Next
रोलबॉलच्या दोन विश्वविक्रमांची ‘गिनिज बुक’मध्ये नोंद
प्रेस रिलीज
Thursday, June 07, 2018 | 06:26 PM
15 0 0
Share this story

विनीत कुबेर आणि राजू दाभाडे यांना गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून मिळालेले प्रमाणपत्र प्रदान करताना रोलबॉल प्रशिक्षक चेतन भांडवलकर

पुणे : पुण्याने जगाला दिलेल्या ‘रोलबॉल’ या आगळ्यावेगळ्या खेळाचे नाव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले आहे. रोलबॉल फेडरेशन ऑफ इंडिया (आरबीएफआय) आणि आंतरराष्ट्रीय रोलबॉल फेडरेशन (आयआरबीएफ) यांनी सलग चोवीस तास रोलबॉलचा सामना खेळवून, गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवले आहे.

‘तीन तास सुरू असलेला जोराचा पाऊस, दुपारच्या वेळी पडलेले कडक ऊन या कशाचीही तमा न बाळगता; खेळाडूंनी रोलबॉलचा हा सामना सलग २४ तास रंगवला. पुणे आणि महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून आलेल्या तब्बल तीनशेनऊ रोलबॉल खेळाडूंनी सामन्यात भाग घेऊन रोलबॉल सामना खेळणाऱ्या सर्वाधिक खेळांडूंचाही विश्वविक्रम नोंदवला. अशा पद्धतीने रोलबॉल या खेळाच्या नावावर दोन विश्वविक्रमांची भर पडली आहे’,

अशी माहिती रोलबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे (आरबीएफआय) अध्यक्ष विनीत कुबेर यांनी पत्रकार परिषदेत दिली. रोलबॉल या खेळाचा शोध लावणारे क्रिडा मार्गदर्शक राजू दाभाडे, रोलबॉल प्रशिक्षक चेतन भांडवलकर या वेळी उपस्थित होते. या वेळी भांडवलकर यांच्या हस्ते विनीत कुबेर आणि राजू दाभाडे यांना गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून मिळालेले प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. 

‘रोलबॉल हा बास्केटबॉल किंवा हँडबॉलसारखाच परंतु पायात स्केटस् घालून खेळायचा खेळ आहे. प्रत्येकी सहा खेळाडू असलेल्या दोन संघांमध्ये हा खेळ खेळला जातो. यात प्रत्येक संघाचे पाच खेळाडू प्रत्यक्ष खेळतात, तर दोन्ही संघांचा एकेक खेळाडू  ‘गोल टेंडर’ म्हणून जबाबदारी सांभाळतो. या विक्रमी सामन्यासाठी तीनशे नऊ खेळाडूंचा सहभाग असलेले ‘इंटरनॅशनल रोलबॉल फेडरेशन’ आणि ‘रोलबॉल फेडरेशन ऑफ इंडिया’ असे दोन संघ करण्यात आले. १८ मे रोजी संध्याकाळी पाच वाजल्यापासून १९ मे रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सलग रोलबॉलचा सामना खेळला गेला. यात मुले व मुली अशा दोहोंचा सहभाग होता. संततधार अशा ३ तास सुरू राहिलेल्या पावसामुळे या खेळात व्यत्यय येईल की काय अशी शंका निर्माण झाली, परंतु गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसच्या नियमानुसार सामना थांबवता येणार नसल्यामुळे पावसातही खेळाडूंनी खेळ सुरूच ठेवला. दुसऱ्या दिवशी दुपारी पडलेले कडक ऊन ही सामना सुरू ठेवण्यातील आणखी एक आव्हानात्मक गोष्ट होती; परंतु त्यावरही खेळाडूंनी मात केली. उन्हापावसात आणि रात्रीच्या वेळी लहान वयाच्या खेळाडूंना विश्रांती देऊन त्यांची जागा मोठ्या खेळाडूंनी घेतली आणि कोणत्याही परिस्थितीत खेळ थांबू न देता विश्वविक्रमास गवसणी घातली. या सामन्यात ‘इंटरनॅशनल रोलबॉल फेडरेशन’ने ‘रोलबॉल फेडरेशन ऑफ इंडिया’वर ३३६-३२८ अशा गुणांनी मात केली’, अशी माहिती या वेळी देण्यात आली.  

‘आरबीएफआय’चे अध्यक्ष विनीत कुबेर म्हणाले, ‘अधिकाधित मुलामुलींनी रोलबॉल खेळण्यास सुरूवात करावी आणि या खेळास आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळावे या उद्देशाने रोलबॉल सामन्यांची ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद करण्याची कल्पना समोर आली. या विश्वविक्रमासाठी खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांनी घेतलेली मेहनत अवर्णनीय असून, लवकरच रोलबॉलला ऑलिंपिकमध्ये स्थान मिळावे असा आमचा प्रयत्न आहे.’

‘क्रिडा मार्गदर्शक राजू दाभाडे यांनी २००३ मध्ये या खेळाची संकल्पना मांडली आणि आता या खेळास चांगली लोकप्रियता प्राप्त झाली आहे. जगभरातील ५० हून अधिक देशांमध्ये हा खेळ खेळला जात आहे. गतवर्षीपासून रोलबॉलचा विद्यापीठ स्तरावरील खेळांमध्ये समावेश झाला आहे. या वर्षी ‘प्रायॉरिटी सेक्टर’मध्ये या खेळाचा समावेश होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे रोलबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन मिळेल’, असेही कुबेर यांनी सांगितले. 

‘रोलबॉल’ या खेळात खेळाडूंच्या कौशल्याबरोबरच त्यांचा वेग आणि शरीराचे संतुलन राखण्याची क्षमता या सर्वच गोष्टींचा कस लागतो. त्याबरोबरच या खेळात विजयासाठी ‘टीम वर्क’ फार महत्त्वाचे ठरते,’ असे दाभाडे यांनी सांगितले.

‘बेळगावमध्ये नोंदवण्यात आलेल्या या विश्वविक्रमासाठीच्या सामन्यात ११ वर्षांखालील, १४ वर्षांखालील, १७ वर्षांखालील आणि त्याहून मोठ्या खेळाडूंचाही सहभाग होता. यात महाराष्ट्रातील ४२ मुले आणि १६ मुली होत्या. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, आंध्र प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, तेलंगणा, तमिळनाडू, पाँडिचेरी, केरळ, ओडिशा, आसाम या सर्व ठिकाणांहून रोलबॉल खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक आले होते. आयआरबीएफ आणि आरबीएफआय यांच्यातर्फे सर्व खेळाडूंचा सन्मानपदके प्रदान करून गौरव करण्यात आला’,अशी माहिती कुबेर यांनी दिली. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link