Next
‘‘आठवणींचे अमृत’ पुस्तक प्रत्येकालाच प्रेरणा देणारे’
अप्पासाहेब साठे यांच्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे चिपळुणात प्रकाशन
BOI
Monday, January 21, 2019 | 04:10 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
‘दिवंगत अप्पासाहेब साठे यांचे व्यक्तिमत्त्व चतुरस्र होते. ‘आठवणींचे अमृत’ हे त्यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या जीवनातील अनुभवांचे वस्तुनिष्ठ कथन करणारे आहे. हे पुस्तक प्रत्येकालाच प्रेरणा देणारे आहे,’ असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिपळूणमध्ये काढले. ‘आठवणींचे अमृत’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन २१ जानेवारी रोजी चिपळूणमध्ये झाले. त्या वेळी ते बोलत होते. 

चिपळूणच्या नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी अप्पासाहेब साठे यांच्या कन्या आणि लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैयाजी जोशी  भैयाजी जोशी, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार विनय नातू, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे, श्रीधर भिडे, मंगेश तांबे, आनंद लिमये, बाबा चांदेकर, राजनभाई दळी, मोहनभाई संसारे आदी मान्यवर उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, ‘दिवंगत अप्पासाहेबांच्या ‘आठवणींचे अमृत’ या पुस्तकातून साठे कुटुंबीयच नव्हे, तर समाजालाही संस्कार, ऊर्जा आणि सामाजिक कार्याचा वसा मिळाला. या पुस्तकात त्यांच्या जीवनातील वास्तव प्रसंगांचे वस्तुनिष्ठ वर्णन आहे. दिलेला शब्द पाळायचा ही त्यांच्या आईची आणि आजीची शिकवण आणि तत्त्वनिष्ठपणा त्यांनी आयुष्यभर जोपासला. जे घडले, जे भोगले त्याचे खरेखुरे वर्णन अप्पासाहेबांनी या पुस्तकामध्ये लिहिले आहे. जे चांगले आहे, ते आहेच; तथापि काही चुकाही त्यांनी प्रांजळपणे कबूल केल्या आहेत. संस्कारक्षम असे हे पुस्तक सर्वांनी आवर्जून वाचावे.’

‘सत्कार्य करायचे ते फळाची अपेक्षा धरून करायचे नाही, हे व्रत अप्पासाहेबांनी आयुष्यभर जपले. संस्कार करण्याचे आणि समाजप्रबोधनाचे कार्य त्यांनी अविरतपणे केले,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.

‘अप्पासाहेबांचा एक लेख खूप ठिकाणी शोधूनही मिळाला नाही; पण हा दुर्मीळ लेख नागपुरात मिळाला. चांगल्या गोष्टी नागपुरातच मिळतात,’ असे मुख्यमत्र्यांनी म्हणताच सभागृहातील नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट आणि हास्यासह उत्स्फूर्तपणे दाद दिली.सुमित्रा महाजन म्हणाल्या, ‘‘आठवणींचे अमृत’ या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती प्रकाशित होताना मला व माझ्या साठे कुटुंबीयांना मोठा आनंद होत आहे. चिपळूण शहरात पुस्तकाचे प्रकाशन व्हावे, अशी अप्पांची तीव्र इच्छा होती. ती आज पूर्ण होत आहे. या प्रकाशन सोहळ्याला मान्यवरांसोबतच चिपळूण शहरवासीय मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले, यामुळे मी भारावून गेले आहे. संघर्ष करीत संकटांवर मात कशी करायची व संस्कार जपत कसे वागायचे याची शिकवण अप्पांनी दिली. ते आमचे प्रेरणास्थान आहेत.’ 

भैयाजी जोशी म्हणाले, ‘ज्या काळात देशात संघर्षाचे वातावरण होते, समाजात नैराश्य आले होते, त्या वेळी अप्पासाहेब साठे यांनी समाजप्रबोधनाची धुरा यशस्वीपणे वाहिली. भारत हा सुपरपॉवर होण्यापेक्षा भारताने विश्वगुरुत्वाची संकल्पना रुजवून विश्वामध्ये मार्गदर्शकाची भूमिका बजावून विकसित राष्ट्र ही भावना वृद्धिंगत करण्यात यशस्वी व्हायला पाहिजे.’

चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी आपल्या स्वागतपर भाषणात, हा कार्यक्रम म्हणजे अमृतयोग असल्याचे सांगितले.

प्रकाशक आनंद लिमये म्हणाले, ‘आमच्या संस्थेमार्फत ४०हून अधिक लेखकांची पुस्तके आम्ही प्रकाशित केली आहेत. प्रत्येक पुस्तक कायमस्वरूपी दस्तऐवज ठरणारे आणि समाजाला दिशा देणारे आहे. अप्पासाहेबांनी लिहिलेल्या अधिक दोन लेखांसह आणि सुमित्राताईंनी लिहिलेल्या प्रस्तावनेसह ही दुसरी आवृत्ती आम्ही प्रकाशित करीत आहोत.’ 

समारंभाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे प्राचार्य श्याम जोशी यांनी केले. समारंभाला कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, तसेच चिपळूण शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

(चिपळूणच्या दौऱ्यावर असलेल्या लोकसभेच्या अध्यत्रा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते शिरळ येथे विद्याभारतीच्या शिक्षणसंकुलाचे भूमिपूजन झाले. तसेच, त्यांच्या मातोश्री उषाताई साठे यांच्या नावाच्या सभागृहाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमांची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(हे पुस्तक बुकगंगा डॉट कॉमवरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search