Next
गझलेच्या चांदण्यातल्या नव्या ताऱ्याशी गप्पा!
मानसी मगरे
Tuesday, October 02, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


मराठी गझल म्हटलं, की सर्वांत आधी डोळ्यांसमोर येतात ते सुरेश भट. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन पुण्यातील नचिकेत जोशी हा नव्या उमेदीचा गझलकार मराठी गझलविश्वात पाय रोवू पाहतो आहे. ‘चांदणे जागेच आहे’ हा त्याचा गझलसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. त्या निमित्ताने त्याच्याशी साधलेला हा संवाद...
..........
नचिकेत जोशीलेखनाची सुरुवात कशी झाली? त्यातही गझल हा प्रकार कसा निवडला?
- लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. थोडंफार लेखनही करायचो; पण तेव्हा कविता वगैरे नाही लिहिल्या. वक्तृत्व स्पर्धांमध्ये मात्र मी कायम असायचो. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये असं जाणवलं, की भाषणात कवितेच्या काही ओळी घालता आल्या, तर भाषण आणखी खुलतं. मग हळूहळू कवितांकडे वळलो. पुढे संदीप खरेंच्या कविता आणि त्यांच्या सादरीकरणानं त्यात आणखी रमत गेलो. मग त्यापुढील भाषणात माझ्या मी काही ओळी तयार करून घालत गेलो. हे करत असताना मुक्त छंदातल्या, दोन ओळींच्या यमक जुळणाऱ्या कविता आपोआपच लिहिल्या गेल्या. याच काळात सुरेश भटांचं ‘एल्गार’ हातात पडलं आणि मी अक्षरशः झपाटल्यासारखं ते सगळं वाचलं. तेव्हापासून मी गझल प्रकाराच्या प्रेमात पडलो. भटसाहेबांच्या गझलांमध्ये मला तेव्हा प्रथमदर्शनी जाणवलेला आणि लक्षात आलेला प्रकार म्हणजे विरोधाभास. ते दोनच ओळींमध्ये परस्परविरोधी शब्द घेऊन त्याचा अन्वयार्थ साधायचे. हे खूप भन्नाट आहे. 

सुरेश भटगझल लेखनाची खरी प्रेरणा कोणाकडून मिळाली?
- अर्थातच सुरेश भटसाहेबांकडून. त्यांचं ‘एल्गार’ हातात पडल्यानंतर मी त्यात पूर्णपणे हरवून गेलो. खरं तर ‘एल्गार’ हे भटसाहेबांनी त्यांच्या गझल कारकिर्दीला ३०-४० वर्षं झाल्यानंतर लिहिलेलं पुस्तक. त्यामुळे त्यांच्या गझल लेखनाच्या तेवढ्या अनुभवातून ते उतरलेलं होतं आणि माझी सुरुवात असताना पहिलं तेच माझ्या हाती पडलं. त्या पुस्तकानं मी भारावून गेलो. गझल लेखनामध्ये असलेलं जे शास्त्र आहे, म्हणजे मीटर, यमक, काफिया, रदिफ हे सुरेश भटांनी त्यांच्या गझलांमध्ये अगदीच चपखलपणे वापरलं आहे. विशेषतः त्यांच्या बहुतांश गझला अक्षरगणवृत्तात आहेत, ज्यात लघू आणि गुरू यांच्या क्रमाचा खेळ आहे. भटसाहेबांच्या जवळपास प्रत्येक गझलेमध्ये हा क्रम आणि त्यातल्या अक्षरांची येणारी संख्या असा दोन्हींचा उत्कृष्ट मेळ साधलेला आहे. थोडक्यात काय, तर शब्द, गझल लेखनासाठीचं शास्त्र, यमक आणि तेवढाच सुरेख भावार्थ या सगळ्या गोष्टींचा मेळ साधून लिहिलेल्या त्यांच्या गझला आहेत. माझ्या मते, हे केवळ ‘न भूतो न भविष्यति’ आहे. त्यामुळे माझ्या गझल लेखनाची प्रेरणा म्हणजे केवळ सुरेश भट आणि त्यांच्या गझला. 

गझल लेखनातलं शास्त्र कसं आणि कोणत्या माध्यमातून शिकता आलं?
- मुळात गझलेची आवड निर्माण झाली, त्या काळात रेडिओ ऐकण्याचं प्रमाण खूप होतं. ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या..’, ‘तरुण आहे रात्र अजुनि..’ अशा ज्या मराठी गाण्यांच्या स्वरूपात आलेल्या गझला होत्या, त्या तेव्हा रेडिओवर खूपदा लागायच्या. त्यामुळे गझल प्रकारासाठीचा निरीक्षणाचा अर्धा अभ्यास तिथेच होत गेला. दोनच ओळींचा शेर, यमक, ‘लघू-गुरू’चा क्रम, मात्रा, वृत्त अशा शास्त्रीय गोष्टींचं संस्करण गाण्याच्या स्वरूपात असलेल्या गझलांमधून लवकर आणि चांगल्या प्रकारे होत गेलं. मग, ज्या गाण्याचं कडवं दोन ओळींत संपतं, ती गझल असू शकते हे हळूहळू लक्षात येऊ लागलं. दोनच ओळींचा शेर, हा गझलेचा गुणच आहे. शिवाय गझलेचं गाणं जरी झालं, तरी ती स्वतःचा फॉर्म सोडत नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येत गेल्या. दरम्यान, त्याच काळात मी ‘मायबोली’ पोर्टलवर पोहोचलो. तिथे वैभव जोशी गझल लेखनाच्या कार्यशाळा घ्यायचे. त्याचाही खूप फायदा झाला. काही गोष्टी अगदी कायमस्वरूपी समजल्या, लक्षात राहिल्या. मिश्रा, रदिफ, काफिया या गझलेच्या अभ्यासातल्या काही शास्त्रीय संकल्पना समजू लागल्या. गझल हा मूळ काव्यप्रकार उर्दू भाषेतला. म्हणून मग ती उर्दूतलीच नावं पुढे मराठीतही जशीच्या तशी आली आणि तशीच वापरली गेली.  

कवी मोरोपंत, माधव जूलियन, सुरेश भट, सुरेशचंद्र नाडकर्णी, भीमराव पांचाळे यांच्यापासून ते अगदी आजच्या तरुण गझलकारांपर्यंत समान (कॉमन) अशी एखादी गोष्ट आहे असं वाटतं का? आणि ठळकपणे झालेला एखादा बदल आहे असं वाटतं का? तो कोणता?
- बदल अर्थात बरेच झाले आहेत. साम्य म्हटलं, तर ते तंत्राच्या बाबतीत आहे आणि अर्थात त्याचा जो फॉर्म आहे, तो तोच आहे. मुळात कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त अर्थपूर्ण भाव पोहोचवते ती गझल, अशी काहीशी तिची संकल्पना आहे. थोडक्यात, दोन ओळींच्या शेरात पहिल्या ओळीत मांडलेला विचार किंवा एखादा भाव, दुसऱ्या ओळीत तुम्ही कशा प्रकारे संपवता, हे गझलेचं अंगभूत वैशिष्ट्य आहे, असं मला वाटतं. याचा विचार करता अलीकडील काळात गझलेच्या तंत्रातही काही नवीन बदल समोर येत आहेत. मोरोपंत असतील किंवा माधव जूलियन यांनी गझलेच्या पायाभूत गोष्टी सांगितल्या; मात्र पुढे शास्त्रात चपखल बसणारी गझल लिहीत राहण्याचं काम चोखपणे कोणी केलं असेल, तर ते सुरेश भटांनी. गझल हा जरी आपण बाहेरून घेतलेला काव्यप्रकार असला, तरी मराठीत गझल लिहिताना ती आपल्या मातीची वाटली पाहिजे. तिच्यात आपले विषय, आपल्या भावना उमटल्या पाहिजेत, असा भटसाहेबांचा आग्रह असायचा. त्यानुसार मराठी गझलेवर काम करत असताना सुरेश भटांनी त्यात अनेक बदल केले असल्याचं दिसतं. मूळ शास्त्र आणि फॉर्म तोच ठेवून, त्याची मांडणी आणि इतर काही बाबी यांच्यात विशेष असे बदल आणि पायंडे भटसाहेबांनी पाडले आहेत. यापेक्षा आणखी एक मोठा बदल सांगता येईल, जो विषयांच्या बाबतीत आहे. गेल्या दहा एक वर्षांत मराठी गझल प्रकारात विषयांमध्ये खूप वैविध्य आलं आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे विषय मागच्या काही काळात हाताळले गेले आहेत. तंत्राच्या बाबतीत झालेला बदल पाहिला, तर तो काही प्रमाणात यमकाच्या बाबतीत झालेला दिसतो. उदा. : ‘पसारा’ या शब्दाला ‘किनारा’ किंवा मग त्यासारखं यमक. म्हणजेच शेवटी ‘रा’ हे कायम होतं. त्यात हळूहळू आता यमक जुळवताना मराठीत ‘स्वर काफिया’ नावाचा प्रकार रुळत आहे. म्हणजेच त्यात शेवटचं अक्षर सारखंच असावं हा आग्रह न राहता केवळ शेवटचा स्वर स्थिर ठेवून शब्द लिहिणं हे चालतं. हा प्रकार बऱ्यापैकी रुळतही आहे. उदा. : ‘किनारा’ या शब्दातला ‘आ’ हा केवळ स्वर स्थिर ठेवून शब्द लिहिलेला चालतो. 

‘चांदणे जागेच आहे’ या तुझ्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या गझलसंग्रहाबद्दल काय सांगशील?
- खरं तर पुस्तक वगैरे करायचं कधीच डोक्यात नव्हतं. ‘मायबोली’वर लिहायला लागलो, तेव्हापासून लेखनाचे अनेक प्रकार हाताळले. विशेषतः गझल लिहिण्याची प्रक्रिया तेव्हा जोमानं सुरू होती. बऱ्याच गोष्टी शिकण्याची संधीही या काळात मिळाली. लेखन विकसित होत गेलं आणि सहज एकदा ‘किती लिहिलंय आजवर हे पाहू,’ असं म्हणून त्यावर नजर टाकली, तर जवळपास २०० गझल लिहून झाल्या होत्या. आता पुस्तक करता येईल, असं डोक्यात आलं आणि ती संकल्पना साकारली गेली. ‘चांदणे जागेच आहे’ या माझ्या पुस्तकाबद्दल सांगायचं झालं, तर त्यात कोणता एकच विषय घेऊन लिहिलेलं नाहीये. विशेषतः आजवर मी प्रवास, निसर्ग या विषयांवर बहुतांश गझला लिहिल्या आहेत. ते माझ्या आवडीचे विषय आहेत. आपलं आयुष्य हा एक प्रवास आहे आणि प्रवासात अनेक टप्पे पार करावे लागतात, चढ-उतार असतात, तसंच या आयुष्याच्या प्रवासाचंही आहे. हा विचार मनात ठेवून, ही थीम घेऊन लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. त्या आशयाच्या गझला या संग्रहात वाचायला मिळतील. या पुस्तकाच्या निमित्तानं, एक नक्कीच सांगावंसं वाटेल, की गझल किंवा कोणताही लेखणप्रकार हाताळायचा असेल आणि नसेलही, तरी त्यासंदर्भातील वाचन करायलाच हवं. जसं चित्रपटाची, त्याच्या समीक्षणाची आवड असेल, तर विषय काहीही असो, फॉर्म कोणताही असो, चित्रपट पाहत राहावे लागतात. तसंच याचंही आहे. वाचत राहावं आणि अभ्यासत राहावं. यामुळे लेखनाचे नवीन पैलू उलगडत जातात.

('नचिकेत जोशी'च्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search