‘साद फाउंडेशन’तर्फे ग्रामीण भागात मोफत आरोग्य शिबिर
रोटरीच्या सहकार्याने शहापूर तालुक्यात १७८ बालकांची मोफत तपासणी
दत्तात्रय पाटील
Wednesday, August 22, 2018 | 11:55 AM
1500
Share this story
शहापूर (ठाणे) : ठाणे जिल्ह्यातील एकमेव आदिवासी तालुका असलेल्या शहापूरचा अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या डोळखांब येथे १९ ऑगस्ट २०१८ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. बालसंरक्षण या विषयावर काम करत असलेली साद फाउंडेशन ही संस्था आणि ‘रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१४२’ यांच्या संयुक्त विद्यमाने मातांसह लहान मुलांची मोफत आरोग्य तपासणी या वेळी करण्यात आली.
धावपळीच्या जीवनात चुकीच्या आहार व विहार पद्धतींमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामीण भागात लहान मुलांच्या कुपोषणासोबत त्यांना हृदयविकारासारखे विकार होण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. त्यामुळे लहान मुलांची वेळच्या वेळी सर्वांग आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन गरीब व गरजूंच्या आरोग्याची मोफत तपासणी या उपक्रमाद्वारे करण्यात आली.
रविवारी सुट्टीच्या दिवशी डोळखांब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या या शिबिरात नवजात बालकांपासून सोळा वर्षांपर्यंतच्या १७८ मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली, त्यांच्या पालकांना आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला. मातांना स्तनपानाविषयी माहिती देण्यात आली. पालकांनी लहान मुलांच्या आरोग्याविषयी काय काळजी घ्यावी, याविषयी डॉ. सविता जावडेकर (एमएस), बालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप मांगेकर, डॉ. राजेंद्र जावडेकर यांनी मार्गदर्शन केले.
हे शिबिर यशस्वी होण्यासाठी साद फाउंडेशनच्या अॅड. पल्लवी, प्रदीप पवार, श्रुती क्षीरसागर, गीतांजली विचारे, विद्या मोरे, मयुरी शिंदे, रवींद्र विशे व साद युवा टीमचे दत्तात्रय पाटील, सागर खरात, संकेत पवार, आनंद खरे, जयेश चौधरी, प्रणय घाडगे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
या शिबिरात मुंबईच्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थिनी स्वयंसेवक म्हणून उपस्थित होत्या. तसेच शहापूरच्या एस. बी. कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजनेचे अमन साळुंखे, हरिश्चंद्र देसले यांनीही स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन सहकार्य केले. हृदयविकार व कुपोषणाचे प्रमाण अधिक असलेल्या बालकांवर पुढील उपचारांसाठी रोटरी क्लब व साद फाउंडेशन यांच्यामार्फत प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रदीप पवार यांनी सांगितले.
शिबिराला शहापूर पंचायत समितीच्या महिला बालविकास व आरोग्य विभागानेही सहकार्य केले. तालुक्याच्या ठिकाणापासून ४० ते ४५ किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या ग्रामीण भागातील लहान मुलांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने हे शिबिर आयोजित केल्याबद्दल उपस्थितांनी साद फाउंडेशन व ‘रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट’चे आभार मानले.