Next
भिवंडीत रंगले ग्रामीण कविसंमेलन
मिलिंद जाधव
Tuesday, October 02, 2018 | 02:27 PM
15 0 0
Share this storyभिवंडी :
आपली बोलीभाषा जतन व्हावी, ती रसिकांपर्यंत पोहोचावी, तसेच ग्रामीण भागातील ज्येष्ठ व नवीन कवींना विचारमंच उपलब्ध व्हावा, म्हणून भिवंडी तालुक्यातील माझी आई प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने ग्रामीण कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. हे ग्रामीण कविसंमेलन भिवंडी शहरातील टिळक वाचनालय सभागृहात झाले. 

या कविसंमेलनाचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी सेक्युलर महाराष्ट्र महासचिव किरण चन्ने, सोशल फायटर्स साप्ताहिकाचे संपादक राजेंद्र सोनवणे, बापाचा बाप साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक संतोष चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिका संजीवनी राजगुरू, संमेलनाध्यक्ष विजयकुमार भोईर, संस्थेच्या सचिव विजयाताई भोईर, संस्थेचे उपाध्यक्ष साहित्यिक जगदेव भटू, कवी नवनाथ रणखांबे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

या वेळी वसई विरार म. न. पा. नगरसेविका सुरेखा कुरकुरे, ज्येष्ठ कवी, गायक राजरत्न राजगुरू, दैनिक जनतेचा महानायक वर्तमानपत्राचे उपसंपादक प्रबोध माणगांवकर, कवी, गायक भास्कर अमृतसागर, सामाजिक कार्यकर्ते मोहन गायकवाड आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कविसंमेलनात ठाणे, पालघर, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, पुणे, धुळे, रायगड या जिल्ह्यांतील अनेक कवी, कवयित्री यांनी प्रेम, पाऊस, गझल, समाजप्रबोधन अशा विविध विषयांवर आपल्या दर्जेदार कविता सादर केल्या. 

‘कवी, साहित्यिकांनी सध्याच्या परिस्थितीवर लेखन करणे खूप गरजेचे आहे. तेव्हाच समाजामध्ये क्रांती घडू शकेल. असे लेखन करणे ही काळाची गरज आहे,’ असे अॅड. किरण चन्ने यांनी सांगितले. ‘साहित्यिक, कवींनी  पाने, फुले, प्रेमकविता यांमध्ये अडकून न पडता प्रबोधनाच्या वाटेवर लिखाण करावे, जेणेकरून समाजाला फायदा होईल,’ असे मनोगत राजेंद्र सोनवणे यांनी व्यक्त केले. त्यांनी कविताही सादर केली. 

‘आपले विचार कवितेच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहचणार आहेत. म्हणून प्रबोधनात्मक कवितेवर कवींनी जास्त भर द्यावा. त्यातूनच समाजाला दिशा देण्याचे काम होणार आहे,’ असे पत्रकार संतोष चव्हाण यांनी सांगितले. ‘कविसंमेलनातून कवींना लिहिण्यास अजून हुरूप येणार असून, कवींच्या लेखणीला धार मिळणार आहे,’ असे ज्येष्ठ साहित्यिका संजीवनी राजगुरू यांनी सांगितले. सर्व कवींना माझी आई प्रतिष्ठान संस्थेकडून सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. नाशिक ते ठाणे प्रवासादरम्यान बसमध्ये फिरते साहित्य संमेलन घेण्यात आले होते. त्या साहित्य संमेलनात सहभागी झालेल्या कवींना ज्येष्ठ साहित्यिका संजीवनी राजगुरू यांच्याकडून पार्वती सदाफुले स्मृती पुरस्कार व माझी आई प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 

‘एवढे वर्ष आम्ही लेखन करून आम्हाला चांगला विचारमंच मिळाला नाही. म्हणून नवीन कवींना पुढे आणण्यासाठी माझी आई प्रतिष्ठान संस्थेकडून आम्ही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देण्याचे काम करणार आहोत,’ असे अध्यक्ष विजयकुमार भोईर यांनी सांगितले. ‘कवींसाठी आम्ही नेहमीच नवीन उपक्रम राबविणार असून, साहित्य जोपासण्याचे काम आम्ही सातत्याने करणार आहोत,’ असे साहित्यिक जगदेव भटू यांनी सांगितले. 

या ग्रामीण कविसंमेलनात ६० कवींनी सहभाग घेतला होता. सहा तास कविसंमेलन मोठ्या उत्साहात रंगले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी मिलिंद जाधव यांनी केले, तर आभार कवी नवनाथ रणखांबे यांनी मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link