Next
‘अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य सर्वांनाच’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Tuesday, February 26, 2019 | 11:33 AM
15 0 0
Share this article:नागपूर : ‘विदर्भाची भूमी ही नाट्य परंपरेला दाद देणारी असून, साहित्य, संस्कार, विचार या सर्वच बाबतीत समृद्ध आहे. सहिष्णूता हा आमचा विचार आहे. संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांनाच आहे. भारतीय संविधानाने समतेचा विचार दिला असून, शासन भारतीय संविधानावरच चालत आहे; तसेच भारतीय संविधानाच्या चौकटीतच राहून कामकाज करत आहे,’ प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अखिल भारतीय नाट्य परिषदेचे ९९वे संमेलन रेशीमबाग येथील मैदानावर २३ फेब्रुवारी २०१९ रोजी झाले. फडणवीस यांनी नाट्य संमेलनाला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. (कै.) पुरुषोत्तम दारव्हेकर खुल्या रंगमंचावर आयोजित या कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, मावळत्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार, गिरीश गांधी, प्रसाद कांबळी, प्रफुल्ल फरकसे तसेच ज्येष्ठ रंगकर्मी या वेळी उपस्थित होते. फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी, मावळत्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार तसेच अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या विविध पदाधिकाऱ्यांचा या वेळी शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.मुख्यमंत्री म्हणाले, ‘३४ वर्षांनंतर नागपुरात नाट्य संमेलन होत असल्याचा आनंद होत असून, ९९वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. नाट्य परिषदेने १००वे संमेलनसुद्धा नागपूर येथे आयोजित करण्याची तयारी दर्शविली आहे. महाराष्ट्राची रंगभूमी आणि नाट्यपरंपरा ही देशातील अत्यंत समृद्ध परंपरा आहे. देशात ही नाट्य परंपरा मराठी रंगभूमीने जोपासली आहे. ती वाखाणण्याजोगी आहे. अनेक वेळा कालानुसार काही परंपरा लुप्त होतात. काही कला तेवढ्या वेगाने पुढे जात नाहीत. त्याला पोषक वातावरण नसते; मात्र मराठी रंगभूममी व रसिकांनी कुठेही कमी न होऊ देता ती अधिक समृद्ध केली आणि विकसित केली. त्याबद्दल मी मराठी नाट्य परंपरा व रसिकांचे आभार मानतो.’

विदर्भभूमीने नेहमीच नाट्य परंपरेला दाद दिली असून, ही परंपरा अडचणीत आली त्या प्रत्येक वेळी विदर्भभूमीने भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे नाट्य परंपरा, नाट्यकर्मींना विवंचनेतून बाहेर काढण्याचे काम या भूमीने केले आहे. वैदर्भियांची भूक अजूनही तशीच असल्याचा आनंद आहे. त्यातही झाडीपट्टीची बातच न्यारी आहे. आजही झाडीपट्टीची परंपरा ही भौतिकच नाही, तर साहित्यिक, संस्कृती आणि विचारानेही समृद्धी जोपासत ही विदर्भाची भूमी समृद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.‘सहिष्णूता हा विचार आहे. तो आमच्या रक्तात आहे. या संदर्भात जेवढी आक्रमणे झाली ती आम्ही पचवलीत. या पूर्वी १९७५ साली अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला झाला असता देशवासीयांनी तो उलथवून टाकला. केवळ नक्षली साहित्य सापडले म्हणून कोणाविरुद्ध कारवाई करण्यात येणार नाही; परंतु देशविरोधी कृत्याचे पुरावे आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध संविधानाने दिलेल्या चौकटीत राहून निश्चितच कार्यवाही करण्यात येईल. यासंदर्भात कोणताही गैरसमज असू नये.’ असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

या वेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या आयोजनाबद्दल आयोजकांना धन्यवाद देताना पुलवामा घटनेचा उल्लेख करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाकिस्तानात जाणारे नद्यांचे पाणी अडविण्याची घेतलेली भूमिका योग्य असल्याचे नमूद केले. भारतावर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करताना देशासाठी बलिदान देण्याची तयारी सर्वच भारतीयांमध्ये असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी हे आंबेडकरी विचारांचे पाईक असल्याचेही त्यांनी सांगितले.

या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अखिल भारतीय नाट्य परिषदेचे निमंत्रक नरेश गडेकर, मुख्य निमंत्रक व अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष नवनाथ (प्रसाद) कांबळी, अशोक ढेरे, सुनील ढगे, जगन्नाथ चितळे, रघुवीर खेडकर, सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळातील नाट्य कलावंतांचा गौरव करण्यात आला. नाट्य संमेलनाचे कार्याध्यक्ष गिरीश गांधी यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search