Next
कर्जवितरण व वसुलीमध्ये वाढ
प्रेस रिलीज
Tuesday, September 18, 2018 | 02:21 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : व्यावसायिक कर्जे घेण्याच्या प्रमाणात यंदाच्या पहिल्या तिमाहीमध्ये गेल्या वर्षीपेक्षा १०.१ टक्क्यांची वाढ झाली असल्याचे ट्रान्सयुनियन सिबिल-सिडबी एमएसएमइ पल्स रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे; तसेच देशभरात या तिमाहीमध्ये एकूण १०१ लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाले आहे. त्यातील २२.८ लाख कोटी रुपयांची कर्जे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठीची आहेत. यामध्ये व्यावसायिक कारणांसाठी व्यक्तींनी आणि लघु उद्योग कंपन्यांनी घेतलेल्या कर्जांचा समावेश आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.

एमएसएम उद्योगांकडील थकीत कर्जांचे प्रमाण स्थिर राहिलेले असून, ते मर्यादीत प्रमाणात कमी-जास्त झालेले आहे. सूक्ष्म स्वरूपाच्या उद्योगांकडील थकीत कर्जांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तिमाहीत ८.९ टक्के होते, ते यंदा कमी होऊन ८.७ टक्के झाले. लघु व मध्यम उद्योगांकडील थकीत कर्जांचे प्रमाण वाढून गेल्या वर्षीच्या ११.२ टक्क्यांवरून ११.५ टक्के झाले आहे.  

विशेष बाब म्हणजे अशी की व्यावसायिक कारणांसाठी कर्ज घेतलेल्या व्यक्तींकडील थकीत कर्जांचे प्रमाण २.५ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. एमएसएमइ पल्स या अहवालात देशातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या तिमाही वाटचालीचा आढावा बारकाईने घेतलेला असतो. ट्रान्सयुनियन सिबिल कमर्शिअल ब्युरोकडे प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप कंपन्यांपासून पब्लिक लिमिटेड कंपन्यांपर्यंतच्या ६७ लाख उद्योगांची नोंदणी झालेली आहे. बॅंका, बॅंकेतर अर्थसंस्था, गृह कर्ज देणाऱ्या कंपन्या, सहकारी बॅंका, प्रादेशिक ग्रामीण बॅंका आणि अन्य संस्थांचा उद्योगांकडील क्रेडीट डाटा दरमहा तपासला जातो व अद्ययावत ठेवला जातो.

या अहवालाची अधिक माहिती देताना सिडबीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महंमद मुस्तफा म्हणाले, ‘अर्थसंस्थांनी लघु उद्यागांना कर्जे मंजूर करायचा सरासरी कालावधी २०१६मध्ये ३२ दिवसांचा होता, तो आता २६ दिवसांवर आला आहे; तसेच आमच्या ब्यूरोकडून मिळालेल्या माहितीचा उपयोग करण्याचे आणि डिजिटायझेशनचे प्रमाणही वाढले आहे. विविध अर्थसंस्थांच्या कर्ज मंजूर करण्याच्या कालावधीत किती फरक असतो, हेही आमच्या अहवालातून दिसून येते. एमएसएम उद्योगांना कर्ज मंजूर करण्यासाठी बॅंकेतर अर्थसंस्था २०१६मध्ये सरासरी २४ दिवस घ्यायच्या, त्या आता १८ दिवस घेतात. सरकारी बॅंका या कामासाठी सर्वात जास्त वेळ घेतात. २०१६मध्ये त्या ४१ दिवसांचा वेळ घेत असत, त्या आता ३१ दिवसांचा वेळ घेतात. खासगी बॅंका पूर्वी ३२ दिवस लावायच्या, त्या आता २९ दिवस लावतात.’

बॅंकांशी नव्यानेच संपर्क झालेल्या व व्यावसायिक कारणांसाठी कर्ज घेतलेल्यांची संख्या वाढते आहे. एका वर्षभरातच बॅंकांशी संबंध तोडणाऱ्यांची संख्या १४ टक्के आहे; तसेच बॅंकांशी संबंध जुळवून ठेवणाऱ्या लघु उद्योगांची संख्या दोन टक्क्यांनीच वाढली आहे. एमएसएम उद्योगांनी घेतलेल्या एकूण कर्जांमध्ये झालेल्या २० टक्के वाढीत ३२ टक्के इतका मोठा वाटा याच नवीन ग्राहकांकडून मिळाला आहे.

ट्रान्सयुनियन सिबिलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश पिल्लई म्हणाले, ‘अर्थसंस्थांना कार्यक्षमतेने काम करण्यासाठी आणि नफ्याची गणिते जुळवण्यासाठी आम्ही त्यांना नेहमीच मदत करतो. सूक्ष्म, लघु, मध्य व मोठ्या कंपन्यांचा विचार केला, तर असे दिसून येते की सूक्ष्म व लघु उद्योगांची कामगिरी खूपच सरस झाली आहे. त्यांची वाढ अनुक्रमे २१ टक्के व १४ टक्के इतकी झाल्याचे दिसते. कर्ज थकीत राहण्याचे प्रमाण या कंपन्यांमध्ये वाढलेले नाही वा कमीही झालेले नाही. मध्यम व मोठ्या कंपन्यांमध्ये मात्र कर्ज घेण्याचे प्रमाण कमी झाले असून, ते थकीत ठेवण्याचे प्रमाण वाढलेले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search