Next
साधेपणातील सौंदर्य दर्शविणारे चर्च
BOI
Thursday, December 21, 2017 | 03:45 PM
15 0 0
Share this article:मुंबईतील भायखळा येथील ख्रिस्त चर्चला ‘युनेस्को’तर्फे आशिया पॅसिफिक क्षेत्रातील सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी दिला जाणारा पुरस्कार यंदा मिळाला आहे. आता ख्रिसमस सण तोंडावर आला आहे. त्या औचित्याने, मुंबईतील ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर बुरांडे यांनी लिहिलेला, या वास्तूची वैशिष्ट्ये उलगडणारा लेख प्रसिद्ध करत आहोत.
.........

नूतनीकरणानंतरचे ख्रिस्त चर्च, भायखळा

मुंबईतील भायखळा येथील ख्रिस्तच्या वास्तूला १८३ वर्षे होऊनही पुढील अनेक वर्षं टिकून राहण्याची क्षमता त्या वास्तूत आहे. ‘ख्रिस्त चर्च - १८३३’ असे या प्रार्थनास्थळाच्या दर्शनी भागावर ठळक अक्षरांत लिहिले आहे. सन २०१६मध्ये या वास्तूचे पुनरुज्जीवन (नूतनीकरण) करण्यात आले. सामूहिक प्रार्थना, ध्यानधारणा अथवा ईश्वराशी संवाद साधण्याचे मार्ग प्रत्येक धर्मानुसार वेगवेगळे असतात. त्यानुसार परंपरेतून जोपासलेल्या मूलभूत आध्यात्मिक दृष्टिकोनानुसार त्या त्या धर्मस्थळाचा आराखडा ठरत आला आहे. अशा वास्तू मुख्यत: धार्मिक अथवा आध्यात्मिक जागृतीसाठी बांधल्या जातात. कोणतीही वास्तू केवळ मजबूत बांधकाम साहित्याच्या वापरातून उभी राहत नसते, तर तिचा भूमितीय आराखडाही तेवढाच परिपूर्ण असावा लागतो. ख्रिस्त चर्चचा भूमितीय आराखडा परिपूर्ण असून, बांधकाम साहित्यही मजबूत आहे. यानंतर आवश्यक असतो तो वास्तुशास्त्रीय सौंदर्यविवेक (Aesthetic sense)! ख्रिस्त चर्चचा आराखडा कोणी केला याची नोंद नाही; पण तो ज्या कोणी केला असावा, त्याला वास्तुकला सौंदर्यविवेकाची जाण असावी, असे या चर्चच्या रचनेतून जाणवते. वास्तू सिद्धांतानुसार ख्रिस्त चर्चचे अंतर्बाह्य सौंदर्य या वास्तूच्या साधेपणात दडलेले आहे! चर्चच्या बैठ्या जोत्यावरील साधे, पण ठसठशीत आकारातील उंच व भारदस्त दिसणारे भारवाहक डोरिक स्तंभ, मानवी दृष्टिक्षेपात न मावणारा व उपासकाला खुजेपणाची अव्यक्त जाणीव करून देणारा उंच दरवाजा व तेवढ्याच उंचीतील लाकडी खिडक्या (Louvered window), द्विस्तरीय मिनार व शाश्वत जीवनाचा संदेश देत आकाशाकडे निमुळते होत जाणारे ‘ओबेलिक्स’ (Obelics) चिन्ह ही ख्रिस्त चर्चच्या दर्शनी भागाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत! तत्कालीन काळाची गरज ओळखून पहिल्या चौरस जागेत रोमन लिपीतील घड्याळ व दुसऱ्या चौरस जागेत ख्रिस्त चिन्ह असलेल्या क्रॉसच्या (Cross) आकारातील खिडकी दिसते. चर्चच्या बाह्यांगावर फोर्ट येथील सेंट थॉमस चर्च व एशियाटिक लायब्ररीची छाप दिसून येते. या इमारती एकाच कालखंडात बनल्या आहेत. चर्चच्या दक्षिण-उत्तर दिशेतील द्वारमंडपे नंतरच्या काळात जोडली असूनही ती आराखड्याचा मूळ भाग असल्यागत प्रतीत होतात व चर्चच्या एकूण सौंदर्यात भरही घालतात. 

ख्रिस्त चर्चचा परिसर दर्शविणारी छायाचित्रे. डावीकडचे ब्रिटिशकालीन, तर उजवीकडचे सध्याचे.
घड्याळ

स्थान, ऐतिहासिक महत्त्व
ख्रिस्त चर्च (आधीचे नाव भायखळा चर्च) भायखळा येथील मिर्झा गालिब रोडवर (क्लेयर रोड ) आहे. तत्कालीन गव्हर्नर बार्टल फ्रियरने संरक्षक भिंत पाडून फोर्टच्या कक्षा वाढवल्या. अनेकांनी गजबजलेल्या फोर्ट परिसराबाहेर जाणे पसंत केले. धनिकांनी समुद्रकिनाऱ्याजवळचा वाळकेश्वर परिसर निवडला, तर काहींनी भायखळा व परळ येथील प्रशस्त जागेत जाणे पसंत केले. चर्चचे व्यवस्थापकीय विश्वस्त, आर्किटेक्ट ख्रिस्तोफर गोम्स यांनी चर्चची उभारणी आणि पुनरुज्जीवन यांबाबतची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम या जागेत निवासी शाळा सुरू झाली. प्रत्येक रविवारी विद्यार्थ्यांना दक्षिण मुंबईतील सेंट थॉमस चर्चमध्ये जावे लागत असे. त्या काळात भायखळा ते फोर्ट प्रवास खडतर होता. म्हणून तत्कालीन गव्हर्नर माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टनने (१८१९-१८२७) चर्च बांधण्याच्या कामगिरीला सुरुवात केली. या चर्चचा पायाभरणी समारंभ तत्कालीन गव्हर्नर अर्ल ऑफ क्लेयर यांच्या हस्ते करण्यात झाला होता. १९ ऑगस्ट १८३३ रोजी हे चर्च ख्रिस्तधर्मीयांच्या प्रार्थनेसाठी खुले करण्यात आले. पुढे या रस्त्याला ‘क्लेयर रोड’ असे नाव देण्यात आले. हे प्रार्थनास्थळ ‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’च्या आधिपत्याखाली चालते. चर्चचे बांधकाम कोलकाता येथील पब्लिक अँड बॉम्बे एज्युकेशन सोसायटीने दिलेल्या निधीतून झाल्याचे समजते.

ओबेलिक्ससौंदर्यपूर्ण आराखडा
भायखळा ख्रिस्त चर्चचा आराखडा नियो- क्लासिकल शैलीतील असून, चर्चव्यवस्थेतील पारंपारिकदृष्ट्या चालत आलेल्या मोजक्या व अत्यावश्यक मूलभूत घटकांतून साकारला आहे. चर्चच्या प्रवेशद्वाराजवळील बाह्य व्हरांड्यात डोरीक शैलीतील अर्धगोलाकार खाचणी केलेले, चार उंच स्तंभ भरभक्कमतेचा संदेश देतात. चर्चच्या दर्शनी भिंतीच्या मध्यावर १६ फूट उंच व आठ फूट रुंद लाकडी दरवाजा आणि त्याच उंचीच्या लाकडी खिडक्या आहेत. गर्दीच्या वेळी अतिरिक्त उपासकांना प्रवेशद्वारातूनच पोटमाळ्यावर जाण्यासाठी प्रशस्त वक्राकार लाकडी जिना आहे. याच जागेतून घड्याळाच्या दुरुस्तीसाठी आणि घंटाघरापर्यंत जाण्याची सोय आहे. 

(डावीकडे) प्रार्थना बैठक (Nave) आणि (उजवीकडे) वेदी (Altar)

चर्चच्या मध्यवर्ती प्रवेशद्वाराजवळ सर्वप्रथम धर्मोपदेशकांची खोली (Room for Reverend), वस्त्रे ठेवण्याची खोली (Vestry), प्रार्थना बैठक (Nave), वेदी (Altar) अशी क्रमवार रचना आहे. प्रार्थनागृहात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम नजरेत भरतात ते आयताकृती प्रार्थनागृहावरील छताचे वजन पेलणारे कोरिन्थियन (Corinthian) शैलीतील बारा ओतीव लोहस्तंभ. ते युरोपहून आयात करण्यात आले आहेत. लोहस्तंभाचा शिखरभाग (Corinthian Capital) विशिष्ट पद्धतीने सोनेरी रंगात रंगवला आहे. अशाच प्रकारचे लोहस्तंभ एशियाटिक लायब्ररीच्या बिल्डिंगसाठीसुद्धा वापरले आहेत. ऑल्टर भागात कोरिन्थियन लोहस्तंभ नसून, तो विटांच्या साह्याने बनवला आहे. शिखरभाग लाकडाचा असून, तो गोल्ड लीफ पद्धतीने रंगवला आहे. या दोन्ही गोष्टी सहजी ध्यानात येत नाहीत! आयताकृती प्रार्थनागृहातील आसनव्यवस्थेतील नीटनेटकेपणा, स्वच्छता, भरपूर प्रकाश व खेळती हवा, शांततामय पवित्र वातावरण आणि इतर घटकांमुळे उपासक नतमस्तक होतो. शिखरभागाचा सोनेरी रंगातील आभास वगळता इतरत्र कुठेही व्यापारी ऐश्वर्याचा भपका जाणवत नाही; जाणवते ती ईश्वरसमीप नेणारी शांतता! पुनरुज्जीवनात छत, स्टेनग्लास, ओबडधोबड बसॉल्ट लादी पॉलिश, रंग इत्यादी घटकांचा समावेश असून, त्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

कोरिन्थियन कॅपिटल

छत : आयताकृती प्रार्थनागृहावरील छत तीन भागांत विभागले आहे. छताचा आकार साधारण १०३ बाय ६५ फूट असून, मध्य छत जवळपास १० फूट उंच आहे. १२ ओतीव लोहस्तंभ (Cast iron) आणि ३४ इंच जाड भिंतीवर लाकडी कैचीच्या आधारे मंगलोरी छताचे वजन पेलले आहे. ओतीव लोहस्तंभावरील भरभक्कम आडव्या लाकडी तुळया, ‘लाथ सीलिंग’ आणि बाह्य भिंतीचा बराचसा भाग अनेक वर्षांच्या गळतीमुळे ओलसर झाला होता. त्यामुळे एकूण संरचनात्मक डागडुजी करणे अत्यावश्यक ठरले. छताच्या तळभागातील ‘लाथ प्लास्टर सीलिंग’ (लाकडी कैचीच्या तळाशी ठरावीक अंतरावर पातळ लाकडी पट्ट्या बसवून दोन्ही बाजूंना चुना मिश्रित लगद्याच्या लेपनातून साधलेले फॉल्स सीलिंग) या पद्धतीमुळे अर्धगोलाकार व इतर क्लिष्ट आकारही उत्तमरीत्या बनतात. दीर्घकाळ टिकून राहण्याच्या क्षमतेमुळे ही पद्धत अनेक वर्षे टिकून होती.

चर्चचा १९व्या शतकातील फोटो आणि चर्चमधील पाइप ऑर्गन वाजवत असतानाचा जुना फोटो.

सर्वांत आश्चर्याची बाब म्हणजे आरोग्याला घातक अशा कार्बन डाय ऑक्साइडच्या उत्सर्जनाकरिता वायुविजनाची व्यवस्था छतामध्ये तीन ठिकाणी तयार केली असल्याचे डागडुजी करतेवेळी दिसून आले. वर्तमान वातानुकुलित व्यवस्थेतील संभाव्य व्यवस्था त्या काळातही गृहीत धरली होती, हे यातून स्पष्ट होते. अति पुरातन इमारतीची डागडुजी अतिशय काळजीपूर्वक करणे भाग असते. वास्तुसंवर्धन वास्तुविशारद विकास दिलावरी यांच्या टीममधील अनुभवी स्थापत्य सल्लागार किरण भावसार यांनी संरचना पुनरुज्जीवनाचे काम अतिशय कुशलतेने अआणि काळजीपूर्वक हाताळले. त्यामुळे ते कौतुकास पात्र आहेत, अशी भावना व्यवस्थापकीय ख्रिस्तोफर गोम्स यांनी व्यक्त केली. चर्चचे अध्यक्ष रुडॉल्फ वुडमन यांनी जातीने लक्ष घातल्यामुळेच हे काम तत्परतेने होऊ शकले, हे त्यांनी आवर्जून सांगितले.

चर्चमधील स्टेनग्लासचा वापर

स्टेनग्लास : चर्चच्या पूर्वेकडील भिंतीच्या मध्यवर्ती भागातील स्टेनग्लास उपासकाचे लक्ष वेधून घेतात. मध्ययुगीन काळातील (१०वे ते १६ वे शतक) चर्चमध्ये प्रतीकांद्वारे सजावटीतून दर्शकाचे लक्ष वेधून घेण्यासाठी रंगीत काच अथवा रंगलेपन केलेल्या काचेचा वापर करण्यास सुरुवात झाली. अनेक गडद व फिकट रंगांच्या एकत्रीकरणातून साधलेल्या मिश्र कलाकृतीला ‘स्टेनग्लास’ असे नाव पडले. विविध रंगांनी नटलेली स्टेनग्लास स्पेन्सर क्रॉम्प्टन यांनी सन १८७०मध्ये भेट दिली आहे. ही स्टेनग्लास हे. जे.स्कॉट यांनी बनवला आहे. त्याच्या डागडुजीचे काम करण्यात आले. शांत जागेत मूक रंग बोलतात, याची प्रचीती घ्यायची असेल तर यासारखी दुसरी जागा नसावी! यासाठी घट्ट तारेच्या सांगाड्यात काचेच्या तुकड्यांचा वापर करून प्रतीकांच्या द्वारे कल्पना व्यक्त केल्या जात असत. या प्रतीकात मानवी आकृत्या किंवा कलाकृतींचे वेगवेगळे आकार जोडण्यासाठी बांधक म्हणून शिसे वापरले जाते. पांढऱ्या रंगाच्या सान्निध्यात नैसर्गिक अथवा विजेच्या प्रकाशात हे रंग आणखी उजळून दिसतात. चर्चमधील स्टेनग्लास आकृत्यांतून साधलेले आकार सात्त्विक विचारांना पोषक, तर रंग भावनांच्या जवळचे वाटतात. पूर्वेकडील भिंतीच्या डाव्या कोपऱ्यातील स्टेनग्लास जॉन रँडल्स ग्रीव्ह यांनी समर्पित केला आहे. या स्टेनग्लासमधील संदेशचित्र खूपच सात्विक व बोलके आहे. प्रार्थनागृहाच्या पूर्वेकडील मध्य भिंतीला लागून असलेल्या उंच व्यासपीठाला ऑल्टर (Altar) म्हणतात. ही जागा पवित्र मानली जाते. या जागेवरून धर्मगुरू उपासकांना उपदेश देतात. डाव्या बाजूला धर्मोपदेशकांना बसण्याचे आसन आणि महोगनी लाकडात नक्षीकाम केलेले बायबल उघडून ठेवण्यासाठीचे उच्चपीठ (Lectern) ठेवले आहे.

(डावीकडे) मार्बल शिल्पे, पोटमाळा, प्लूटेड स्तंभ आणि (उजवीकडे) चर्चमधील बैठक (Pews) व बसॉल्ट लादी

वक्राकार जिना

रंगसौंदर्य : डागडुजीअगोदर चर्चचे बाह्यांग मातकट गुलाबी रंगामुळे नीरस दिसत असे. परंतु पुनरुज्जीवनानंतर शुभ्र पांढऱ्या रंगातील चर्चचे अंतर्बाह्य सौंदर्य उजळून दिसते आणि जणू काही ही वास्तू वर्तमानात बनवली असावी, असेच वाटते! वास्तविक पाहता सर्व रंग मूलत: सुंदर व शुद्ध असतात. त्यातल्या त्यात पांढऱ्या रंगात सदाफुलीच्या फुलासारखी मृदुता आहे. पांढरा रंग मन प्रसन्न करणारा व विशुद्ध आहे. म्हणून अत्यंत पवित्र मानला जातो.

विद्युत प्रकाश योजना : चर्चच्या दक्षिण-उत्तर बाह्य भिंतीवरील खिडक्या पावसाळी पाण्यापासून सुरक्षित राहाव्यात, म्हणून अनेक पदरी ठिबक मूसचा (Drip mould) कलात्मकतेने वापर केला आहे. संवर्धन वास्तुविशारदाने प्रार्थनास्थळाचे सूर्यास्तानंतरचे सौंदर्य आधुनिक एलईडी ट्यूबलाइट्सचा खुबीने वापर करून खुलवले आहे!

वारसा ठेवा असलेला पाइप ऑर्गनवारसा ठेवा असलेला पाइप ऑर्गन (Pipe organ) : चर्चमधील मोठ्या आकाराचा पाइप ऑर्गन शंभर वर्षांहून अधिक जुना आहे. तांत्रिक बिघाड असल्याकारणाने तो सध्या बंद आहे. त्या काळात अशा प्रकारचे संगीत वाद्य चर्चमध्ये असणे प्रतिष्ठेचे समजले जात असे. मुंबईतील फक्त पाच चर्चमध्ये अशी वाद्ये आहेत. त्यापैकी सेंट जॉन्स चर्चमधील पाइप ऑर्गन आजही सुरू आहे. बाकी ठिकाणची वाद्ये या ना त्या कारणांमुळे बंद आहेत. हे वाद्य वाजवण्याचे ज्ञान असलेले वादकही अत्यंत कमी आहेत! खर्चिक असले तरी लवकरच हा पुरातन ठेवा दुरुस्त करण्याची योजना असल्याचे गोम्स यांनी सांगितले.

मार्बल शिल्पे : प्रार्थनागृहाच्या भिंतीवरील संगमरवरी दगडातील शिल्पे (Marble plaque) अप्रतिम आहेत. त्या काळी नैसर्गिक आपत्तीसारख्या कारणांमुळे बालके अकाली मृत्युमुखी पडत. अशी बालके व स्त्रियांचे चित्रण या शिल्पातून केले आहे. जागेच्या अभावामुळे अशी शिल्पे लावण्याची प्रथा बंद करण्यात आली आहे. उत्तरेकडील पोर्चजवळ बाप्तिस्माची (बालक नामकरणविधी) जागा आहे.

वास्तुसौंदर्य : वास्तूच्या आरेखनात रेषांना खूप महत्त्व असते. सरळ, साध्या व मोजक्या रेषेतील आरेखन, मानवी दृष्टिकक्षेत मावणारा आकार व शुभ्र पांढऱ्या रंगामुळे मूळ वास्तूतील बारकाव्यांचे सौंदर्य उजळून ही वास्तू प्रसन्न वाटते. या सर्व बाबींचा विचार करून मुंबई महानगरपालिकेने या वास्तूची ‘ग्रेड-३’मध्ये वर्गवारी केली आहे.
रुढीबद्ध व्यापारी प्रलोभनास महत्त्व न देता प्रार्थनास्थळाला आवश्यक असणाऱ्या शांततेला अधिक महत्त्व असते, याची प्रचीती ख्रिस्त चर्च परिसरात येते. माझ्या मते, व्यवस्थापकीय मंडळ व संवर्धन वास्तुविशारद यांच्यात समन्वय असेल, तर चिंताजनक स्थितीतील वास्तूंचे पुनरुज्जीवन चांगल्या प्रकारे होऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे! एकेकाळी दाट वृक्षांनी समृद्ध असलेल्या शांत परिसरात ख्रिस्त चर्च उभारण्यात आले होते, ती शांतता वर्तमानातही टिकून आहे. सर्वप्रथम, मूळ ख्रिस्त चर्चच्या अज्ञात रचनाकाराचे कौतुक! मूलत: सुंदर असलेल्या वास्तूला अधिक उजाळा देण्याचे कार्य करणे म्हणजे कल्पनांची पूर्तता (Idea realization) करण्यासारखे आहे, असे मला वाटते. त्यानंतर, ख्रिस्त चर्चचे संवर्धनकार्य कुशलतेने (Smartly) केल्याबद्दल संवर्धन वास्तुविशारद विकास दिलावरी आणि टीमचे मन:पूर्वक अभिनंदन. १८३ वर्षांच्या ख्रिस्त चर्चने आजतागायत जपलेले कला-सौंदर्य व वास्तूचे महत्त्व ओळखून ‘युनेस्को’ने यंदाचा गुणवत्ता पुरस्कार या वास्तूला जाहीर केला असावा, हे यातून दिसते. म्हणून त्यांचेही आभार!!

ई-मेल : चंद्रशेखर बुरांडे - fifthwall123@gmail.com

ख्रिस्त चर्चचा नितांतसुंदर अन् शांत परिसर
(‘युनेस्को’चा पुरस्कार मिळालेल्या ‘बोमनजी होरमर्जी वाडिया फाउंटन अँड क्लॉक टॉवर’बद्दलचा लेख वाचण्यासाठी येथे आणि ‘वेलिंग्टन फाउंटन’बद्दलचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search