Next
धातू कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकयोग्य
BOI
Sunday, March 18, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this story

शेअर बाजारात डे ट्रेडिंग, तसेच ऑप्शन्स अँड फ्युचर्सच्या नादाला लागून त्वरित श्रीमंत होण्याचा (वा रंक होण्याचा) मोह टाळावा. लहान-मोठ्या बातमीचे तुकडे, पानाप्रमाणे पडू लागले की सशाच्या गतीने विक्री करण्याचा मोह टाळायला हवा. खासगी बँका, ग्राफाइट, शिसे, पोलाद अशा धातू कंपन्यांवर लक्ष केंद्रित हवे; पण गुंतवणुकीबाबत ठाम राहावे. ‘समृद्धीची वाट’ या सदरात आज त्याबद्दल पाहू या..
...............

शेअर बाजारात बैल आणि अस्वलेच असतात (bull & bears) असे म्हटले गेले, तरी खऱ्या अर्थाने शेअरबाजारात   ससेच जास्त असतात. लहर असेल तेव्हा भरधाव वेगाने धावणारा, मग कंटाळा आला की थोडा वेळ पहुडणारा आणि वाऱ्याने सळसळणारे पिंपळपान जरी अंगावर पडले तरी आकाशच कोसळले असे समजायचे ही सशाची लक्षणे आहेत. त्याची वंशावळही भराभर वाढत असते. तसेच शेअरबाजारात तेजी धावायला लागली, की भरधाव जाते; मग अकारण सुस्तावते. काहीही कारण त्याला पळायला वा झोपा घ्यायला पुरतं. गेल्या आठवड्यात तसेच झाले. भाजपला उत्तर प्रदेश व बिहारच्या तीन पोटनिवडणुकीत हादरा बसायचे कारण झाले आणि विश्लेषकांचे ‘२०१९च्या निवडणुकीत भाजपला २७२ जागा मिळणार का, याचे येताजाता लचके तोडणारे, तरीही सत्तेच्या गोळ्यासाठी एकत्र राहणारे तथाकथित मित्रपक्ष त्या वेळीही एकत्र राहणार का,’ असे अंदाज सुरू झाले आणि शेअर बाजारातील निफ्टी व निर्देशांक गेल्या आठवड्यात डुगडुग करू लागले. शुक्रवारी निर्देशांक ३३,१७६ वर, तर निफ्टी १०,१७९वर बंद झाला.

गेल्या आठवड्यात हेग व ग्राफाइट इंडिया या कंपन्यांच्या शेअर्सचा बोलबाला होता. ‘हेग’ने तीन हजार ३१० रुपयांपर्यंत झेप घेतली व नंतर तो तीन हजार १४९वर बंद झाला. तीन हजार रुपयांखाली मिळेल तेव्हा तो जरूर घ्यावा. मार्च, जून, सप्टेंबर २०१८ तिमाहीचे या कंपनीचे नफ्याचे आकडे मोठे असतील. त्यामुळे डिसेंबरपर्यंत तो चार हजार रुपयांपर्यंत वाढावा. ग्राफाइट इंडिया कंपनीचा शेअर गेल्या आठवड्यात ६९५ रुपयांपासून ७७५ रुपयांपर्यंत वाढला आहे. अधूनमधून त्याला अप्पर सर्किट (upper circuit ) लागत असते. सातशे रुपयांखाली तो जरूर घ्यावा. कारण डिसेंबर २०१८पर्यंत तो ९०० रुपयांची आणि कदाचित ९६० रुपयांची सीमाही ओलांडू शकेल.

... मात्र शेअर बाजारात फक्त फायदाच होतो असे नाही. योग्य वेळी विक्री केली नाही तर हातची संधी चुकत जाते; पण बरेच लोक नेमके विक्री करायच्या वेळी खरेदी करतात. कारण सतत वाढत्या भावामुळे त्यांचे डोळे दिपलेले असतात; पण अभ्यास व खात्री करून खरेदी-विक्री केली तर सहसा पश्चात्ताप होत नाही.

गेल्या आठवड्यात संसद सदस्य असलेल्या तेलुगू देसम पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पाठिंबा काढून घेतला. अन्य मित्रपक्षही वाकुल्या दाखवत आहेत. तेलुगु देसमने सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठरावही देण्याचे ठरवले आहे व विरोधकही त्यात साथ देतील. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हची मंगळवार-बुधवारी बैठक होत आहे. तिथे कदाचित व्याजदर वाढवण्याचा निर्णय होईल व याचे पडसाद अन्य देशांतील मध्यवर्ती बँकांतूनही उमटतील. बाजाराला अस्वस्थ व अस्थिर करणाऱ्या या बातम्यांकडे नीट लक्ष देऊन गुंतवणूकदारांनी व्यवहार करायला हवेत.डे ट्रेडिंग, तसेच ऑप्शन्स अँड फ्युचर्सच्या नादाला लागून त्वरित श्रीमंत होण्याचा (वा रंक होण्याचा) मोह टाळावा. लहान-मोठ्या बातमीचे तुकडे, पानाप्रमाणे पडू लागले की सशाच्या गतीने विक्री करण्याचा मोह टाळायला हवा. खासगी बँका, ग्राफाइट, शिसे, पोलाद अशा धातू कंपन्यांवर लक्ष केंद्रित हवे; पण गुंतवणुकीबाबत ठाम राहावे.

- डॉ. वसंत पटवर्धन
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link