Next
कुशल व्यवस्थापक
सुरेखा जोशी
Sunday, March 11, 2018 | 06:30 PM
15 0 0
Share this story

कुटुंबातल्या जबाबदाऱ्या पार पाडताना उत्तम व्यवस्थापन कौशल्य दाखवून देणाऱ्या स्त्रियांनी व्यावसायिक क्षेत्रातल्या व्यवस्थापनातही आघाडी घेतली आहे. छोट्या उद्योगांबरोबरच मोठे उद्योगही त्या समर्थपणे सांभाळत आहेत. आपल्या उद्योग-व्यवसायाला त्यांनी एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. राजकारणातही केवळ दिखाऊ चेहरा एवढीच आपली ओळख मर्यादित न ठेवता, बदल घडवण्याची ताकद आपल्यात आहे, हे स्त्रियांनी सिद्ध केलं आहे. ‘पहिलं पाऊल टाकणाऱ्या तेजस्विनी’ या लेखमालेच्या सहाव्या नि शेवटच्या भागात माहिती घेऊ या उद्योग-व्यवसाय आणि राजकीय क्षेत्रातल्या महिलांची माहिती...

किरण मुजुमदार शॉ
जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या ‘बायोकॉन’च्या अध्यक्ष किरण मुजुमदार शॉ यांनी फोर्ब्ज मासिकाच्या प्रभावशाली महिलांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. शंभर कोटींची उलाढाल असलेला उद्योग समर्थपणे सांभाळणाऱ्या त्या देशातल्या पहिल्या उद्योजिका आहेत. ‘बायोकॉन’च्या यशात किरण यांच्या दूरदृष्टीचा वाटा मोठा आहे. ‘टाइम’ मासिकानंही त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन, त्यांना जगातल्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान दिलं. ‘दी गिव्हिंग प्लेज’ या सामाजिक उपक्रमाशी संबंधित असलेल्या किरण यांनी आपली किमान अर्धी संपत्ती लोककल्याणासाठी दान करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 

सिद्धी कर्नानी :
उच्च दर्जाचं, भेसळमुक्त, रसायनविरहित खाद्यान्न लोकांना देता यावं, या उद्देशानं सिद्धी कर्नानी यांनी सेंद्रिय अन्नविषयक देशातला पहिला ‘स्टार्टअप’ सुरू केला. संपूर्णपणे सेंद्रिय शेती करणारं देशातलं पहिलं राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिक्कीममधल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचं काम त्यांच्या कंपनीनं केलं. ईशान्येकडच्या राज्यांमधल्या शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी हा उद्योग सुरू केला. विविध उद्योग संघटनांनी फिक्की मिलेनियम अलायन्स, नॅशनल अॅग्रीप्रेन्युअर्स आणि इंडियन अॅग्रीबिझनेस एक्सलन्स यांसारखे पुरस्कार देऊन त्यांच्या कामाचा गौरव केला आहे. 

राधिका अग्रवाल :
राधिका अग्रवाल ‘शॉपक्ल्यूज’ या ऑनलाइन शॉपिंग व्यवसायाच्या सहसंस्थापक आहेत. पाच वर्षांच्या आत त्यांनी आपल्या व्यवसायाची उलाढाल शंभर कोटी डॉलर्सवर पोहोचवली. यात त्यांची कामाची अनोखी पद्धत, योग्य धोरण आणि कौशल्य हेरून त्याला संधी देण्याची वृत्ती या गुणांचा वाटा मोठा आहे.  सुमारे पाच लाख व्यापारी त्यांच्या या व्यवसायाशी जोडले गेले आहेत. देशात तीस हजारांहून अधिक ठिकाणी त्यांच्या व्यवसायातर्फे सेवा पुरवली जाते. 

पूजा वारियर :
‘अनएलटीडी इंडिया’ ही पूजा वारियर यांची कंपनी, समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी काम करणाऱ्या प्राथमिक अवस्थेतल्या सामाजिक संस्थांना मदत पुरवण्याचं काम करते. पूजा या कंपनीच्या सहसंस्थापक आणि संचालक आहेत. कामासाठी निधी उभारणं, कार्यकर्ते मिळवणं आणि या संस्थांना त्यांच्या प्रवासात मदत करू शकतील अशा व्यक्तींसंबंधात मार्गदर्शन करणं इत्यादी प्रकारे मदतीचा हात देऊन, पूजा यांची कंपनी या संस्थांच्या बदलाच्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यास हातभार लावते. या कामासाठी त्यांना २००९मध्ये ‘टेड इंडिया फेलो’ म्हणून नामांकन मिळालं होतं. २०१३मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा ‘यंग ग्लोबल लीडर’ हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

उर्वशी बुटालिया :
उर्वशी बुटालिया यांनी १९८४मध्ये ‘काली फॉर वुमन’ ही प्रकाशन संस्था सुरू केली. केवळ स्त्री विश्वावर आधारित साहित्य प्रकाशित करणारी ही देशातली पहिलीच प्रकाशन संस्था आहे. महिला लेखक, शिक्षणतज्ज्ञ यांना व्यक्त होण्यासाठी एक मंच मिळवून देणं, अविकसित देशांमधल्या महिलांच्या स्थितीबाबत जगाला माहिती देणं आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडणं, या उद्देशानं या प्रकाशन संस्थेची स्थापना करण्यात आली. देशाच्या फाळणीवर आधारित ‘दी अदर साइड ऑफ सायलेन्स’ हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक काही विद्यापीठांच्या अभ्यासक्रमाचा भाग बनलं आहे.

उपासना टकू :
उच्च शैक्षणिक कौशल्य आत्मसात केलेल्या उपासना यांनी सुरुवातीला अमेरिकेत ‘एचएसबीसी’ आणि ‘पे पल’ या वित्तसंस्थांसाठी काम केलं. भारतात आल्यावर त्यांनी ‘मोबिक्विक’ ही पेमेंट स्टार्टअप कंपनी सुरू केली. पेमेंट स्टार्टअप सुरू करणाऱ्या त्या देशातल्या पहिल्या उद्योजिका आहेत. ‘असोचेम’नं ‘बिझनेस वुमन ऑफ दी इयर’ पुरस्कार देऊन आणि फोर्ब्ज मासिकानं २०१६चा ‘एशियाज वुमन टू वॉट वॉच’ हा किताब देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला आहे.

चेतना सिन्हा :
देशातली पहिली ग्रामीण महिला बँक सुरू करणाऱ्या चेतना सिन्हा ‘माणदेशी महिला बँक’ आणि ‘माणदेशी फाउंडेशन’च्या प्रमुख आहेत. माणदेशातलं वास्तव समजून घेऊन त्यानुसार त्यांनी आपली धोरणं ठरवली. त्यामुळे त्यांच्या कामाला ग्रामीण महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. विविध संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे. ग्रामीण महिलांसाठी त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन केंद्र सरकारच्या महिला आणि ग्रामीण विकास मंत्रालयानं त्यांची राष्ट्रीय महिला कोशाच्या प्रशासकीय मंडळावर नियुक्ती केली आहे. 

चित्रा रामकृष्ण :
शेअर बाजार ही बहुतांशी पुरुषांची मक्तेदारी; पण आपल्या व्यावसायिक कौशल्याच्या बळावर चित्रा रामकृष्ण यांनी या क्षेत्रातही महिलांचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं. २०१३ ते २०१६ या कालावधीत त्यांनी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलं. ‘एनएसई’च्या प्रमुखपदी नेमणूक झालेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. एनएसईला जगातला दुसऱ्या क्रमांकाचा भांडवली बाजार म्हणून ओळख मिळवून देण्यात चित्रा रामकृष्ण यांचा मोलाचा वाटा आहे. आर्थिक व्यवस्थापन आणि गुंतवणूक या क्षेत्रांमधलं त्यांचं कौशल्य वादातीत आहे. 

देवयानी घोष :
देवयानी घोष ‘नॅसकॉम’ या माहिती तंत्रज्ञान औद्योगिक संघटनेच्या प्रमुखपदी नियुक्ती झालेल्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. ‘इंटेल’ कंपनीतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलेल्या देवयानी यांनी कंपनीच्या अनेक महत्त्वाच्या कामांत नेतृत्व केलं आहे. सध्या त्या ‘इंटेल’च्या दक्षिण आशिया विभागाच्या विपणन उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. एप्रिल २०१८मध्ये त्या ‘नॅसकॉम’च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील.

डॉ. स्वाती पिरामल :
‘असोचेम’ या देशातल्या प्रमुख औद्योगिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान डॉ. स्वाती पिरामल यांना मिळाला आहे. सार्वजनिक आरोग्य आणि संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ. पिरामल उद्योजिका असण्याबरोबरच शास्त्रज्ञसुद्धा आहेत. ‘पिरामल इंडस्ट्रीज’च्या संचालिका म्हणून काम करतानाच त्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि आर्थिक धोरण या विषयाच्या पंतप्रधानांच्या सल्लागार म्हणूनही काम केलं आहे. 

नैनालाल किडवई :
नैनालाल किडवई ‘फिक्की’ या औद्योगिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या पहिल्या महिला आहेत. ‘मॅक्स फायनान्शिअल सर्व्हिसेस’च्या अध्यक्षा असलेल्या नैना नेस्ले, सिप्ला, लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांच्या नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणूनही काम पाहतात. २००६मध्ये एचएसबीसी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. खासगी बँकेच्या प्रमुखपदी नियुक्ती झालेल्या त्या देशातल्या पहिल्याच महिला आहेत. 

शोबना कामिनेनी :
‘सीआयआय’ या औद्यौगिक संघटनेच्या अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला म्हणजे शोबना कामिनेनी. त्या अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेडच्या कार्यकारी उपाध्यक्षा आहेत. उपाध्यक्षा म्हणून काम करताना, त्यांनी या उद्योगाचा भारतभर विस्तार केला. ‘अपोलो म्युनिक हेल्थ इन्शुरन्स’ची सुरुवात त्यांनी केली. भारतात एनसीडी अर्थात असांसर्गिक, परंतु दीर्घकालीन आजारांबाबत शिक्षण देण्याचं आणि त्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचं काम त्यांनी स्थापन केलेली ‘बिलियन हार्टस् बीटिंग फाउंडेशन’ ही संस्था करत आहे. 

नीलू रोहमेत्रा :
नीलू रोहमेत्रा हिमाचल प्रदेशातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’च्या संचालिका आहेत. आयआयएम संस्थेच्या त्या पहिल्याच महिला संचालक आहेत. आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत त्यांनी पाच सुवर्णपदकं मिळवली आहेत. ऑक्सफर्डमधल्या ‘ईएपी मॅनेजमेंट स्कूल’मध्ये त्या व्हिजिटिंग फेलो म्हणून काम करतात. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. 

भारती लव्हेकर :
भारती लव्हेकर या बहुआयामी सामाजिक कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत. पंचवीस वर्षांहून अधिक काळ त्या समाजकार्य करत आहेत. मुंबईतल्या वर्सोव्याच्या आमदार असलेल्या भारती लव्हेकर देशात सॅनिटरी पॅड बँक सुरू करणाऱ्या पहिल्या महिला आहेत. स्त्री भ्रूणहत्या, स्त्रियांचं आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांनी ‘टी फाउंडेशन’ची स्थापना केली. या टी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी शाळांमध्ये, तसंच सार्वजनिक ठिकाणी सॅनिटरी पॅड एटीएम आणि डिस्पोजल मशिन्स बसवली आहेत. या फाउंडेशनतर्फे शाळांमधून मुलींना ‘मेन्स्ट्रुअल हेल्थ किटस्’ दिली जातात. 

छवी राजावत :
छवी राजावत ही राजस्थानमधल्या सोडा गावची सरपंच असून, सरपंचपद भूषविणारी ती देशातली पहिली महिला आहे. पुण्यातल्या महाविद्यालयातून एमबीए केलेल्या छवीनं आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या गावाच्या विकासासाठी करण्याचा निर्णय घेतला. गावाचा सर्वसमावेशक, शाश्वत विकास करून, आपलं गाव इतर गावांसाठी विकासाचं मॉडेल बनवायचं, हे तिचं स्वप्न होतं. हे स्वप्न सत्यात आणण्यासाठी तिनं २०१०मध्ये राजकारणात प्रवेश केला. ‘थिंक ग्लोबल, अॅक्ट लोकल’ ही संकल्पना तिनं प्रत्यक्षात आणून दाखवली आहे. 

(महिला दिनाबद्दलचे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील सर्व विशेष लेख https://goo.gl/zuvB57 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत. या महिलांबद्दलचा सोबतचा व्हिडिओ जरूर पाहा.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link