Next
भावना कांत ठरली पहिली भारतीय लढाऊ वैमानिक
पहिल्या तुकडीतील अन्य दोघींचेही प्रशिक्षण सुरू
BOI
Friday, May 24, 2019 | 03:42 PM
15 0 0
Share this article:

फ्लाइट लेफ्टनंट भावना कांत

नवी दिल्ली : अवघ्या २५ वर्षांची फ्लाइट लेफ्टनंट भावना कांत ही भारतीय हवाई दलातील पहिली महिला लढाऊ वैमानिक ठरली आहे. मिग-२१ बायसन या विमानावरील खडतर प्रशिक्षण तिने २२ मे २०१९ रोजी यशस्वीरीत्या पूर्ण केले. आता प्रत्यक्ष युद्धकामगिरीवर जाण्यासाठी ती सज्ज आहे. २०१७मध्ये भारतीय हवाई दलात प्रथमच तीन महिलांची लढाऊ वैमानिक म्हणून निवड करण्यात आली होती. त्यापैकी भावनाचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंग यांचेही प्रशिक्षण सुरू आहे.

‘अत्यंत कष्टाने, चिकाटीने आणि झोकून देऊन भावना कांत यांनी अत्यंत खडतर असे हे प्रशिक्षण पूर्ण केले असून, पहिल्या महिला लढाऊ वैमानिक होण्याचा मान मिळवला आहे. त्यांनी ‘मिग-२१ बायसन’ या विमानावरील प्रशिक्षण पूर्ण करून, लढाऊ विमान दिवसा कामगिरीवर नेण्याची पात्रता प्राप्त केली आहे,’ असे भारतीय हवाई दलाचे प्रवक्ते ग्रुप कॅप्टन अनुपम बॅनर्जी यांनी सांगितले.


वायुसेनेच्या प्रशिक्षण कार्यक्रमानुसार लढाऊ विमान उडवण्यासाठी पाच वर्षांचे विनाअडथळा नियमित प्रशिक्षण आवश्यक असते. मिग-२१ विमान हवेत उडवण्याचे प्राथमिक प्रशिक्षण दिल्यानंतर हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. हे प्रशिक्षण अत्यंत खडतर असते. यानंतरच्या टप्प्यात चंद्रप्रकाशात आणि गडद काळोखातही विमान चालवण्याचे प्रशिक्षण वैमानिकांना देण्यात येते. भावना यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना रात्रीच्या कामगिरीवरदेखील जाण्याची संधी मिळेल, असेही हवाई दलाच्या सूत्रांनी सांगितले. 

भावना कांत सध्या राजस्थानात बिकानेरमधील नाल या हवाई दलाच्या तळावर तैनात असून, नोव्हेंबर २०१७मध्ये त्या हवाई दलात रुजू झाल्या. मूळच्या बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील घनश्यामपूरमधील बऊर गावच्या असलेल्या भावना यांनी बेंगळुरू येथील एमएस महाविद्यालयातून बीई इलेक्ट्रिकल ही पदवी घेतली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये त्यांनी मिग-२१ बायसन हे लढाऊ विमान प्रथम उडवले. भारतीय हवाई दलात महिला लढाऊ वैमानिकांच्या पहिल्या तुकडीत निवड झालेल्या त्या उमेदवार असून, त्यांच्यासमवेत अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंग यांचीही निवड झाली होती. 


अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंग यांचेही प्रशिक्षण सुरू आहे. आतापर्यंत या तिघींनी पायलॅटस पीसी-७, टर्बोप्रॉप्स, किरण आणि हॉक जेट ट्रेनर्स अशी तुलनेने हाताळायला सोपी असलेली विमाने चालवली आहेत. आतापर्यंत त्यांनी ३४० किलोमीटर प्रति तासाचे व्हर्च्युअल प्रशिक्षण घेतले आहे. अवनीने टू सीटर मिग-२१ टाइप ६९ ट्रेनर विमानात क्वालिफाइड फायटर इन्स्ट्रक्टरसोबत प्रशिक्षण घेतले आहे. भारतीय हवाई दलात सध्या ९४ महिला पायलट आहेत; मात्र त्या युद्धविमाने उडवत नाहीत. महिलांना लढाऊ विमाने चालविण्याची संधी देण्याचा निर्णय मनोहर पर्रीकर यांच्या संरक्षण मंत्रिपदाच्या कारकिर्दीत २०१६ मध्ये घेण्यात आला. त्यानुसार, जून २०१७च्या दरम्यान पहिल्या तुकडीची निवड करण्यात आली. 

महिलांनी इतर सर्वच क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला असला, तरी सुरक्षा दलांमध्ये मात्र गेली अनेक वर्षे त्यांचा सहभाग अल्पच राहिला आहे. महिलांना सैन्यदलात वेगवगेळ्या पदांवर काम करण्याची संधी मिळत असली तरी, प्रत्यक्ष लढाईत भाग घेता येत नव्हता. भारतीय हवाई दलाने महिलांना ही संधी देऊ केली. त्यात भावना कांत ही पहिली महिला लढाऊ विमान चालवणारी वैमानिक ठरली. आता भावना लढाईच्या कामगिरीवर जाण्यासाठी सज्ज झाली आहे. आतापर्यंत या क्षेत्रात महिला नव्हत्या. आता याही क्षेत्रात आपले स्थान मिळवून 'हम भी कुछ कम नही’ हे महिलांनी सिद्ध केले आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणी चेनम्मा, महाराणी ताराबाई अशा अनेक लढवय्या स्त्रियांचा वारसा या आजच्या रणरागिणींनी पुढे नेला आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
afrin ali About 117 Days ago
Which study is essential for a girl to be a part of airforce .my daughter is 6 yrs. Old
0
0
Tejal Gheunach Tamhankar About 117 Days ago
We proud of you Bhavana.You are insparation for new generation.
0
0
Ramachandr Kubal About 117 Days ago
हम होंगे कामयाब
0
0

Select Language
Share Link
 
Search