Next
निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वसई!
BOI
Wednesday, August 14, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

वसईच्या किल्ल्यावरील नागेश्वर मंदिर‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या सहा भागांमध्ये आपण ठाणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती घेतली. आता पाहू या पालघर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे. सुरुवात वसईपासून...
.......
ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून एक ऑगस्ट २०१४ रोजी पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा महाराष्ट्रातील ३६वा जिल्हा आहे. पालघर जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. त्यामध्ये जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणू आणि वाडा या तालुक्यांचा समावेश आहे़. या भागामध्ये शिलाहार, सातवाहन राजवटी होत्या. त्यानंतर मुघल, निजाम, पोर्तुगीज, मराठे आणि अखेर इंग्रज अशा राजवटी या भागाने पाहिल्या. या जिल्ह्याला ऐतिहासिक वारशाबरोबर सुंदर सागरकिनारा, पूर्वेस पाठीराखा असलेल्या सह्याद्रीचा सहवासही लाभला आहे. त्यामुळे पर्यटकांची पावले इकडे आपसूकच वळतात. पदभ्रमण करणारे, समुद्रस्नान करणारे, धार्मिक पर्यटन करणारे, इतिहासाची आवड असणारे अशा सर्वांनाच आकर्षित करणारा हा भाग आहे. या जिल्ह्यात प्रामुख्याने आदिवासी भाग आहे. आदिवासींच्या कलागुणांना जोपासण्याचे काम शासन करीत आहे. आदिवासींची सुप्रसिद्ध वारली चित्रकला, हस्तकला या भागाचे वैशिष्ट्य आहे. 

वसई-विरार महानगरपालिका : या महानगरपालिकेची स्थापना तीन जुलै २०१० रोजी झाली. पश्चिमेला अरबी समुद्र, उत्तरेला वैतरणा नदीची खाडी, पश्चिमेला तुंगारेश्वरचे अभयारण्य व पर्वत, तर दक्षिणेला उल्हास नदीची विस्तीर्ण खाडी अशी चारही बाजूंनी नैसर्गिक देणगी असलेला हा परिसर आहे. तसेच पौराणिक, धार्मिक वारसा असलेली ठिकाणे आणि इतिहासाचा मोठा वारसा या शहराला आहे. ग्रीक व्यापारी कोस्मा इंडिकपॉलेस्टेस याने इ. स. ६००मध्ये, तर सहाव्या शतकात चिनी प्रवासी झुआनझांग याने जून किंवा जुलै ६४०मध्ये बासेनच्या आसपासच्या भागात भेट दिली असावी, असे मानले जाते. इतिहासकार जोसे गेर्सन दा कुन्हाच्या मते, या काळात बासेन आणि त्याच्या आसपासचा भाग चालुक्य राजवटीच्या आधिपत्याखाली असावा. त्यानंतर शिलाहार व त्यानंतर यादव राजवट आली. इ. स. १००च्या सुमारास अनेक अरबी प्रवाशांनी ठाणे आणि सोपारासारख्या बासेनजवळील शहरांचा उल्लेख केलाआहे. परंतु त्यात बासेनचा कोणताही संदर्भ आला नव्हता. सन १३१८मध्ये गुजरातच्या सुलतानाने हा भाग ताब्यात घेतला. काही वर्षांनंतर बार्बोसाने गुजरातच्या राजाचे एक चांगले बंदर असलेले शहर म्हणून बसई या नावाने (Baxay - उच्चार Basai) त्याचे वर्णन केले. या भागाच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे भारतातील, तसेच परदेशी चित्रपट व जाहिरातींचे चित्रीकरण येथे चालू असते. इंग्रजी चित्रपटातील ‘ह्यूमन फॉर द वीकेंड’ या गाण्याचे चित्रीकरणही येथे झाले होते. ट्रॅफिक टाळून रेल्वेने दीड तासात येथे पोचता येते. त्यामुळे मुंबईकरांचे वीकेंड डेस्टिनेशन म्हणून हे आवडते ठिकाण आहे. 

वसई किल्ला प्रवेशद्वारावरील शिल्पपोर्तुगीज आणि गुजरातचा सुलतान यांच्यात २३ डिसेंबर १५३४ रोजी झालेल्या कराराप्रमाणे पोर्तुगीजांनी वसई शहर, तसेच त्याचे प्रांत, बेटे आणि समुद्र ताब्यात घेतले. त्याच्याबरोबर मुंबई बेटांमध्ये साष्टी, कुलाबा, ओल्ड वुमेन्स बेट, मुंबई, माझगाव, वरळी, माटुंगा, माहीम आणि दमण आणि दीव, ठाणे, कल्याण आणि चौल यांचा ताबाही पोर्तुगीजांकडे आला. 

यातील मुंबई व आसपासच्या साष्टी बेटाचा भाग पोर्तुगीजांनी इंग्लंडला एका शाही विवाहात हुंडा म्हणून दिला व ब्रिटिशांना पश्चिम किनारपट्टीवर प्रवेश मिळाला. वसई किल्ल्याचे व्यापारी महत्त्व ओळखून वसईपासून नाशिककडे जाणाऱ्या कल्याणपर्यंतच्या जलमार्गावर वर्चस्व स्थापन करण्यासाठी या किल्ल्याचे मजबुतीकरण केले. 

वसई किल्ला प्रवेशद्वार

वसई किल्ला जुना पोर्तुगीज नकाशावसई किल्ला (Fort Bassein) : मूळ किल्ल्याचे बांधकाम भडारी-भेंगाळे नावाच्या सरदाराने सन १४१४मध्ये केले होते. सन १५३०मध्ये हा किल्ला गुजरातच्या सुलतानाने त्याच्याकडून घेतला. हा किल्ला मूळ इस्लामिक पद्धतीने बांधलेला असला, तरी पोर्तुगीजांनी त्यात सुधारणा करताना युरोपीय पद्धतीच्या स्थापत्यशास्त्राचा वापर करून किल्ल्याची पुनर्बांधणी केल्याचे दिसते. सन १५३४मध्ये पुनर्बांधणीचे काम सुरू केले. पुनर्बांधणीच्या कामाला दहा वर्षं लागली. किल्ला दशकोनी असून, प्रत्येक कोपऱ्यावर एक बुरुज आहे. त्याची चारही बाजूंची लांबी एक किलोमीटर आहे. मजबूत तटबंदी तीस ते पस्तीस फूट उंच व पाच फूट रुंद आहे. या बुरुजांना बाहरी बुरुज, कल्याण बुरुज, फत्ते बुरुज, कैलास बुरुज, यशवंत बुरुज आणि दर्या बुरुज अशी नावे दिली आहेत. किल्ल्याला एक समुद्राकडून व एक जमिनीकडून प्रवेशद्वार आहे. 

किल्ल्यावरील इमारती (फोटो : विकिपीडिया)

चौथ्या बुरुजाच्या अलीकडे तटात चोरवाटा आहेत. यशवंत बुरुजाखाली ५५३ फूट लांबीचा भुयारी मार्ग आहे. हा गाळाने भरला आहे. काही धाडसी ट्रेकर्स सरपटत यात जाऊन येतात. खास भुयारी प्रवासाचे कार्यक्रमही राबविले जातात. किल्ल्यात पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात आली. एका बाजूला अथांग सागर व बाकी तिन्ही बाजूंना दलदल आहे. चिमाजीअप्पांना या किल्ल्यावर मोहीम पूर्ण करण्यासाठी तीन वर्षे लागली. यावरून किल्ल्याचा भक्कमपणा लक्षात येतो. तसेच याचे महत्त्वही कळून येते. त्या वेळी तुंबळ लढाई झाली. चिमाजीअप्पांनी अतिशय हुशारीने नाकाबंदी करून किल्ल्यावर हल्ला केला व विजय मिळविला. लढाईत पोर्तुगीजांची ८०० माणसे मारली गेली. दारूगोळा संपला आणि पोर्तुगीज शरण आले. मराठ्यांनी किल्ला सर केला. किल्ल्यातील बायका-मुलांना सुखरूप जाऊ दिले. ब्रिटिशांनी हा किल्ला १७७४मध्ये ताब्यात घेतला व सालभाईच्या कराराप्रमाणे मराठ्यांना तो १७८३मध्ये परत केला. नंतर १८१८मध्ये त्यांनी तो परत घेतला. किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेल्यावर किल्ल्याची दुरवस्था झाली. 

किल्ल्यावरील चिमाजीअप्पा स्मारक (फोटो : विकिपीडिया)

सन १८६०मध्ये इंग्रजांनी हा किल्ला कर्नल लिटलवूड या इंग्रज अधिकाऱ्याला भाड्याने दिला. त्याने किल्ल्यात उसाची शेती केली आणि साखर कारखाना उभारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या उभारणीसाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी त्याने किल्ल्यातील दगड लोकांना विकले. त्यामुळे किल्ल्यास अधिकच हानी पोहोचली. किल्ल्याकडे कोणी फिरकेनासे झाले. इतिहासाची आवड व पर्यटकांमुळे आता किल्ल्यावर वर्दळ वाढली आहे. आजही किल्ल्याचे अवशेष बघताना पोर्तुगीज शैलीचे बांधकाम आढळून येते. त्याची तटबंदी विस्मयकारक आहे. बालेकिल्ल्यात दारूगोळा कोठार, सैनिकांची वसतिस्थाने आणि वाड्यांचे अवशेष दिसून येतात. 

किल्ल्यावरील चर्चकिल्ल्यात गेल्यावर बालेकिल्ल्याकडे जाताना वाटेत तीन चर्च लागतात. यातील संत जोसेफ ख्रिस्तमंदिर या चर्चची उभारणी १५४६ ते १६०१ या काळात झाली. हे चर्च कॅथेड्रल या नावाने ओळखले जाते. पोर्तुगीज राजवटीतील अनेक शिलालेख या चर्चमध्ये पाहण्यास मिळतात. येथील पोर्तुगीज शैलीतील कमानी विस्मयकारक आहेत. या चर्चच्या मनोऱ्याच्या माथ्यावर चार रांजणाकृती कळस होते. त्यातील फक्त दोनच शिल्लक आहेत. या चर्चच्या प्रवेशद्वाराच्या उजवीकडे असणाऱ्या मनोऱ्यावर जाण्यासाठी चक्राकार (गोल) जिना आहे. त्याच्या ६३ पायऱ्या शिल्लक आहेत. या जिन्याने वर चढल्यानंतर आपणास संपूर्ण वसई खाडीचे विहंगम दर्शन होते. वसई आणि तिच्याजवळील माणिकपूर, पापडी, निर्मळ, रमेदी येथे पोर्तुगीजांनी बांधलेली सुरेख जुनी चर्चेस अद्यापही प्रार्थनास्थळे म्हणून वापरात आहेत. 

वसई ते मेणवली (वाई) घंटा प्रवास : २२ मार्च १७३९ रोजी चिमाजीअप्पांची वसईची मोहीम झाल्यावर मराठी सैन्याने किल्ल्यातील चर्चमधील मोठ्या घंटा उतरवून त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्यापैकी एक घंटा वाईजवळील मेणवली येथील नाना फडणवीसांच्या वाड्यामागे त्यांनी बांधलेल्या घाटावर आहे. तसेच एक घंटा नाशिक येथील नारोशंकराच्या मंदिरात असून, ती ‘नारोशंकराची घंटा’ म्हणून प्रसिद्ध आहे. आणखी एक घंटा पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात आहे. 

वसईच्या किल्ल्यात वज्रेश्वरी देवीचे व श्री नागेश्वर मंदिर ही पुरातन मंदिरे आहेत. ती पोर्तुगीजांनी नष्ट केली होती आणि चिमाजीअप्पांनी परत बांधली. या मंदिराची उभारणी इ. स. १७३९मध्ये करण्यात आली. नागेश्वर मंदिरालगतच प्राचीन नागेश महातीर्थ तलाव आहे. जवळच पुढे गेल्यावर उजव्या बाजूला चिमाजीअप्पांचा पुतळा उभारला आहे. वसई स्टेशनपासून किल्ला सहा किलोमीटरवर आहे. वसई आणि आसपासच्या माणिकपूर, पापडी, निर्मळ, रमेदी येथे पोर्तुगीजांनी बांधलेली सुरेख जुनी चर्चेस अद्यापही प्रार्थनास्थळे म्हणून वापरात आहेत. तसेच जुन्या चर्चेचे अवशेषही बघण्यास मिळतात. वसई किल्ल्याच्या दक्षिणेला बीच आहे. तेथून वसई खाडी व अरबी समुद्राचे सुंदर दृश्य दिसते. 

बेना बीचबेना बीच, वसई : सुट्टीत आनंद साजरा करण्यासाठी मुंबईकर येथे हजेरी लावतात. मनोरंजनाचे अनेक खेळ येथे उपलब्ध आहेत. बेना बीच हे फक्त पर्यट स्थळांचे ठिकाण नाही, तर आनंदभुवन आहे. 

रानगाव बीच : वसई रेल्वे स्थानकापासून रानगाव-रांगावन बीच ८.२ किलोमीटर अंतरावर आहे. हा एक निर्जन समुद्रकिनारा आहे. कारण तो फारसा परिचित नाही. रानगाव बीचकडे जाणारा रस्ता अरुंद आहे. समुद्रकिनाऱ्यावर पार्किंगची जागा नाही. ज्यांना शांतता हवी आहे, त्यांच्यासाठीच ही जागा आहे. 

भुईगाव बीच : खूपच सुंदर, अद्भुत, शांत, कमी गर्दी असलेला समुद्रकिनारा म्हणून भुईगाव बीच ओळखला जातो. वसई रोड स्टेशनपासून तो साधारण ११ किलोमीटर अंतरावर आहे. मऊशार वाळूतून चालणे आणि बाइक रायडिंग साठी हा प्रसिद्ध आहे. एक परिपूर्ण वीकेंड डेस्टिनेशन समजले जाते. 

पंजू बेट

पंजू बेट :
वसईच्या दक्षिणेस असलेल्या खाडीच्या तोंडावर हे कुंकवाच्या कुयरीसारख्या आकाराचे बेट आहे. येथे उल्हास नदी समुद्रास मिळते. त्यामुळे उल्हास नदीचे मुख खूप रुंदावले आहे. याच खाडीमध्ये हे सुंदर बेट वसलेले आहे. पंजू हे नाव पाचू (रत्न) यावरून आले आहे. कारण हे पाचूसारखेच दिसते. हे बेट पश्चिम रेल्वेच्या नायगाव आणि भाईंदर स्थानकांदरम्यान आहे. हे एक प्राचीन ऐतिहासिक गाव आहे. चिमाजीअप्पांच्या वसई मोहिमेच्या वेळी या गावाचा त्यांना आधार होता. त्यांचे आर्थिक व्यवहार या गावातूनच होत होते. या गावातील सुमारे २० लोकांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. या बेटाचे क्षेत्रफळ सुमारे ६०० एकर आहे. लोकांचे मुख्य व्यवसाय शेती, मासेमारी, मिठागरे हे आहेत. या छोट्या बेटावर गोड्या पाण्याचा एक तलावही आहे. मिठागरेही आहेत. गावातील लोक सुसंस्कृत आहेत. नायगाव किंवा भाईंदरकडून येथपर्यंत येण्याचा बोटीचा प्रवास खूप आल्हाददायक आहे. 

पंजू

कसे जाल वसईला?
वसई हे पश्चिम रेल्वेवरील एक जंक्शन आहे. तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ठिकाण आहे. येथून रेल्वेने कल्याण-दिवा-पनवेलमार्गे कोकणात, तसेच पुणे-बेंगळुरूकडे जाता येते. जवळचा विमानतळ मुंबई. या भागात राहण्यासाठी भरपूर हॉटेल्स व रिसॉर्टस् उपलब्ध आहेत. 

- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
जगदीश पोफळी About 8 Days ago
फारच उपयुक्त व सुंदर माहिती
0
0

Select Language
Share Link
 
Search