Next
कलेचा ‘सेतू’ बांधणारी ‘वानरसेना’
मानसी मगरे
Saturday, January 27, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

बच्चेकंपनीसोबत टीम वानरसेना

कला... मग ती कोणतीही असो जोपासता आली पाहिजे. प्रत्येकाने आपल्या आवडीच्या एखाद्या तरी कलेवर मनापासून प्रेम केलं पाहिजे, ती जोपासली पाहिजे... याच विचाराने प्रेरित झालेले पुण्यातील काही तरुण विविध ठिकाणच्या भिंती ग्राफिक्सच्या माध्यमातून सुशोभित करण्याचा उपक्रम राबवत आहेत. लोकसहभागातून हा उपक्रम राबवणाऱ्या ‘वानरसेना’ या संस्थेच्या स्वप्नील कुमावत यांच्याशी ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या मानसी मगरे यांनी साधलेला हा संवाद...
.......................
एका विशिष्ट वयानंतर लोक कलेपासून दूर जातात. आपल्या आवडीचे छंद जोपासणेही सगळ्यांना शक्य होत नाही. लोकांचं कलेशी असलेलं नातं नव्याने मिळवून देण्याचा प्रयत्न ‘वानरसेना’ करत आहे. विविध ठिकाणच्या भिंती ग्राफिक्सच्या माध्यमातून सुशोभित करण्याचे उपक्रम अनेक ठिकाणी राबविले जातात; पण तो लोकांच्या सहभागातून राबवणे ही वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. त्या पार्श्वभूमीवर, संस्थेचे स्वप्नील कुमावत यांच्याशी साधलेला हा संवाद...

स्वप्नील कुमावत यांच्यासह टीम वानरसेनाही संकल्पना कशी सुचली?  
- खूप वर्षांपासून सोबत असलेले आम्ही सात मित्र, वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारे. त्यात मी स्वतः लेखक, दिग्दर्शक आहे. मीनल जामखेडकर ‘आयटी’मध्ये डिझायनर आहे, अमृता जामखेडकर इंटिरिअर डिझायनर आहे, सत्त्वशील जगताप शेफ आहे, सोमेन दास ‘आयटी’मध्ये काम करतो आणि प्रसाद भारद्वाजची जाहिरात संस्था आहे. असे आम्ही सातही जण वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारे आहोत; पण आमच्या बऱ्याचशा आवडी-निवडी किंवा विचार करण्याची पद्धत सारखी आहे. एकत्र येऊन काही तरी उपक्रम राबवावा, असं अनेक वर्षं डोक्यात होतं. असंच एका दिवाळीच्या वेळी ‘आर्ट एक्झिबिशन’सारखं काही तरी करायचं ठरलं. दरम्यान, आमच्या सोसायटीत लहान मुलांची एक अभिनय कार्यशाळा आयोजित केली होती. जिथे आम्ही ही कार्यशाळा घेत होतो, तिथली भिंत खूपच खराब होती असं आमच्या लक्षात आलं आणि मग त्यावर काही करता येईल का, असा विचार झाला. कार्यशाळेतल्या मुलांचीच चित्रं तिथे काढावीत, असं ठरलं. त्यानुसार मग त्या मुलांची चित्रं काढायला घेतली. एका रविवारी त्याच मुलांकडून ती चित्रं रंगवून घेतली. या सगळ्यातून असं लक्षात आलं, की यातून एक सकारात्मक ऊर्जा मिळतेय, जी आपल्यापेक्षा कितीतरी मोठी आहे. आजही ती भिंत तशीच आहे आणि ती सगळी मुलं सगळ्यांना अगदी अभिमानाने सांगतात, की हे सगळं आम्ही केलंय. लोकांमध्ये असलेल्या एनर्जीतून असं काही करता येऊ शकतं, असं यातून लक्षात आलं. यातून मग ऑक्टोबर २०१५मध्ये आम्ही आमचा पहिला इव्हेंट केला. पहिली भिंत रंगवली. ‘स्मार्ट सिटी’बद्दल असलेल्या एका कार्यक्रमात आम्ही अशी जागा शोधली, की जिथे भरपूर आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक असतील. त्यांना सोबत घेऊन आम्ही ती भिंत रंगवली. असे कार्यक्रम करत असताना मग हळूहळू पुण्यातील अशा कलाकारांची आमची एक फौज तयार झाली. हे सगळे कलाकार खूप छान प्रकारे आमच्याशी जोडले गेले आहेत. 

या उपक्रमाचं स्वरूप काय आहे?
- त्या त्या भागात आम्ही आमच्या या सगळ्या कलाकारांना आणतो. ते तिथे चित्रं काढतात आणि मग त्याच भागातील लोकांना आम्ही ती चित्रं रंगवण्यासाठी बोलावतो, अशी एक साधारण पद्धत आम्ही रूढ केली आहे. उदाहरण द्यायचं झालं, तर आम्ही येरवडा जेलच्या भिंतींवरही काम केलंय. त्या सगळ्या भिंती आम्ही तिथल्या कैद्यांना घेऊन रंगवल्या आहेत. त्यांना सहभागी करून घेऊन आम्ही तो उपक्रम राबवला. प्रत्येक ठिकाणची एक वेगळी पद्धत असते, वेगळी अपेक्षा असते. येरवडा जेलच्या भिंतींवर काम करताना त्यावर प्रेरणादायी संदेश, सकारात्मक विचार अशा काही गोष्टी येणं अपेक्षित होतं. त्यानंतर आम्ही पिंपरी स्टेशनचा एक उपक्रम केला. संपूर्ण स्टेशन आम्हाला रंगवायचं होतं. तिथे असणारी थीम वेगळीच होती. प्रत्येक ठिकाणी तिथल्या लोकांना सोबत घेऊन आम्ही हे काम करतो. आजवर आम्ही ५० जणांपासून ते जवळपास ६०० लोकांना एकत्र आणूनही ८-१० कार्यक्रम केले आहेत. 

वानरसेना हे नाव ठेवण्यामागचं कारण काय?
- खरं तर हे नाव ठेवण्यामागे एक खूप मजेशीर गोष्ट आहे. वानरसेना या नावातच विस्ताराची संकल्पना आहे. हे काम आम्ही केवळ सात जणंच करणार होतो असं नाही, तर यात मोठ्या संख्येने इतर जणही सहभागी आहेत. वानरसेना ही दोन लोकांचीही असू शकते आणि १०० लोकांचीही. ‘सूत्रधार’च्या कार्यक्रमाच्या माध्यमातून यासाठीचा एक खूप मोठा मंच आम्हाला मिळाला. 

येरवडा जेल प्रकल्पात मार्गदर्शन करताना वानरसेना कलाकार‘वानरसेना’साठी काम करणाऱ्या कलाकारांबद्दल थोडंसं सांगा.
- ‘वानरसेना’ ही आज आमची जी ओळख आहे, त्यात या कलाकारांचा वाटा खूप मोठा आहे. हे कलाकारच आमची खरी शक्ती आहेत. विशेष म्हणजे हे सर्व जण त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उत्तम काम करणारे आहेत. वेळात वेळ काढून ते इथे येतात, आमच्या इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्यांसाठी चित्रं काढतात. ‘वानरसेना’साठी काम करणाऱ्या साधारण ६०-७० कलाकारांची एक टीम आहे. अर्थात तेही आमच्याप्रमाणे त्यांचे इतर व्याप सांभाळून हे इव्हेंट्स करतात. येरवडा जेल किंवा पिंपरी स्टेशन असा एखादा मोठा इव्हेंट असेल, तर त्यासाठी महिनाभर आधी आम्ही या कलाकारांसोबत त्याची तयारी करतो. साधारणत: यातल्या प्रत्येक कलाकाराची एक वेगळी शैली असते. परंतु एकत्र आणि मोठा असा एखादा इव्हेंट असेल, तर सगळ्यांची चित्रं एका शैलीमध्ये येणं अपेक्षित असतं. तशी तयारी करून घेतली जाते. थोडक्यात काय, तर वानरसेना सात जणांची असली, तरी त्यामागे या ७० कलाकारांची टीम आहे, असते.  

येरवडा जेल प्रकल्पमाणूस कलेशी जोडलेला असणं किती महत्त्वाचं आहे असं वाटतं? 
- मुळात कला हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असायलाच हवा, मग ती कला कोणत्याही प्रकारची असो अथवा कोणत्याही माध्यमाची असो. साधारणतः एका ठराविक वयानंतर लोक स्वतःला या कलेपासून वेगळं करतात, असं बऱ्याचदा दिसून येतं. हे असं करणं म्हणजे अमानवीय प्रकार आहे, असं मला वाटतं. कारण खरं तर याची आपल्याला आतून गरज असते. कला लोकांना एकत्र आणण्याचंही काम करते. आम्ही येरवडा जेलचा प्रकल्प करत होतो, तेव्हा जेलर आणि कैदी एकत्र चित्र रंगवत आहेत, असा एक फोटो काढला गेला. हे फक्त कलेतूनच साध्य होऊ शकतं. या कलेचं मानवी आयुष्यात इतकं महत्त्व असेल, तर कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलीच पाहिजे असं वाटतं. यासाठी आम्ही ही कला ‘वानरसेना’च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू केला. लोकांना आणि कलेला जोडणारा सेतू आम्ही बनलो. म्हणूनही मग वानरसेना हे नाव दिलं. सहभागी होणारे लोकच ‘वानरसेने’चे मालक आहेत, असं आम्ही मानतो. कारण त्यांच्याशिवाय हे होऊ शकणार नाही. कोणतंही रंगकाम केल्यानंतर हे ‘वानरसेना’ने केलंय, असं आम्ही म्हणत नाही. आमच्या भिंती पाहून लोकं म्हणतात, की हे आम्ही केलंय. हे ऐकून एक वेगळंच समाधान मिळतं.   

पिंपरी स्टेशन प्रकल्पचित्रकला किंवा पेंटिंग या माध्यमाव्यतिरिक्त इतर काही कलांचा उपयोग आजवर केला आहे का?
- ‘वानरसेना’च्या माध्यमातून आजवर ग्राफिक्स आणि पेंटिंग यांचा उपयोग करून लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो; पण अशा अनेक माध्यमांचा आम्ही विचार करत आहोत, ज्यांच्यामार्फत आम्ही विविध कलांशी लोकांना जोडू शकू. हाच ‘वानरसेना’चा मूळ उद्देश आहे. प्रत्येकामध्ये उपजतच कोणती ना कोणती कला नक्कीच असते. परंतु त्याकडे दुर्लक्ष होतं. केवळ काम करण्याने आयुष्य अगदी तणावाचं होऊ लागतं. आयुष्य तसंच रेटत असताना वय होतं आणि आपण असं काही तरी करू शकू, हा आत्मविश्वास राहत नाही. हा सगळा विचार करून आम्ही नवीन प्रयोग करतोय. या इव्हेंटमध्ये अगदी पाच वर्षांच्या छोट्या मुलापासून ते ६५ वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत सगळे सहभागी असतात. ते सोबत चित्रं रंगवतात. यातून एक वेगळाच आनंद मिळाल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतं. विशेष म्हणजे यात सहभागी होण्यासाठी कसलीही अट नाही. कित्येकदा या इव्हेंटमध्ये असेही लोक असतात ज्यांना पेंटिंगचा ब्रश कसा धरायचा इथपासूनच्या गोष्टी आमचे कलाकार शिकवतात. यामध्ये आमची मेहनत असतेच; पण लोकांना त्यांनी हे केलंय याचं समाधान आम्ही देऊ शकतोय, ही खूप मोठी बाब आहे. 

पिंपरी स्टेशन प्रकल्पअशा प्रकारचं ग्राफिटी वर्क करणारे पुण्यात आणखीही काही ग्रुप्स आहेत. त्यात तुमचं वेगळेपण काय?
- अशा इव्हेंट्ससाठी ठिकाणं निवडणं हा एक खूप मजेशीर भाग असतो. मी म्हणेन हेच आम्ही वेगळं असण्याचं एक कारण आहे. कारण पुण्यात असे आणखीही काही ग्रुप्स आहेत, जे सुंदर ग्राफिटी करतात. बऱ्याचदा आम्ही करत असलेल्या ग्राफिटी नक्कीच तेवढ्या चांगल्या नसतातही; पण जागांची निवड महत्त्वाची ठरते. शिवाय इतरांप्रमाणे आमचे इव्हेंट केवळ आम्हीच करत नाही, तर त्यात लोकांचा सहभाग असतो. लोकांना एकत्र आणून त्यांच्यामार्फत आम्ही हे करतो. यातच आमचं वेगळेपण आहे. येरवडा जेल, पिंपरी स्टेशन, शाळांच्या भिंती, अपंग कल्याणकारी संस्था, अनाथाश्रमातील भिंती अशी ठिकाणं आम्ही आजवर निवडली होती, जिथे लोकांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात मिळाला.  

पैसे मिळवणं हा उद्देश या सगळ्यामागे नाही. मग हे सगळं चालतं कसं?
- हो. हे खरंय, की पैसे मिळवणं हा वानरसेनेचा उद्देश नाही. तो तसा आम्हाला कधी अपेक्षितही नव्हता; पण हे सगळे इव्हेंट्स करण्यासाठी अर्थातच पैसे लागतात. यासाठी मग आम्ही प्रायोजकांचा आधार घेतो. आमच्या इव्हेंट्सचं स्वरूप आणि त्यामागची भावना लक्षात घेता ते आम्हाला मिळत गेले. आजवर थिसेनक्रुप, इंडिगो पेंट्स, गुजरातचा ‘मनपसंत’ अशा मोठ्या ब्रँड्सचं प्रायोजकत्व आम्हाला मिळालंय. कलाकारांना किंवा इतर सहकाऱ्यांना मोबदला देताना आम्ही पैशाच्या स्वरूपात न देता गिफ्ट्सच्या रूपाने देतो. टी-शर्ट, कॅनव्हास अशा वस्तू गिफ्ट्स म्हणून दिल्या जातात. गिफ्टमधून एक प्रेरणा मिळते असा आमचा अनुभव आहे. 

ई-मेल : vanarsena.club@gmail.com
वेबसाइट : http://www.vanarsena.club

('वानरसेना' टीमच्या उपक्रमाची ओळख करून देणारा व्हिडिओ सोबत देत आहोत)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ashlesha Bhagwat About
Vanarsena bharicha👍want to participate.
0
0
Santosh Jadhav About
Great job..
0
0

Select Language
Share Link
 
Search