Next
सहल तुमकुरू जिल्ह्याची...
BOI
Wednesday, October 31, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

मधुगिरी
आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा महाकाय पाषाण कर्नाटकच्या तुमकुरू जिल्ह्यात आहे. ग्रॅनाइटचे निरनिराळे प्रकार या भागात पाहायला मिळतात. या पाषाणातही अनेक वनस्पती उगवतात. त्यामुळे वेगळेच सौंदर्य बघायला मिळते. पदभ्रमण करणाऱ्यांसाठी हा स्वर्गच असून, भू-शास्त्रज्ञांसाठी अभ्यासाचे ठिकाण आहे. ‘करू या देशाटन’ सदरात आज सहल तुमकुरू जिल्ह्याची...
..................
तुमकुर या कर्नाटकतील जिल्ह्याचे आता तुमकुरू असे नामकरण करण्यात आलेले आहे. येथील महाकाय पाषाण एखाद्या माणसाच्या टक्कल पडालेल्या शिरोभागाप्रमाणे उन्हात चमकत असतात. हजार फूट उंचीच्या, तीन तीन किलोमीटर लांबीच्या अशा महाकाय टेकड्या हे तर दक्षिण मध्य भारताचे वैशिष्ट्य आहे. सुरुवात करूया मधुगिरीपासून...

मधुगिरी

मधुगिरी : या गावाजवळ आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा महाकाय पाषाण ३९४० फूट उंचीवर आहे. हा पाषाण आणि त्यावर असलेला किल्ला हे येथील आकर्षण. शहराच्या उत्तरेस असलेल्या मधु-गिरी (मध-टेकडी) नावाच्या टेकडीवरूनच हे नाव रूढ झाले. या महाकाय शिळेवरच विजयनगर राजवटीत किल्ला बांधला गेला. साधारण इ. स. १६७०च्या सुमारास गंगा राजवटीतील राजा हिरा गौडा यांनी मूळ किल्ल्याचे बांधकाम केले. त्या वेळची एक गमतीशीर गोष्ट सांगितली जाते. गौडा यांची एक मेंढी या निर्जन डोंगरावर रात्री हरवली होती. ही मेंढी जेव्हा खाली आली, तेव्हा तिच्या अंगावरून पाणी ठिबकत होते. हे बघून सर्वांना आश्चर्य वाटले. रात्रीच्या नीरव शांततेत झऱ्याचे पाणी वाहण्याचा आवाज आला. तेथे पाणी सापडल्यावर तेथे किल्ला बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. किल्ल्याला तीन द्वारे असून, अंतरलदाबगिलू, दिड्डीबगीलू आणि म्हैसूर दरवाजा अशी त्यांची नावे आहेत. येथे व्यंकटरमणस्वामी आणि मल्लेश्वराचे द्राविडी शैलीतील जुने मंदिर विजयनगर राजवटीत बांधले गेले. गोपालकृष्ण मंदिराचे फक्त अवशेष शिल्लक आहेत.

मेदिगिशीमेदिगिशी: २५८१ फूट उंचीवरील टेकडीच्या शिखरावर, खडकाळ जागेवर बांधलेला हा किल्ला आहे. या किल्ल्यावर अनेक लढाया झाल्या आहेत. स्थानिक आदिवासी प्रमुख नाग्गा रेड्डी याच्या पत्नीच्या नावाने हा किल्ला ओळखला जातो. कारण त्याच्या पत्नीचे केस तिच्या पायांना (मेडी-टाच, केश-केस) स्पर्श करत असत. हे ठिकाण ट्रेकर्सना आकर्षित करते. ते मधुगिरीपासून २० किलोमीटरवर आहे.
देवरायनदुर्ग
देवरायनदुर्ग : पूर्वी या ठिकाणाला अन्नेबिदासरी व जादकदुर्ग या नावांनी ओळखले जायचे. १७व्या शतकाच्या अखेरीस हे ठिकाण म्हैसूर राजवटीत समाविष्ट झाले व तेव्हापासून देवरायनदुर्ग हे वाडियार राजांच्या स्मरणार्थ दिलेले नाव रूढ झाले. हे ठिकाण ३९४० फूट उंचीवर असून, एक थंड हवेचे ठिकाण आहे. याच्या सभोवताली अनेक टेकड्या आहेत. त्यामुळे उत्साही ट्रेकर्ससाठी ही सर्वोत्तम जागा मानली जाते. येथे द्रविड शैलीतील योगनरसिंह आणि भोगनरसिंह अशी नरसिंहाची दोन मंदिरे आहेत. येथे जयमंगला नदीचा उगम झाला आहे. लोकांची अशी श्रद्धा आहे, की या ठिकाणी श्रीरामचंद्रांनी जमिनीत बाण मारला आणि चंदनाचा लेप करण्यासाठी ‘नामा’ झरा तयार केला. वसंत ऋतूला ‘नामदा चिलुम’ असे म्हणतात. दुसऱ्या दंतकथेनुसार, या ठिकाणाला करीगिरी म्हणूनही ओळखले जात असे. भृगू ऋषींनी गंधर्व बंधू देवदत्त आणि धनंजय यांना शाप दिला होता. त्यामुळे एक भाऊ हत्ती झाला, तर दुसरा पर्वत झाला (करी म्हणजे हत्ती व गिरी म्हणजे पर्वत). मध्यभागी धनुष्यतीर्थ व रामतीर्थ आहे. श्री नरसिंह जयंतीचा उत्सव चैत्र शुद्ध चतुर्दशीला येथे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. हे ठिकाण तुमकुरूपासून १४ किलोमीटर व बेंगळुरूपासून ६५ किलोमीटरवर आहे.

जयमंगालीजयमंगाली : ७९८ एकर क्षेत्रावर पसरलेले हे कर्नाटकातील दुसऱ्या क्रमांकाचे काळविटांचे अभयारण्य मधुगिरीपासून २५ किलोमीटरवर आहे. त्याचे पूर्वीचे नाव मेदेनाहळ्ळी असे होते.

काग्गालडूकाग्गालडू : आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे पक्षी अभयारण्य येथे असून, स्थलांतरित राखाडी रंगाच्या बगळ्यांसाठी हे प्रसिद्ध आहे. येथे क्वचित प्रसंगी माळढोक पक्ष्यांचेही दर्शन होते. १९९३मध्ये गावकऱ्यांनी हे पक्षीसंवर्धन सुरू केले. गावकऱ्यांमध्ये याबद्दल जागृती निर्माण करून पक्षी कसे येतील याची काळजी घेण्यात आली. त्याचे चांगले फळ पर्यटकांना मिळत आहे. पक्षी सामान्यतः फेब्रुवारी महिन्यापासून अभयारण्यात येतात व जवळजवळ सहा महिने म्हणजे ऑगस्टपर्यंत राहतात. हे स्थळ तुमकुरूपासून ७३ किलोमीटरवर आहे.

गुब्बी

गुब्बी : हे गाव मिशनरी कार्यासाठी प्रसिद्ध आहे. थॉमस हडसन आणि त्यांची पत्नी मिशनचे काम सुरू असताना तंबूमध्ये राहत असत. तेथेच त्यांनी मातीकामातील झोपडी बनविली. विल्यम आर्थर यांनी येथे चर्चची स्थापना केली. या गावातील वीराण्णा गुब्बी हे नाट्य व चित्रपट दिग्दर्शक आणि कलाकार होते आणि त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कन्नड नाट्यभूमीतील ते एक अग्रगण्य आणि सर्वांत प्रभावी रंगकर्मी होते. गुब्बी हे ठिकाण तुमकुरूपासून १८ किलोमीटरवर आहे.

चेन्नरायना दुर्गा : कोराटेगेरेपासून १० किलोमीटरवर असलेल्या या किल्ल्याकडे मधुगिरी ते तुमकुरूमार्गे जाता येते. नवदुर्गांपैकी येथे एक देवी आहे.

सिद्दरा बेट्टा
सिद्दरा बेट्टा : हे ठिकाण औषधी वनस्पतींसाठी प्रसिद्ध आहे. टेकडीवरून पडणारा नैसर्गिक झरा औषधी गुणांनी युक्त असल्याचे मानले जाते.

पावागडपावागड : पावागड किल्ल्याच्या पायथ्याशी पावागड गाव वसलेले आहे. गावात ७५ फूट उंचीची हनुमानाची मूर्ती आहे. हा भाग तुमकुरू जिल्ह्यात असला, तरी येथे जाण्यासाठी आंध्र प्रदेशामधून किंवा चित्रदुर्ग जिल्ह्यातून जावे लागते. या किल्ल्यावर पूर्णपणे अवघड वाटेने चालत जावे लागते. ट्रेकिंग करणाऱ्यांना ते एक आव्हानच आहे. या किल्ल्यावरही मोठमोठ्या शिळा दिसून येतात. किल्ल्यावर गोड्या पाण्याचा भीमण्णा तलाव आहे. सिंहासनाच्या जागी बाजूला दोन हत्ती कोरलेले आहेत. किल्ल्यावर अनेक टेहळणी बुरुज आहेत. तसेच भुयारी मार्गही आहेत.

पावागड
कर्नाटकातील सर्वात मोठे सौर ऊर्जा उद्यान येथे आहे. १३ हजार एकर क्षेत्रावर हा सौर प्रकल्प विस्तारलेला आहे. प्रकल्प दोन हजार मेगावॉट क्षमतेचा असून, त्यासाठी १४ हजार ८०० कोटी रुपये खर्च होणार आहे. मे २०१८अखेर ६०० मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे.

कैदला/कडालाकैदला/कडाला : हे ठिकाण तुमकुरूच्या उत्तरेस आठ किलोमीटरवर असून, चन्नकेशव व गंगाधरेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. सुंदर शिल्पकला हे येथील वैशिष्ट्य. गंगाधरेश्वर मंदिरात सापडलेल्या कन्नडमधील शिलालेखानुसार इ. स. ११५०मध्ये होयसळ राजांनी ही दोन मंदिरे बांधली, असे दिसून येते. या नोंदीनुसार, या गावाला क्रीडाकपुरी असे म्हणत. चन्नकेशव मंदिर स्थापत्यशास्त्रानुसार होयसळ, तसेच द्रविडी व विजयनगर शैलीचे मिश्रण असल्याचे दिसून येते. संपूर्ण मंदिराला संरक्षक भिंत आहे. मंदिरात महाद्वार असून, त्यावर सुंदर तीन शिलालेख आहेत. त्यात नक्षत्र, नृत्य करणाऱ्या नर्तिका, ऋषी, देवता व देवी यांची सुंदर शिल्पे आहेत. ११ फूट उंचीचे मानवी शिल्प, मंदिर बांधणारा गुले बाची याचे असावे असे लोकांचे म्हणणे आहे. इतर हिंदू मंदिरांप्रमाणे मूर्तीचे मुख पूर्वेस नसून पश्चिमेला आहे. पुजाऱ्याच्या म्हणण्यानुसार मुस्लिम आक्रमकांपासून मंदिर वाचविण्यासाठी असे केले असावे.

मूर्तीवरील दागिन्यांचे काम अत्यंत सुबक आहे. प्रभावळीसह दशावतार मूर्ती नावासह कोरल्या आहेत. श्रीदेवी आणि भूदेवीची आकर्षक चित्रे मुख्य देवतेच्या दोन्ही बाजूला आहेत. या मंदिराच्या स्थापत्यशास्त्राचे वैशिष्ट्य असे आहे, की मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची किरणे थेट मुख्य देवतेच्या पायाशी पडतात. (कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराप्रमाणे किरणोत्सव). मंदिरामध्ये केवळ दोन भाग असून, सर्व काम ग्रॅनाइटमध्ये आहे.

तुमकुरू : जिल्ह्याचा ज्ञात इतिहास गंगा राजवटीपासून सुरू होतो. येथे इ. स. एक ते इ. स. १०००पर्यंत गंगा राजवट अस्तित्वात होती. गंगा कुटुंबाचे या जिल्ह्यात सापडलेले संदर्भ इ. स. ४००पासूनचे आहेत. गंगा राजवटीनंतर राष्ट्रकूट आणि चालुक्यांनीही येथे राज्य केले. त्यानंतर तुमकुरू विजयनगर साम्रज्यात समाविष्ट झाले. त्यानंतर म्हैसूरच्या वाडियार राजवटीची सत्ता इंग्रज येईपर्यंत होती. तुमकुरू आता जिल्ह्याचे ठिकाण असून, ते औद्योगिक व शेक्षणिक शहर म्हणून प्रसिद्ध झाले आहे. अन्नप्रक्रिया उद्योग येथे नव्यानेच सुरू झाला आहे.

गोरवानाहळ्ळीगोरवानाहळ्ळी : महालक्ष्मी मंदिरासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. स्थानिक कथेनुसार अब्बय्या नावाच्या महालक्ष्मी भक्ताला देवी प्रसन्न झाली. तिने त्याला भरपूर संपत्ती दिली. त्यातून त्याने धर्मकार्य सुरू केले. त्याने घरातच महालक्ष्मीची पूजा सुरू केली. अब्बय्यांचा भाऊ थोटदप्पा हाही त्यांच्या धर्मादाय कामात सहभागी झाला. अब्बय्यांच्या मृत्यूनंतर थोटदप्पा यांनी देवीला पूजा सुरूच ठेवली. स्वप्नातील दृष्टांतानुसार थोटदप्पा यांनी देवीच्या समर्पणासाठी गोरवानाहळ्ळी महालक्ष्मी मंदिर बांधले. इ. स. १९१०नंतर थोटदप्पा यांच्या मृत्यूनंतर मंदिर व पूजेकडे दुर्लक्ष झाले. १५ वर्षांनंतर कमलअम्मा या देवीच्या स्त्री भक्ताने पुन्हा पूजाअर्चा सुरू केली. त्यामुळे लोक देवस्थानाकडे पुन्हा येऊ लागले. आज ते एक प्रसिद्ध धार्मिक ठिकाण बनले आहे. हे तुमकुरूपासून २९ किलोमीटरवर आहे.

तुरुवेकेरेतुरुवेकेरे : या ठिकाणी आसपास होयसळ राजवटीतील इ. स. १२००मधील अनेक मंदिरे आहेत. महादंडनायक सोमना यांनी बांधलेले चन्नकेशव मंदिर, गंगाधरेश्वर मंदिर, चेननिगाराय स्वामी मंदिर, मळे शंकरेश्वर मंदिर आणि सर्वांत मोठे बेटेरायस्वामी मंदिर यांचा त्यात समावेश आहे. नीरगुंडा आणि अंजनहळ्ळी गावांजवळील टेकडीच्या वरच्या बाजूला कांचीराय स्वामी मंदिर आहे. टेकडीवरून सुंदर देखावा दिसतो.

तिपतुरतिपतुर : हे शहर नारळाच्या झाडांसाठी आणि उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सुक्या खोबऱ्याचा मोठा व्यापारही येथे चालतो. तसेच रेशीम साडी उत्पादनासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

सिरा : हे मुस्लिम धार्मिक ठिकाण असून, या गावाला इतिहास आहे. सिरा १६व्या शतकात मुघल सुभा बनला. १७व्या शतकाच्या पूर्वार्धात नायक (कस्तुरी रंगप्पा नायक) याने किल्ला बांधल्याचा उल्लेख आढळतो. किल्ला पूर्ण व्हायच्या आधीच विजापूर सरदार रणदुल्लाखान व अफझल खान यांनी हल्ला करून सिरा जिंकले व नायकाला ठार करून सिरावर कब्जा केला. मलिक हुसेन याने किल्ल्याचे काम पूर्ण केले. हे ठिकाण तुमकुरूपासून ५२ किलोमीटरवर आहे.

सिरा
कसे जाल तुमकुरूला?

तुमकुरू हे रेल्वेने मिरज-बेंगळुरू मार्गावरील स्टेशन आहे. तसेच पुणे-बेंगळुरू महामार्गावर आहे. जवळचा विमानतळ बेंगळुरूला, ७१ किलोमीटरवर आहे. जाण्यासाठी उत्तम कालावधी ऑक्टोबर ते फेब्रुवारी. तुमकुरू गावामध्ये राहण्याची, जेवणाची चांगली सोय आहे.

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.) 


( तुमकुरूचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sameer About 326 Days ago
Mast
1
0

Select Language
Share Link
 
Search