Next
‘गदिमा...बाबूजी अन् बेरजेचे राजकारण’
‘मसाप’च्या कार्यक्रमात ‘गदिमां’च्या आठवणींना उजाळा
प्रेस रिलीज
Thursday, October 11, 2018 | 03:20 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘गीतरामायण कार्यक्रमाच्या रॉयल्टीवरून सुधीर फडके (बाबूजी) आणि ग. दि. माडगूळकर (गदिमा) यांच्यामध्ये दुरावा वाढला. त्यांचा संवाद बंद झाला. महाराष्ट्राचे खूप नुकसान होईल, असे प्रत्येकजण म्हणू लागला. दरम्यान, सैनिकांच्या कल्याण निधीसाठी पुण्यात एका कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले होते. यशवंतराव आणि ‘गदिमा’ यांचे मैत्र ‘चले जाव’ चळवळीपासूनचे. त्यांनी एकमेकांना बघताच घट्ट मिठी मारली. यशवंतरावांनी ‘बाबूजीं’नाही जवळ घेतले. ‘तुम्ही दोघे महाराष्ट्राचे सांस्कृतिक शिलेदार आहात. तुम्ही मिळून हा गड राखा, अन्यथा मोठे सांस्कृतिक नुकसान होईल,’ असे सांगून यशवंतरावांनी त्यांचे हात उंचावून समेट घडवला,’ यशवंतरावांनी केलेल्या बेरजेच्या राजकारणाचा हा प्रसंग सांगत ‘गदिमां’च्या मुलांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

निमित्त होते, थोर कवी ग. दि. माडगूळकर अर्थात ‘गदिमां’च्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे (मसाप) आयोजित ‘पुत्र सांगती’ या कार्यक्रमाचे. ‘गदिमां’चे पुत्र श्रीधर माडगूळकर, आनंद माडगूळकर आणि शरतकुमार माडगूळकर यांनी ‘गदिमां’च्या आठवणींना उजाळा दिला. प्रसिद्ध निवेदक अरुण नूलकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. शरतकुमार यांनी यशवंतरावांचे मोठेपण सांगून ऐतिहासिक प्रसंगाची आठवण करून दिली. या प्रसंगी ‘मसाप’चे विश्वस्त मंडळाचे सदस्य उल्हास पवार, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते.

‘अण्णांची मोठी अंत्ययात्रा निघाली, तेव्हा वडिलांनी किती मोठे काम केले आहे ते लक्षात आले. आमचे वडील आजही समजलेले नाहीत,’ असे त्यांनी सांगितले.

श्रीधर म्हणाले, ‘गीतरामायण पुन्हा होणार नाही. ‘गदिमां’ची मुलं म्हणून खूप आनंद वाट्याला आला. विविध क्षेत्रातील दिग्गजांना भेटता आले. राजकारण चिखलातच असते. जितकी मोठी उडी तितका अधिक चिखल अंगावर उडणार, पण म्हणून ते सोडायचे नसते, असे अण्णा नेहमी सांगत.’

‘अण्णांसमोर गीतरामायण गाण्याची संधी एकदाच मिळाली. पु. भा. भावे घरी आले, तेव्हा गाणे म्हणं, असे अण्णांनी सांगितले. नंतर ‘पराधीन आहे जगती’ म्हणायला सांगितले. या गाण्याचे एखादेच कडवे अण्णांनी ऐकले. त्यांना संगीताची उत्तम जाण होती. आम्ही त्यांच्या लोकप्रियतेचे वलय अनुभवले. मी गेल्यावर कुणी विचारणार नाही. केवळ चौकट छापून येईल, हे ‘गदिमां’चे भाकीत मराठी लोकांनी खोटे ठरवले आहे. चाळीस वर्षांनंतरही मराठी समाज त्यांना विसरलेला नाही. त्यांची जन्मशताब्दी उत्साहात साजरी केली जात आहे,’ अशी भावना आनंद यांनी व्यक्त केली.

प्रा. जोशी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search