Next
रोपळेमध्ये आढळला ‘स्वर्गीय नर्तक’
BOI
Friday, March 23, 2018 | 04:07 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील रोपळे (ता. पंढरपूर) परिसरात नुकताच स्वर्गीय नर्तक हा देखणा व या भागात दुर्मीळ असलेला पक्षी आढळून आला. हा देशाच्या नैर्ऋत्य भागातील स्थानिक पक्षी असून, अन्य भागांत तो स्थलांतरी पक्षी म्हणून आढळतो.

रोपळे भागात घनदाट झाडीत हा पक्षी नुकताच आढळला. मानेपासून डोक्यावरील तुऱ्यापर्यंतचा संपूर्ण भाग गडद काळा, चमकदार डोळे, चोच छोटी, पण तीही काळीच, मानेपासून शेवटपर्यंतचा भाग पूर्ण पांढऱ्या रंगाचा आणि टोकाला दुभंगलेली पण सुमारे एक ते दीड फूट लांबीची असे या पक्ष्याचे रूप असते. रोपळे गावात आढळलेला पक्षी नर जातीचा होता. झाडावर बसल्यावर लोंबणारी त्याची शेपटी तलवारीच्या पात्याप्रमाणे दिसते. झाडाच्या फांद्यांवर उड्या मारताना तो जणू नृत्यच करत असल्याचे दिसते. त्याला इंग्रजीत इंडियन पॅराडाइज फ्लायकॅचर असे म्हणतात आणि Terpsiphone paradise हे त्याचे शास्त्रीय नाव आहे.

तो हवेतून उडताना त्याच्या शेपटीचा ‘फुर्र...’ असा अवाज येत असल्यामुळेच त्याला रॉकेट बर्ड किंवा रिबन बर्ड म्हणूनही ओळखले जात असल्याचे अकलूज येथील पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी सांगितले. ते म्हणाले, स्वर्गीय नर्तक हा स्थानिक स्थलांतरित पक्षी आहे. काश्मीरच्या खोऱ्यात जास्त प्रमाणात आढळतो. झाडांच्या दोन फांद्यांच्या बेचक्यात गवताच्या पानाच्या साहाय्याने तो घरटी बांधतो. घरट्यांचा आकार कपासारखा दिसतो. त्यात त्याची मादी तांबूस तपकिरी ठिपकेदार पट्टे असलेली लालसर रंगाची तीन ते चार अंडी घालते. नर व मादी दोघेही त्यांचे रक्षण करतात. आपल्या भागात हा पक्षी अतिशय दुर्मीळ आहे. केरळ, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, हिमालय व बेळगावच्या जंगलात त्याचा वावर अधिक आहे.’ 

हिंदीत याला शाहबुलबुल व दूधराज अशी नावे आहेत. तो ‘चिंचीक...चिंचीक...’ अशी हर्ष निर्माण करणारी शीळ घालतो. (या पक्ष्याचा आवाज ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.) गवताच्या साहाय्याने तयार केलेल्या त्याच्या घरट्याला वरून शेण किंवा चिखलाने लिंपून घेतल्यामुळे त्याचे घरटेही देखणे दिसते. पानगळीच्या जंगलातही तो आढळत असून, फेब्रुवारी ते जुलैदरम्यान त्याचा विणीचा हंगाम असतो. कीटक व माशा हे त्याचे प्रमुख खाद्य. मध्य प्रदेशातील बांधवगड अभयारण्यात त्याचा मोठा वावर असून, मध्य प्रदेशचा तो राज्यपक्षी आहे. महाराष्ट्रात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात यांची घरटी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. तसेच पन्हाळा परिसरातही तो स्थलांतर करून येतो. रोपळे परिसरात स्वर्गीय नर्तक पक्षी दिसल्याने स्थानिक पक्षिप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फिटले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
पंढरीनाथ माळी About 360 Days ago
खूप छान पक्षी आहे . नेत्रसुखद आहे
0
0
अरविंद कुंभार About 360 Days ago
सामान्यपणे हे पक्षी जोडीने दर वर्षी वसंत ऋतूमध्ये सोलापूर परिसरात येतात. या पक्षातील नर स्वर्गीय नर्तक पक्षी सहजासहजी नजरेस पडत नाही. ज्यांना दर्शन देतील ते नशीबवान ठरतील. .
0
0

Select Language
Share Link