Next
जग आमच्याकडे येत आहे!
BOI
Monday, July 16, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

२०२१पर्यंत भारतीय भाषांमध्ये इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या पाच कोटी ३६ लाखांपर्यंत जाईल, असा अंदाज इंटरनेटवर अधिराज्य असलेल्या गुगलने वर्तविला आहे. या गैर-इंग्रजी भाषकांमधील ३० टक्के वापरकर्ते हे केवळ चार भाषांमधील असतील. अन् त्या चार भाषांपैकी एक भाषा आपली मराठी आहे. म्हणूनच गुगलने आता आपले लक्ष भारतीय भाषांवर केंद्रित केले आहे. या अनुषंगाने विशेष लेख...
.............
मोसमी पावसाच्या या हंगामात पाऊस बरसो की न बरसो, मराठी भाषकांच्या दृष्टीने चांगल्या बातम्यांची बरसात चालू आहे. गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहा. मराठी माध्यमांच्या शाळेत प्रवेश वाढणे, त्यानंतर देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीने तिसरे स्थान मिळविणे अशा अनेक घटना घडल्या. त्यातच आता आणखी एक विषय पुढे आला आहे. वर्ष २०२१पर्यंत भारतीय भाषांमध्ये इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या पाच कोटी ३६ लाखांपर्यंत जाईल, असा अंदाज इंटरनेटवर अधिराज्य असलेल्या गुगलने वर्तविला आहे. या गैर-इंग्रजी भाषकांमधील ३० टक्के वापरकर्ते हे केवळ चार भाषांमधील असतील. अन् त्या चार भाषांपैकी एक भाषा आपली मराठी आहे, ही ती बातमी. आपल्यासाठी हा अभिमानाचा आणि आशेचा विषय व्हायला हवा.

तेलुगू, मराठी, तमिळ आणि बंगाली या त्या चार भाषा आहेत. सध्याच्या ऑनलाइन जाहिरातींची वार्षिक उलाढाल दोन अब्ज डॉलरची आहे आणि त्यात स्थानिक भाषांचा वाटा केवळ पाच टक्के आहे; मात्र येत्या चार वर्षांमध्ये ही उलाढाल ४.४ अब्ज डॉलर एवढी होईल आणि त्यात स्थानिक भाषांचा वाटा ३५ टक्के असेल, असे हा अंदाज सांगतो. 

ऑनलाईन विश्वात भविष्याचा वास सर्वांत आधी गुगलला लागतो. आजच्या सायबर विश्वात जो काही व्यवसाय आहे, त्यावर ८० टक्के वाटा गुगल आणि फेसबुक या दोघांचा मिळून आहे. म्हणून गुगलच्या या अंदाजाला महत्त्व आहे. देशात आजच्या घडीला गैर-इंग्रजी वापरकर्त्यांची संख्या इंग्रजी भाषकांपेक्षा जास्त आहे. भारतात सध्या १७ कोटी ५० लाख लोक इंग्रजीतून इंटरनेट वापरतात, तर २३ कोटी ४० लाख लोक आपापल्या भाषांमधून इंटरनेट वापरतात, असेही गुगलने स्पष्ट केले आहे.
स्वभाषेतून इंटरनेट वापणाऱ्यांची संख्या पुढील चार वर्षांत वार्षिक १८ टक्के दराने वाढेल, अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे इंग्रजी भाषा वापरणाऱ्यांची संख्या फक्त तीन टक्क्यांनी वाढेल आणि ती १९ कोटी ९० लाखांवर पोहोचेल.

अन् हेच कारण आहे, की गुगलने आता आपले लक्ष भारतीय भाषांवर केंद्रित केले आहे. गेल्या आठवड्यात गुगलने आपल्या अॅडसेन्स आणि अॅडवर्डस् या लोकप्रिय जाहिरात सेवेमध्ये तेलुगू भाषेला सामावून घेतले. त्यामुळे आता तेलुगुतून ब्लॉगलेखन करणारे, संकेतस्थळ असणारे किंवा आपला मजकूर प्रसिद्ध करणाऱ्यांना गुगलच्या जाहिराती दाखवणे सोपे होणार आहे. तसेच तेलुगू भाषेतील प्रकाशक आणि जाहिरातदार यांना तेलुगू भाषेतून इंटरनेट वापरणाऱ्या मोठ्या प्रमाणातील लोकांपर्यंत पोहोचता येणार आहे.

गुगलच्या अंदाजानुसार, पुढील चार वर्षांत तेलुगूमध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या नऊ कोटी १० लाख असेल. ऑनलाइन विश्वात भारतीय भाषांमध्ये तेलुगूचा क्रमांक चौथा आहे. पहिला क्रमांक अर्थातच हिंदीचा आहे. त्यानंतर बंगाली आणि तमिळ या भाषांचा क्रमांक येतो. या भाषांमधून अॅडसेन्स सेवा देणे गुगलने आधीच सुरू केले आहे.

डिसेंबर २०१७ पर्यंत भारतात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या चार कोटी ८१ लाख होती आणि जूनमध्ये ती ५० कोटींच्या वर जाण्याचा अंदाज होता. येथे दर महिन्याला ८० लाख ते एक कोटी वापरकर्ते जोडले जात आहेत. जगातील दुसऱ्या क्रमांकाची इंटरनेट बाजारपेठ, तसेच जगात इंटरनेटची सर्वांत वेगाने वाढणारी बाजारपेठ म्हणून भारताकडे पाहिले जाते. पहिला क्रमांक अर्थातच चीनचा! अन् चीनने हे पहिले स्थान कसे मिळविले? तर इंटरनेट वापरकर्त्यांसाठी सर्व सेवा आणि मजकूर मँडरिन भाषेत व लिपीत उपलब्ध करून देऊन. त्याचा परिणाम असा झाला, की आता इंटरनेटवर इंग्रजीच्या खालोखाल चिनी भाषा ही दुसरी सर्वांत जास्त वापरली जाणारी भाषा आहे. याउलट भारतीय भाषांतील मजकुराचे इंटरनेटच्या एकूण सामग्रीमधील प्रमाण केवळ ०.१ टक्के एवढे आहे.

तेलुगू भाषेच्या या सेवेची घोषणा करताना ‘गुगल’चे दक्षिण-पूर्व आशिया आणि भारताचे उपाध्यक्ष राजन आनंदन म्हणाले, की गेल्या १८ ते २० महिन्यांमध्ये जे बदल भारतात झाले, तसे जगात कोठेच पाहावयास मिळालेले नाहीत. सर्च, व्हिडिओ, सोशल, मेसेजिंग आणि ई-कॉमर्स यांसारख्या सर्व श्रेणींमध्ये अफाट वाढ झाली आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर, ‘पहिल्या १० कोटी वापरकर्त्यांपेक्षा हे नवीन आलेले वापरकर्ते अत्यंत वेगळे आहेत. ऑनलाइन येणाऱ्या १० वापरकर्त्यांपैकी नऊ जण भारतीय भाषांमधून इंटरनेट वापरत आहेत.’ या नवीन वापरकर्त्यांना ध्वनीने इंटरनेटचा वापर करणेसुद्धा सोपे जात आहे आणि केवळ ध्वनीवर चालणारी इंटरनेटची पहिली बाजारपेठ भारत बनेल, अशी अपेक्षाही आनंद यांनी व्यक्त केली आहे. तसेच मराठीसहित अन्य भाषांमध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी मान्य केले आहे. गुगल सध्या आपल्या आठ सर्वाधिक लोकप्रिय सेवा भारतीय भाषांमधून देत आहे.  

गुगलच्या या अंदाजांना आपल्या देशी संस्थांचाही दुजोरा मिळाला आहे. मोबाइल कंपन्यांची संघटना असलेल्या इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (आयएएमएआय) आणि मार्केट रिसर्च फर्म ‘आयईएमआरबी’ने मे महिन्यात प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, भारतीय भाषांतून इंटरनेट उपलब्ध झाल्यास त्याचा अधिक वापर करू, असे २३ टक्के लोकांनी म्हटले होते.

डिजिटल पेमेंट्स, मूलभूत ई-कॉमर्स, ऑनलाइन नोकरी शोधणे इत्यादींसारख्या महत्त्वाच्या सेवा आता स्थानिक भाषांमध्ये अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. म्हणून त्याचा वापरही मर्यादित आहे, असे त्या अहवालात म्हटले होते. हे निष्कर्ष १७० शहरांमधील ६० हजार व्यक्ती आणि ७५० खेड्यांमधील १५ हजार व्यक्तींच्या सर्वेक्षणानंतर काढण्यात आले होते.

देशात सध्या अंदाजे ५५ कोटी हिंदी भाषक आहेत. इंग्रजी भाषकांची संख्या १२ कोटी ५० लाख असली, तरी त्यांतील फक्त २.६ लाख लोकांनी ती आपली मातृभाषा असल्याचे सांगितले आहे. बाकी सर्व लोक एकूण २२ प्रादेशिक भाषांपैकी एका किंवा अधिक भाषांमध्ये संवाद साधतात. त्यात मराठी भाषकांची संख्या तिसऱ्या क्रमांकाची आहे, हेही जनगणनेच्या आधाराने स्पष्ट झाले आहे, हे मी दोन आठवड्यांपूर्वी लिहिले होते.

याचा अर्थ स्पष्ट आहे. ‘तुम्ही एखाद्या व्यक्तीशी तो समजत असलेल्या भाषेत बोललात, तर ते त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचते. तुम्ही त्याच्याशी त्याच्या भाषेत बोललात तर ते त्याच्या हृदयात जाते,’ असे नेल्सन मंडेला यांचे एक वाक्य आहे. ज्यांना नव्या युगात व्यवसाय करायचा आहे, त्यांना तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचायचे नाहीये. त्यांना हृदयापर्यंत पोहोचायचे आहे. त्यासाठी ते आपल्याकडे येत आहेत, आपल्या भाषेत!

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Shashikant Ghaskadbi About
सकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी योग्य उपक्रम.
0
0

Select Language
Share Link
 
Search