Next
माखजनमधील गणेशोत्सवाला ३५० वर्षांची परंपरा
संदेश सप्रे
Tuesday, September 11, 2018 | 12:00 AM
15 0 0
Share this story

माखजन येथील मंदिरातील चांदीची गणेशमूर्तीसंगमेश्वर : रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील माखजनमधील गणेश मंदिरामध्ये आजही साजऱ्या होणाऱ्या उत्सवाला पेशवे काळापासूनची परंपरा आहे. ३५० वर्षांनंतरही हा उत्सव येथे मोठ्या भक्तिभावात साजरा होतो. 

माखजन येथे ३५० वर्षांपूर्वीचे गणेश मंदिर असून, तेथील गणेशोत्सव पेशवे काळापासून सुरू आहे. या मंदिरात पंचधातूची गणेशमूर्ती आहे. अद्याप जिल्ह्याबाहेर या मंदिराची फारशी प्रसिद्धी झालेली नाही. पेशवे काळात माखजन येथील जोशी घराण्याचे पूर्वज ज्योतिषी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी केलेली कित्येक भाकिते त्या वेळी खरी ठरली होती. त्यांच्या विद्वत्तेवर खूष होऊन पेशव्यांनी त्यांना ‘काय पाहिजे ते मागा’ असे सांगितले होते. त्या वेळी श्री गणेशाचे भक्त असलेल्या जोशींनी सोने-नाणे न मागता श्री गणेशाची मूर्ती मागितली होती. पेशव्यांनी त्यांना पंचधातूने बनविलेली गणेशमूर्ती भेट म्हणून दिली. भेट मिळालेल्या या मूर्तीची प्रतिष्ठापना जोशींनी माखजन गावातच केली आणि त्या गणरायाच्या सेवेतच आपले आयुष्य व्यतीत केले. 

पेशव्यांनी दिलेली ही पंचधातूची गणेशमूर्ती योद्ध्याच्या रूपातील आणि उभी असून, त्याच्या बाजूलाच रिद्धी-सिद्धी विराजमान झाल्या आहेत. माखजन गावात या गणेशाचे छोटेखानी मंदिर असून, दर वर्षी गणेश चतुर्थीला येथे छोटा उत्सव साजरा होतो. मूर्तीवरील धातूंचे कोरीव काम आकर्षक असून, मूर्तीकडे पाहताक्षणी प्रसन्न वाटते. 

मुंबई-गोवा महामार्गावरील आरवली या ठिकाणापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर हे स्वयंभू देवस्थान आहे. सध्या जोशी घराण्याच्या आठव्या पिढीतील सतीश जोशी व कुटुंबीय श्री गणेशाची सेवा करत आहेत. नैमित्तिक पूजा, अर्चा येथे सुरू असते. तसेच गणेशोत्सवाव्यतिरिक्त संकष्टी चतुर्थीलाही येथे स्थानिक भाविकांची वर्दळ असते.

मंदिरांचा तालुका 
रत्नागिरीतील सर्वाधिक मंदिरे असणारा तालुका म्हणून संगमेश्वरची ख्याती आहे. या तालुक्यात शिवमंदिरांची संख्या अधिक असली, तरी त्याखालोखाल स्वयंभू गणेशाच्या मंदिरांचीही संख्या लक्षणीय आहे. तालुक्यातील शिवने येथील हरिहरेश्वर - सिद्धिविनायक मंदिरातील उजव्या सोंडेचा गणेश स्वयंभू म्हणून प्रसिद्ध आहे. देवरुखातील चौसोपी वाड्यातील जोशीबुवांना दृष्टांतानुसार सापडलेला चांदीचा गणेश, तसेच गणेश वेदपाठशाळेतील द्विभुज गणेशमूर्ती हीदेखील भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. 

(देवरुखातील चौसोपी वाड्यातील गणेशोत्सव भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होतो. त्याविषयी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील गणेशोत्सवाच्या विशेष बातम्या व लेख https://goo.gl/X8v1iW या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link