Next
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती
स्नेहा कोंडलकर
Saturday, August 26, 2017 | 07:00 PM
15 0 0
Share this article:श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी पुण्यात १८९२मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्या माध्यमातून क्रांतिकारी चळवळीलाही दिशा दिली. त्या मंडळाबद्दल....
..............
गणेशोत्सवाच्या माध्यमातून इंग्रज राजवटीविरुद्ध चळवळच उभारली गेली होती. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना करून आपल्या क्रांतिकारी चळवळीला गणेशोत्सवाच्या माध्यमातून दिशा देण्याचे राष्ट्रकार्य केले.

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतमातेच्या स्वातंत्र्याचे स्वप्न उराशी बाळगून इंग्रजांशी दोन हात करण्यासाठी एक व्यक्तिमत्त्व पुण्यात कार्यरत होते ते म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी. भाऊसाहेब लक्ष्मण जावळे हे त्यांचे पूर्ण नाव. ते राजवैद्य होते. राहत्या घरी त्यांचा धर्मार्थ दवाखाना होता. देशभरातून त्यांच्याकडे रुग्ण येत होते. त्यांचा राहता वाडा म्हणजे शनिवारवाड्याचा मागचा भाग. त्याला शालूकरांचा बोळ असे म्हणत. भाऊसाहेबांचा शालू रंगवण्याचा व्यवसाय होता. यावरूनच त्यांचे रंगारी हे नाव रूढ झाले. भाऊसाहेबांच्या मनात ब्रिटीश साम्राज्याविरोधात कारवायांसंदर्भात विचार सुरू होता. यातूनच गणेशोत्सवाचा विचार पक्का झाला. त्यांनी आपल्या वाड्यात साथीदारांसोबत बैठक बोलवली आणि पुण्यात तीन ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

१८९२मध्ये भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली भाऊसाहेब रंगारी गणपती, नानासाहेब खासगीवाले गणपती आणि गणपतराव घोटावडे यांचा गणपती या तीन गणपतींची दहा दिवसांच्या उत्सवानंतर अनंत चतुर्दशीदिवशी मिरवणूक काढण्यात आली. यातूनच पुढे राजकीय क्रांतिकारी चळवळीला वेग आला. भाऊसाहेब रंगारी गणपतीपुढे पुढाऱ्यांची, समाजसुधारकांची, क्रांतिकारकांची भाषणे झाली. लोकमान्य टिळक, पंडित मदनमोहन मालवीय, बिपिनचंद्र पाल, सेनापती बापट, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, राजगुरू अशा अनेकांनी भाषणे आणि भेटी देऊन गणेशोत्सवाला प्रोत्साहन देऊन देशकार्यासाठीचे बीज रोवले.

वाईटाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारी गणेशमूर्ती
भाऊसाहेबांनी स्वतः कागदाच्या लगद्यापासून केलेली मूर्ती आणि तेवढाच जुना असलेला मिरवणुकीचा रथ हे या गणपतीचे वैशिष्ट्य. गणपती राक्षसाच्या छातीवर बसला असून, त्याने सोंडेने त्याच्या हाताला विळखा घातला आहे. गणपतीचा उजवा हात उगारलेल्या स्थितीत आहे आणि हातात शस्त्र म्हणून रक्तरंजित दात धारण केलेला आहे. ही गणेशमूर्ती पारंपरिक लंबोदर, स्थूलकाय स्वरूपातील नसून, राक्षसाशी प्रत्यक्ष युद्ध करणारी, वीररसाने युक्त अशी उग्र स्वरूपातील मूर्ती आहे. १८९२मध्ये स्थापन झालेली ही गणेशमूर्ती समाजाला प्रतीकात्मक संदेश देणारी होती. ही मूर्ती पारतंत्र्याच्या जोखडात अडकलेल्या समाजाला ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारी ठरली. ही मूर्ती पाहण्यास आजही मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मंडळातील  मूर्ती पुण्यातील अनेक जुन्या गणेशमूर्तींपैकी एक आहे. मिरवणुकीच्या पहिल्या दिवशी खळदकर बंधूंचे नगारावादन, उमंग, समर्थ शिवछत्रपती, श्रीराम या ढोल-ताशा पथकांचे श्रींच्या मूर्तीपुढे वादन होते.

क्रांतिकारकांचे माहेरघर भाऊसाहेब रंगारी भवन
सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ ज्या वास्तूत रोवली गेली आणि देशाच्या सामाजिक जीवनात लोकचळवळीचा नवा अध्याय ज्या वास्तूच्या साक्षीने रचला गेला ती वास्तू म्हणजे भाऊसाहेब रंगारी यांचा राहता वाडा. १८६७ साली त्या वास्तूची बांधणी झाली. भविष्यातील क्रांतीचळवळीचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी या वास्तूची रचनाच वेगळी केली होती. या वास्तूचा उपयोग क्रांतिकारकांना गुप्त बैठकी घेण्यासाठी झाला. क्रांतिकारकांची सुरक्षा आणि गुप्तता वाड्यात राखली गेली. वाड्याच्या मुख्य दरवाज्याला ‘लॅच लॉक’ पद्धत होती. म्हणजे बैठकीतील कुणालाही आवाज न देताही, चावीशिवाय दार उघडून बैठकीत रुजू होणे शक्य होते. एवढेच नाही, तर वाड्यातील सर्व मुख्य दरवाज्यांना सेंट्रल लॉक पद्धत होती. त्याची साक्ष आजही वाड्यात मिळते. एक खटका ओढला, की कड्यात कडी अडकायची, तारा-साखळ्या ओढल्या जायच्या आणि सगळे दरवाजे-खिडक्या बंद व्हायचे. तळघर, तळघरातून गावाबाहेर सोडणारा भुयारी रस्ता, बंदुका-हत्यारे गुप्तपणे लपवण्यासाठी बनवलेले दरवाजे अशा अनेक सोयींनी सज्ज असलेला वाडा क्रांतिकारकांच्या सुसज्जतेची साक्ष देतो. भाऊसाहेबांची दूरदृष्टी यातून लक्षात येते.

लोकजागृतीसाठी सुवाद्य मेळावा
आजच्या गणेशोत्सवात आपण सांस्कृतिक कार्यक्रम पाहतो. भाऊसाहेब रंगारी गणपती उत्सवामध्ये लोकजागृतीसाठी सांस्कृतिक सांगीतिक कार्यक्रमांतून संदेश दिले जायचे. समाजातील लहान-थोर कलाकार यात सहभागी होत असत. स्फूर्तिगीते, पोवाडे, गोंधळ, लोकगीते यांचे सादरीकरण सुवाद्य मेळ्यात केले जाई. त्या काळात गणेशोत्सवात या मेळ्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. ब्रिटिश दडपशाहीच्या काळात गणशोत्सवात लोकशिक्षणासाठी सुवाद्यमेळ्याच्या माध्यमातून कार्य घडले. काशिनाथ ठकूजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या मिरवणुकीत सुवाद्य मेळावा होता. यात सादर केली जाणारे पदे, गीते वीररसयुक्त असत. त्यातून आपला इतिहास लोकांना सांगितला जात असे.

भाऊसाहेब रंगारी यांनी स्थापन केलेला गणेशोत्सव खऱ्या अर्थाने एक लोकचळवळ आणि क्रांतिकारी असा होता. नंतर हा वारसा समर्थपणे त्यांच्या सहकाऱ्यांनी उचलला. भाऊसाहेबांनंतर सार्वजनिक गणेशोत्सवाची जबाबदारी काशिनाथ ठकूजी जाधव यांनी उचलली. त्यांच्यानंतर त्यांचे जावई श्री परशुराम बाळाजी निकम यांनी स्वखर्चाने ही जबाबदारी पार पाडली. वर्षागणिक सार्वजनिक गणेश मंडळांचे प्रमाण वाढत होते. त्याला व्यावसायिक रूप येत असताना निकम यांनी आपली परंपरा कायम राखली. आजही पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये भाऊसाहेब रंगारी गणपतीचे आकर्षण आणि वेगळेपण टिकून आहे. आजही अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कामे ट्रस्टच्या वतीने चालतात. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूळ शिकवणीचा आदर करत उत्सवाचे कार्य तितक्याच जोमाने सुरू आहे. शालेय विद्यार्थ्यांना साहित्यवाटप, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, दुर्लक्षित ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता, वारकरी भोजन यांसारखी अनेक सामाजिक कार्ये ट्रस्टच्या वतीने केली जातात.

मंडळातील कार्यकर्ते आपल्या वाढदिवशी अनाथाश्रमास मदत करतात. अनाथ हिंदू महिलाश्रम येथे महिलांसाठी कार्यक्रम, रक्तदान शिबिर अशी अनेक सामाजिक कामे केली जातात. तसेच गणपती उत्सवादरम्यान भाऊसाहेबांचा वाडा लोकांसाठी दहा दिवस खुला ठेवण्यात येतो. त्यादरम्यान पुण्यातील जनवाणी ट्रस्टच्या वतीने स्वयंसेवक नेमले जातात. ते वाडा पाहायला येणाऱ्या लोकांना त्याचा इतिहास, तसेच बंदुका-हत्यारे या प्रदर्शनासाठी ठेवलेल्या वस्तूंची माहिती देतात. आजच्या काळात भाऊसाहेब रंगारी गणपती महोत्सवाचा इतिहास दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहे.

विश्वस्त मंडळ (२०१७)
अध्यक्ष : सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष : बाळासाहेब निकम, सचिव : राजेंद्र गुप्ता, सहसचिव : राजेंद्र आडकर, खजिनदार : अनंत कुसुरकर, विश्वस्त : संजीव जावळे, कार्यकारिणी सदस्य : मिलिंद सातव, सुरज रेणुसे, मिलिंद डफळे.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sharad Pawar About 9 Days ago
Very nice
0
0
Adv Milind Dattatraya Pawar About
Nyc Story
0
0

Select Language
Share Link
 
Search