Next
ये हवा ये रात ये चाँदनी...
BOI
Sunday, July 22, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

सज्जाद हुसेनसंगीतकार सज्जाद हुसेन यांचा स्मृतिदिन २१ जुलै रोजी होऊन गेला. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदराच्या आजच्या भागात आस्वाद घेऊ या त्यांनी संगीत दिलेल्या ‘ये हवा ये रात ये चाँदनी...’ या गीताचा...
...........
जुलै महिन्यात जे अनेक कलावंत हे जग सोडून गेले आहेत त्यामध्ये संगीतकार सज्जाद हुसेन हे नावही आहे. संगीतकार सज्जाद हुसेन हे नाव खूप लोकांच्या ओठावर होते असे म्हणता येणार नाही; पण ‘ये कैसी अजब दास्ताँ हो गयी है...’ हे गाणे आवर्जून ऐकले जाते. सुरैयाचे कौतुक होते आणि ओघानेच संगीतकाराचे. त्याचा संगीतकार सज्जाद हुसेन ही माहिती मिळताच ऐकणारा थोडा गंभीर होतो. ‘हलचल’, ‘संगदिल’, ‘खेल’ अशी दोन-तीन चित्रपटांची नावे ओठावर येतात; पण त्याचबरोबर सज्जादच्या वेगळ्या स्वभावाचीच चर्चा जास्त होते. अर्थात हे जुन्या चित्रपटप्रेमींच्या बाबतीत घडते.

नव्या पिढीतील चित्रपटसंगीताचे प्रेमी तर या नावाचे नाते फक्त मेंडोलिनशी आहे, एवढेच जाणतात. सज्जाद हुसेन यांच्याबद्दल लेख लिहिताना बुजुर्ग लेखकांनाही त्यांच्या वेगळ्या स्वभावाचे किस्से लिहिण्याचा मोह टाळता आला नाही, असे दिसून आले आहे. मी मात्र येथे त्यांच्या २१ जुलै रोजी होऊन गेलेल्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने ‘ते तसे काही किस्से’ टाळून लिहिता आले, तर काही मोजकेच लिहिण्याचा प्रयत्न येथे करत आहे. कारण एक तर सज्जाद या दुनियेतून जाऊन २३ वर्षे झाली आहेत. दुसरे असे, की कलावंत लहरी असतात, हे खूप जणांच्या बाबतीत दिसून आले आहे; मग एकट्या सज्जाद यांचाच उल्लेख त्याबद्दल करण्यात काय हशील?

कोणताही माणूस पूर्णपणे गुणसंपन्न नसतो. काही दोष प्रत्येकातच असतात. आणि त्याच्यातील गुणांपेक्षा दोषांचीच चर्चा करणे सभ्यतेला धरून नसते, असे मला वाटते. भले गुणांची संख्या जास्त नसेल; पण जेवढे आहेत तेवढे तर बघता येतात. असो!
मध्यप्रदेशातील सीतामह या संस्थानातून सज्जाद हुसेन १९३५च्या सुमारास मुंबईत आले. त्यांचे वडील उत्तम सतारवादक होते. सज्जाद स्वतः सोळा प्रकारची वाद्ये वाजवण्यात वाकबगार होते. मेंडोलिनवर ते रागदारी छेडायचे. सुरांवर पोटच्या मुलापेक्षा जास्त प्रेम करायचे आणि हे संगीतप्रेम घेऊन ते मुंबईत आले, तेव्हा अभिनेत्री मीनाकुमारीचे वडील अल्लाबक्ष यांनी त्यांना आसरा दिला.

तेथे राहत असताना त्यांना ‘दोस्त’ हा चित्रपट संगीत देण्यासाठी मिळाला. सज्जाद यांनी संगीत दिलेली आणि व नूरजहाँ यांच्या स्वरातील ‘बदनाम मोहब्बत कौन करे...’, ‘कोई प्रेम का देके संदेसा...’, ‘आलम पे आलम सितम पे सितम...’ ही तिन्ही गीते लोकप्रिय ठरली आणि सज्जाद यांचे नाव झाले. चित्रपटसृष्टीत ‘सज्जाद’ या नावाची चर्चा सुरू झाली.

त्यानंतर मधुबाला, नर्गिस, दिलीपकुमार यांची भूमिका असलेला के. असिफ यांचा ‘हलचल’ हा चित्रपट संगीत देण्यासाठी सज्जाद यांना मिळाला. त्यातील काही गीते त्यांनी संगीतबद्ध केली. परंतु नंतर निर्मात्याशी त्यांचे मतभेद झाले आणि सज्जाद यांनी तो चित्रपट सोडून दिला. नंतर संगीतकार मोहम्मद शफी यांनी तो पूर्ण केला. ‘आज मेरे नसीब ने मुझको रुला दिया...’ हे हलचल चित्रपटातील गीत आजही श्रवणीय आहे. ‘हलचल’नंतर ‘सैंया’, ‘रुक्साना’, ‘फर्ज और इश्क’, ‘कसम’ या चित्रपटांना सज्जाद यांनी संगीत दिले; पण त्यातील गीते फारशी लोकप्रिय ठरली नाहीत.

‘भूल जा ए दिल...’, ‘जाते हो तो जाओ...’(खेल), ‘दिल में समा गए सजन...’, ‘कहाँ हो कहाँ...’, ‘वो तो चले गए ऐ दिल, यादसे उनकी प्यार कर...’(संगदिल), ‘ये कैसी अजब दास्ताँ हो गयी है...’, ‘फिर तुम्हारी याद आयी ए सनम...’, ‘माजंदरा मेरे वतन मेरे जहाँ...’(रुस्तम सोहराब) ही अशी एकापेक्षा एक सुंदर गाणी संगीतकार सज्जाद हुसेन यांनी दिली होती.

स्पष्ट व परखड मते, संगीत, सूर, लय, ताल यांमधील अचूकता व त्यावर मनापासून प्रेम, या सगळ्या गोष्टी फिल्म इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या सगळ्यांना पटणाऱ्या होत्याच, असे नाही. चित्रपटसृष्टीत कामचलाऊ वृत्तीने काम करणारे अनेक असतात. त्या सर्वांबरोबरचे मतभेद सज्जाद यांना रुस्तम सोहराब चित्रपटानंतर चित्रपटसृष्टीपासून दूर ठेवत गेले. त्यांची मुले हळूहळू मोठी झाली. वडिलांकडून मेंडोलिन वाजवायला शिकली आणि नव्या पिढीच्या संगीतकारांकडे काम करू लागली.

सज्जाद आपल्या साध्या घरात मेंडोलिनवर रागदारी छेडत आपल्या जीवनाची संध्याकाळ व्यतीत करत राहिले. २१ जुलै १९९५ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांनी संगीत दिलेली मधुर गीते आजही आवर्जून ऐकली जातात आणि मेंडोलिनवादनाचा विषय निघाला, की सज्जाद यांचे नाव प्रथम घेतले जेते. अर्थात हे सर्व कलेवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांमध्ये होते. बाकी सारे ‘कोण? तेच सज्जाद ना, जे...’ अशी सुरुवात करून कित्येक प्रत्यक्षात न घडलेले प्रसंग, न उच्चारलेली वाक्ये त्यांच्या नावांवर घुसडून आपल्याला कशी खूप माहिती आहे, हे दर्शवितात. माणसांचे सगळे प्रकार जगात आहेत, हेच खरे!

सज्जाद यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे एक ‘सुनहरे गीत’ पाहू या! चित्रपट संगदिल (१९५२), गीतकार शकील बदायुनी आणि गायक तलत मेहमूद! 

तेरी इक अदा पे निसार है 
मुझे क्यों न हो तेरी आरजू 
तेरी जुस्तजू में बहार है

ही प्रसन्न हवा, ही रसिली रात्र आणि हे सुखशीतल चांदणे, तुझ्या एका विभ्रमावर कुर्बान आहे. (इतकी तू सुंदर दिसतेस मग) मला तुझ्या प्राप्तीची इच्छा का होणार नाही? (खरोखरच) तुला शोधून काढण्यात, (जुस्तजू) तुझ्यासाठी वने-उपवने धुंडाळण्यातही मोठी बहार आहे, मौज आहे.

तुझे क्या खबर है ओ बेखबर 
तेरी इक नजर में है क्या असर 
जो गजब में आए तो कहर है 
जो न हो मेहरबाँ तो करार है

(हे) अजाण, बेफिकीर सुंदरी, तुझ्या एका कटाक्षातही केवढा प्रभाव आहे याची तुला काय वार्ता? (तुझ्या नजरेतील जादू तुला ठाऊक नाही.) (त्या तुझ्या नजरेत) क्रुद्धता आली, तर कहर उसळतो आणि (ती तुझी नजर) कृपावंत झाली नाही तर, म्हणजेच आशिकाकडे वळली नाही, तरच त्याला आराम मिळतो. (त्याच्यावर बेचैन होण्याचा बाका प्रसंग गुदरत नाही.)

तेरी बात बात है दिलनशी 
कोई तुझसे बढकर नहीं हँसीं 
है कली कली में जो मस्तियाँ
तेरी आँख का वो खुमार है

तुझी हर एक बात, तुझा हर एक वार्तालाप हृदयात ठसणाराच आहे. तुझ्यापेक्षा सुंदर दिसणारी कोणी सौंदर्यवती या जगात नाही. या उद्यानातील प्रत्येक कळीमध्ये जी धुंदी तरळत आहे, ती तुझ्याच नेत्राची नशा आहे.

‘संगदिल’ चित्रपटातील दोनच कडव्यांचे गाणे लिहिताना गीतकार शकील बदायुनी यांनी एका प्रेमिकाच्या भावना समर्पक शब्दांत व्यक्त केल्या आहेत. परंतु ही दोनच कडवी आपण बारकाईने पाहिली, तर असे लक्षात येईल, की हे गीत केवळ प्रेयसीचे सौंदर्यवर्णन करणारे नाही, तर खासकरून ते तिच्या दृष्टीच्या, नेत्रकटाक्षाच्या प्रभावाचे वर्णन करणारे गीत आहे. इश्काच्या प्रांतातील गीते लिहिण्यात शकील बदायुनी तरबेज होते. आणि स्त्री सौंदर्यवर्णनात तर त्यांची प्रतिभा बहरून येत असे. त्याचेच हे एक उदाहरण आहे.

संगीतकार सज्जाद हुसेन यांनी या गीतासाठी तयार केलेली चाल एवढी सुंदर, मोहक व आकर्षक आहे, की ती पुन्हा वापरण्याचा मोह पुढील काळात संगीतकार मदनमोहन यांना आवरता आला नाही. ‘आखरी दाव’ (१९५८) या चित्रपटात याच चालीवर मजरूह सुलतानपुरी यांच्याकडून गीत लिहून घेतले होते व मोहम्मद रफींनी ते गायले होते. ‘तुझे क्या सुनाऊ मैं दिलरुबा......’ हे ते गीत होते. एखादी चाल किती प्रभावी असते, ते या उदाहरणावरून दिसून येते आणि ती निर्माण करणाऱ्या संगीतकाराची कला किती महान आहे, हे लक्षात येते. 

‘सुनहरी’ गीते अशीच संगीत, शब्द व स्वर यांनी सजलेली असतात. त्यांच्या निमित्ताने संगीतकार सज्जाद हुसेन यांच्यासारख्या कलावंतांच्या आठवणीही येत राहतात. त्यांनीच संगीत दिलेल्या गीताच्या शब्दांत त्यांना सांगावेसे वाटते -

फिर तुम्हारी याद आयी ए सनम 
हम न भूलेंगे तुझे अल्ला कसम

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
जनार्दन अनपट, सातारा रोड (सातारा)महाराष्ट्र About 241 Days ago
बहोत ही बढ़िया,,और लाजवाब जानकारी
0
0

Select Language
Share Link