Next
‘भिमाईची चिरनिद्रा काळजाला हुरहुर लावणारी’
मालिकेच्या आठवणींनी गहिवरल्या अभिनेत्री चिन्मयी सुमीत
प्रेस रिलीज
Tuesday, June 11, 2019 | 04:07 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘स्टार प्रवाह’ मालिकेवर सध्या सुरू असलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेत बाबासाहेबांच्या आईची म्हणजेच भिमाईची भूमिका करणाऱ्या चिन्मयी सुमित यांनी भिमाईच्या निधनाच्या चित्रीकरणानंतर नुकताच मालिकेचा निरोप घेतला. भिमाई यांची चिरनिद्रा हुरहूर लावणारी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी या वेळी व्यक्त केली. 

भिमाईंचे व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावी आणि खंबीर असे होते. बाबासाहेबांच्या लहानपणीच भीमाईंचे आजारपणात निधन झालं. सर्वात लहान लेकरू म्हणून भीवावर त्यांचा प्रचंड जीव होता. या मालिकेच्या सेटवरही असेच काहीसे चित्र होते. आंबेडकरांच्या बालपणीची भूमिका साकारणाऱ्या अमृत गायकवाडने चिन्मयी आणि इतर सर्वांनाच खूप लळा लावला होता. चिन्मयी यांनी मालिकेचा निरोप घेतला; पण छोटा भीवा, मालिकेतल्या इतर सहकलाकारांसोबतच्या आठवणीने आणि या कुटुंबात यापुढे आपण नसणार या जाणीवेने त्या भावूक झाल्या. 

या मालिकेविषयी सांगताना चिन्मयी म्हणाल्या, ‘माझी आई औरंगाबाद इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात शिक्षिका होती. त्यामुळे लहानपणापासूनच माझ्यावर बाबासाहेबांसारखे व्हायचे हे संस्कार झाले. घरात खूप पुस्तक होती. त्याच प्रमाणे शाळेच्या लायब्ररीत मुक्त प्रवेश होता, त्यामुळे वाचनाची गोडी लहानपणापासूनच लागली. आमच्या कुटुंबावर बाबासाहेबांच्या विचारांचा पगडा होता आणि आजही कायम आहे. या भूमिकेसाठी जेव्हा दशमी प्रॉडक्शन्समधून विचारणा झाली तेव्हा मी तातडीने होकार कळवला. महामानवाच्या आईची भूमिका साकारायला मिळणे ही माझ्यासाठी सर्वांत मोठी गोष्ट होती. अतिशय कणखर आणि स्वाभिमानी स्त्री असणाऱ्या भिमाईंना मालिकेच्या रूपाने भेटता आले याचा आनंद आहे. या मालिकेचे कुटुंब माझ्या मनात कायम वसलेले राहिल.’

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री नऊ वाजता दाखविली जाते. या मालिकेच्या पुढील भागांमध्ये लहान वयातच आईचे छत्र गमावलेल्या भीमाच्या मनाची घालमेल पाहायला मिळणार आहे. आईच्या आठवणीने व्याकूळ भीवाच्या मनाची तगमग प्रेक्षकांच्या काळजाला नक्कीच हात घालेल. लहानग्या मुलांची होणारी परवड आणि घर सांभाळायला कुणीच नसल्यामुळे भीवाचे बाबा म्हणजेच रामजी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतात. भीवाला मात्र दुसऱ्या आईचे येणे पटत नाही. बयेची म्हणजे पहिल्या आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही या मतावर तो ठाम असतो. आईचे जाणे आणि सावत्र आईचे येणे या प्रसंगातून भीवाच्या लहानग्या मनावर कसा परिणाम होणार, याची उत्कंठावर्धक गोष्ट ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेच्या पुढील भागांत पाहायला मिळणार आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search