Next
विखे-पाटील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केले राज्यांचे चित्ररथ
नागरिकांनी केले भरभरून कौतुक
BOI
Monday, January 28, 2019 | 06:16 PM
15 0 0
Share this article:


पुणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त विखे-पाटील मेमोरियल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आकर्षक चित्ररथांनी सर्वांची मने जिंकून घेतली. गेल्या वर्षीपासून शाळेने वेगवेगळ्या राज्यांची माहिती देणारे चित्ररथ बनवण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यंदा आसाम, गुजरात, पंजाब आणि कर्नाटक या चार राज्यांचे चित्ररथ साकारण्यात आले होते. झेंडावंदन झाल्यानंतर शाळेपासून काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये सर्वांत पुढे शाळेचे बँडपथक होते. त्यापाठोपाठ शिस्तबद्ध संचलन करणारे विद्यार्थी आणि त्यापाठोपाठ आकर्षक चित्ररथ हे देखणे दृश्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. 


सेनापती बापट मार्गावरील पत्रकारनगर येथे असलेल्या शाळेतून मिरवणुकीला प्रारंभ झाला. सिम्बायोसिस महाविद्यालय, गुडलक चौक, फर्ग्युसन रस्ता, मॉडेल कॉलनी आणि तिथून शाळेपर्यंत अशी ही मिरवणूक काढण्यात आली. 

प्रत्येक चित्ररथाबरोबर त्या राज्याचा पारंपरिक पोशाख केलेले विद्यार्थी, शिक्षक चालत होते. त्या राज्याची माहिती खाद्यसंस्कृती, कलासंस्कृती इत्यादी विषयी माहिती देणारे आकर्षक फलक चित्ररथावर लावण्यात आले होते. फुले, चित्रे यांनी हे चित्ररथ सजवण्यात आले होते. तसेच पर्यावरण संवर्धन, निसर्ग रक्षण याविषयीचे संदेश देणारे फलकही चित्ररथांवर लावण्यात आले होते. 

त्या राज्याचे लोकसंगीत, लोकनृत्य सादर केले जात होते. पंजाबचा भांगडा, गुजरातचा गरबा अशी पारंपारिक लोकनृत्ये त्याच जोशात लयबद्ध पद्धतीने सादर केली जात होती. गुजरातच्या चित्ररथावर गीरचे अभयारण्य दाखवण्यात आले होते. त्यात सिंहासह अन्य जंगली प्राण्याची आकर्षक कटआउट्स लक्ष वेधून घेत होती. त्या त्या राज्याची खाद्यसंस्कृती दर्शविणारे खाद्यपदार्थ रस्त्यावर ही मिरवणूक बघण्यासाठी उभ्या असलेल्या नागरिकांना वाटण्यात आले. 

अत्यंत मेहनतीने विद्यार्थी आणि शिक्षकांनी ही सर्व तयारी केल्याचे जाणवत होते. भारताच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन याद्वारे अत्यंत प्रभावीपणे होत होते. विशेष म्हणजे काही फ्रान्समधून आलेले विद्यार्थीही यात सहभागी झाले होते. त्यांनी अत्यंत आवडीने पारंपरिक भारतीय पोशाख परिधान केले होते. 


‘गेले महिनाभर शाळेतील सर्व विद्यार्थी यासाठी मेहनत घेत होते. मुलांना आपल्या सांस्कृतिक, भौगोलिक वैविध्याची माहिती व्हावी, यासाठी गेल्या वर्षीपासून हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. दर वर्षी चार राज्याचे चित्ररथ तयार केले जातात. त्या राज्यांची नावे निश्चित झाली की मुले त्या राज्याची सर्व माहिती गोळा करतात. तिथली खाद्यसंस्कृती, लोककला, पोशाख, जीवनशैली, भाषा, संगीत, महत्त्वाची स्थळे, नैसर्गिक साधनसंपत्ती अशी सर्व माहिती जमा करून त्यासंदर्भातील चित्रे, कटआउट्स तयार केले जातात. त्यांचा वापर करून चित्ररथ सजवला जातो. मुले तिथले लोकनृत्य, संगीत याची तयारी करतात. यामुळे मुले अनुभवातून वेगवेगळ्या राज्यांबद्दल शिकतात. हा अनुभव त्यांच्यासाठी खूप उत्साहवर्धक आणि उपयुक्त ठरतो. शाळेच्या मुख्याध्यापिका मृणालिनी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे शिक्षक आणि मुले खूप आनंदाने आणि उत्साहाने ही तयारी करतात,’ असे शाळेतील शिक्षिका पौर्णिमा धारप यांनी सांगितले. 


‘हे चित्ररथ बघून प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी केलेल्या या अभिनव उपक्रमाचे पालक, आजूबाजूच्या परिसरातील नागरिक, मान्यवर व्यक्ती या सर्वांनी खूप कौतुक केले. त्यामुळे खूप आनंद झाला,’ अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search