Next
प्रयोगशील डाएट...
BOI
Wednesday, March 28, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this story


‘डाएट’चे फॅड सांभाळताना आजकाल स्वतःवर मनानेच विविध प्रयोग केले जातात. असे करण्याने वजन कमी होत नाहीच, उलटपक्षी चुकीचे काहीतरी खाल्ल्याने तब्येतीवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. खरे तर प्रत्येकाच्या आहारात काही गोष्टी समान असल्या, तरी उंची, कामाचे स्वरूप, व्यायामाची सवय, आजार किंवा व्याधी इत्यादी सर्व बाबी विचारात घेता, आहारतज्ज्ञांकडून आहाराचा तक्ता बनवून घेतला पाहिजे... ‘पोषणमंत्र’मध्ये आज पाहू या बदलत्या ‘डाएट’ संकल्पनेबद्दल...
...........................................
वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करुनही जेव्हा वजन कमी होत नाही, इच लॉस होत नाही, तेव्हा पावले आपोआप डाएटकडे वळतात. बहुतेकजण जसे व्यायामात स्वतःच्या मनानेच  तऱ्हेतऱ्हेचे प्रयोग करत असतात, तसेच डाएटच्या बाबतीतही लोक फारच प्रयोगशील असतात. हे प्रयोग करताना अनेक पर्यायांचा अवलंब केला जातो. 

इंटरनेटवरील माहितीच्या आधारे डाएट करणे, प्रशिक्षकाला विचारून डाएट करणे, आपापसांत चर्चा करुन डाएट ठरवणे इत्यादी प्रकार सरसकट सूरू असतात. प्रशिक्षकाचा जर आहारशास्त्राचा अभ्यास असेल, तर त्याचा सल्ला घेण्यास हरकत नाही; पण आहारशास्त्राचा अभ्यास नसलेले आणि त्यात फार पारंगत नसलेले प्रशिक्षकही बऱ्याचदा आहाराचे सल्ले देताना दिसतात. यामुळे मग त्याचा परिणाम म्हणावा तेवढा अचूक होताना दिसत नाहीत. त्यातून हवे ते रिझल्ट्स मिळत नाहीत. 

आजकाल मुले पिळदार शरीरयष्टी बनणवण्याचा नादात खूप प्रथिने असलेला आहार घेतात. त्यासाठी प्रोटीन पावडर, वेगवेगळ्या गोळ्या घेतात, पण त्यांना हे माहित नसते, की तळलेले बाहेरचे पदार्थ पूर्ण बंद करायला हवेत. एकीकडे प्रथिनांच्या वाढीसाठी गोळ्या घेणे आणि दुसरीकडे तळलेले, जंक फुड खाणे, त्यामुळे कर्बोदके व स्निग्ध पदार्थही मोठ्या प्रमाणात पोटात जातात व वजन आहे तेवढेच राहणे किंवा उलट पक्षी चरबी वाढलेलीच असते, हा प्रकार होतो. म्हणजेच पैशासारखा पैसा वाया जातो आणि व्यायामशाळेत घाम गाळलेला असतो तो वेगळाच.

असाच आणखी एक घातक प्रकार म्हणजे एकमेकांचे डाएट विचारून ते तसे करण्याचा प्रयत्न करणे. खरे तर प्रत्येकाच्या आहारात काही गोष्टी समान असल्या, तरी उंची, कामाचे स्वरूप, व्यायामाची सवय, आजार किंवा व्याधी इत्यादी सर्व बाबी विचारात घेता, आहारतज्ज्ञांकडून आहाराचा तक्ता बनवून घ्या. काय खावे? केव्हा खावे? किती खावे? कशासोबत काय खावे? ह्या सगळ्याला खूप महत्त्व आहे. प्रथिनांच्या दोन स्त्रोतांपैकी कोणते जास्त चांगले याचाही विचार होणे गरजेचे असते. हे इतके सखोल ज्ञान व विचार आहारतज्ज्ञच करू शकतात. 

अनेक वेळा आहारतज्ज्ञांनी दिलेला आहारतक्ता व इतर मित्रांनी किंवा प्रशिक्षकाकडून मिळालेल्या आहारातील सूचना या एकत्र करून वेगळाच प्रयोग सुरू केला जातो. पुढच्या १५–२० दिवसांत काही परिणामकारक बदल दिसला नाही, की परत आहारतज्ज्ञांकडे जायचे व आहाराचा फायदा झाला नाही असे सांगायचे. एकूणच काय तर आजच्या भेसळीच्या जमान्यात हे असे प्रसंग म्हणजे व्यायामशाळेतील भेसळ म्हणायला हरकत नाही. वेगवेगळ्या डाएटप्रमाणेच तऱ्हेतऱ्हेच्या गोळ्या घेण्याचेही फॅड वाढले आहे. एक लिंबू आहारात ठेवणे चांगले, की एक ‘क’ जीवनसत्वाची गोळी घेणे चांगले? दिवसाला दोन फळे खाणे चांगले, की ‘बी कॉम्प्लेक्स’ची गोळी घेणे चांगले? ते प्रत्येकाने स्वतःच ठरवावे; पण काही काही जणांना गोळ्या घेण्यात एक प्रकारचं सो कॉल्ड ग्रेट फिलिंग असतं. हा सगळा गोंधळ थांबला पाहिजे.

- आश्लेषा भागवत
मोबाइल : ९४२३० ०८८६८ 
ई-मेल : ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत.) 

(‘पोषणमंत्र’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/4tP7a7 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Anjali gadgil About 356 Days ago
खूप छान माहिती
0
0

Select Language
Share Link