Next
सहल महाड परिसराची...
BOI
Saturday, June 22, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर ते दिवेआगर या भागाची माहिती घेतली. आजच्या भागात पाहू या रायगड किल्ल्याच्या दक्षिणेकडील महाड परिसर. 
..........
या भागात बौद्ध गुंफा/लेणी असल्यामुळे सुमारे १८०० वर्षांचा इतिहास आहे. या भागाने सातवाहन, शिलाहार, यादव, निजाम, विजापूरचे आदिलशहा, त्यानंतर मराठे व अखेरीस इंग्रज अशा राजवटी पाहिल्या. आदिलशहाच्या काळात बाणकोटपासून महाडपर्यंत जलवाहतूक होती. बाणकोट, महाड, वरंधा, शिरवळ, पंढरपूर, विजापूर हा तत्कालीन राजमार्ग होता. महाड परिसराचा पश्चिम भाग म्हणजे सह्याद्रीची उतरण. अतिशय दुर्गम भागाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी उपयोग करून घेतला आणि निसर्गाबरोबर इतिहासाचा वारसाही आपल्याला दिला आहे. दुर्गम भागात असलेले गडकोट आणि त्यातील कपारीतून फिरताना जो आनंद मिळतो तो वेगळाच असतो. पोलादपूरपासून महाडपर्यंत या भागाने सह्याद्रीचा जणू मुकुटच धारण केला आहे. पोलादपूरच्या आंबेनळी घाटापासून ताम्हिणी घाटापर्यंत निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. 

शिवथरघळ येथील गुंफा

शिवथरघळ :
आध्यात्मिक, धार्मिक, तसेच निसर्गप्रेमींचे हे आवडते ठिकाण आहे. शिरवळहून महाडला येताना वरंधा घाट उतरल्यावर उजवीकडे शिवथरघळ आहे. हे ठिकाण सर्व बाजूंनी असलेल्या उंच पर्वतराजीत असून, वाघजाई दरीच्या कुशीत आहे. काळ नदीचा उगम याच परिसरात होत असून, ती पुढे सावित्रीला मिळते. शिवथरघळ आणि आजूबाजूचा सर्व परिसर चंद्रराव मोऱ्यांच्या जावळीच्या वतनात होता. जावळीचे मोरे हे विजापूर दरबाराचे वतनदार देशमुख होते. घनदाट जावळीच्या भू-प्रदेशामुळे मोरे यांना निसर्गाचे संरक्षण असल्याने ते बलाढ्य झाले होते. शिवरायांनी हा परिसर १६४८मध्ये आपल्या ताब्यात घेतला. समर्थ रामदास सन १६४९मध्ये या घळीत (गुहेमध्ये) वास्तव्यासाठी आले. सन १६६०पर्यंत म्हणजे दहा-अकरा वर्षे ते या ठिकाणी राहत होते. दासबोधाचा जन्म याच घळीत झाला. दासबोधाची सात/आठ दशके त्यांनी या घळीतच लिहून पूर्ण केली. दासबोध समर्थ रामदासांनी रचला आणि त्याचे लेखन त्यांचे पट्टशिष्य कल्याणस्वामींनी केले. दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत. महाराष्ट्र सरकारच्या राज्य मराठी विकास संस्थेने ७८०० ओव्यांचा हा ग्रंथ ऑडिओ स्वरूपात आपल्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला आहे. शास्त्रीय गायक संजय अभ्यंकर यांच्या आवाजातील या दासबोधाला राहुल रानडे यांनी संगीत दिले आहे. (दासबोधातील व्यवस्थापनासंदर्भातील उपदेशाबद्दलची लेखमाला वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

शिवथरघळ धबधबाछत्रपती शिवाजी महाराज सन १६७६मध्ये दक्षिणदिग्विजयासाठी जाताना श्री समर्थांचा आशीर्वाद येथूनच घेऊन पुढे गेले असे म्हणतात. रायगडाच्या पाडावानंतर हे ठिकाण दुर्लक्षित झाले होते. घनदाट जंगलामुळे नंतर कोणीही फिरकेनासे झाले. हे ठिकाण धुळे येथील विख्यात समर्थभक्त श्री शंकर कृष्ण देव यांनी १९१६ साली शोधून काढले. गुहेच्या तोंडावर पडणाऱ्या धबधब्यामुळे हे निसर्गप्रेमींचेही आवडते ठिकाण आहे. त्यानंतर या जागेच्या मूळ मालकांनी समर्थ सेवा मंडळाला जागेचे दानपत्र करून दिले. त्यानंतर साताऱ्याचे (दिवंगत) भाऊकाका गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा मंडळाच्या माध्यमातून तेथे अनेक सुविधा निर्माण केल्या गेल्या. तेथे आता दासबोध वाचन, प्रवचन, तसेच निरनिराळ्या वयोगटातील लोकांची शिबिरे भरविली जातात. आता तेथील व्यवस्थापन शिवथरघळ श्री सुंदरमठ सेवा समितीमार्फत केले जाते. तेथे राहण्याची, जेवण्याची व्यवस्था पूर्वसूचना देऊन केली जाते. पायऱ्या चढून आल्यावर समोरच शिवथरघळ श्री सुंदरमठ सेवा समितीने स्थापन केलेली इमारत लागते. इमारतीवरून पुढे गेल्यावर सरळ जाणारा रस्ता थेट गुहेपाशी घेऊन जातो. घळीमध्ये रामदासस्वामींची मूर्ती आहे. गुहेसमोरच सुंदर धबधबा आहे. त्याचा धीरगंभीर आवाज संपूर्ण दरीत घुमत असतो. 

घळीच्या वरील डोंगरसपाटीवर चंद्रराव मोऱ्यांच्या वाड्याचे अवशेष आहेत. या सपाटीवरून राजगड, रायगड, तोरणा आणि प्रतापगड सारख्याच अंतरावर आहेत. या ठिकाणी पावसाळ्यात जाणे अविस्मरणीय ठरते. 

वरंधा घाट

वरंधा घाट :
पुण्याहून भोरमार्गे महाडकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर ‘वरंध घाट’ तथा ‘वरंधा घाट’ नावाचा २०-२५ किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. हा घाट सह्याद्रीच्या उभ्या धारेवर असलेल्या कावळ्या किल्ल्याला छेदून देशावरून कोकणात उतरतो. एका अवघड ठिकाणी एकावर एक अशी ४/५ हेअरपिन कर्व्हज (वळणे) यात आहेत. ज्या वेळी खालून बस किंवा ट्रकसारखे एखादे वाहन येत असते, त्या वेळी एकदम वरच्या बाजूला उभे राहून वाहन पाहताना, वळताना श्वास रोखला जातो. या घाटात पर्वत आणि जंगल याशिवाय काहीच दिसत नाही. घाटात गाड्यांचे आवाज प्रतिध्वनित होत असतात. भोरहून निघाल्यावर डावीकडे देवघर धरणाचा जलाशय, नागमोडी वळणे हा प्रवाससुद्धा खूप छान वाटतो. घाटाच्या समोरच्या डोंगरकुशीत, गर्द झाडीत समर्थ रामदासस्वामींची शिवथरघळ आहे. घाटाच्या सुरुवातीला भोर तालुक्यातील हिरडोशी गाव आहे, मध्यभागी वाघजाई मंदिर आहे. वरंधा घाटातून उतरताना मध्यावर एका ठिकाणी गरम भजी, नाश्त्याचे पदार्थ मिळतात. थंडीत कुडकुडत गरम भजी आणि चहा पिताना खूप मजा येते. 

वाघजाईसमोरचा एक भलामोठा डोंगर अजस्र शिवलिंगाच्या आकाराचा दिसतो. पावसाळ्यात त्याच्या चारही अंगावरून असंख्य धबधबे कोसळत असतात. वाघजाईच्या पुढे लगेच एका खिंडीतून घाट डावीकडे वळतो. या खिंडीच्या दोन्ही अंगांचे डोंगर म्हणजेच कावळ्या ऊर्फ मनमोहनगड किल्ला. या गडावर वाघजाईकडील बाजूच्या डोंगरामध्ये नऊ टाकी आहेत. दुसऱ्या बाजूस अशीच काही टाकी व शिबंदीच्या घरांचे अवशेष दिसतात. इतिहासात फारशा परिचित नसलेल्या या गडावर प्राचीन काळापासून वाहत्या असलेल्या या घाटवाटेवर लक्ष ठेवण्याचे काम होते. ब्रिटिशांनी इ. स. १८५७मध्ये पक्का रस्ता तयार केला. उताराच्या शेवटी कोकणातील माझेरी, वरंध आणि बिरवाडी ही गावे येतात. 

चवदार तळे सत्याग्रह शिल्प

महाड :
मुंबई-गोवा महामार्गावरील महाड हे ऐतिहासिक ठिकाण आहे. सावित्री आणि गांधारी नद्यांच्या काठावर वसलेले हे शहर एके काळी ‘महिकावती’ या नावाने ओळखले जात असल्याचे सांगितले जाते. ‘बलिपटना’ आणि ‘पलईपटभाई’ असेही जुने नामोल्लेख आढळतात. पूर्वी उधाणाच्या भरतीच्या वेळी महाडपर्यंत गलबते येत असत. इतर भरतीच्या वेळी महाडच्यावर दीड किलोमीटरपर्यंत डोंगी (नावा) येऊ शकतात. सोळाव्या शतकात गव्हाच्या व्यापाराचे हे एक प्रमुख केंद्र होते. महाडमध्ये लोणारी कोळसा, तांदूळ यांचे उत्पादन होते. महाडच्या औद्योगिक वसाहतीमध्ये रासायनिक, तसेच कापड उद्योग आहेत. महाड हे जणू रायगडाचे प्रवेशद्वार समजले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड येथून जवळच असल्याने शिवकाळात महाडचे महत्त्व अधिक वाढले. १७९६ साली येथे दुसरा बाजीराव, नाना फडणवीस व इंग्रज यांच्यामध्ये तह होऊन बाजीरावाला पेशवाई मिळाली. 

येथे चवदार, वीरेश्वर व हापूस ही तीन तळी आहेत. वीरेश्वर हे येथील प्रमुख मंदिर आहे. महाड खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळे सत्याग्रहामुळे सर्वश्रुत झाले. १९२४ साली झालेल्या कुलाबा डिस्ट्रिक्ट डिप्रेस्ड क्लास मिशनच्या सभेत रामचंद्र मोरे यांनी बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेऊन चवदार तळ्याबद्दलची स्थिती कथन केली. तळे सर्वांना खुले व्हावे, यासाठी सत्याग्रह हा एकमेव मार्ग उपलब्ध असल्याची सर्वांचीच खात्री पटली. सत्याग्रहात महाड नगर परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुरबानाना टिपणीस, जी. एन. सहस्रबुद्धे हे चित्पावन ब्राह्मण समाजाचे सुधारक, ए. व्ही चित्रे हे सीकेपी समाजसुधारक आणि त्यांचे अनुयायी सामील झाले. २० मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची सुरुवात झाली. एक सार्वजनिक सभा घेऊन सुरबानाना टिपणीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सर्व सार्वजनिक ठिकाणे आणि तळी अस्पृश्यांसाठी खुली करण्यात येत असल्याचे जाहीर केले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मोर्चेकऱ्यांसह चवदार तळ्याकडे चालण्यास सुरुवात केली.

त्यांच्यापाठोपाठ त्यांचे अनुयायी चालू लागले व लवकरच हा जमाव चवदार तळ्यावर पोहचला. चवदार तळ्याच्या पायऱ्या उतरून डॉ. आंबेडकर पुढे सरसावले आणि आपल्या ओंजळीत पाणी घेऊन ते पाणी सावकाश प्यायले व सत्याग्रहाची सांगता झाली. या प्रसंगाचे एक शिल्पही येथे बसविण्यात आले आहे. या तलावाला चार बाजूने दारे होती. म्हणून त्याला चौदार तळे असेही म्हणत. 

गरम पाण्याचे झरे : शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर पश्चिमेला सव नावाचे छोटे गाव आहे. ते गरम पाण्याच्या झऱ्यांमुळे पर्यटकांचे आकर्षण असलेले ठिकाण आहे. झरे असलेली जागा खासगी मालकीची आहे. 

कोल लेणी

कोल बौद्ध लेणी :
महाड तालुक्यात मंडणगडच्या बाजूला कोल हे गाव आहे. या गावात सातवाहन काळातील दोन लेणीसमूह आहेत. या लेण्यांची नोंद जेम्स बर्जेस यांच्या एपिग्राफिया इंडिका, तसेच ब्यूलर यांच्या इंडियन पॅलिओग्राफी यामध्येआहे. ल्युडर यांच्या एपिग्राफिया इंडिका (भाग १०) यामध्ये कोल लेण्यांच्या शिलालेखांचे अर्थ सांगितले आहेत. 

पहिल्या समूहातील लेणी क्रमांक १, ३, ४, ५, ६ यामध्ये भिक्खू निवास असावा. सध्या ते मातीने पूर्ण भरलेले असून, त्यामधील शिलालेखही अस्पष्ट झाले आहेत. या सर्व लेण्यांमध्ये कोरीव आसने आहेत. त्यांचा वापर ध्यानधारणा करण्यासाठी केला जात असावा. नंतरच्या काळात वाटसरू मुक्कामासाठी याचा वापर करीत. 

कोल लेणी

लेणी क्रमांक २ : हे मुख्य विहारलेणे आहे. या ठिकाणी प्रार्थनास्थान असावे. हे लेणे मातीने पूर्ण भरलेले आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या लेण्यात काही नाणी वगैरे सापडली आहेत. 

लेणे क्रमांक चारमध्ये पुढीलप्रमाणे शिलालेख आहे : ‘अघासकस गमिकियसा सिवदतस लेणे’ याचा अर्थ अघासकस गावातील उपासक सिवदत्त याने या लेण्यांचे दान दिलेले आहे. 

लेणे क्रमांक पाचच्या प्रवेशद्वारावर पुढीलप्रमाणे शिलालेख आहे : ‘भद्र उपासकस दुहुतूयसिरिय सिवदतस बितीया काय लेन देय धम्म’ याचा अर्थ - भद्र उपासकाची कन्या व सिवदत्त याची पत्नी धम्म सिरी हिने धम्मदान केलेली लेणी. सिवदत्त व त्याच्या बायकोने ही दोन लेणी दान केलेली आहेत. 

कोल बौद्ध लेण्यांचा दुसरा गट गावात शिरताच समोरच आहे. या समूहामध्ये तीन लेणी आहेत. कोल येथील सर्व लेण्यांची पुरातत्त्व विभागाने दखल घेऊन संरक्षित करण्याची आवश्यकता आहे. या लेण्यांची निसर्गामुळे होणारी हानी थांबविणे आवश्यक आहे. नाही तर १८०० वर्षांपूर्वीचा हा ठेवा नष्ट होण्याची शक्यता आहे. गावातील काही जाणकार लोकांच्या सहाय्याने लेणी संशोधक मुकेश जाधव, प्रशांत माळी, रवींद्र मीनाक्षी मनोहर (धम्मलिपी अभ्यासक) या लेण्यांच्या संवर्धनाचा, तसेच याची माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

गांधार पाले येथील शिलालेख

गांधार पाले बौद्ध गुंफा :
महाडजवळील सावित्री-गांधारी नद्यांच्या संगमावर जवळ असलेल्या टेकडीवर ३१ गुंफा आहेत. ही लेणी सातवाहन काळातील असावीत. हिनायन बौद्ध गुंफा पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात खोदण्यात आल्या. टॉलमेनीनुसार इसवी सन १५०च्या काळात पालेला बाली पाटण म्हटले जायचे आणि पेरिप्लसच्या काळात इसवी सन २४७च्या काळात पालैपटमई म्हटले जायचे वा तसे नाव असावे. शिलाहार राजा अनंत देव याच्या ११व्या शतकातील शिलालेखानुसार पालीपट्टण म्हणून या ठिकाणाचा उल्लेख आहे. या लेण्यांमध्ये चैत्यग्रियां नावाचे काही छोटे स्तूप आहेत. तसेच भगवान बुद्धांच्या मूर्ती, बोधिसत्त्व आणि काही विहारांच्या भिंती आणि खांबांवर काही शिलालेख आहेत. एका गुहेच्या भिंतीवर ब्राह्मी लिपीत कोरलेला शिलालेखदेखील आहे. ही बौद्धकालीन लेणी शिल्पकलेचा सुंदर नमुना आहेत. लेणी समूहात एकूण २८ लेणी आहेत व त्यात ३ चैत्य आणि १९ विहार आहेत. 

गांधार पाले गुंफा

पुरातत्त्व विभागाने लावलेल्या फलकाजवळ उतरल्यानंतर लगेच लेण्यांकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण लेण्यांपर्यंत पोहोचतो. पायऱ्या चढण्यासाठी २०-२५ मिनिटे लागतात. लांबून ही लेणी त्रिस्तरीय दिसतात. या लेण्यांची अधिक माहिती http://abcprindia.blogspot.com/ येथे मिळू शकेल.

चांभारगड /महेंद्रगड : ट्रेकिंगच्या दृष्टीने मध्यम श्रेणीचा, १२०० फूट उंचीचा हा किल्ला मुंबई-गोवा महामार्ग ओलांडल्यावर रायगड रस्ता सुरू होतो तेथे समोरच पूर्वेला दिसतो. रायगडाच्या आजूबाजूला डोंगररांगांवर अनेक किल्ले आहेत. त्यात प्रामुख्याने लिंगाणा, काळदुर्ग, सोनगड व चांभारगड यांचा समावेश होतो. यांचा उपयोग केवळ घाटमाथ्यावर नजर ठेवण्यासाठी व टेहळणीसाठी होत असावा. गडावर एक छोटेसे पठारच आहे. किल्ल्यावर थोडे-फार घरांचे अवशेष आहेत, तर पठाराच्या खालच्या बाजूस पाण्याची एक-दोन टाकी आहेत. या टाक्यांच्या बांधणीवरून हा गड फार पुरातन असावा असे दिसते. गडावर पाहण्याजोगे काहीच नाही. अर्ध्या तासात संपूर्ण गडफेरी आटपते. रायगडाचा हा पश्चिमेकडील चौकीदार होता. 

वाळणकोंडीवाळणकोंडी : शिवथरजवळ काळ नदी उगम पावते व डोंगरातून वाहत येणारे तिचे पाणी वाळण गावाअलीकडे सपाटीला लागते. येथे खडकात मोठी घळ तयार होऊन एक डोह तयार झाला आहे. नदीच्या पात्रामध्ये श्री वरदायिनी देवीचे जागृत ठिकाण आहे. त्या ठिकाणी असलेल्या डोहातील मासे बाराही महिने तेथून जात नसल्याने डोहातील मासे देवाचे आहेत, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नदीवरील झुलता पूल या ठिकाणाचे आकर्षण ठरला आहे. पुलावर उभे राहून हे मासे पाहता येतात. डोहात खाण्याचा पदार्थ टाकला की शेंदरी रंगाचे मस्तक असलेले प्रथम लहान व नंतर मोठे मासे वर येतात. माश्यांचे एकूण सात थर खालून वर येत असतात. आबालवृद्धांना या ठिकाणाचे आकर्षण आहे. थंडीच्या हंगामात शांत असलेल्या या रस्त्यावर रंगीबेरंगी, अतिशय सुंदर फुलपाखरे पाहावयास मिळतात. पावसाळ्यानंतर रस्त्याच्या कडेला रानफुलांचे मळेच फुललेले असतात. येथे थेट वाहन जाते. 

कवी परमानंद यांची समाधीपोलादपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून ‘शिवभारत’ लिहिणारे कवी परमानंद (परमानंद गोविंद नेवासकर) यांची समाधी येथे आहे. शिवभारत हा ग्रंथ अधिकृत संदर्भग्रंथ मानला गेला आहे. पोलादपूर हे मुंबई-गोवा, तसेच महाबळेश्वर मार्गावरील प्रमुख ठिकाण आहे; पण याची ऐतिहासिक ओळख फारशी कोणाला नाही. सदाशिव टेटलीकरांच्या ‘दुर्गयात्री’मध्ये याचा उल्लेख आला आहे. 

लक्ष्मण झुला (झुलता पूल) : पोलादपूरपासून १० किलोमीटरवर गोपाळवाडीजवळ सावित्री नदीवर झुलता पूल आहे. लोखंडी जाळीचा ६० फूट लांब व तीन फूट रुंद असा हा पूल असून, त्याखाली पाण्याच्या प्रवाहातील भोवऱ्यामुळे झालेले रांजणखळगे आहेत. सावित्री नदीचा प्रवाह या रांजणखळग्यात कोसळतो, तेव्हा निर्माण होणारा दुधाळ प्रवाह पाहताना डोळ्याचे पारणे फिटते. निसर्गरम्य असे हे ठिकाण आहे. 

वीर तानाजी समाधीउमरठ : वीर तानाजींचे मामा शेलार यांचे गाव म्हणजेच पोलादपूरजवळील उमरठ. येथे वीर तानाजी यांची समाधी आहे. शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची, पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले, ‘गड आला, पण सिंह गेला’. चार फेब्रुवारी १६७२च्या (माघ वद्य नवमी) रात्री हे युद्ध झाले. मामाबरोबर रायगड जिल्ह्यातील उमरठ गावी (पोलादपूरजवळ) स्थायिक झालेले तानाजी मालुसरे यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील पाचगणीजवळील गोडोली होय. वीर तानाजींचे शव ज्या दुर्गम वाटेने सिंहगडावरून उमरठ येथे आणले, त्यास मढेघाट असे म्हणतात. 

मोरझोत धबधबामोरझोत धबधबा : उमरठ गावापासून दोन किलोमीटरवर खोपडगाव हद्दीत हा धबधबा आहे. निसर्गरम्य परिसरात हा धबधबा असून, मोराच्या पिसाऱ्याप्रमाणे आकार धारण करून हा धबधबा १०० फूट खाली कोसळतो. या फेसाळ प्रवाहाच्या तुषारांखाली आंघोळीसाठी पर्यटकांची गर्दी होते. म्हणूनच या धबधब्याला मोरझोत असे सार्थ नाव पडले आहे. 

सूर्याजी मालुसरे समाधीस्थळ : नरवीर तानाजी मालुसरे यांचे धाकटे बंधू सूर्याजी मालुसरे यांची समाधी सारवर या गावी आहे. आपल्या बंधूसमवेत त्यांनी स्वराज्याच्या प्रत्येक लढाईत सहभाग घेतला. सिंहगड फत्ते होण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांची पत्नी सती गेली. त्यांचीही समाधी येथे आहे. 

मंगळगड/कांगोरीगड : हा चंद्रराव मोरे यांनी बांधलेला किल्ला महाड वरंधा रस्त्याच्या दक्षिणेस दुधाणेवाडीजवळ आहे. महाड शहरापासून सुमारे १८ किलोमीटरवर तो आहे. २४५७ फूट उंचीवरील हा किल्ला ट्रेकिंगसाठी चांगला आहे. इ. स. १६४८मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला व त्याचे नाव मंगळगड ठेवले. तटबंदी आणि भिंतीचे भाग अजूनही दिसून येतात. इमारतींची पडझड झाली आहे. पेशव्यांविरुद्ध उठाव केला म्हणून सातारा गादीचे छत्रपतींचे स्वामिनिष्ठ सरदार चतुरसिंह यांना १८१२ ते १८१८ या कालावधीमध्ये या गडावर कैदेत ठेवले होते. गडावरच त्यांचे निधन झाले. इंग्रज अधिकारी मॉरिसन व हंटर यांनाही येथेच कैदेत ठेवण्यात आले होते. 

मंगळगड

रायगडाच्या संरक्षक साखळीतील हा मंगळगड किल्ला कांगोरी किल्ला म्हणूनही ओळखला जातो. जेव्हा जेव्हा रायगडावर आपत्ती आली, त्या त्या वेळी येथील फौजा रायगडाच्या मदतीला धावल्या. त्या वेळी सरदार गिरजोजी यादव यांनी रायगडावरील सोनेनाणे व अन्य महत्त्वाच्या वस्तू या गडावर सुरक्षेकरिता आणल्या. नंतरच्या काळात त्या पन्हाळगडावर रवाना करण्यात आल्या. १८१८च्या शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धात कर्नल प्रॉथरच्या हल्ल्यात हा किल्ला इंग्रजांनी घेतला. अभिजित बेल्हेकर यांच्या ‘दुर्गांच्या देशा’ या पुस्तकामध्ये याचे छान वर्णन आहे. महाडहून या गडाजवळील पिंपळवाडीसाठी एसटी बसची सोय आहे. पुणे-मुंबई किंवा अन्य ठिकाणहून यायचे झाल्यास एखाद्या मुक्कामाची तयारी ठेवावी. यासाठी पायाच्या पिंपळवाडीतील मंदिरे सोईची. गडावर काहीही मिळत नाही. 

चंद्रगड

चंद्रगड :
हा पोलादपूर तालुक्यात असून, महाबळेश्वरच्या आर्थर सीट पॉइंटच्या पश्चिमेस आहे. हा किल्ला दौलतराव मोरे यांनी बांधला. २२५८ फूट उंचीवरील या किल्ल्यावर फक्त पायवाटेनेच जाता येते. कृष्णा नदीच्या बलकवडी धरणाच्या मागे असलेल्या जोर गावातून पायवाटेने किंवा उमरठ-ढवळे गावाकडूनही पायवाटेने जाता येते; मात्र वाटाड्या हवाच. सह्याद्रीच्या रांगेतील हा अवघड किल्ला निसर्गरम्य तर आहेच; पण ट्रेकिंगच्या सरावासाठीही चांगला आहे. 

कसे जाल महाड परिसरात?
महाड हे तालुक्याचे ठिकाण असून, मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण आहे. महाड रेल्वे व महामार्गाने मुंबईशी, तसेच ताम्हिणी/वरंधा घाटाने पुण्याशी, तसेच आंबेनळी घाटाने महाबळेश्वर, सातारा, कोल्हापूरशी जोडलेले आहे. जवळचा विमानतळ मुंबई १२५ किलोमीटर, पुणे १३५ किलोमीटर. महाड येथे राहण्याची, जेवाणाची सोय होऊ शकते. 

(बौद्ध लेण्यांचे अभ्यासक व लेण्यांचा शोध घेणारे आयु. मुकेश जाधव यांचे या लेखासाठी सहकार्य झाले.) 

- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 64 Days ago
Can anybody read this script ? How widespread was its use ? Why , and when did it become obsolete ? How Long did it exist ? It seems to be older than Dewanagari .
1
0
BDGramopadhye About 64 Days ago
Does Shri Jadhav write about his findings ? Hope , he does . It will be valuable addition to our knowledge of the history of that period . Best wishes .
1
0
BDGramopadhye About 106 Days ago
Shahu was in Satara , while Peshawas were in Pune . They trave travelled to Satara , for the audience . Which was the route did they take ?
1
0

Select Language
Share Link
 
Search