Next
लक्ष्मीपल्लीनाथाचा चैत्रोत्सव यंदा २४ ते ३१ मार्च या कालावधीत
प्रेस रिलीज
Tuesday, March 06, 2018 | 01:53 PM
15 0 0
Share this article:

मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) : येथील श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानाचा चैत्रोत्सव शनिवार, २४ मार्च ते शनिवार, ३१ मार्च २०१८ या कालावधीत होणार आहे. लक्ष्मीपल्लीनाथाचा हा १०२वा चैत्रोत्सव असून, मुंबई-गोवा महामार्गावर पालीजवळ मठ गावात लक्ष्मीपल्लीनाथाच्या कुलोपासकांनी उभारलेल्या नव्या मंदिराच्या प्रांगणातील हा सहावा उत्सव आहे. त्याचे औचित्य साधून या वेळी करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्या उपस्थितीत मंदिराचे कलशारोहणही होणार आहे. ह. भ. प. मकरंदबुवा सुमंत (रामदासी) यांचे कीर्तनही या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

चैत्र शुद्ध दशमी ते चैत्र पौर्णिमा या कालावधीत दर वर्षी हा उत्सव होतो. यंदा कलशारोहणामुळे हा उत्सव सप्तमीपासूनच होणार आहे. परंपरा जपणारे कार्यक्रम, तरुणांचा मोठा सहभाग आणि नेटके नियोजन ही या उत्सवाची वैशिष्ट्ये असतात. यंदाच्या उत्सवात, २६ मार्च रोजी करवीर पीठाचे परमपूज्य श्रीमद् शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते कलशारोहण सोहळा होणार आहे. कलशारोहणानंतर ते उपस्थितांना मार्गदर्शनही करणार आहेत. दर वर्षीप्रमाणेच श्रींची पूजा, अभिषेक, लघुरुद्रादि धार्मिक विधी आणि कीर्तन, प्रवचन, नामजप आदी कार्यक्रम या कालावधीत होणार आहेत. दररोज सकाळपासून दुपारपर्यंत धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद व रात्री भोजन, सायंकाळी आरत्या व नामजप, रात्री कीर्तन आणि मध्यरात्री पारंपरिक पद्धतीनुसार छबिना आणि भोवत्या अशी कार्यक्रमांची सर्वसाधारण रूपरेषा आहे. २५ मार्चला रात्री स्थानिक भक्तमंडळींचे भजन होणार असून, २७ मार्च रोजी रात्री वेदमूर्ती आचार्य गुरुजी आणि ब्रह्मवृंद मंत्रजागर करणार आहे. २६ ते ३१ मार्च या कालावधीत रात्री नऊ ते १२ या वेळेत ह. भ. प. मकरंदबुवा सुमंत (रामदासी) यांचे कीर्तन होणार आहे. 

शनिवारी, ३१ मार्च रोजी रात्री साडेनऊ ते १२ या वेळेत ‘मी विनायक दामोदर सावरकर’ हा कार्यक्रम योगेश सोमण सादर करणार आहेत. त्यानंतर सुमंतबुवांचे लळिताचे कीर्तन होऊन उत्सवाची सांगता होणार आहे, असे संस्थानाच्या कार्यकारिणीतर्फे कळविण्यात आले आहे. या सोहळ्यात आवर्जून सहभागी होण्याचे आमंत्रण संस्थानातर्फे देण्यात आले असून, पूर्वकल्पना दिल्यास उत्सवकाळात निवासाची सोयही करण्यात आली आहे.  स्थानिक जांभ्या दगडात कलाकुसर करून मंदिर उभारण्यात आले असून, म्हैसूर येथील ग्रॅनाइट दगडात गाभाऱ्याची कलाकुसर करण्यात आली आहे. कुलोपासक आणि भक्तांच्या देणगीतून मंदिराचे आतापर्यंतचे काम झाले असून, यापुढील उभारणीसाठीही यथाशक्ती मदतीचे आवाहन संस्थानातर्फे करण्यात आले आहे. 

संपर्क : 
सुधाकर चांदोरकर : ९४२२६ ४६७६५
श्रीनिवास गुण्ये : ७८७५७ ८९३२९
रवींद्र भाट्ये : ९४०५२ ५८७१६

श्री देव लक्ष्मीपल्लिनाथ संस्थानाची वेबसाइट : http://www.laxmipallinath.com/

(गेल्या वर्षीच्या चैत्रोत्सवाची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. गेल्या वर्षीच्या उत्सवातील भोवत्यांची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
श्रीराम सत्यविनायक हळबे About
सुंदर उपक्रम आहे.
0
0

Select Language
Share Link
 
Search