पाहणारी. पण काही तपशील, मुद्दामच उघड न-करणारी. गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्यातले व्यवहार यांचा लेखा-जोखा म्हणजे हा १९९८ सालचा चित्रपट. ९८मध्ये आधी बनलेल्या सर्व हिंदी चित्रपटांपेक्षा अतिशय वेगळा. पाथब्रेकर! सिनेमा कसा असावा, त्यातलं संगीत कसं असावं, छायाचित्रण कसं असावं, संवाद कसे असावेत, अभिनय कसा असावा, पात्रांची देहबोली, वेशभूषा कशी असावी, संकलन कसं असावं, इत्यादी सर्व बाबी अभ्यासण्याकरता आवर्जून पाहावा असा चित्रपट. या चित्रपटाने प्रेक्षक आणि समीक्षकांना थक्क करून सोडलं. 

मुंबई अंडरवर्ल्ड. नाव घेतलं तरी दहशत बसेल असा प्रकार. मुंबईच्या इतिहासातलं एक अतिशय महत्त्वाचं, रक्तरंजित पान. ज्येष्ठ पत्रकार, एस. हुसैन झैदींच्या, ‘डोंगरी टू दुबई’मध्ये या काळ्या, रूद्रभीषण इतिहासाचा खोलवर जाऊन घेतलेला वेध आला आहे. या विषयावर अनेक पुस्तके आहेत. चित्रपट आहेत. यासंदर्भातल्या बातम्या, घटना तो भयानक काळ मुंबईमध्ये जगलेल्यांना ठाऊक आहे. ८०च्या दशकात जन्मलेल्यांनाही यातल्या काही घटना व त्यांच्याशी संबंधित व्यक्ती ज्ञात असतील, पण या विषयातले तपशील दाखवत असतानाच, गुन्हेगारांमधला माणूसही बारकाव्यांसकट दाखवायचं काम आजवर किती चित्रपटांनी अथवा पुस्तकांनी केलं? हा प्रश्न समोर येतो. हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या चित्रपटांमध्ये आणि पुस्तकांमध्ये ही वर्णने आली. 

सत्या प्रदर्शित झाला, त्या सुमारास ८०च्या दशकातलं बटबटीत सिनेमांचं दशक आणि तश्या प्रकारच्या सिनेमांची लाट संपली होतं. ९०च्या दशकातल्या सिनेमांची भुरळ प्रेक्षकाला पडणं मात्र सुरूच होतं. शाहरुख, सलमान, आमीर, अक्षय, अजय इत्यादींचे सिनेमे अजूनही आपली व्यावसायिक सिनेमाची चौकट सोडू बघत नव्हते. राजश्री, चोप्रा, जोहर इत्यादी बड्या बॅनर्सखाली बनणारे सिनेमे रोमान्स, ड्रामा आणि भव्य चकचकाट आणि पोशाखीपणातच धन्यता मानून होते. व्यावसायिक आणि समांतर सिनेमाच्या वाटा अजूनही वेगळ्याच होत्या. मग अचानक काहीतरी बदल झाला आणि चित्रपटसृष्टीच्या ट्रेंडमधे बदल घडले. रामगोपाल वर्मांचा ‘सत्या’ आणि विक्रम भटचा ‘गुलाम’ असे दोन सिनेमे साधारण मागे-पुढेच प्रदर्शित झाले.  १९ जूनला गुलाम आणि ३ जुलैला सत्या. वर्ष होतं १९९८. तसं पाहायला गेलं, तर ‘गुलाम’ पूर्णपणे धंदेवाईक सिनेमा, पण तत्कालीन व्यावसायिक सिनेमांची चाकोरी धाडसाने मोडून काढणारा आणि सत्या हा सिनेमा व्यावसायिक आणि कलात्मक सिनेमांचा सुयोग्य मिलाफ असणारा. सर्वसामान्य बॉलीवूड सिनेमांच्या कैक पायऱ्या वरचा. 

गुन्हेगारांचं जग हे आपल्या रोजच्याच जगात किती बेमालूमपणे मिसळून गेलेलं असतं, सामान्य चेहऱ्या मोहऱ्याच्या माणसाचं मन किती क्रूर असू शकतं, एका क्षणी एकच माणूस क्रूरकर्मा असू शकतो, तर दुसऱ्याच क्षणी तोच माणूस, कमालीचा हळवा कसा होतो, हे जवळून दाखवणारा हा सिनेमा. गुन्हेगारी जगतातल्या आणि पोलिस खात्यातल्या माणसांचं माणूसपण दाखवणारा. सत्या प्रदर्शित झाला आणि सिनेमा म्हणजे नेमकी काय चीज असते, हे सर्वसामान्य प्रेक्षकाला नव्याने कळलं. तेच ते विषय, प्रेमकथा, विरहकथा, सूडकथा, शृंगारकथा, बिनडोक विनोदीपट, भडक रहस्यपट, गुन्हेगार विश्वाच्या बटबटीत कहाण्या पाहून प्रेक्षक कंटाळलेला असताना, कसलाही गाजावाजा न करता सत्या आला आणि प्रेक्षकांची मने जिंकू लागला. रामगोपाल वर्मा, हे नाव सर्वतोमुखी झालं. याआधी कधीही न दिसलेली मुंबई, तिचे अंतरंग, पावसाळ्यात दिसणारं तिचं आगळं-वेगळं रूप, अठरा पगड जातीची माणसं आपल्या पोटात घेऊन जगणाऱ्या या मुंबापुरीचं रात्रीचं विश्व, सर्वसामान्य माणसाच्या पांढरपेशा जगाच्या आजूबाजूलाच असणारं, त्यांच्या एरवीच्या जगाच्या हातात हात घेऊन वावरणारं हे नवं विश्व प्रेक्षकांनी पाहिलं.

पोलिस आणि अंडरवर्ल्डमधले संबंध, नेते मंडळी आणि त्यांनी स्वार्थासाठी केलेला गुन्हेगारांचा वापर हे विषय अनेकदा चित्रपट कादंबऱ्यांमधून येऊन गेलेले आहेत. राहुल रवैलच्या ‘अर्जुन’पासून आपण असे विषय बघत, ऐकत आलो. वेगवेगळ्या स्वरुपात दिसणारा पाऊस आपण आधीही पाहिलेला आहे. गुन्हेगारी जगतावर आधारलेले चित्रपट आपण पाहिलेले आहेत. पण मग सत्यामधे वेगळं काय आहे? तर सत्यामधे दिसणारा खूप वेगळा पाऊस. त्यात असलेलं अफलातून पार्श्वसंगीत, ‘गरीला-टेक्निक’ वापरून फिरणारा आणि एरवीपेक्षा खूप वेगळ्या, आजवर न दिसलेल्या जागा दाखवणारा आणि आधी पाहिलेल्याच काही जागा नव्या दृष्टीकोनातून दाखवणारा कॅमेरा, चारचौघांसारखे दिसणारे गुन्हेगार, दिवसा ढवळ्या चालू असणारे त्यांचे काळेकुट्ट व्यवहार, अतिशय वेगळा पोत असणारा ध्वनी, कथेचं बोट धरून, अलगद उलगडत जाणारी गुन्हेगार आणि पोलिसांची सायकी, त्यांच्यामधे दडलेलं माणूसपण, या सगळ्यांतून सशक्तपणे उभं राहणारं, एकंदर प्रणालीचं धडकी भरवणारं रूप. या आणि अशा अनेक गोष्टी वेगळ्या आहेत ‘सत्या’मध्ये. 

सत्या हा एकदा पाहून सोडून देण्यासारखा चित्रपट नाही. हा सिनेमा करमणुकीसाठी नाही. तो जितके वेळा पाहू, तितक्या वेळा निरनिराळे अनुभव देतो. नव्या गोष्टी दाखवतो. हा चित्रपट पाहायचा, तो ऐकायचा, पाहायचा आणि ऐकायचा. यावर चिंतन करायचं. या सगळ्या कृती एकदम करायच्या नाहीत. प्रत्येक वेळी पाहताना वेगवेगळ्या गोष्टी करून पाहायच्या. यात चालणारा अफलातून असा ‘पॉवर-प्ले’ पाहायचा. माणसांचे क्रूर, हिंस्र चेहरे पाहायचे, आपसातलं राजकारण पाहायचं. यातला कॅमेरा कसा फिरतो ते पाहायचं, पात्रांच्या चेहऱ्यावर हलणाऱ्या रेषा पाहायच्या, तर कधी कोरे, करकरीत, भावनाविरहीत चेहरे पाहायचे, हादरवून टाकणारे ‘शूट-आउट’ पाहायचे आणि एकंदर आयुष्याबाबत, त्यातल्या निरर्थकपणाबाबत विचार करायचा. देवानं आपल्याला सुशिक्षित, सुसंस्कारी माणूस बनवलं, चांगल्या घरात, चांगल्या काळात जन्माला घातलं, एक सुरक्षित आयुष्य बहाल केलं म्हणून त्याचे आभार मानायचे. ‘सत्या’ जेव्हा जेव्हा पाहतो, तेव्हा तेव्हा या सुरक्षित आयुष्याबद्दल देवाचे आभार मानावे असं मनापासून वाटतं. विद्याच्या डोळ्यातलं थांबणारं पाणी, सत्याचं रक्तानं माखलेलं कपाळ, भिकूच्या सहकाऱ्यानं उद्विग्नतेनं पेपरवर झाडलेली गोळी, भाऊ ठाकुरदास जावळे नावाच्या उग्र दानवासारखा चेहरा, जग्गा आणि त्याचा सत्यावर ब्लेड उगारणारा हस्तक ही सगळी दृश्ये. तसेच विद्या आणि सत्याने चौपाटीवर फिरताना एकमेकांच्या हातात हात गुंफून म्हटलेले गुलजार साहेबांच्या लेखणीतून उतरलेले शब्द, ‘बादलों से काट काटके’, भर पावसात स्कूटर पायावर पडून त्याखाली पाय सापडलेला भिकू म्हात्रेचा हस्तक, पाऊस पदरात गोळा करताना विद्याने म्हटलेलं ‘गीला गीला पानी’, वीज गेलेली असताना मेणबत्तीच्या प्रकाशात उजळलेला विद्याचा रेखीव, बोलका चेहरा, भिकू म्हात्रेला त्याच्या बायकोने मारलेली जोरदार थापड, त्यानंतरचं तिचं गालातल्या गालात हसणं, सत्या आणि विद्याने पाहिलेली अगणित स्वप्नं, ‘मौका सभीको मिलता है’, असं सत्याचं भिकूला सुनावणं, गरम रक्ताचा इन्स्पेक्टर खांडेलकर, एसीपी आमोद शुक्ला ही सगळी व्हिजुअल्स, सत्या म्हटलं, की क्षणात माझ्या डोळ्यासमोरून सरकतात. 

सुरुवातीच्या काही फ्रेम्सपासूनच मुंबई आणि तिचा विचित्रपणा लक्षात येऊ लागतो. हरतऱ्हेची माणसं, त्यांचे दैनंदिन व्यवहार दिसू लागतात. माणसांच्या जंगलात आपला एक कोरडा, अलिप्त पण करारी स्वभाव घेऊन सत्या कुठून तरी दाखल होतो. बार टेंडर म्हणून काम करत असतानाच, त्याची गाठ जग्गा नावाच्या गुंडाशी पडते. किरकोळ कारणावरून सुरू झालेला संघर्ष सत्याच्या जीवावर बेततो. त्यातून, खोटेनाटे आरोप लावून, त्याची रवानगी जेलमध्ये होते. जेलमधले प्रसंग, भिकू म्हात्रेशी झालेला त्याचा संघर्ष, संघर्षाचं एका क्षणी मैत्रीत होणारं रुपांतर, यामुळे सत्याचं आयुष्य बदलून जातं. मनोज वाजपेयी या सिनेमात मनोज वाजपेयी वाटत नाही. तो भिकू म्हात्रे वाटतो. उर्मिला मातोंडकरसारखी मादक आणि अतिशय सुंदर अभिनेत्री यात कनिष्ठ मध्यमवर्गीय, चाळीत राहणारी विद्या वाटते. मकरंद देशपांडे यात मुळे वकीलच वाटतो. सौरभ शुक्ला हा कल्लूमामाच वाटतो. खांडेलकर, आमोद शुक्ला, भाऊ ठाकूरदास जावळे, जग्गा, ही पात्रे त्यांच्या स्वभावाच्या बारकाव्यांसह लक्षात राहतात. अभिनेते, अभिनेत्री यांच्या नावांऐवजी पात्रांची नावे लक्षात राहणे, ही दिग्दर्शक आणि लेखकांची कमाल आहे. रामगोपाल वर्मांच्या अप्रतिम दिग्दर्शनाला, अनुराग कश्यप आणि सौरभ शुक्ला यांची लेखणी अतिशय दमदार स्वरुपाची साथ देते. अतिशय अचाट स्वरूपाचा कथेचा स्पॅन, पडद्यावर, व्यवस्थित वेळ घेऊन, मोठ्या गांभीर्यानं आणि संयतपणे उलगडत जातो. बारीकसारीक तपशील आणि बारकावे टिपत, रामगोपाल वर्मा ही अंतर्मुख करणारी कहाणी सांगतो. 

‘हा चित्रपट पाहून, कोण्या गँगस्टरनं, पिस्तूल हाती धरताना, कोणाला मारण्यापूर्वी थोडा जरी विचार केला, तरी हा चित्रपट बनवायचं सार्थक झालं, असं मी मानेन’, असं राम गोपाल वर्मा चित्रपटाच्या शेवटी म्हणतात. ‘सत्याच्या हातून मारल्या गेलेल्या व्यक्तींसाठी मी तितकेच अश्रू ढाळेन, जितके मी सत्याकरता ढाळेन’, असंही म्हणतात. सत्यामधली पात्रं ही संवाद पाठ करून बोलत नाहीत. दोन माणसं एकमेकांशी अगदी सहजगत्या जसे संवाद साधतील, तशीच ती संवाद साधतात. म्हणूनच ती कृत्रिम वाटत नाहीत. नैसर्गिक वाटतात. जग्गाच्या माणसाच्या तोंडावर सत्याने ब्लेड ओढणं काय, साउंड एक्स्पान्शनचा केलेला प्रभावी वापर काय, पार्श्वभूमीवर ऐकू येणारा हार्पचा खर्ज, आर्त व्हायोलिन काय, पावसाचा आवाज काय, ‘गीला गीला पानी’मधली अधेमधे सामोरी येणारी, आवर्जून जाणवणारी शांतता काय, हे सगळंच, अफलातून वातावरण निर्मिती करणारं आहे. चित्रपटसृष्टी, उद्योगपती, अंडरवर्ल्ड, पोलिस, नेते आणि सामान्य लोक अशी सगळी प्रणाली सत्यामध्ये पाहायला मिळते. 

‘भिकू म्हात्रे’ हा मुंबईमधला मोठा गुन्हेगार एक ‘फॅमिली मॅन’ असणे. कुटुंबीयांशी असलेलं त्याचं वागणं, इतर कुणाही मध्यमवर्गीय माणसासारखंच असतं. आपल्या शेजारी राहणारा सत्या, हा कुणीतरी आपल्याचसारखा मध्यमवर्गीय असल्याचं विद्याने समजणं, आमोद शुक्ला आणि इन्स्पेक्टर खांडेलकर यांनी शूटआउट, एनकाऊंटरसारख्या घटनांची चर्चा कुटुंबातील सदस्य सोबत असताना करणं असो, भांडणं झालेली असताना, एरवी डॉमिनेटिंग असणाऱ्या भिकू म्हात्रेच्या बायकोने सत्या समोर असताना त्याची थोबाडीत खाणं, सत्या गेल्यानंतर भिकूला उलट दोन-तीन थोबाडीत मारणं असो, एका शूटआऊटच्या प्रसंगी, बाजूला लहान मुले खेळत असणे, पैकी एका मुलाला कसलीही इजा पोहोचू नये म्हणून, एका कधीही न-बोलणाऱ्या, सतत कोरा चेहरा करून असणाऱ्या गँगस्टरनं आपल्या जवळ ओढून सुरक्षित ठेवायचा प्रयत्न करणं, गुरूनारायणसंदर्भात कल्लूमामाचं भिकूला समजावणं असो, चंदरला पोलिसांनी गोळ्या घातल्यावर त्याबद्दल बोलत असताना भिकू म्हात्रेचं पोटतिडकीने उद्वेग व्यक्त करणं असो, वकील मुळेनं भिकूकडे पाहून ‘ये साला नही समजेगा’ म्हणणं असो किंवा सत्यानं शेवटच्या प्रसंगात कल्लूमामावर पिस्तुल रोखून प्लिज म्हणणं असो, हे सगळेच प्रसंग पात्रांच्या प्रोफेशनमागे दडलेले त्यांचे खरे सच्चे चेहरे दाखवणारे आहेत. दलाली केल्याचे खोटे पुरावे लावणं असो, एखाद्याचं एनकाउंटर करणं असो, खंडणी व्यवहार असोत, कमिशनरला मारायचा प्लॅन करणं असो किंवा कोणाला मारल्यानंतर त्याची बॉडी गटारात टाकण्याचा उल्लेख असो, हे सगळेच पाहताना सामान्य प्रेक्षकाला जरी हादरायला होत असलं, तरीही हे सगळं व्यवहार गँगस्टर लोक कमालीच्या शांतपणे करतात. ते त्यांचं रोजचं काम आहे. गँगस्टर आणि पोलिस तुमच्या-आमच्यातलेच असतात. त्यांनाही सुख दु:खे आहेत. भावना आहेत. ते सिस्टमचा भाग आहेत. पोलिस आणि त्यांच्यात तणाव आहेत. तरीही एक प्रकारचं सामंजस्य आहे. ही सगळी यंत्रणा भीती या एका घटकावर चालते. काही घटनांमुळे या सगळ्याचा समतोल ढळतो आणि मग हाहाक्कार होतो. सामान्य माणसासकट सगळ्यांचच विश्व हादरतं. 

अप्रतिम अभिनय, कमालीचं बांधीव आणि नेटकं दिग्दर्शन, सशक्त कथा, पटकथा, संवाद, देखणं छायाचित्रण, जबरदस्त पार्श्वसंगीत, याला तोडीस तोड असणारं संकलन आणि प्रॉडक्शन डिझाइन, अश्या सगळ्याच बाबतीत उच्च पातळी गाठणारी ही एक अप्रतिम कलाकृती आहे. मुंबईचा काळा इतिहास, मुंबई अंडरवर्ल्ड आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या अस्वस्थ माणसांची ही दृकश्राव्य स्वरूपातली, सत्या नावाची ही डायरी, अनेकदा आवर्जून आवर्तने करावी अशीच आहे.
 
- हर्षद सहस्रबुद्धे
ई-मेल : sahasrabudheharshad@gmail.com

(लेखक पुण्यात उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असून, गेली अनेक वर्षे वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. त्यांचे ‘रसास्वाद’ हे सदर दर १५ दिवसांनी, मंगळवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/bBLgCE या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
arun tingote About 33 Days ago
सुंदर लिहिल आहे. सत्या हा चित्रपट मलाही प्रचंड आवडतो.
1
0

Select Language
Share Link
 
Search