Next
कर्तृत्वशालिनी सूर्यकांता पाटील
BOI
Friday, August 17, 2018 | 03:33 PM
15 0 0
Share this article:

आपल्या अजोड कर्तृत्वाने राजकीय क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र मुद्रा उमटविणाऱ्या मराठवाड्याच्या कन्या आणि देशाच्या माजी केंद्रीय ग्रामीण विकास व संसदीय कार्य राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांचा ७०वा वाढदिवस १५ ऑगस्ट २०१८ रोजी झाला. त्या निमित्ताने त्यांच्याबद्दलचा हा लेख...
............
निजामाच्या जोखडातून मराठवाड्याला मुक्त करताना हैदराबाद मुक्ती संग्रामात मातीसाठी बलिदान देणारे वीर हुतात्मा जयवंतराव पाटील-वायपणेकर यांची लेक असल्यामुळे संघर्षाचे बाळकडू सूर्यकांता पाटील यांना जन्मतःच मिळालेलं. अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची ऊर्मी रक्तातच होती. त्यातूनच त्यांचा पिंड तयार झाला. अन् त्यामुळेच की काय, अवघ्या आयुष्यात त्यांच्या वाट्याला आलेला ‘संघर्ष’ हा त्यांच्या जीवन आणि जगण्याचा स्थायी भाव बनला. राजकारणाचा वारसा त्यांना घरूनच मिळाला. त्यांच्या मातोश्री अंजनाबाई व आजोबा माधवराव पाटील यांनी आमदार म्हणून त्या भागाचं नेतृत्व आधी केलेलं होतं. त्यामुळे सूर्यकांताताईंनी राजकारणाच्या सारीपाटावर लीलया पदार्पण केलं. १९७४ ते ८०च्या काळात त्यांनी नांदेड नगरपालिकेच्या सदस्य म्हणून काम केलं. त्यानंतर १९८०ला त्या हदगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. त्यांचा राजकारणात ज्या काळात प्रवेश झाला, त्या काळात महिला राजकारणात फारशा उतरत नव्हत्या. परंतु ज्यांना काळाच्या भाळावर नाव कोरायचं असतं, त्यांना काळ कधीच आडवा येत नाही. एवढंच नाही, तर कर्तृत्ववान माणसांचं स्वागत करण्यासाठी काळसुद्धा सज्ज होऊन उभा राहत असतो. सूर्यकांता पाटील यांनी आपलं वक्तृत्व आणि कर्तृत्वाच्या जोरावर नेतृत्वाचा आरंभ केला. नांदेड नगरपालिकेच्या सदस्यत्वापासून त्यांनी लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्य म्हणूनही त्यांनी समाजाचं नेतृत्व केलं. केंद्रात त्या ग्रामीण विकास खात्याच्या राज्यमंत्रिपदी विराजमान झाल्या.

राजकारण हे व्यक्तिगत लाभासाठी नसून, ते लोकहितासाठी आहे, अशी त्यांची धारणा आहे. ज्यांची धारणा चांगली असते, त्यांची धोरणेही निश्चितच चांगली असतात. म्हणून तर ग्रामीण मातीशी नाळ असलेल्या सूर्यकांताताईंनी राज्यमंत्री असताना ग्रामीण भागाचा कायापालट करणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांचा आरंभ केला. मिळालेल्या राजसत्तेचा लोकहितार्थ वापर करणाऱ्या या लोकनेत्यांनी विकास पर्वाची सुरुवात केली. सत्तेच्या सिंहासनावर आरूढ झालं, की माणसाला सत्तेची धुंदी चढते; पण सूर्यकांता पाटील त्याला अपवाद राहिल्या आहेत. त्यांनी माती आणि माणसांच्या मूलभूत प्रश्नांना कधीच बगल दिली नाही, की ते नजरेआड केले नाहीत. मग त्या सत्तेत असोत की नसोत. त्यामुळे मतलबी राजकारण करणं त्यांना कधी जमलंच नाही. म्हणूनच विकासाभिमुख राजकारण व निकोप समाजकारण करणाऱ्या लोकनेत्या म्हणूनच समाजमनावर त्यांची ‘सूर्यमुद्रा’ उमटलेली आहे.

गेल्या अर्धशतकापासून आपल्या अमोघ वाणीनं लोकमनावर अधिराज्य गाजविणाऱ्या सूर्यकांता पाटील यांचं कर्तृत्वही नेतृत्वाला शोभेल असं उंच आहे. स्पष्टवक्तेपणा, सडेतोड वृत्ती आणि निर्भीडपणा हा त्यांचा बाणा. जगताना सर्वसामान्य माणसाला ज्या अडचणी येतात, आव्हानांचा मुकाबला करावा लागतो, त्या गोष्टी त्यांच्या वाट्याला आल्या नाहीत असं नाही. राजकारणामध्ये निःस्पृहपणे काम करताना एखाद्या माणसाला किती अनंत अडचणींचा सामना करावा लागतो, हे त्यांनी अनेकदा जवळून अनुभवले. परंतु त्या अडचणी अन् आव्हानांकडे त्यांनी संधी म्हणूनच पाहिले.

येतील वादळे, खेटेल तुफान, तरीही वाट चालतो आहे...
अडथळ्यांना भिऊन अडखळणे, पावलांना पसंत नाही...

ज्या झाडाची मुळं जमिनीत खोलवर रुजलेली असतात, ती वादळातही भक्कमपणे उभी असतात. जणू अशाच लोकाभिमुख असणाऱ्या या नेत्याची समाजाने सतत केलेली पाठराखण हे त्यांचं बलस्थान आहे.

राजकारण म्हटलं, की आरोप आले, प्रत्यारोप आले. विजय आला, तसा पराजयही आला. म्हणून या क्षेत्रात काम करताना माणसाला कधी विजयाचा हार, तर कधी पराभवाचा प्रहारही सहन करावा लागतो. असे क्षण प्रत्येकाच्या वाट्याला कमी-अधिक प्रमाणात येतात. यातून सूर्यकांता पाटीलही सुटलेल्या नाहीत. पराभवाची चवही त्यांना चाखावी लागली खरी; पण पराभवाने खचून न जाता, त्यांनी तो सहज पचविला. कारण...

येतात पराभव.. जातात पराभव... कायमचे का राहतात पराभव..
ज्यांना घडवायचा इतिहास..त्यांनाही घडवीत जातात..पराभव..

या नव्या पिढीतील डॉ. विश्वाधार देशमुख यांच्या काव्यपंक्तींनुसार ताई पुन्हा तितक्याच ताकदीनं उभ्या राहिल्या. त्या सत्तेत असोत अगर नसोत; पण समाजातले हमाल, माथाडी कामगार, शेतकरी, महिला, तसेच इतर उपेक्षित व दुर्लक्षित घटकांच्या उन्नतीसाठीचा त्यांचा संघर्ष चालूच असतो.

विकासापासून कोसो दूर असलेल्या हिमायतनगरसारख्या ग्रामीण भागात १९८१ साली मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था स्थापन करून, या ‘उजेडाच्या लेकी’नं मुलींची शाळा सुरू केली. गोरगरिबांच्या मुला-मुलींच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या नावाने शाळा, महाविद्यालय सुरू करून या मातीचं ऋण फेडलं. अंधाराला चिरून वर आलेल्या या उजेडाच्या लेकीनं संघर्ष नुसता झेलला नाही तर पेललाय... अनेक चढ-उतार पाहिलेत. ज्यांच्या पापणीआड सामान्य माणसांच्या वेदना असतात, कणव त्यांच्याच नजरेतून बरसत असते. सूर्यकांता पाटील यांच्या नजरेत जशी जबर जरब आहे, तसाच करुणाभावही आहे. कणखर मनाच्या तळाशी वात्सल्यही आहे. एरव्ही समाजहितासाठी पुढारीपण करणाऱ्या ‘ताई’ गोरगरिबांच्या लेकीबाळींच्या लग्नात ‘माई’ होतात. तेव्हा त्यांच्यातल्या ममत्वाचे दर्शन घडते.

तुमचे झिजणे सुगंधी....तुमचे जगणे चंदन..
किती फाटक्या छतांना...दिले तुम्ही तारांगण..

अशा संघर्षयात्री कर्तृत्वशालिनीला कृतज्ञतापूर्वक सलाम. निरामय आरोग्यासाठी त्यांना भरभरून शुभेच्छा!

- प्रा. डॉ. सूर्यप्रकाश जाधव

(शब्दांकन : नागेश शिंदे, हिमायतनगर)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search