Next
मराठीचे अलौकिक शब्दलेणे!
BOI
Monday, March 05, 2018 | 03:42 PM
15 0 0
Share this article:

शब्दशक्तीचं सामर्थ्य, त्यातल्या अर्थच्छटांची सूक्ष्म जाण, बुद्धिमत्ता आणि तरल कल्पनाशक्ती या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे गोविंदाग्रजांची काव्यसृष्टी. गोविंदाग्रजांनी मराठी वाङ्मयाला, समृद्ध, श्रीमंत केलं आहे आणि हे आपणा सर्व रसिकांसाठी अमूल्य असं शब्दलेणं आहे. यंदा गोविंदाग्रजांचं स्मृतिशताब्दी वर्ष आहे. म्हणूनच मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर आयोजित करण्यात आलेल्या उत्सवात गोविंदाग्रजांच्या कवितांचा धावता आढावा घेणारा हा लेख प्रसिद्ध करत आहोत.
.........
प्रज्ञा आणि प्रतिभाशक्तीच्या अलौकिक बळावर, कल्पनाशक्ती, आशयघनता आणि शब्दसौष्ठव यांचं विलक्षण प्रत्ययकारी विश्व उभारणाऱ्या राम गणेश गडकरी यांचं मराठी साहित्यातलं स्थान अनन्यसाधारण आहे. ३४ वर्षांच्या अल्पायुष्यात त्यांच्या प्रतिभेची उत्तुंग गरुडभरारी स्तिमित करणारी आहे. नाटक, विनोद. कविता या वाङ्मयप्रकारांतलं त्यांचं कर्तृत्व त्यांच्या भाषावैभवाची साक्ष देणारं, अजरामर स्वरूपाचं झालं आहे.

त्यांच्या भाषावैभवाचे नितांत रमणीय रूप म्हणजे त्यांचा ‘वाग्वैजयंती’ हा एकमेव आणि एकमेवाद्वितीय असा काव्यसंग्रह. गोविंदाग्रज या टोपणनावानं त्यांनी काव्यलेखन केलं, हे असं वाक्य खरं म्हणजे अत्यंत रुक्ष आहे. त्यांच्या सर्जनशीलतेचा तो अधिक्षेप आहे. वैयक्तिक अनुभूतीच्या विलक्षण आर्ततेतून त्यांचं काव्य जन्माला आलं. तिथे कारागिरी नाही, शब्दांची ओढाताण नाही आणि अर्थासाठी शब्दांची उसनवारीसुद्धा नाही. अंतर्मुख होणाऱ्या आणि करायला लावणाऱ्या संवेदनशील हृदयाचा उत्कट आणि आर्त उद्गार म्हणजे गोविंदाग्रजांची कविता असंच म्हणायला हवं. 

गोविंदाग्रजांनी चौतीस वर्षांच्या आयुष्यात खूप काही भोगलं. पितृछत्र लहानपणीच हरपलं. प्रतिकूल परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. ऐन तारुण्यात प्रेमभंगाचं दुःख वाट्याला आलं. आणि आजूबाजूच्या परिस्थितीमुळे नैराश्यानं त्यांना घेरून टाकलं. त्यांचं संपूर्ण जीवनच मुळी दु:खमय झालं होतं. उदासीनता, विषण्णता आणि अंतरीच्या दुःखाची आर्तता त्यांच्या काव्यातून व्यक्त झाली आहे.

गोविंदाग्रजांना प्रेमाचे शाहीर म्हणून ओळखलं जातं. कारण ‘वाग्वैजयंती’मध्ये प्रेमविषयक कविता संख्येनं जास्त आहेत. उत्कट, विरहार्त प्रेमभाव त्या कवितांतून प्रत्ययाला येतो. गोविंदाग्रजांचं स्वर्गीय प्रेमभावनेबद्दलचं स्वतःचं असे चिंतन होते. प्रेमाच्या व्यवहारात देणंघेणं, मोह, माया, अपेक्षा असं काही नसतं, नसावं, अशी त्यांची मनोधारणा होती. ती कवितेतून व्यक्त झाली आहे -
 न मिळे अवसर अभिलाषा । ‘दे घे’ची नाही भाषा।
.... ती दिव्य प्रेमाची जाती।।

असं अत्यंत स्वच्छपणे त्यांनी लिहून ठेवलं आहे; पण असं प्रेम त्यांना लाभलंच नाही. ‘मम करी कपाळी दुर्दैवाच्या रेषा।’ असं त्यांनी हताशपणे लिहून ठेवलं आहे.

मानवी मनाचं शाश्वत सौंदर्य ओळखू न शकणाऱ्या उथळ, चंचल स्वभावाच्या प्रेयसीला ते म्हणतात, 

केल्या ज्याच्या पायघड्या मी तुझ्या पावलांसाठी।
त्या हृदयाला तुडवूनि गेलीस नटव्या थाटापाठी।।

त्यामुळे मग ‘फुले वेचिली पण आता ही द्यावी कोणालागी’ असा प्रश्न त्यांच्या मनात उमटला तर तो स्वाभाविकच म्हणायला हवा. 

कांट्यांवरि या कोमल हृदया टाकुनि देवा क्रूर।
कुठें फुलांची धनीन माझी दिली दवडुनी दूर?

ही कटू आणि तीव्र भावना असो, वा, 

‘बाग जगाची ही न फुलांची काटे जागोजाग।’ ही वस्तुस्थिती असो, ते सर्व काही निराश मनानं स्वीकारतात. संपूर्ण जग हे द्वंद्वानं भरलेलं आहे. आपण कोणती तरी एक वृत्ती स्वीकारावी असं ते सांगतात - 

सुख दुःखाच्या द्वैतामधुनि, दुःख सदा वगळावे।
सुख सेवावे हीच वासना सामान्यांची धावे।।

पण त्याच वेळी ते आणखी एक मध्यम मार्गही सांगतात.

‘सुखदुःखांची समता आहे, एकाने नच जग चाले।’ हे ओळखायला हवे. मानवी जीवनाबद्दल ते म्हणतात -

परी सुखदु:खापुढे टाकुनि वदता घे जे रुचे तुला।
अचूक सुखाला उचली मानव, दुःखा त्याची न ये तुला।।

गोविंदाग्रजांनी स्वतःला नैराश्यातून बाहेर काढण्याचे आटोकाट प्रयत्न केले. ‘पुनर्जात प्रेमास’ कवितेत ते म्हणतात -

तुडवू पायी चाल खेदाला। टाकू जाळुनि नैराश्याला।
दुःख सब झूट चल। उघडी झाकली मूठ।।

आणि हे सगळं दु:ख सोसण्यासाठी, ‘सोसण्यास मज ते सद्धैर्य दे तेवढे।’ अशी ईश्वराला प्रार्थनाही करतात.

‘एखाद्याचे नशिब’ ही त्यांची आणखी एक वेगळी कविता -

काही गोड फुले सदा विहरती स्वगागनांच्या शिरी,
काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरी;
काही जाउनी बैसती प्रभुपदीं पापापदा वारि ते;
एकादें फुटके नशीब म्हणुन प्रेतास शृंगारिते!

नशिबावर हवाला ठेवून निराश होणाऱ्यांसाठी गोविंदाग्रजांची ही कविता निश्चितच वेगळा दृष्टिकोन देणारी म्हणता येईल.

‘राजहंस माझा निजला’ ही गोविंदाग्रजांचा आणखी एक अप्रतिम कविता. खरं तर ती कविता म्हणजे कारुण्योपानिषद... असंच त्या कवितेचं वर्णन करायला हवं. मातेच्या मनातल्या भावकल्लोळाचं इतकं सार्थ वर्णन अन्यत्र अभावानंच वाचायला मिळतं. ‘हे कोण बोलले बोला। राजहंस माझा निजला।’ या कवितेत मांडीवरच्या मृत बालकाला नेण्यासाठी आलेल्यांना थांबण्यासाठी सांगणारी भावविव्हल माता आपल्यासमोर शब्दांतून उभी करण्याचं सामर्थ्य गोविंदाग्रजांच्या शब्दांत आहे. इतकं, की सहृदय वाचकाचं अंत:करण भरून आलंच पाहिजे. उत्प्रेक्षकांच्या आणि अनुप्रासांच्या माध्यमातून त्यांनी हे उभं केलं आहे. 

‘फुले वेचिली पण’, ‘हासत्या पिंपळपानास’ अशा कवितांतून त्यांच्या कल्पनासृष्टीचं वेगळं आणि वेधक रूप पाहायला मिळतं. प्रीतीच्या सुंदर भावनेला नेमक्या शब्दांत मांडणं असो वा असफल प्रेमाला तत्त्वज्ञानाच्या मुलाम्यात गुंफणं असो, कवी विलक्षण ताकदीनं ते सर्व मांडतो. ‘स्मशानातले गाणे’, ‘फुटकी तपेली’ यांसारख्या कविता गूढगुंजनात्मक आहेत. ‘कृष्णाकाठी कुंडल’ ही ऐतिहासिक पार्श्वभूमीवरची प्रेमकथा अपूर्ण असली, तरी त्यांच्या प्रतिभेची झेप दाखवणारी आहे. 
गोविंदाग्रजांच्या कवितांचा हा केवळ धावता आढावा आहे. त्यांच्या प्रतिभेचं अलौकिक लेणं अनुभवायचं असेल, तर ‘वाग्वैजयंती’ मुळातून वाचायला हवी. अर्थात केवळ तेवढंच नाही, माझ्या मते त्यांनी नाटकात जी पदे रचली आहेत, त्यांचाही विचार व्हायला हवा. जवळपास ४० ते ४५ पदं त्यांनी रचली आहेत. भाषेच्या दृष्टीनं, वाङ्मयीन गुणवत्तेच्या दृष्टीनं त्यांचा विचार रसिकांनी करायला हवा. ती पदं नाट्यगीतं म्हणून लोकप्रिय नसतीलही कदाचित; पण म्हणून त्यातली गुणवत्ता उणावत नाही. त्यामुळे काव्यसृष्टीच्या बाबतीत त्यांचा विचार व्हायला हवा. 

गोविंदाग्रजांनी अर्थालंकार, शब्दालंकार यांचा विपुल वापर करून घेतला. नाद, ताल आणि लय यांची जाण असणाऱ्या गोविंदाग्रजांची भाषासुद्धा त्यामुळे चैतन्यशील असल्याचं जाणवतं. शब्दशक्तीचं सामर्थ्य, त्यातल्या अर्थच्छटांची सूक्ष्म जाण, बुद्धिमत्ता आणि तरल कल्पनाशक्ती या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे गोविंदाग्रजांची काव्यसृष्टी. गोविंदाग्रजांनी मराठी वाङ्मयाला, समृद्ध, श्रीमंत केलं आहे आणि हे आपणा सर्व रसिकांसाठी अमूल्य असं शब्दलेणं आहे, हे निश्चित.

- डॉ. श्रीकृष्ण जोशी
मोबाइल : ९४२३८ ७५८०६
ई-मेल : shrikrishna.s.joshi@gmail.com

(लेखक रत्नागिरी येथील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य असून, ते ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार आहेत. मराठीच्या समृद्धीसाठी काय करणे आवश्यक आहे, असे त्यांना वाटते ते वाचा https://goo.gl/BXsDag या लिंकवर.) 

(राम गणेश गडकरी यांचे समग्र साहित्य http://ramganeshgadkari.com/ या वेबसाइटवर उपलब्ध आहे.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search