Next
झुंज भाषेची, धडपड पुनरुत्थानाची!
BOI
Monday, October 15, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

इमॅन्युएल मॅक्रोनआज पृथ्वीवरील पाच खंडांमधील ५८ देशांमध्ये फ्रेंच भाषा बोलली जाते. जेथे जेथे ती बोलली जाते, त्या भागांचा निर्देश ‘फ्रँकोफोनी’ या नावाने करण्यात येतो. जगभरातील २७ कोटी ४० लाख फ्रेंच भाषकांचे प्रतिनिधित्व ते करतात. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांना या ‘फ्रँकोफोनी’मध्ये प्रतिकारशक्ती भरून तिचे पुनरुत्थान करायचे आहे. इंग्रजीच्या जागतिक वर्चस्वाशी त्यांना सामना करायचा आहे. आंतरराष्ट्रीय फ्रेंच भाषकांच्या नुकत्याच झालेल्या शिखर परिषदेच्या निमित्ताने...
................
‘हा काही लोकांचा जमलेला क्लब नाही, तर पुनरुत्थानाचे ठिकाण आहे,’ फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी गुरुवारी (११ ऑक्टोबर २०१८) हे उद्गार काढले. त्या वेळी त्यांच्यासमोर ४० राष्ट्रप्रमुख आणि ८४ देशांचे प्रतिनिधी होते. अन् ज्या ठिकाणाचा निर्देश ते करत होते ते होते लॉर्गनिझाँ इंटरनेसनाल दी ला फ्रँकोफॉनी (ओआयएफ) म्हणजेच आंतरराष्ट्रीय फ्रेंच भाषक या संघटनेची शिखर परिषद.

आज पृथ्वीवरील पाच खंडांमधील ५८ देशांमध्ये फ्रेंच भाषा बोलली जाते. जेथे जेथे ती बोलली जाते, त्या भागांचा निर्देश ‘फ्रँकोफोनी’ या नावाने करण्यात येतो. जगभरातील २७ कोटी ४० लाख फ्रेंच भाषकांचे प्रतिनिधित्व ते करतात. अन् मॅक्रोन यांना या फ्रँकोफोनीमध्ये प्रतिकारशक्ती भरून तिचे पुनरुत्थान करायचे आहे. इंग्रजीच्या जागतिक वर्चस्वाशी त्यांना सामना करायचा आहे. अर्थात ही काही त्यांची एकट्याची मनीषा नव्हे, तर संपूर्ण फ्रान्सचीच ती आकांक्षा आहे. 

ही परिषद भरली होती ती आर्मेनिया या युरोपियन देशाची राजधानी इरेव्हान येथे. ‘ओआयएफ’ची ही १७वी परिषद होती. ही शिखर बैठक होत असतानाच ऑब्जर्वेटोर दू ला लँग्वे फ्रांसेज (ओएलएफ) या संस्थेने आपला ताजा अहवाल सादर केला. दर चार वर्षांनी प्रकाशित होणारा हा अहवाल फ्रेंच भाषेवरील अद्ययावत माहिती देणारा दस्तऐवज म्हणून पाहिला जातो. या अहवालानुसार मँडारिन, इंग्रजी, स्पॅनिश आणि अरबीनंतर बोलली जाणारी फ्रेंच ही पाचवी भाषा ठरली आहे. (काही ठिकाणी हिंदी ही चौथी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा मोजली जाते). आज जगातील ३२ देशांची ती अधिकृत भाषा आहे. या संघटनेच्या अहवालानुसार, २०७०मध्ये फ्रेंच बोलणाऱ्यांची संख्या ४७ कोटी ७० लाख आणि ७४ कोटी ७० लाखांदरम्यान असू शकते. याला मुख्यतः आफ्रिकेतील लोकसंख्येत झालेली वाढ कारणीभूत असेल. फ्रेंच भाषेच्या नवीन भाषकांमध्ये सब-सहारा आफ्रिकेतील ६८ टक्के आणि उत्तर आफ्रिकेतील २२ टक्के लोक मोडतात. आपल्या दैनंदिन जीवनात फ्रेंचचा वापर करणारे जवळजवळ ६० टक्के लोक आफ्रिका खंडात आहेत. 

त्याचे पडसाद या परिषदेवर पडले नसते तरच नवल! ‘हे पृथ्वीचे आयाम असलेले एक कुटुंब आहे. ही भाषा आपल्याला जोडते. प्रत्येक जण ती स्वतःच्या सुरात आणि प्रत्येकाच्या पद्धतीने बोलत आहे,’ असे मॅक्रोन त्यांच्या भाषणात म्हणाले. मुख्य म्हणजे फ्रेंच भाषा ही फ्रान्सच्या एकट्याच्या मालकीची नाही, हेही त्यांनी ठासून सांगितले. 

म्हणूनच, ‘फ्रेंच ही ‘सर्जनाची भाषा’ असून, इंग्रजी ही ‘वापराची भाषा’ आहे आणि आम्ही आमच्या भाषेत पुढाकार घेणे, वाटाघाटी करणे व प्रस्ताव मांडणे आवश्यक आहे,’ असे ते म्हणाले. याचा अर्थ विविध देशांतील लोकांमध्ये संवादाची भाषा म्हणून इंग्रजीच्या स्थानाला त्यांनी मान्यता दिली आहे. परंतु ज्याला काही सर्जनशील काम करायचे आहे, रचनात्मक कार्य करायचे आहे, त्याला फ्रेंच भाषा अंगीकारावी लागेल, असे त्यांचे मत आहे. 

त्यांच्या या वक्तव्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. एकोणfसाव्या शतकातील रशियन साहित्यावर (किंबहुना बहुतेकशा युरोपीय साहित्यावर) फ्रेंच साहित्याचा आणि भाषेचा प्रभाव होता. लिओ तोल्स्तोय (टॉलस्टॉय) यांच्यासारख्या लेखकांच्या काही कृतींमध्ये अर्धेअधिक संवाद फ्रेंच भाषेत येतात. उदा. वॉर अँड पीस, अॅना कॅरेनिना इत्यादी. याचे कारण म्हणजे तत्कालीन उच्चभ्रू, कुलीन रशियन नागरिकांमध्ये फ्रेंच ही व्यवहाराची भाषा होती. आज आपल्याकडे इंग्रजी प्रतिष्ठित आहे, तशी!

त्याच सुवर्णकाळाला साद घालण्याचा प्रयत्न मॅक्रोन करत आहेत. मॅक्रोन यांनी मार्च महिन्यात मांडलेली एक कल्पना येथे पुन्हा मांडली. सर्व फ्रेंचभाषक देशांनी विलार-कोतरेत (Villers-Cotterêts) येथील किल्ल्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. येथेच फ्रांस्वा याने फ्रेंच ही फ्रान्स देशाची अधिकृत भाषा असेल, अशी घोषणा केली होती. जगप्रसिद्ध फ्रेंच लेखक अलेक्झांडर द्यूमा याचे हे जन्मस्थानदेखील आहे.

लुईसा मुशिकीवाबो‘ओआयएफ’चे उद्दिष्ट हे युवकांमध्ये विशेषतः आफ्रिकेतील युवकांमध्ये, फ्रेंच भाषेचा प्रसार करणे, हे आहे. या शतकाच्या मध्याच्या सुमारास आफ्रिका खंडात ७० कोटी फ्रेंच भाषक असतील असा एक अंदाज आहे. मॅक्रोन यांना फ्रँकोफोनी ही ‘राष्ट्रकुल’सारखी (कॉमनवेल्थ) संघटना करायची आहे. ब्रिटन व फ्रेंच हे दुसऱ्या महायुद्धापर्यंत जगावर वर्चस्व गाजवणारे देश. त्यांच्या पूर्वीच्या वसाहतींमध्ये (भारतासहित!) त्यांच्या भाषांची सद्दी अजूनही टिकून आहे. त्यातील इंग्रजी प्रसरण पावताना दिसते, तर फ्रेंच आपली सद्दी टिकवून ठेवण्यासाठी धडपडत आहे. मॅक्रोन यांचे प्रयत्न हे याच धडपडीचा भाग आहेत. इंटरनेटवर वापरली जाणारी ती चौथी भाषा आहे आणि युरोपियन युनियनमध्ये आणि इंग्रजीनंतर लॅटिन अमेरिकी देशांमध्ये शिकविली जाणारी ही दुसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. त्यात आफ्रिकी देशांमधील विस्तार फ्रेंच भाषेच्या धुरिणांना खुणावत आहे. म्हणूनच  ‘फ्रँकोफोनीचे गुरुत्वाकर्षण केंद्र दक्षिण दिशेला फिरत आहे,’ असे ‘ओएलएफ’ने म्हटले आहे. 

अन् जेव्हा मॅक्रोन यांनी ‘ओआयएफ’च्या अध्यक्षपदी रवांडाच्या लुईसा मुशिकीवाबो यांची निवड केली, तेव्हा आफ्रिकेवर फ्रेंचचा असलेला भर आणखीच स्पष्ट झाला. लुईसा या फ्रँकोफोनीच्या पहिल्या आफ्रिकी महिला अध्यक्ष आहेत. तसेच त्या रवांडाच्या परराष्ट्रमंत्री आहेत. त्यांच्या नामांकनावर आफ्रिकेत अनेकांनी नाके मुरडली आहेत. रवांडाबरोबर राजनैतिक संबंध सुरळीत करण्यासाठीच लुईसा यांची नियुक्ती झाल्याची टीका अनेकांनी केली. 

काही महिन्यांपूर्वी, रवांडाचे अध्यक्ष कागमे यांनी पॅरिसला भेट दिली, तेव्हा लुईसा यांच्या नावाची निश्चिती झाली. त्या वेळी आपल्या परराष्ट्रमंत्री फ्रँकोफोनी समुदायाचे नेतृत्व करतील, असे त्यांनी जाहीर केले होते, तेही इंग्रजी भाषेत! तसेच रवांडातील मानवाधिकाराच्या स्थितीवरही आंतरराष्ट्रीय पातळीवर फारसे चांगले बोलले जात नाही. 

रवांडा हा बेल्जियमचा अंकित देश. तेथे २५ वर्षांपूर्वी झालेल्या नरसंहारात फ्रान्सचा सहभाग असल्याचा आरोप तत्कालीन सरकारने केला होता. त्यामुळे दोन देशांचे संबंध बिघडले. रवांडाचा फ्रान्सवर एवढा रोष होता, की त्याने २००३मध्ये देशाची प्रथम भाषा किनारवांडा आणि फ्रेंच यांच्या बरोबर इंग्रजीला अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली. त्यानंतर पाच वर्षांनी फ्रेंचला पूर्णपणे हद्दपार करून इंग्रजीला अधिकृत करण्यात आले आणि २००९मध्ये तर रवांडा ‘राष्ट्रकुल’मध्ये सहभागी झाले. ब्रिटनचा आणि त्या देशाचा काहीही संबंध नसताना केवळ फ्रान्सला खिजविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. 

अन् आता त्या देशाला राष्ट्रकुलातून ओढून ‘फ्रँकोफोनी’त परत आणण्यासाठी मॅक्रोन सज्ज झाले आहेत. त्यासाठीच तर इंग्लंडचा जणू जुळा भाऊ असलेला आयर्लंड, युरोपीय महासंघाचा सदस्य माल्टा, पश्चिम आफ्रिकेतील गांबिया आणि अमेरिकेतील लुईझियाना या राज्यांना ‘ओआयएफ’चे निरीक्षक म्हणून या परिषदेत सामील करून घेतले आहे. सौदी अरेबियाही या रांगेत होताच. परंतु तेथील एका प्रकरणामुळे त्याला माघार घ्यावी लागली. खुद्द आर्मेनियातही १० हजारांपेक्षा अधिक फ्रेंच भाषक नाहीत; मात्र तोही २००४पासून ‘फ्रँकोफोनी’चा सदस्य आहे. 

...पण एकदा भाषेसाठी झुंजायचे म्हटल्यावर अशा गोष्टींकडे कोण लक्ष देतो? मॅक्रोन आणि त्यांचे देशवासी स्वभाषेच्या पुनरुत्थानासाठी सज्ज झालेत. ‘ब्रेक्झिट’सारख्या हालचालींमुळे त्यांना अधिक हुरूप आलाय. ‘दोन हत्ती लढतात, तेव्हा चिरडते ते गवत,’ अशी एक आफ्रिकी म्हण आहे. आता इंग्रजी व फ्रेंच हत्तींच्या या आखाड्यात कोणते गवत चिरडले जाते ते पाहायचे!

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 111 Days ago
Prospect of economic prosperity makes people makes people learn Other language , love for the other language plays little part . This Is life .
0
0

Select Language
Share Link
 
Search