Next
प्रीमिअर बॅडमिंटन लीगमध्ये ‘पुणे सेव्हन एसेस’ संघाची घोषणा
पुरुष दुहेरीमधील अव्वल खेळाडू मॅथिआस बो करणार संघाचे नेतृत्व
प्रेस रिलीज
Tuesday, December 04, 2018 | 03:54 PM
15 0 0
Share this storyपुणे : प्रीमिअर बॅडमिंटन लीग या भारतातील आघाडीच्या क्रीडा महासंघातर्फे चौथ्या स्पर्धेसाठी ‘पुणे सेव्हन एसेस’ या संघाची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेमध्ये देशातील उत्कृष्ट संघ सहभागी होणार आहेत. पुण्यातील विमाननगर भागातील फिनिक्स सिटी मॉल येथे या संघाचा प्रदर्शनीय खेळ झाला. या वेळी ‘पुणे७एसेस’ संघाचे सह-मालकी हक्क असलेल्या अभिनेत्री तापसी पन्नू हिने संघातील खेळाडूंची ओळख करून दिली.

भारतीय बॅंडमिंटन क्षेत्रातील काही नामवंत खेळाडू ‘पुणे सेव्हन एसेस’मध्ये सामील झाले आहेत. यामध्ये आघाडीचा खेळाडू अजय जयराम, या वर्षी झालेल्या गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत मिश्र दुहेरीमध्ये सुवर्णपदक आणि पुरुष दुहेरीमध्ये रौप्यपदक मिळवलेला चिराग शेट्टी, कॅनडातील यंदाच्या जागतिक ज्युनिअर बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक मिळवलेला लक्ष्य सेन, तसेच महिला बॅडमिंटन संघातील दिग्गज खेळाडू प्राजक्ता सावंत यांचा समावेश आहे. संघाचे सहाय्यक प्रशिक्षक आनंद पवार हे असणार आहेत.

पुण्यातील बालेवाडी स्टेडियम हे ‘पुणे सेव्हन एसेस’ संघाचे मुख्यालय असणार आहे. हा संघ मुंबईत येत्या २२ डिसेंबर रोजी आपल्या प्रचाराची सुरुवात करणार आहे. संघाचे मालकी हक्क तापसी पन्नू हिच्याबरोबरच मुंबईतील केआरआय एन्टरटेन्मेंट या बुटीक सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनीकडे आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर बॅंडमिंटनमध्ये नाव कमावलेल्या काही दिग्गज खेळाडूंना पुण्याच्या या संघाने लिलाव प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतले आहे. पुरुष दुहेरी या प्रकारातील राजा म्हणून नावाजलेला मॅथिआस बो हा ‘पुणे सेव्हन एसेस’ संघाचे मुख्य नेतृत्व करणार आहे; तसेच स्पेनची कॅरोलिना मेरिन ही २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेती महिला एकेरी गटाचे नेतृत्व करणार आहे. तिला डेन्मार्कची खेळाडू लीन केआर्सफेल्ट ही साथ देईल. पुण्याच्या या संघाला दुहेरी गटामध्ये गुणवंत खेळाडूंची चांगली उपस्थिती लाभली आहे.

मिश्र दुहेरी गटात चमकदार नैपुण्य दाखवणारा चिराग शेट्टी आणि अनुभवी व्लादिमिर इव्हानोव्ह यांचा खेळ या संघातर्फे पाहायला मिळेल, तर पुरुष एकेरी गटात लक्ष्य सेन हा आपली कामगिरी दाखविणार आहे.बॅडमिंटन खेळासाठी पुणे हे अतिशय महत्त्वाचे केंद्र आहे. बॅडमिंटनची पहिली नियमावली याच शहरात १८००च्या शतकात ब्रिटीश सैनिकांकडून बनविली गेली. या पार्श्वभूमीवर या शहराचा एक खास संघ निर्माण होणे हे औचित्यपूर्ण होते. सध्या पुणे शहरात १० हजारांहून अधिक बॅडमिंटन खेळाडू आहेत. ५०हून अधिक बॅडमिंटन कोर्ट्स उपलब्ध असलेल्या पुणे शहरामध्ये ‘प्रीमिअर बॅडमिंटन लीग’च्या माध्यमातून बॅडमिंटनला आणखी प्रोत्साहन मिळणार आहे.

या प्रसंगी तापसी पन्नू म्हणाली, ‘प्रीमिअर बॅडमिंटन लीगमध्ये ‘पुणे सेव्हन एसेस’ संघाच्या प्रचाराची सुरुवात करताना मी अतिशय उत्साहित झाले आहे. आमच्या संघामध्ये नवीन व अनुभवी अशा दोन्ही प्रकारच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा समावेश आहे. ‘प्रीमिअर बॅडमिंटन लीग’मध्ये आपल्या संघाला अव्वल क्रमांकाचा बनविण्यासाठी आमचे खेळाडू सांघिक व वैयक्तिक नैपुण्य दाखवतील, याची मला खात्री आहे. आम्ही या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठीच आलो आहोत आणि ही भावना आमच्या खेळाडूंमध्ये आहे, हे मला दिसून येत आहे. या खेळाला पुढील स्तरावर नेण्यासाठी जे आवश्यक आहे, ते मी निश्चितच करेन. आमच्या खेळाडूंना प्रोत्साहीत करण्यासाठी मी प्रत्येक सामन्यात उपस्थित असणार आहे.’

या वेळी ‘पुणे सेव्हन एसेस’ संघाचा कर्णधार मॅथिआस बो म्हणाला, ‘या संघाचे नेतृत्व लाभल्याने मी अतिशय उत्साहात आहे. आमच्या संघात काही उदयोन्मुख व चमकदार खेळाडू आहेत, तसेच आंतरराष्ट्रीय चॅम्पियनही आहेत. अनुभवी प्रशिक्षक आम्हाला मिळाले आहेत. आम्हाला यश मिळवून देण्यात या सर्वांचा मोठा हातभार असणार आहे. मी या संघातील सर्वात वरिष्ठ खेळाडू असेन. माझा अनुभव व माझे तांत्रिक ज्ञान यांचा उपयोग संघाला ‘प्रीमिअर बॅडमिंटन लीग’मध्ये यश मिळवून देण्यास होणार आहे.’

‘प्रीमिअर बॅडमिंटन लीग’च्या मागील स्पर्धांमध्ये जागतिक स्तरावरील ६० खेळाडू सहभागी झाले होते. त्यात नऊजण ऑलिंपिक पदकविजेते होते; तसेच भारतातील गुणवंत खेळाडूही सामील होते. ‘पुणे सेव्हन एसेस’ संघाच्या समावेशामुळे या लीगमध्ये आता आणखी काही दिग्गजांची भर पडली आहे.

असा असेल संपूर्ण संघ : पुरुष एकेरी- लक्ष्य सेन, अजय जयराम, ब्राइस लिव्हर्ड्झ. महिला एकेरी- कॅरोलिना मेरिन, लीन केआर्सफेल्ट. पुरुष दुहेरी- मॅथिआस बो, व्लादिमिर इव्हानोव्ह, चिराग शेट्टी. मिश्र दुहेरी- प्राजक्ता सावंत.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link