Next
जागतिक क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ९३व्या स्थानावर
दी टाइम्स हायर एज्युकेशन इमर्जिंग इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी क्रमवारीत देशातील ४९ संस्था
BOI
Saturday, January 19, 2019 | 04:50 PM
15 0 0
Share this story

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

पुणे : ‘दी टाइम्स हायर एज्युकेशन’ने जाहीर केलेल्या इमर्जिंग इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ९३वा क्रमांक पटकावला आहे. बेंगळुरूमधील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ने चौदावे स्थान मिळविले आहे. तसेच मुंबई, रुरकी, कानपूर, खरगपूर, इंदूर, दिल्ली, चेन्नई येथील आयआयटी पहिल्या ७५ क्रमांकांत आहेत. देशातील एकूण ४९ संस्थांनी या यादीत स्थान मिळविले असून, त्यापैकी २५ संस्था पहिल्या २०० क्रमांकांत आहेत. 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स,बेंगळुरू

अध्यापन, संशोधन, ज्ञान व माहितीची घेवाण-देवाण, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन, बाजारपेठ आणि उद्योगांच्या मागणीनुसार अभ्यासक्रमांमध्ये बदल अशा विविध १३ मूल्यांवर ‘दी टाइम्स हायर एज्युकेशन’ने इमर्जिंग इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी ही गुणवत्ता यादी प्रकाशित केली आहे. या यादीमध्ये ४३ देशांमधील एकूण ४५० विद्यापीठांचा समावेश आहे. गेल्या वर्षी ही संख्या ३७८ होती. 

या यादीत यंदा देशातील एकूण ४९ शैक्षणिक संस्था असून, गेल्या वर्षी ही संख्या ४२ होती. या ४९ संस्थांपैकी २५ संस्था पहिल्या २०० क्रमांकामध्ये आहेत. गेल्या वर्षी ही संख्या १७ होती. यंदा भारतातील अनेक नवीन संस्थांनी या यादीत स्थान मिळवले असून, अनेक संस्थांनी वरचे स्थान पटकावले आहे. काही संस्था मागेही पडल्या आहेत. 

आयआयटी, मुंबई

बेंगळुरूमधील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ने (आयआयएस्सी) १४वे स्थान पटकावत या यादीत अग्रक्रम मिळवला आहे. त्यापाठोपाठ आयआयटी मुंबई २७व्या स्थानावर आहे. आयआयटी रुरकीने २१ स्थाने पुढे झेप घेऊन ३५वे स्थान मिळवले आहे. आयआयटी कानपूर ४६, आयआयटी खरगपूर ५५, आयआयटी इंदूर ६१, जेएसएस अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च ६४, आयआयटी दिल्ली ६६, आयआयटी चेन्नई ७५, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ९३व्या क्रमांकावर आहे. पुणे विद्यापीठ गेल्या वर्षी या यादीत १८०व्या स्थानावर होते. संशोधन क्षेत्रातील कामगिरी सुधारल्याने विद्यापीठाने ही आघाडी घेतली आहे. पुण्यातील ‘आयसर’ अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च ही संस्था १०९व्या क्रमांकावर आहे. बनारस हिंदू विद्यापीठ आणि अमृता विद्यापीठ यांनी प्रथमच पहिल्या १५० संस्थांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, (आयसर) पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर‘दी टाइम्स हायर एज्युकेशनच्या इमर्जिंग इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये विद्यापीठ ९३व्या क्रमांकावर आल्याने आम्हाला आनंद झाला आहे. गेल्या दोन वर्षांत बाजारपेठेच्या मागणीनुसार आणि अर्थव्यवस्था बळकटीकरणाच्या दृष्टीने नवे अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरू केले आहेत. त्यामुळे काही सकारात्मक बदल दिसत आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी अनेक आंतराष्ट्रीय विद्यापीठांसोबत विद्यापीठाने करार केले आहेत. त्याचे परिणाम दिसू लागले आहेत,’ अशी प्रतिक्रिया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केली. 

चीनचे वर्चस्व कायम 
या यादीत चीनच्या एकूण ७२ शैक्षणिक संस्थांचा समावेश असून, पहिल्या पाचपैकी चारही क्रमांकांवर त्यांचेच वर्चस्व आहे. या यादीत चीनचे त्सिंगवा विद्यापीठ प्रथम क्रमांकावर, पेकिंग विद्यापीठ दुसऱ्या क्रमांकावर, झिजियांग विद्यापीठ तिसऱ्या क्रमांकावर, तर युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ चायना चौथ्या क्रमांकावर आहे. पाचव्या स्थानावर लोमोनोसोव्ह मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटी आहे. 

याबाबत संपादक एली बोथवेल म्हणाले, ‘भारतीय संस्थांमध्ये या यादीत अव्वल स्थान मिळवण्याची क्षमता आहे. शिकवण्याच्या कौशल्यात त्या आघाडीवर आहेत; मात्र आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनाबाबत मागे आहेत. जागतिक पातळीवर उच्च शिक्षणासाठी प्रगती करताना संशोधनाबाबत सहकार्य वाढवण्यावर भर देणे आवश्यक आहे. जगभरातील विद्यार्थ्यांनी भारतात येण्यासाठी प्रयत्न करणेही गरजेचे आहे.’ 

‘इजिप्त, मलेशिया यांसारखे देशही झपाट्याने या क्षेत्रात पुढे येत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे,’ असेही ते म्हणाले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link