पुणे : जिल्ह्यात तसेच राज्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जल आणि मृद संधारण कामांतर्गत बांबूची लागवड करण्याची मागणी खासदार अनिल शिरोळे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. याबाबत महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्याचाच पाठपुरावा म्हणून शिरोळे यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर नुकतीच बैठक घेतली.
महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवडीच्या महत्त्वाकांक्षी योजनेत बांबू लागवड करण्याची मागणी शिरोळेंनी जलसंपदा मंत्र्यांकडे केली होती; तसेच तत्सम प्रजातींची लागवड केल्यास अतिवृष्टीमुळे वाहून येणाऱ्या मृदेस अटकाव होऊन धूप थोपविता येते. प्रस्तावित बांबू लागवडीमुळे मान्सून पश्चात पाण्याचा प्रवाह (post mansoon flow) वाढून शहराची भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. पाणवहाळ क्षेत्रात नदी किनारी वसलेल्या गावांना पुरापासून संरक्षण देखील करत येते. यावर तातडीने कार्यवाही होण्यासाठी वरिष्ठ पातळीवर सर्व संबंधित सचिव यांची बैठक आयोजित करून शासन निर्णय निर्गमित करण्याच्या शिरोळे यांच्या मागणीची दखल घेऊन जलसंपदा मंत्री महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.
त्याचाच पाठपुरावा म्हणून शिरोळे यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. या वेळी अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, प्रवीण कोल्हे, पांडुरंग शेलार, श्री. राणे, रंगनाथ नाईकडे असे अन्य अधिकारी उपस्थित होते. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार यासंबंधी पुढील बैठक दोन जुलै रोजी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्या उपस्थितीत करण्याचे निश्चित करण्यात आल्याचे शिरोळे यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले.