Next
‘बीएनसीए’च्या देवकी बांदलला सव्वालाखाचा पुरस्कार
कै. नंदिनी सप्रे शोधनिबंध पुरस्कार ख्रिस्तोफर बेनिंजर यांच्या हस्ते प्रदान
प्रेस रिलीज
Friday, July 05, 2019 | 05:05 PM
15 0 0
Share this article:


पुणे : आर्किटेक्ट कै. नंदिनी सप्रे यांच्या नावाने शोध निबंधासाठी देण्यात येणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफआर्किटेक्चर फॉर वूमेनमधील (बीएनसीए) देवकी बांदल हिला नुकताच मिळाला. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शहर नियोजक व आर्किटेक्ट ख्रिस्तोफर बेनिंजर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण आले असून, सव्वालाख रुपयांचा धनादेश व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

‘वास्तूरचना शास्त्राच्या माध्यमातून देशातील धार्मिक ऐक्य’ साधण्याचा देवकी बांदल हिचा शोधनिबंध ९१ स्पर्धकांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरला. त्यातील पहिल्या तीन स्पर्धकांचे सादरीकरण झाले. सायली गंगन आणि संजना शिंदे यांनाही बेनिंजर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देण्यात आले. त्यांनी शोधनिबंधांसाठी अनुक्रमे ‘महिलांसाठी कौशल्य विकास केंद्राची कोल्हापुरात उभारणी’ आणि ‘सार्वजनिक जागा म्हणून बाजारपेठांचा विकास’ हे विषय निवडले होते.

कै. सप्रे पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून, महिला सबलीकरणासाठी ते ‘बीएनसीए’च्या विद्यार्थिनींसाठी आयोजित केले जाते. या वेळी ‘बीएनसीए’चे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप, स्पर्धेच्या आयोजक आणि आंतरराष्ट्रीय कक्षाच्या प्रमुख प्रा. श्रुती जोशी, नंदिनी यांचे पती अतुल सप्रे, सदाशिव सप्रे या शिवाय परीक्षक आर्किटेक्ट संदीप महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी अंतिम फेरीतील तीनही स्पर्धकांचे कौतुक करून बेनिंजर म्हणाले, ‘वास्तूरचनाशास्त्रातील डिझाइन या संकल्पनेला जोडून मुख्य विषयाला न सोडता हे शोधनिबंध उत्तम रितीने सादर करण्यात आले. वाङ्मातून आशियातील उत्तम महिला आर्किटेक्ट तयार करण्याचे काम ‘बीएनसीए’ करत असून, ही स्पर्धा म्हणजे कै. सप्रे यांच्या ध्येयाचा गौरवच आहे.’

डॉ. कश्यप म्हणाले, ‘या स्पर्धेतून विजयी विद्यार्थिनीला पुढच्या करिअरसाठी निधी उपलब्ध होत असून, त्यातून तिला अधिक आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करणे शक्य होईल. भविष्यात या स्पर्धेची व्याप्ती आणखीन वाढवण्याचा आमचा मानस आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search